फारकत - मराठी कविता

फारकत, मराठी कविता - [Separation, Marathi Kavita] फारकत घेतलीए आम्ही, मी आणि माझ्या अंतरात्म्याने.
फारकत - मराठी कविता | Separation - Marathi Kavita

फारकत घेतलीए आम्ही, मी आणि माझ्या अंतरात्म्याने

We are separated...
My inner soul and me.
फारकत घेतलीए आम्ही
मी आणि माझ्या अंतरात्म्याने!
कधीकाळी माझं जिवलग मीत्र होतं
तेच आता मला परकं झाला आहे!

संवादच तुटलाय आमचा
माझा, माझ्या मनाशी...
ऐहीक लोकप्रियतेच्या शिखरावर
पोहोचताना...
सत्याची, निस्पृहतेची, तत्त्वांची
कास धरणाऱ्या माझ्या मूर्ख हट्टी मनाला...
कधीचं अंतर दिलं आहे मी!

कशाला बोलावं मी त्याच्याशी?
लौकीक यशाकरता मी केलेल्या
रास्त तडजोडी मान्य नाहीत त्याला...
पैसा, प्रसिद्धी, सत्तेच्या, ... च्या सोनेरी मखरात
सजुन बसलेली असते मी त्या वेळी
अडगळीच्या कोपऱ्यात बसलेल्या
त्याच्या चेहर्‍यावर असतं
एक उपहासाचं, छद्मी तुच्छ हास्य!

एकांताची देखील भिती
वाटायला लागली आहे आताशा...
कधी संधी साधून झडप घालेल
माझ्यावरती... काळोखाच्या सावली सारखं?
दाखवत राहिल माझ्या असंख्य चुका...
माझी दुरावलेली नाती...
माझे जुने सप्नाळू धेय्यवेडे दिवस...
माझे तत्त्वनिष्ठ आदर्शवादी विचार...
भूकेत, उपासमारीत घालवलेल्या अनेक रात्री
माझा संघर्ष, ती तत्व जपण्यासाठी केलेली
केविलवाणी धडपड!

त्याच्याशी पुन्हा जवळीक?
जवळपास अशक्य आहे ते आता!
माझ्या झगमगीत यशस्वीतेची
जाड-उबदार कातडी खेचत...
त्याची जिवघेणी लक्तरं
वेशीवर टांगून , बाजर बसवी सारखं...
विवस्त्र करेल ते मला...
माझ्याच नजरेत!

आजूबाजूच्या मुखवट्यांच्या... गर्दीच्या
कोलाहलात मीसळून जाते मी हल्ली
मनातल रीकामपण भरायला...
शोधत राहते असंख्य कौतुकाची तोंडं,
जी खांद्यावर उचलून धरतात मला!
पुजतातं माझ्या बाह्य प्रतिमेला!

कानांनी ऐकायचा बंद केलाय...
अंतरात्म्याचा अस्फुट आवाज...
कधीतरी त्याची शेवटची तडफड
जाणवून ही... दूर्लक्ष करायला शिकले आहे मी
कारण त्याचं जाग्रृत असणं...
माझ्या लौकीक असण्याला...
घातक आहे!

म्हणूनच फारकत घेतली आहे
मी माझ्या अंतरात्म्याशी
कायमची!


स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.