साथिया भाग १ (गुरुपौर्णिमा) - मराठी कथा

साथिया भाग १,मराठी कथा - [Sathitya Part 1,Marathi Katha] कृष्ण युध्दात अर्जुनाचा सारथी होता तर संभ्रमित अवस्थेत असलेल्या अर्जुनाला गीता सांगितली होती.
साथिया भाग १ - मराठी कथा | Sathiya Part 1 - Marathi Katha

कृष्णाने युध्दात अर्जुनाचं सारथ्य केलं होतं, कुरुक्षेत्रावर संभ्रमित अवस्थेत असलेल्या अर्जुनाला गीता सांगितली होती


गुरुपौर्णिमा
२०२० - मुंबई

“Students Talks” हा महाविद्यालयीन मुलांनी सुरु केलेल्या गुरुपौर्णिमेच्या वेबिनार मधलं भाषण रंगात आलं होतं...

माझ्या मित्रांनो!
गु शब्दस्तु अंधकारः स्यात् रु शब्दस्तन्निरोधकः ।
अंधकारनिरोधत्वात् गुरु इति अभिधीयते ॥

‘गु’कार म्हणजे अज्ञानरूपी अंधकार आणि ‘रु’कार म्हणजे त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज; म्हणून गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधकार घालविणारा. “गुरु म्हणजे एखाद्या प्रिझम सारखा असतो. सूर्यप्रकाश प्रत्येकालाच दिसतो पण जेव्हा प्रकाश किरण प्रिझम मधुन जातात तेव्हा तुम्हाला त्यातले सप्तरंग दिसायला लागतात.”

गुरु तुम्हाला काय बघायचं ते सांगत नाही, पण बघायचा दृष्टिकोन निर्माण करतो. तुमच्या इच्छीत लक्षापर्यंत पोहोचायला मदत करतो. कोणाला गुरु मानावं ह्याचे जरी संकेत असले तरी भेटणारी प्रत्येक व्यक्ती, घडणारी प्रत्येक घटना, येणारा प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जाते, आपल्या आयुष्यात बदल घडवते..., निसर्गातला प्रत्येक जिवीत कण तुम्हाला शिकवत असतो, ग. दि. मा. म्हणतात त्याप्रमाणे...

बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु
झाडे, वेली, पशु, पाखरे, यांशी गोष्टी करू
बघू बंगला या मुंग्यांचा,सूर ऐकुया त्या भुंग्यांचा
फुलाफुलांचे रंग दाखवित, फिरते फुलपाखरू
हिंडू ओढे, धुंडू ओहळ,झाडावरचे काढू मोहळ
चिडत्या, डसत्या मधमाश्यांशी, जरा सामना करू

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, ऐन दुपारी पर्‍ह्यात पोहू. सायंकाळी मोजु चांदण्या, गणती त्यांची करू. जेव्हा नैराश्य येतं, मनात अंधकार होतो, रस्ता सापडत नाही. त्यावेळी गुरू चे स्मरण करा तुम्हाला रस्ता नक्की सापडेल. आजच्या कठीण आणि अंधंकारमय वातावरणात तोच तुम्हाला आशेचा दिवा तुम्हाला दाखवेल. This too shall pass. We will have bright future… ही खात्री तुमच्या मनात निर्माण करेल!

तुम्ही भारतभरातल्या तरुण मुलांनी विचार आदान प्रदानाचं हे जे व्यासपीठ निर्माण केलं आहे त्यावर मला माझे विचार व्यक्त करायची संधी दिलीत या बद्दल तुमचे शतशः आभार! Thank you my friends and I wish you all the best!

टाळ्यांच्या कडकडाट आजच्या वक्त्यांने भाषणाचा समारोप केला आणि वेबिनार नंतर त्यांच्या भारतभरातल्या फॅन्सनी पाठवलेल्या शुभेच्छा आणि प्रश्नांना उत्तर द्यायला सुरवात केली.

गेली काही वर्षे एक मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून त्याची भारतात प्रसिद्धी झाली होती. तरुण, तडफदार, सुविद्य, सुसंस्कारित आणि अतिशय कार्यप्रवण नेता म्हणून तो फेमस होताच. २००९, २०१४ आणि आता २०१९ च्या स्टेट असेंब्ली इलेक्शन मधे सर्वाधिक मताधिक्याने जिंकून विजयाची हॅटट्रिक करायचा रेकॉर्ड त्याच्या नावावर होता. महाराष्ट्र राज्याचा अर्थमंत्री म्हणून महत्वाची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी त्याच्यावर टाकली होती.

त्याच्या वैयक्तिक फेसबुक आणि इंस्टाग्राम, ट्विटरवर लाखोंचं फॅन फॉलोईंग होतं. त्याच्या भाषणांनी तरुणवर्ग आकर्षित होत होता. “भावी मुख्यमंत्री” पदाचा उमेदवार असा उल्लेख मिडीयाने हळूहळू करायला सुरवात केलेली होती. केवळ पस्तिशीला त्याने साकार केलेलं हे अभूतपूर्व यश नक्कीच वाखाणण्याजोगं होतं.

पण २०१९ चं सरकार स्थापन झाल्यापासून आव्हानं वाढली होती. कोरोनाने जगरहाटी ठप्प करुन टाकली होती. कोरोना, लॉकडाऊन, त्यानंतर आलेली वादळं यांनी प्रचंड हानी झाली होती. कंपन्या बंद होत्या. निर्यात थांबली होती. टुरीझम ठप्प झाल्याने एअरलाईन्स दिवाळखोरीत जाणार होत्या, लघुउद्योग तर डबघाईला आले होते. जनतेत असंतोष होता. माणसं भुकेने आणि कोरोनाने मरत होती. प्रत्येक दिवस आव्हान म्हणून येत होता. अपूऱ्या आणि फाटलेल्या पांघरुणासारखी अवस्था झाली होती. एक झाकावं तर दुसरं उघडं पडतयं अशी परिस्थिती होती. रात्रीचा दिवस झाला तरी काम संपत नव्हतं.

अशा परिस्थितीत वेबिनार वैगरे करायला आणि भाषणं द्यायला खरं सांगायचं तर वेळ नव्हता. पण राज्यातल्या तरुण पिढीला मोटिव्हेट करणं देखील तितकचं गरजेचं होतं. त्यांच्या मनातली आशा आणि विश्वास जागा ठेवणं पण तेवढेच महत्त्वाचं होतं.

त्याच्या गुरुनी त्याला हेच शिकवलं होतं. गुरुपौर्णिमेचं महत्त्व त्याच्या इतकं दुसरं कोणाला समजणार होतं?? तो आज जे काही होता, ते, त्याचं यश, त्याचं व्यक्तिमत्त्व, त्याचे विचार, संस्कार... सगळीच तर त्याच्या गुरुची देन होती.

कल्याण स्वामींच्या आयुष्यावर समर्थांची कृपाद्रुष्टी होती, अर्जुनाच्या आयुष्यात कृष्णाचं जे स्थान होतं तेच, त्यापेक्षाही अधिक त्याच्या विचारांवर त्याच्या गुरुचा पगडा होता पण, “न धरी शस्त्र करीं मी! गोष्टी सांगेन युक्तिच्या चारं!” असं म्हणणाऱ्या श्री कृष्णाने देखील, युध्दात अर्जुनाचं सारथ्य केलं होतं, कुरुक्षेत्रावर संभ्रमित अवस्थेत असलेल्या अर्जुनाला गीता सांगितली होती...

त्याचा गुरु मात्र, त्याला एकट्याला कुरुक्षेत्रावर गोंधळलेल्या अवस्थेत एकट्याला सोडून निघून गेला होता! कीतीही वर्षे झाली तरी एकटं पडण्याच्या जखमेवरची खपली भरली गेली नव्हती.

इंटरकॉम वाजला. “साहेब, CM सरांनी तातडीने बैठक बोलावली आहे!” त्याच्या सचिवाने सांगितले... आणि अंगात कोट चढवून आणि डोक्यातले विचार झटकून महाराष्ट्राचे अर्थमंत्री, युवा महाराष्ट्राचे तडफदार नेते, मुख्यमंत्री पदाचे भावी उमेदवार, श्री विश्वजीत राजे भोसले मिटींगला निघाले.

“तु मला सोडून गेलीस म्हणून मी माझी कर्तव्य, माझा मार्ग, माझी घोडदौड कधीच सोडली नाही. But I will never forget and forgive you for leaving me like this!! मी तुला कधीही माफ करणार नाही वैदेही! मनातल्या विचारांना आवरुन, दमदार पावलं टाकीत, विश्वजीतने लॉबी क्रॉस करुन मुख्यमंत्र्यांच्या केबिनमधे प्रवेश केला.

क्रमशः
स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.