तृष्णा भाग ६ (लक्ष्य) - मराठी कथा

तृष्णा भाग ६,मराठी कथा - [Trushna Part 6,Marathi Katha]कधी न भेटणारे दोन विरुद्ध टोकाचे दोन जीव भेटले! मग सुरू झाला प्रवास एका संघर्षाचा आणि तृष्णेचा.
तृष्णा भाग ६ - मराठी कथा | Trushna Part 6 - Marathi Katha

कधीही न भेटणारे दोन विरुद्ध टोकाचे दोन जीव भेटले! मग सुरू झाला प्रवास एका संघर्षाचा आणि तृष्णेचा!


लक्ष्य
मिशन २००९ State Assembly Elections!!

दुसऱ्या दिवशी पासून विश्वजीतच्या मिशन २००९ ला आणि खडतर आयुष्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. वैदेहीने विश्वजीत करता एक नियमावली आणि “Do’s and Don’t” यादी बनवलेली होती आणि ती सर्व अमलात आणणं अत्यावश्यक होतं. नियमावली ते नियम उदीग्न होऊन विश्वजीत वाचत असताना त्याच्या कानावर वैदेहीचे शब्द पडत होते...

“आज पासून दारु, सिगारेट, तंबाखू कींवा इतर कुठलेही व्यसन संपूर्ण बंद; हि व्यसनं आरोग्याला धोकादायक असतात आणि हातात सत्ता आली की माणसाला अधोगतीला नेतात. लोकांना निर्व्यसनी नेता हवा असतो!!

“सकाळी दोन तास कंपल्सरी व्यायाम. तुमच्या करता एक पर्सनल ट्रेनर नेमला असेल तो सांगेल तसा व्यायाम व दररोज चालणे आवश्यक आहे. या प्रोफेशन मधे फीटनेस अतिशय आवश्यक आणि तेवढीच महत्वाची आहे पर्सनॅलिटी! विसरु नका first impression is The last impression!! नेता तरुण, तडफदार आणि रुबाबदार दिसायला हवा. त्याच्या चालण्यातून confidence दिसायला हवा.

“परीक्षा होई पर्यंत दररोज परीक्षेचा पाच तास अभ्यास करायचा आहे. तुमच्या कॉलेजच्या एका शिक्षिकेला नियुक्त केलं आहे तुमचा अभ्यास घेण्यासाठी. परीक्षेत नंतर फक्त एक आठवडा सुट्टी मिळेल घरी जायला. नंतर लगेच काम सुरु होईल.

“लेट नाईट पार्टी, डीस्को, मित्रांबरोबर गाडी उडवणं बंद. स्पेशली मुलींबरोबर लेट नाईट्स कींवा सहली नाहीत. फक्त रविवारी काही तास फ्री मिळतील. कुठल्याही वेब साईटवर, इमेल वरुन कुठलाही मजकूर मला दाखवल्याशिवाय आणि मंजूर झाल्याशिवाय टाकायचा नाही. कुठलीही प्रक्षोभक, अश्लील कींवा जातीयवादी विधानं करायची नाहीत.कारण एखाद्या छोट्या विधानाचा सुध्दा चूकीचा परिणाम होऊ शकतो.

“दररोज महत्त्वाची, मराठी व इंग्रजी वर्तमानपत्र वाचली गेली पाहीजेत! जगभरातल्या घडामोडी कळल्याच पाहिजेत. भाषा सुधारण्यासाठी माझ्यासमोर दररोज मोठ्याने वाचायची आहेत. नेत्याचं, त्याच्या मात्रृभाषेवर, राष्ट्रभाषेवर आणि ग्लोबल लॅंग्वेज वर प्रभुत्व हवं. या तिन्ही भाषेत तुम्हाला अस्खलित बोलता आलं पाहिजे. या करता भाषा शुद्ध हवी. एका नेत्याला, आपल्या मतदार संघातील गरीबांत गरीब आणि अशिक्षित जनते बरोबर संवाद साधायचा असतो आणि वेगवेगळ्या कंपन्या, उच्चपदस्थ, ईतर नेते, राजकारणी यांच्या बरोबर पण उठबस करावी लागते. या दोन्ही ठिकाणी काय आणि कसं बोलायचे, कुठली भाषा वापरायची हे तुम्हाला कळले पाहिजे या करता हि तयारी आवश्यक आहे.

“उद्या पासून दररोज संध्याकाळी तुम्हाला आवडत असेल ते स्तोत्र आणि रामरक्षा स्तोत्र कंपल्सरी म्हणायचे आहे. येत नसेल तर माझ्या बरोबर म्हणा. शब्दोच्चार स्पष्ट होतात. वाचा शुध्द होते. जसे English मधे toung twisters असतात तसेच मराठीत असतात. एक उदाहरण म्हणून या रामरक्षेतल्या ओळी म्हणून बघा... जमतायत का???

आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषंगसंगिनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ॥

“पुढच्या सहा महिन्यात आपल्या मतदारसंघात जायला लागायचे आहे. या वर्षी दादासाहेब इलेक्शनला उभे राहणार नसले तरी पक्षाने जो उमेदवार उभा केला असेल त्याला पाठींबा देण्यासाठी तुम्ही प्रचारात उतरायचे आहे. त्यामुळे तुमचा मतदार संघात राबता सुरु होईल. प्रत्येकाला तुमचा चेहरा ओळखीचा होईल.

“मला असं वाटतं की ग्रॅज्युएशन झाल्यावर तुमचं शिक्षण थांबु नये. तुम्ही LLB करावं अस मी सजेस्ट करेन. आपलं संविधान, घटना, कायदे, नियम आणि हक्क आपल्याला समजलेच पाहिजेत. म्हणजे कुठलीही कृती ही कायद्याच्या चौकटीत आहे की नाही ह्याची जाणीव आपल्याला असते. घाबरून जाऊ नका. फक्त तीन तास कॉलेज असतं. मी पण LLB ला तुमच्या बरोबर अ‍ॅडमिशन घेणार आहे.

“या सुट्टीत आपण भारताचा इतिहासाचा पुन्हा एकदा अभ्यास करायचा आहे. इतिहास तुम्हाला सिंहावलोकन करायला शिकवतो. आपल्या देशाला अत्यंत वैभवशाली आणि रक्तरंजित इतिहास आहे. तो डोळसपणे समजून घेतलात तर पूर्वी राज्यकर्त्यांनी निर्णय घेतले ते का घेतले? चुका झाल्या त्या का झाल्या? त्या होऊ नयेत म्हणून काय करता येईल? झालेल्या चुका दुरुस्त करता येतील का? तसेच यामुळे लोकांची भावनिक, मानसिक जडणघडण कशी झाली आहे हे कळायला तुम्हाला मदत होईल!

“आणि आता सर्वात महत्त्वाचे!” राजकारण्यांना जात नसते! तुमच्या मतदारसंघातील प्रत्येक मतदार हा तुमचा असतो, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो. प्रत्येकाला तुम्ही आपलेच वाटायला हवे. त्यांचे प्रश्न हे तुम्हाला आपले वाटले पाहिजेत. त्यांच्याशी माणुसकीचं नात निर्माण व्हायला हवं. आजपासून माणूस हिच आपली जात आणि राष्ट्रधर्म हाच धर्म!

“सध्या तरी इतकं पुरे आहे. आपण दररोज भेटणार आहोतचं. दर दिवसाचा अपडेट मला असेल. आणि हो, या वेळी सुट्टीत कोल्हापूरला जाताना, एसटी ने जायचे आहे. गाडी मिळणार नाही. आपली जनता जसा प्रवास करते तसा आपण पण कधीतरी करायला हवा!

या तुम्ही! उद्या सकाळी ५:३० वाजता wake up कॉल करेन!
Have a good day विश्वजीत!!

एखादा कैदी जेल मधे जाताना जेवढा उत्साहात असेल तितक्याच अनिच्छेने विश्वजीत वैदेही कडुन निघाला. कुठल्या वाईट मुहुर्तावर या बाईच्या वाटेला गेलो देव जाणे... हाच विचार विश्वजीतच्या डोक्यात येत होता. पण आता मागे फीरणे शक्य नव्हते. तो शब्द देऊन बसला होता... त्याच्या संघर्षमय प्रवासाची सुरवात झाली होती.


State Assembly Elections, कोल्हापूर - दक्षिण मतदारसंघ
ऑक्टोबर २००९

दादासाहेबांच्या वाड्यातलं पक्ष कार्यालय आणि जनसंपर्क कार्यालय तुडुंब भरलं होतं. मतमोजणी सुरू झाली होती. व्हील चेअरवर बसलेल्या दादासाहेबांना मोजणी केंद्रात जाता येत नव्हतं. विश्वजीत आणि काही समर्थक तिकडेच होते. वैदेही दादासाहेब आणि त्यांचे कार्यकर्ते, समर्थक वाड्यात जमले होते.

फोनवरुन आणि टिव्हीवरुन बातम्यांचा ओघ सुरु होता.

दादासाहेबांना विश्वजीतच्या जन्माच्या वेळची आठवण झाली. त्यावेळी देखील अशीच बैचेनी, अशीच अधिरता, उत्कंठा अनुभवली होती. दादासाहेबांच्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांची खात्रीच होती की विश्वजीत जिंकून येणारच.

गेल्या सहा वर्षांत विश्वजीतने पक्षाच्या कामात कमालीचा होल्ड मिळवला होता. मतदार संघात त्याचं वजन वाढलं होतंच शिवाय, एक तडफदार युवा नेता म्हणून जनमानसात आपली प्रतिमा बनवण्यात तो यशस्वी झाला होता. मिडीयामधे सुध्दा “Promising Youth” असा त्याचा बोलबाला झाला होता.

सहा वर्षांपूर्वी विचारपूर्वक घेतलेला दादासाहेबांचा निर्णय अतिशय मोलाचा ठरला होता. वैदेहीची बुध्दीमत्ता आणि never give up स्वभाव त्यांनी दोन भेटीतच ओळखला होता. विश्वजीतच्या हातुन अक्षम्य चुक झाली होती. अंगातली रग, शक्ती, बुध्दी चुकीच्या ठीकाणी वाया जात होती. दादासाहेबांचा आपल्या मुलाच्या अंगातल्या उपजत गुणांवर विश्वास होता. पण उधळलेल्या अश्वाला वेसण घालायला हवी होती. ताकद योग्य पध्दतीने वळवायला हवी होती. वैदेहीने अचूक केले होते. गोखले सरांचे गुण नकळत तिच्या अंगात उतरले होते. दादासाहेबांनी आपले पत्ते अचूक फेकले होते. रागाने, अपमानाने खवळलेल्या वैदेहीला, विश्वजीतची जबाबदारी देऊन त्यांनी नुसतंच प्रसंगावधान ठेवलं नाही तर अवघड प्रसंगाला योग्य वळण दिलं होतं.

टिव्हीवरच्या बातम्या बघणाऱ्या वैदेहीच्या डोक्यात सुध्दा जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. सहा वर्षांचा हा प्रवास खडतर आणि आव्हानात्मक तर होताच पण रंजक आणि समाधानकारक झाला होता. शिस्तीच्या वातावरणात कधीही न वाढलेल्या विश्वजीत ने सुरवातीला बरीच खडखड केली होती. कधीकधी वैदेहीचा पेशन्स बघितला होता. भांडणे, वाद झाले होते. वैदेहीला हार मान्य नव्हती आणि विश्वजीतला आपले वचन खरे करुन दाखवायचे हैते. दोघेही शब्दाला पक्के राहणार होते.

पहिल्या काही महिन्यांनंतर मात्र विश्वजीतला अभ्यासात, राजकारणात गोडी वाटायला लागली होती. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात इंटरेस्ट वाटायला लागला होता. दररोजचा व्यायाम आणि शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे शरिर सुदृढ आणि निरोगी दिसत होतं. विश्वजीतची आकलनशक्ती उत्तम होती. त्याच्याकडून वेगवेगळी पुस्तके वाचून घेताना त्याने अनेक गोष्टी आत्मसात केल्या होत्या. दररोज केलेलं प्रकट वाचन, चर्चा, माहितीची देवाण घेवाण आणि भाषांवर घेतलेली मेहनत यामुळे त्याच संवाद कौशल्य आणि भाषण कौशल्य वाढलं होतं. तो बहुश्रुत झाला होता. राजकारणातले बारकावे त्याने अभ्यासपूर्वक शिकले होतेच आणि खाचाखोचा दादासाहेबांकडुन समजून घेतल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी दादासाहेबांना पॅरेलिसीसचा अ‍ॅटॅक येऊन गेल्यावर, आपली जबाबदारी वाढली हे लक्षात घेऊन तो अधिक समजुतदार आणि मॅच्युरिटीने वागत होता.

उत्सुकता आणि उत्कंठा शिगेला पोहोचली आणि निकाल जाहीर झाला. विश्वजीत प्रचंड मताधिक्याने विजयी झाला होता. कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरवात केली होती. त्याची मिरवणूक आणि सक्सेस रॅली काढायला सगळे तयारीत होते. पण विश्वजीतला आधी दादासाहेबांना भेटायचं होतं. पाया पडायचं होतं. तो वाड्यात जायला उत्सुक होता.

विश्वजीतला पेढा भरवताना आणि तो पाया पडताना दादासाहेबांना गहिवरून आलं. डोळ्यात अश्रू आले. आज त्यांना सुवासिनीची तिव्रतेने आठवण येत होती. आता आपण कधीही डोळे मीटू शकतो असं वाटुन गेलं.

“दादासाहेब, माझ्या विजयाचे शिल्पकार तुम्ही दोघं आहात असं म्हणतं विश्वजीतने आपल्या गळ्यातले हार दादांच्या आणि वैदेहीच्या गळ्यात घातले. सहा वर्षांपूर्वीची भांडणं, वाद, इर्षा हे सगळं आठवलं आणि त्याला हसु आलं. कट्टर दुश्मन, प्रतिस्पर्धी, रींगमास्टर अशा वैदहीचं आणि त्याचं नातं आता फक्त गुरु शिष्याचं न राहता एक सहकारी, पार्टनर, सल्लागार, मित्र असं सर्व समावेशक झालं होतं. दादासाहेबांच्या इतकाच त्याचा वैदेही बद्दल विश्वास आणि आदर निर्माण झाला होता. “दादासाहेब, मी माझा दिलेला शब्द पाळला आहे! विश्वजीतला आता माझी गरज नाही. ते आता कर्तबगार आणि स्वयंसिद्ध झाले आहेत. आता मला या जबाबदारीतुन मोकळं करा!!” वैदेहीच्या या विनंतीवजा बोलण्याने तो भानावर आला.

“नाही वैदेही आणि दादासाहेब... विश्वजीत तिला थांबवत म्हणाला! तुम्ही गेली सहा वर्षे घेतलेल्या मेहनतीचं हे फळ आहे. पण मला इथे थांबायचं नाही. आत्ता तर कुठे सुरवात झालीये. तुम्हीच म्हणता ना... की स्वप्न कायम मोठं ठेवा म्हणून?! मला मोठी स्वप्न बघायला तुम्ही शिकवलं आहेत. मला ती पूर्ण करायची आहेत. पण ते मला एकट्याने जमणं शक्य नाही. मला तुमच्या दोघांच्याही साथीची गरज आहे. मी भरपूर कष्ट करेन, तुम्ही सांगाल ते! पण प्लीज आता मला एकट्याला सोडू नका!! विश्वजीत भारावलेल्या आवाजात म्हणाला.

वैदेहीने एकवार दोघांकडे बघितले. दादासाहेब बोलले नाहीत तरी त्यांनी मूक संमतीची मान हलवली होती.

“ठीक आहे! उद्या सकाळी शार्प ७ वाजता ऑफीसला भेटा, तुमचं नवं टाईमटेबल आणि शेड्युल तयार असेल...!” असं वैदेहीने म्हणताच तिघेही मनापासून हसले! एका संघर्षमय प्रवासाचा सुखांत होऊन दुसऱ्या प्रवासाचा शुभारंभ झाला होता.!

कथा समाप्त
स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

२ टिप्पण्या

  1. स्वाती आपली कथा आणि त्याची मांडणी आवडली,तुमच्या आणखी नवनवीन कथा वाचायला नक्कीच आवडतील.
    लवकर पब्लिश करा.
  2. स्वाती ताई तुझी कथा फारच छान होती.

    माझ्या सुद्धा माझ्या काही कविता आणि कथा मराठीमाती डॉट कॉमवर प्रसिद्ध करण्यासाठी पाठवायच्या आहेत.
    कृपया मार्गदर्शन करावे.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.