कृष्णाने युध्दात अर्जुनाचं सारथ्य केलं होतं, कुरुक्षेत्रावर संभ्रमित अवस्थेत असलेल्या अर्जुनाला गीता सांगितली होती
विश्वजीत
२००३ - २०१३ एक अवघड प्रवास!
तीन तास चाललेली, काही मंत्र्याच्या व अधिकारी वर्गाच्या उपस्थितीतली प्रचंड वादग्रस्त बैठक आटपून विश्वजीत केबिनकडे परत निघाला त्यावेळेस त्याला पुढे काय घडणार आहे ह्याची कल्पना यायला लागली होती.
कोरोनाचा प्रश्न बिकट व्हायला लागला होता. आरोग्यसेवा अपूरी पडत होती. गेले काही महिने काम करुन डॉक्टर, पोलीस, महापालिकेचे कर्मचारी यांची पहिली फळी थकली होती. लॉकडाऊन वाढवल्याने लोकांचा रोजगार बुडाला होता. सरकारी मदत अपूरी पडत होती. लोकक्षोभ आणि कोरोना बाधितांना आकडा दिवसेंदिवस आटोक्याबाहेर चालला होता.
आरोग्यमंत्री स्वतः कोरोनाग्रस्त झाल्यामुळे कॉरंटाईन झाले होते.
तात्पुरता अतिरिक्त पदभार विश्वजीतला सांभाळायला लागणार होता. कदाचित खाते बदल अपेक्षित होता. अत्यंत निर्णयक्षम आणि क्रियाशील मंत्री म्हणून विश्वजीतची ख्याती होती. आरोग्य खात्याची जबाबदारी त्याच्यावर येण्याची १००% शक्यता होती.
विश्वजीतने ताबडतोब प्रधान सचिव आणि अधिकाऱ्यांची मिटींग बोलावली. Fight against Covid ची रिव्हाईज ब्लुप्रिंट बनवायला सुरवात करणं आवश्यक होतं. विश्वजीतच्या मनात आलं, आज वैदेही असती तर एव्हाना तीने उपाय योजना आणि अंमलबजावणीचा पूर्ण आराखडा तयार ठेवला असता. आव्हान आपल्या अंगावर येऊन आदळायच्या आधीच ती प्रतिकाराला सज्ज असायची. अगदी पहिल्या पासूनच ही तिची सवय होती. तिच्यामुळे हळूहळू त्याच्या अंगात आपोआपच हि सवय आली होती.
विश्वजीतचं मन नकळत भूतकाळात गेलं. त्याचा ‘मी पणा’ आणि अहंभाव नष्ट करण्याची पूर्ण योजना देखील वैदेहीकडे पहिल्याच दिवशी तयार होती. त्याला त्याच्या ट्रेनिंगचे पहिले दिवस आठवले. वैदेहीने तयार केलेली नियमावली आठवली. त्याच्या प्रत्येक मिनीटाला तीने ठेवलेला हिशोब आठवला. तिने त्याला पहाटे झोपेतून उठवायला केलेले वेकअप कॉल्स आठवले. त्यांची भांडणं आठवली, तासंतास तीच्या स्टडीमधे बसून केलेला अभ्यास आठवला. संध्याकाळी दिवेलागणीला, सर्वांनी एकत्र म्हटलेली रामरक्षा आठवली... त्यांच्या दहा वर्षांच्या प्रवासातला, तिच्या बरोबरचा प्रत्येक क्षण आठवला!
विश्वजीत सारख्या वादळाला, अनिरुद्ध, वैदेही आणि अबोलीने आपल्या छोटेखानी आयुष्यात किती अलगद सामावून घेतलं होतं! त्याचा अभ्यास, त्याचं वाचन, कॉलेज, व्यायाम, मिटींग्स ह्या सगळ्याचं नियमन करता करता तो त्यांच्यातलाच एक कधी झाला, त्याचं त्यालाच समजलं नव्हतं.
खरं तर वैदेही वयाने विश्वजीत पेक्षा फक्त पाच - सहाच वर्षांनी मोठी. पण लहान वयात तीच्या आईचा झालेला मृत्यु, लवकर वयात शिक्षण, लगेच अनिरुद्ध बरोबर लग्न, परदेशातला काळ, अबोलीचा जन्म, घरच्या जबाबदाऱ्या आणि आता विश्वजीतची जबाबदारी यामुळे तीला आपण फारच मोठे झाल्यासारखे वाटे.
अनिरुद्ध तीच्यापेक्षा आठ - नऊ वर्षांनी मोठा, शिवाय शांत, संयमी, मितभाषी... विश्वजीतला त्याच्याबद्दल एक प्रकारचा आदर वाटे. अबोलीबद्दल धाकट्या बहिणीसारखी माया वाटे. वैदेही देखील अनिरुद्धशी कधीच भांडत नसे. पण तीचा मुळचा तापट, बडबडा, हट्टी स्वभाव आणि वाद घालुन आपला मुद्दा पटवून सांगायचा अट्टाहास हे सर्व विश्वजीत समोर बाहेर येई.
पहिल्या पहिल्यांदा विश्वजीतची भाषा शुद्ध नव्हती तेव्हा मोठ्या आवाजात वाचन करायला तो लाजत असे. कधी भाषणात असंख्य चुका होत. ते मुद्देसूद होत नसे. वैदेही प्रत्येक बाबतीत करेक्शन करे, सुचना देई. ते परफेक्ट होईपर्यंत तिला चैन पडत नसे. तिच्या सारख्या टिकाकाराला तोंड देताना त्याचा राग अनावर होई. संताप येई. कधी तो लिहीलेलं सगळं फाडून फेकून देई. वैतागून जाई... अशा वेळी अनिरुद्ध कींवा अबोली त्याला प्रेमाने समजावत.
पहिले काही दिवस विश्वजीत बुजला तरी जसा अभ्यासाने, वाचनाने प्रगल्भ झाला, बहुश्रुत झाला तसा तिच्या बरोबरीने तो वाद घालायला, चर्चा करायला तुल्यबळ झाला. काही बाबतीत तिची अगदी ठाम मतं असत. ती मतं मुद्देसूद पणे खोडून काढायला त्याला आवडे. काही वेळा तात्विक वाद, भांडणं, चर्चा अगदी हमरीतुमरीवर येई, अशा वेळी अनिरुद्ध त्यांच्यात समेट घडवून आणे. माझी भांडणारी लहान तीन मुलं असा मजेने तो वैदेही, विश्वजीत आणि अबोलीचा उल्लेख करे.
कधी सर्वजणं विश्वजीतच्या गाडीतून ट्रीपला जात. अशावेळी विश्वजीतला आपलं ड्रायव्हिंगस्कील दाखवायची खुमखुमी येई. आपली फॉर्च्युनर पळवायची ती संधी तो कधी सोडत नसे. मग कधी रविवारचे, वाई - महाबळेश्वर तर कधी लव्हासा तर कधी लोणावळा - खंडाळा..., अबोली, वैदेही बरोबर मोठमोठ्याने गाणी म्हणत विश्वजीत त्यातला प्रत्येक क्षण एंजॉय करे. कधी एखादा चांगला मुव्ही बघत. वैदेही त्यातल्या प्लॉट बद्दल, अॅक्टींग बद्दल, डायरेक्शन बद्दल विष्लेषण करत बसे. तर तिच्या विरोधात अबोली आणि विश्वजीत तीची मतं खोडून काढतं.
विश्वजीतची आई लहाणपणीच गेलेली होती, दादासाहेबांबद्दल आदरयुक्त वचक वाटे, घरात तो एकुलता एक... त्याच्या बरोबर भांडणार, हुज्जत घालणारं, मजा करणारं, प्रत्येक गोष्ट शेअर करणारं कोणी नव्हतचं. ती उणीव या तिघांनी भरुन काढली होती.
वैदेही ने प्रॉमीस केल्याप्रमाणे खरोखरच विश्वजीत पेक्षा दुप्पट मेहेनत घेतली होती. त्याच्या टीम मधील माणसं पारखून त्यांची नेमणूक करणं, त्यांना त्यांची कामं, नियम समजावून सांगणं, विश्वजीत बरोबर LLB चा अभ्यास करणं. त्याच्या संवाद कौशल्यावर मेहेनत घेणं. त्याला कंटाळा येऊ नये म्हणून त्याच्याबरोबर वाचन करणं. वेगवेगळ्या विषयांवर माहिती गोळा करणं, दादासाहेबांशी बोलुन त्यांच्या कडून राजकारणातल्या खाचाखोचा समजून घेणं. मतदार संघाची खडानखडा माहिती गोळा करुन, प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचा आराखडा तयार करणं, विश्वजीतच्या “इमेज बिल्डींग” करता त्याची वेबसाईट आणि फेसबुक पेज तयार करुन घेणं.
त्यावरचा मजकूर वेळोवेळी अपडेट करणं. तरुण मतदारांचे विचार समजून घेणं. प्रचार दौरे करणं. कोल्हापूरला जाताना वैदेही विश्वजीतला मुद्दामहून एसटीने घेऊन जाई. सर्वसामान्य जनता काय बोलते, कशी वागते, त्यांचे प्रश्न काय, समस्या काय ह्या बद्दल जाणून घेई. कधी शेतावर लावण्या, पेरण्यांच्या वेळेस ती शेतकऱ्यांना भेट द्यायला विश्वजीतला आणत असे. विहीरी, शेततळी, खतं, शेतमालाची कींमत, जमिनीचा कस, शेतीमालाच्या कीमती, कर्ज या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवी. प्रश्न समजून घेई.
तर कधी दोघही वेगवेगळ्या कारखान्यांना भेट देत. कामगारांचे प्रश्न समजून घेत. कंपनीच्या पॉलिसी, विकासकामे यांची माहिती करुन घेत. काही वेळा संघाच्या एखाद्या उपक्रमाला भेट देऊन स्वयंसेवकांच्या कार्याची ओळख करुन घेई, त्यांनी केलेले शिस्तबद्ध नियोजन समजून घेई. विश्वजीतच्या टिमला तीच्याच कडक शिस्तीत तयार केलेलं होतं तीने. तिच्या सल्ल्याप्रमाणे ते परफेक्ट काम करत. अगदी दादासाहेब देखील तिच्या या अभ्यासू आणि मेहेनतीवर वृत्तीवर खुष असत.
त्यांना एक पॅरालिसीसचा अॅटॅक येऊन गेल्यावर ते खुपच थकले होते. आता ते अजूनच वैदेहीवर अवलंबून रहात. बिझनेसबद्दल चर्चा करत. ते गेल्यावर त्यांच्या मालमत्तेचे नियोजन काय करायचे ह्याबद्दल पण ते वकीलांबरोबरीने, वैदेहीशी चर्चा करत.
आपल्या आयुष्यातील एखादा काळ संघर्षमय असतो तर एखादा घडामोडींनी भरलेला तर एखादा वेगवान असतो तसा विश्वजीतच्या आयुष्यातला तो पहिला सहा वर्षांचा कालावधी अतिशय संघर्षमय असला तरी अत्यंत आनंदाचा, सर्जनशील काळ होता असं त्याला कायम वाटे.
२००९ ते २०१३ चा काळ, मात्र विश्वजीत करता प्रचंड घडामोडींनी भरलेला होता. २००९ मधे त्याने त्याच्या आयुष्यातली पहिली निवडणूक जिंकली होती. २००९ मधेच त्याचं लग्न झालं होतं. त्याची लग्न करायची अजिबात ईच्छा नव्हती. पण दादासाहेबांना वाटे की आपण जाण्याआधी विश्वजीतचे लग्न व्हावं. त्यांनीच त्यांच्या मित्राच्या, मोहीत्यांच्या मुलीला देवयानीला सून म्हणून निवडली होती. २००९, त्याच्या लग्नानंतर दहाच दिवसात, अनिरुद्धचा कार अॅक्सीडेंट मधे मृत्यु झाला होता आणि दोनच महिन्यात दादासाहेब हे जग सोडून गेले होते.
पण ह्या सर्व प्रवासात वैदेही आणि विश्वजीत एकमेकांच्या बरोबरीने, एकमेकांकरता उभे होते. एकमेकांच्या आयुष्यातल्या रीकाम्या जागा, त्यांनी नकळत भरुन काढल्या होत्या. एक शिक्षक, सल्लागार, मेंटॉर, मैत्रिण, सहकारी, सचिव या अनेक रुपात वैदेही होतीचं... आता दादासाहेब गेल्यावर निर्माण झालेली पोकळी देखील तिने वडीलकीच्या अधिकाराने भरुन काढली होती...!
तर, अनिरुद्ध गेल्यावर, ओक्साबोक्शी रडणाऱ्या अबोलीला जवळ घेऊन समजावताना आणि डीप्रेशनमधे गेलेल्या वैदेहीला प्रेमाने, धाकाने, समजूतीने परत आपल्या पायावर उभं करताना नकळत त्यांच्या कुटुंबाच्या कर्त्या पुरुषाच्या भुमिकेत, विश्वजीत आपणहुन जबाबदारीने शिरला होता.
तु माझ्यासाठी सगळ्या जबाबदाऱ्या पेलल्यास, सगळे रोल निभावलेस, रीकाम्या जागा भरल्यास. माझ्या आयुष्याचा ताबा घेतलास तू! तो हक्क तुला दादासाहेबांनी दिला, मी दिला होता! पण एका क्षणात हे नातं, ही जबाबदारी झटकून तू निघून गेलीस! हा हक्क तुला कोणी दिला होता?? वैदेही तुझ्या जाण्याने माझ्या आयुष्यात जी कायमची पोकळी निर्माण झालीए ती कोण भरुन काढणार आहे?!!
संध्याकाळी स्टडीमधे बसून फाइल्सच्या पसाऱ्यात काम करता करता, बॅकग्राऊंडला ऐकू येणारी पंचमदांची अजरामर मेलडी थकलेल्या विश्वजीतच्या मनाचा एकटेपणा अजून गहिरा करत होती...
“पतझड़ जो बाग उजाड़े, वो बाग बहार खिलाये”
“जो बाग बहार में उजड़े, उसे कौन खिलाये!!”
क्रमशः