वारसा भाग ७ (जपणूक परंपरेची!) - मराठी कथा

वारसा भाग ७,जपणूक परंपरेची!,मराठी कथा - [Varsa Part 7 Japnuk Paramparechi!] मातीशी ऋणानुबंध ठेवुन दिलेल्या संस्कारांचा,परंपरेचा व माणुसकीचा वारसा.
वारसा भाग ७ (जपणूक परंपरेची!) - मराठी कथा | Varsa - Part 7 (Japnuk Paramparechi!) - Marathi Katha

आपल्या मातीशी ऋणानुबंध कायम ठेवुन शिकवलेल्या संस्कारांचा, समजावलेल्या परंपरेचा आणि माणुसकीचा वारसा


काळ: एप्रिलचा तिसरा रविवार
स्थळ: New Jersey

न्यु जर्सी मधल्या आदित्यच्या घरातील लायब्ररीत जमलेले आम्ही सर्व, एकमेकांशी काहीही न बोलता शांत आणि विचारमग्न बसलो होतो. आप्पांनी आदित्यला लिहीलेल्या पत्राचं मी केलेलं कथारुपांतर आणि इच्छापत्राचं वाचन आजच्या रविवारी, अप्पा गेल्यावर साधारण १३ दिवसानंतर व्हावं अशी आदित्यची इच्छा होती. मी आणि माझी बायको, आदित्य - रॅचेल, आमचे दोन अगदी जवळचे मीत्र व त्यांच्या बायका, असे आज जमलो होतो. जेवणानंतर सुरु झालेले वाचन गेले तीन तास अव्याहत सुरू होते. कोणिही जागचे हलले नव्हते. आत्ता पहिला कॉफीब्रेक घेतला होता. रॅचेलने दिलेला कॉफीचा कप संपवून मी पुन्हा एकदा कथानकाकडे वळलो!

गजेंद्रस्वामींना भेटुन अनिरुद्ध निघाले ते मनात एक योजना बनवूनच. सरनोबतांच्या पूर्वजांनी केलेली एक मोठी चुक त्यांना उमगली होती. गेल्या पन्नास - साठ वर्षात, प्रत्येक पिढीतल्या वंशजांने, गावाकडे आणि घराकडे पाठ फिरवली होती. ज्या घराने वैभव पाहिले, जुन्या पिढीचा उत्कर्ष पाहिला, त्यावर मरण कळा आली होती. कांद्रेभुरेला डोंगरावर उभे राहिले की समुद्रापर्यंत पसरलेल्या जमिनीचे मालक असणाऱ्या सरनोबतांनी, हातातली सत्ता आणि शेती गेल्यावर, तिथल्या मातीशी आणि तेथील लोकांशी नाळ तोडली होती. ज्या मातीने त्यांना अफाट संपत्ती दिली, अन्न दिले, ज्या कुळांनी वर्षांनुवर्षे खपवून धान्याची कोठारे भरली त्यांच कुळांशी कुठलेही संबंध वा सोयरसुतक ठेवलं नव्हतं. गणोजीच्या अनावधानाने झालेल्या मृत्यूचे पाप माथी होते, ती चूक सुधारायला किंवा माफी मागायला, आज गणोजीचे कोणीही वंशज हयात नव्हते. परंतु आज त्या आणि आजुबाजुच्या गावातले, आदिवासी भागातले कितीतरी गणोजी, बेकारीच्या, गरीबीच्या, व्यसनाच्या आणि अशिक्षितपणाच्या गर्तेत अडकलेले होते, त्यांच्या मुक्तीकरता, प्रगतीकरता काम करणं गरजेचं होतं. जे नातं इतक्या वर्षांमध्ये तुटलं होतं, ते पुन्हा जोडणं गरजेचं होतं!

शंकररावांना विश्वासात घेऊन अनिरुद्धने सगळ्या सरनोबतांना संमेलनाची पत्रं धाडली. गावच्या संरपंचाना मदतीला घेऊन, हनुमान जयंतीच्या उत्सवाची आर्थिक जबाबदारी सरनोबत घेतील असे आश्वस्त केले. विरारमधे राहणाऱ्या सुतार - गवंडी यांना घेऊन, वाड्याच्या धडधाकट भागाची रंग सफेदी करुन घेतली. भार्गवीला बरोबर घेऊन, आचारी ठरवले. गावच्या चार बायकांना जमवून त्यावर देखरेखीला नेमलं. तरुण मुलांना एकत्र करुन, करमणुकीच्या कार्यक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. करमणुकी बरोबर समाज प्रबोधन असायलाच हवे ही समज दिली.

त्या वर्षी हनुमान जयंती मोठ्या धडाक्यात साजरी झाली. व्हीलचेअरवर बसुन बाळुअण्णांच्या हस्ते पहिली पुजा झाली. स्वतः गजेंद्रस्वामी पुजा सांगायला जातीने हजर होते. शंकररावांना स्पेशल गाडी करुन पुण्याहुन गावी आणले. सर्व सरनोबत भेटले. एकमेकांची विचारपूस झाली. बाळुअण्णांना त्यांचे कुटुंबीय भेटले. प्रत्येकानेच बाळुअण्णांकरता हजार - दोन हजार जमा करुन त्यांना पुढे काही कमी पडू नये याची खातरजमा केली. सगळ्या गावकऱ्यांना सरनोबतांनी जेवण दिले. बायकांचे हळदी कुंकू झाले. भार्गवीने सर्व सवाष्ण बायकांची ओटी भरली. विधवा व म्हाताऱ्या बायकांना देखील भेटवस्तू दिल्या.

अनिरुद्धनी सर्व सरनोबतांना लॉंचमधे बसवून वैतरणेची सफर घडवून, अगदी पलिकडच्या तीरापर्यत नेले. नदीच्या तीरावर उतरून, गजेंद्र स्वामींच्या मार्गदर्शनाखाली गणोजीला प्रतिकात्मक तिलांजली दिली. गणोजी आणि जी माणसे युध्दात कामी आली त्यांच्याकरता हात जोडून सर्वांनी प्रार्थना केली.

कांद्रेभुरेला प्रवास करताना, तिकडच्या आदिवासी भागात, गावात काम करायची खरी गरज आहे हे अनिरुद्धच्या लक्षात आलं होतं. उत्सव झाल्यानंतर, बाकी सरनोबत कुटुंबिय फारसे आले नाहीत तरी देखील अनिरुद्ध मात्र दर महिन्याला गावी येत राहिले.

रूढी, परंपरा यांच्या बरोबरीने समाजोपयोगी गोष्टी केल्या जातील या बद्दल अनिरुद्धनी जातीने लक्ष दिले. गरीब व होतकरू मुलांना पुस्तके व शैक्षणिक साहित्य वाटप केले. कांद्रेभुरे मधल्या शाळेला लायब्ररी करता मदत करायचे आश्वासन दिले. काही गरिब मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलला. तिकडची प्रायमरी शाळा अगदीच मोडकळीस आली होती. अनिरुद्धने त्यांना मदत करायचे ठरवले. त्यांच्या मुंबईतील मित्र आणि सरनोबतांचे काही ईच्छुक मेंबर यांच्या मदतीने डोनेशन आणली. काही समाजसेवी संस्था जव्हार, मोखाड्यात काम करत, त्यांच्या सहकार्याने या मुलांना शिकवायला चांगले शिक्षक येतील याकरता प्रयत्न केले. दरवर्षी हनुमान जयंती होत राहिली. पण त्या बरोबरीने रक्तदान शिबीर, गरिबांसाठी मेडीकल कँप, पुस्तक जत्रा, चित्रकला स्पर्धा, पाककला स्पर्धा असे उपक्रम होत राहिले. रूढी आणि परंपरांचा वारसा जपताना अनिरुद्धने माणुसकीचा ऋणानुबंध आणि वारसा मात्र कायमच जपला!

अप्पांनी शेवटी इच्छा पत्रात लिहिले होते...
“आदित्य, या सर्व प्रवासात, तुझी गावी यायची वेळ एखाद दोनदाच आली. कारण अगदी पहील्या उत्सवाला देखील तु IIT कानपुरला होतास. नंतर तुझं शिक्षण आणि परदेशी गमन झालं. तु तिकडेच स्थयीक झालास आणि तुला एकदा शांतपणे हे सर्व सांगेन म्हणताना वेळच झाला नाही रे! माझ्या वयाच्या साठीनंतर मात्र गावी फेऱ्या कमी झाल्या. भार्गवीला संधिवाताचा त्रास सुरू झाला आणि प्रवास झेपेना. तेव्हा तिकडच्या तरुण मुलांना अधिकार दिले आणि मी मधुन - मधुन फोनवर बोलत राहिलो, आर्थिक मदत करत राहिलो. यामुळे शापाचं परिमार्जन झालं का? हे मला खरचं माहिती नाही पण मी मात्र अतिशय समाधानी झालो.”
मी हे शिकलो की कर्तृत्ववान माणसाने, आपल्या बरोबर इतरांना देखील पुढे घेऊन जायचं असतं. आपल्या समाजाचं, मातीचं नातं विसरायचं नसतं. आपल्या उत्कर्षाबरोबर आपल्या समाजाचा उत्कर्ष करायचा असतो. तरच आपली माणसं देखील प्रगती करतात.
तुला आता लक्षात येईलच की मी माझ्या विलमधे माझी संपत्ती शाळेकरता आणि गावाकरता खर्च करावी असे का लिहिले आहे ते. तु सुखी संपन्न आयुष्य जगत आहेस, मला आता तुझी काळजी नाही. पण माझ्या पैशाची खरी गरज गावात आहे असे मला वाटते.

आदित्य, मला जे करावेसे वाटले, जे मनाला पटले, तेच मी आयुष्यभर केले. तु काय करावेस हा ठरवण्याचा हक्क सर्वस्वी तुझाच आहे. आपल्या सरनोबतांच्या कुळाचा इतिहास आणि वारसा तुला समजावा म्हणून हा सगळा पत्र लिहायचा अट्टाहास केला! जगाच्या पाठीवर कुठेही राहिलात तरी मातीचं ऋण विसरु नका! माझा आशीर्वाद तुम्हा तिघांच्यापाठी कायमच राहील!

लायब्ररीत शांतता होती. आदित्यच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.

ज्या अप्पांनी आपल्या प्रेमाखातर एवढे कष्ट घेतले होते, त्यांच्या मृत्यूसमयी आपण त्यांना भेटू सुध्दा शकलो नाही याचं अत्यंतिक दुःख झालं होते. सगळेच गहिवरले होते. रॅचेलने आदित्यच्या पाठीवर हात फिरवला. आदित्य! I can understand what you must be going through! मी तुझ्याशी लग्न करुन फक्त तुझी बायको झाले होते but after reading Appa's letter today I feel extremely proud to be part of your family too! We are in this together. Whatever you do, I will be with you. आदित्य आणि रॅचेलने एकमेकांचा हात पकडून, मूकपणे एकमेकांना परत एकदा वचन दिले होते.

क्रमशः


स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.