वारसा भाग ६ (शास्त्र काय सांगते?!) - मराठी कथा

वारसा भाग ६,शास्त्र काय सांगते?!,मराठी कथा - [Varsa Part 6 Shastra Kay Sangte] मातीशी ऋणानुबंध ठेवुन दिलेल्या संस्कारांचा,परंपरेचा व माणुसकीचा वारसा.
वारसा भाग ६ (शास्त्र काय सांगते?!) - मराठी कथा | Varsa - Part 6 (Shastra Kay Sangte?!) - Marathi Katha

आपल्या मातीशी ऋणानुबंध कायम ठेवुन शिकवलेल्या संस्कारांचा, समजावलेल्या परंपरेचा आणि माणुसकीचा वारसा


स्थळ: त्र्यंबकेश्वर (नाशिक जिल्हा)

गजेंद्र स्वामी, शांतपणे आणि अगदी लक्षपूर्वक अनिरुद्धनी लिहून आणलेली माहिती आणि संदर्भ वाचत होते. साधारण अडीच वर्षांपूर्वी जो मनुष्य काहीशा अनिच्छेनेच आणि अविश्वासाने त्यांना भेटायला आला होता त्याने स्वतःच्या कुटुंबाकरता आणि त्याला पडलेल्या प्रश्नांची उकल करण्यासाठी अफाट प्रयत्न केले होते. त्यांना मनापासून अनिरुद्धचे कौतुक वाटत होते.

“स्वामी, माझ्या मनात अजूनही काही शंका आहेत.” अनिरुद्धनी आपलं मन मोकळे केलं.

खरं सांगायचं तर युध्दात शेकडो लोकं मारली जातात. काही परागंदा होतात, काही जखमी होतात. पण या सगळ्याचं खापर त्यांच्या नेत्यावर का? या परिस्थितीत महादेवरावांच्या खलाशांनी अनावधानाने गणोजीला फेकायची चूक केली होती. मग हा दोष सरनोबतांना का? जलसमाधी तर गणोजी बरोबर इतरांना पण मिळालेली होती. मग परिमार्जन फक्त गणोजीच्या मृत्यूचं का?

गणोजीला शेताचा तुकडा देणं मी समजू शकतो पण त्यावर हनुमान मंदिर कशाला? उत्सव कशाला?

“तुमचे प्रश्न अगदी योग्य आहेत अनिरुद्ध. मला जे काही ज्ञान आहे त्याला अनुसरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो! गजेंद्र स्वामी शांत आणि आश्वासक स्वरात म्हणाले.

“जगातल्या प्रत्येक धर्मात अंतिम संस्कारांना अनन्यसाधारण महत्व आहे. खास करुन हिंदू धर्मात. अगदी युध्दामधे बळी पडलेले सैनिक असोत कींवा शत्रू सैन्यातील असोत, प्रत्येकाचा आदरपूर्वक अंत्यसंस्कार झाला पाहिजे असं आपलं शास्त्र सांगते. आपण मृत झालेल्या अचेतन शरीराला प्रेत असे सामान्यत: संबोधतो. प्रेत म्हणजे अपवित्र असा अर्थ नसून प्र + इत म्हणजे जो या लोकाच्या (पृथ्वीलोकाच्या) पलीकडे गेला आहे असा. त्यामुळे दिवंगत व्यक्तीच्या अचेतन शरीराची योग्य ती व्यवस्था लावताना आपल्या मनात पवित्र भाव आणि आदरभाव असायला हवा.

आपला असा विश्वास आहे की मृत्यूनंतरचे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत केले की मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात किंवा मृत्युलोकात न अडकता, त्याला सद्‌गती मिळून तो पुढच्या लोकांत जाऊ शकतो. यामुळे त्याच्याकडून (पूर्वजांकडून) कुटुंबियांना त्रास होण्याची, तसेच असा लिंगदेह वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाण्याची शक्यता नाहिशी होते.

या व्यतिरिक्त, त्या व्यक्तीच्या काही अपूर्ण वासना व ईच्छापूर्ती करता अन्नार्पण, जिवंतपणी संबंध असलेल्या वस्तूंचे अर्पण, प्रार्थनेने पापनिवारण व हा मृत हा भूत होऊन घुटमळू नये, त्याचा पुढील मार्ग व मुक्काम निर्वेध व्हावा, त्याने घरी परतून छळू नये, मृत्यूनंतरच्या स्थितीत त्याचे कल्याण व्हावे व जिवंत आप्तांचेही कल्याण करावे इ. गोष्टींची प्रार्थना या संस्कारात केली जाते.

महाभारतात, युध्द समाप्ती झाल्यावर धर्म राजाने सर्वांना सद्गती लाभावी म्हणून तिलांजली व तर्पण केल्याचा उल्लेख आहे. पूर्वी एखाद्याच्या हातून अनावधानाने हत्या झाल्यास पापक्षालन करावे लागे. प्रायश्चित्त घ्यावे लागे. म्हणूनच, एक नेता या नात्याने, या मोहिमेत, ज्या लोकांनी त्यांच्या करता प्राण दिले त्यांची नैतिक जबाबदारी ही सरनोबतांवरच येते.

गणोजीचा मृत्यू अनावधानाने झाला तरी त्याला जिवंत समाधी द्यायचे अक्षम्य पाप हातून घडले होते. त्याचे निराकरण, परिमार्जन होणे गरजेचे होते. त्याच्या आई वडलांची, भागीची माफी मागणे गरजेचे होते. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन होईल असे काही करणे आवश्यक होते.

गणोजीच्या मृत्यूनंतर त्याच्या नावे जमिनीचा तुकडा द्यायला येवढी वर्षे का लागावीत? मनात आणलं असतं तर गणोजीच्या आई वडीलांना शोधून त्यांच सांत्वन करुन, सनातन तिलांजली विधी करुन त्यांना त्वरीत जमिन देऊ करता आली असती. ज्याअर्थी बाळुअण्णांच्या आजीला या सर्व गोष्टी माहीती होत्या म्हणजे घरातल्या स्त्री वर्गात या चर्चा झाल्याच असणार. गणोजीच्या मृत्यूनंतर घरात काही अघटीत घटना कींवा मृत्यू झाले असणार. त्याला घाबरून कोणीतरी, बहुदा त्यांच्या बायकोने कींवा पुढच्या पिढीने वा सुनेने त्यांना झालेल्या पापाचं परिमार्जन करायची गळ घातली असणार...!

आता, हनुमानाचंच मंदिर का?! हनुमान हा रामाचा भक्त, काळ देखील ज्याला घाबरतो असा सर्व शक्तिमान चिरंजीवी! शरिराची आणि मनाची ताकद ज्याच्या केवळ नाम स्मरणाने वाढावी असा हा बलशाली देव. संकटमोचन करणारा. विभीषण रचित वडवानल हनुमान स्तोत्रात हनुमानाचा उल्लेख, सर्व पाप व दुखः निवारण करणारा आणि सर्व वाईट शक्तिंच निर्दालन करणारा असं केलं आहे. बाकीच्या शेतात राबणाऱ्या कुळांच्या मनातील भिती दूर करणे आणि घरातल्यांना अभय वाटणे हे देखील महत्त्वाचं कारण होऊ शकतं की त्या मागे.

तसेच, उत्सव करण्यामागे अजूनही एक उद्देश असावा. त्या निमित्ताने अन्नदान, वस्त्रदान करणे, कुळातील सर्व सदस्यांचा घरात वावर वाढतो, गाठीभेटी होतात, घरातलं वातावरण सकारात्मक बनते. उत्सवाच्या निमित्ताने कुळांना एकत्र आणणे, त्यांना खाऊपिऊ घालणे, यामुळे त्यांचा मालकाप्रती आपसूकच आदर वाढतो.

जो पर्यंत वाड्यात माणसे होती. हातात पैसा आणि सत्ता होती. दिमतीला नोकर चाकर होते तोपर्यंत हा उत्सव होत होता असे दिसते. जेव्हा शेती गेली, मालकी गेली, चरितार्थासाठी घरातली तरुण पिढी शहराकडे वळायला लागली घरातला राबता आणि स्त्रीचा वावर थांबला त्यावेळेस ह्या सर्व परंपरांना खंड पडला. वाईट शक्तिंचा प्रभाव कमी करण्यासाठी जी काही सकारात्मक पावलं उचलली होती त्याला देखील खिळ बसली.

“आता सर्वात महत्त्वाचा आणि एक चमत्कारिक प्रवाद मी आज तुला सांगणार आहे वैतरणा नदी बद्दल! वैतरणा नदी, नाशिकला त्र्यंबकेश्वर जवळ सह्याद्रीमधे उगम पावते आणि पालघर जिल्ह्यातून प्रवास करत अरबी समुद्राला मिळते. वैतरणा पश्चिमवाहिनी आहे.” गरुड पुराणानूसार, वैतरणा ही पृथ्वीवरील पापी लोकांना नरकात नेणारी नदी आहे. यमराज या नदीतून ज्या लोकांचे अचेतन देह नरकात नेतात त्यांना रौरव नरक व यातना सहन कराव्या लागतात. या नदीच्या पात्रातील तप्त प्रवाह आणि जीवजंतू या देहाचे लचके तोडतात. त्यामुळे या नदीला ओलांडाताना जर पलिकडच्या तिरावर पोहोचु शकलो नाही तर त्या व्यक्तीला कदापि मुक्ती नाही असा एक समज आणि प्रवाद जनमानसात आहे. भारतात दोन वैतरणा नदी आहेत. एक महाराष्ट्रात, तर दुसरी विंध्य पर्वतामधे ऊगम पाऊन, ओरीसामधून वहात, पूर्व वाहिनी होऊन बंगालच्या उपसागरात मिळते.

“आता तुला गणोजीच्या वैतरणेतील सदेह जलसमाधीचे कोडे उलगडेल?! तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला मिळाली असतील हा माझा विश्वास आहे. यावर काय परिमार्जन करायचे आहे हे ठरवायचा हक्क पूर्णपणे तुझा असेल अनिरुद्ध! तु काहीही निर्णय घेतलास तरी मी तुला लागेल ते सहाय्य करेन हा विश्वास ठेव.

गजेंद्र स्वामींच्या तोंडून हे सर्व ऐकून घेतल्यानंतर अनिरुद्ध थोडावेळ तसेच शांत बसून होते. मनात वेगवेगळे विचार येत होते. गेल्या अडीच तीन वर्षात अनिरुद्धने जे अनुभवले होते त्यातून बऱ्याच गोष्टी त्याच्या ध्यानात आल्या होत्या. बऱ्याच गोष्टी जाणवल्या होत्या. बऱ्याच चुकांचे परिमार्जन, निराकरण करणे बाकी होते. आश्रमातून निघताना परतीच्या वाटेवर अनिरुद्धच्या मनात योजना तयार झाली होती. डोळ्यात निग्रही चमक आली होती. आता कामाला लागणे आवश्यक होते..., मार्ग सापडला होता. आत्तापर्यंतचा काळ केवळ भूतकाळात डोकावून अनुमान काढण्यात गेला होता... पण आता शेवटचा घाव, शेवटचा पडाव बाकी होता. उगम समजला होता... पण प्रवाह बदलायचा होता!

क्रमशः


स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.