वारसा भाग ८,उपसंहार,मराठी कथा - [Varsa Part 8 Upsanhar] मातीशी ऋणानुबंध ठेवुन दिलेल्या संस्कारांचा,परंपरेचा व माणुसकीचा वारसा.
आपल्या मातीशी ऋणानुबंध कायम ठेवुन शिकवलेल्या संस्कारांचा, समजावलेल्या परंपरेचा आणि माणुसकीचा वारसा
काळ: एप्रिल २०३० (आजपासून १० वर्षांनंतर)
स्थळ: कांद्रेभुरे (पालघर तालुका)
कांद्रेभुरे मधील ‘अनिकेत’ विद्यालयाचे प्रांगण विद्यार्थी आणि पालकांनी भरुन गेले होते. आज ईमारतीच्या नुतनिकरणानंतरचे उद्घाटन होते. यावर्षी पासून विद्यालयाच्या सिनीयर कॉलेजला नॅक अॅक्रेडीशन मिळालेलं होत. विद्यालयाची प्रशस्त ईमारत दिमाखात उभी होती. यावर्षी विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्यांचे सत्कार, स्कॉलरशिपचे वाटप, गरीब, हुशार व होतकरू मुलांना लॅपटॉप आणि शिक्षण साहित्य आणि तसेच विषेश प्राविण्य पुरस्कार समारंभ असा तगडा बेत होता. व्यासपीठावर जिल्हाधिकारी, नगरसेवक, कलेक्टर अशा खाशा मंडळींची उपस्थिती होती.
मुख्याध्यापक बोलायला उभे होते. मुलांनो आणि माझ्या पालक मित्रांनो, मला सांगायला आनंद होतो आहे की या वर्षीपासून आपल्या महाविद्यालयाला, नॅकची मान्यता मिळाली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचा मान्यता प्राप्त ‘इंटिग्रेटेड टेक्निकल कोर्स’ आपण यावर्षी पासून सुरु करत आहोत. यावर्षी अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे, आपल्या उत्तरोत्तर होणाऱ्या कामगिरीबद्दल आणि उत्तम शैक्षणिक दर्जा बद्दल सलग तीसर्यांदा आपल्या शाळेला ‘Best School of the District’ Award मिळालेला आहे. गेल्या दहा वर्षांत आपल्या शाळेची निरंतर प्रगती होऊन रुपांतर महाविद्यालयात झाले आहे. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, डीजिटल लर्निगसाठी अद्ययावत क्लासरुम, बास्केटबॉल कोर्ट, अद्ययावत लायब्ररी, मुलांकरता sports complex, क्रीडा साहित्य, विज्ञानातील विविध शोध व प्रयोग मुलांना कळावेत म्हणून अद्ययावत प्रयोगशाळा, प्रत्येक विद्यार्थ्यांला स्वताःचा लॅपटॉप, अशा अनेक गोष्टी आणि प्रत्येक परिक्षेत आपल्या विद्यार्थ्यांना मिळालेलं यश यामुळे शाळेचा गौरव वाढला आहे. आपल्या शाळेतून काही वर्षांपूर्वी उत्तीर्ण झालेल्या व भौतिकशास्त्रात ग्रॅज्युएट झालेल्या दोन विद्यार्थ्यांना अमेरिकेत उच्च शिक्षणाकरता प्रवेश मिळाला आहे.
आज हे केवळ एका व्यक्तीच्या कष्टामुळे, इच्छाशक्ती आणि आर्थिक मदतीमुळे व मार्गदर्शनामुळे शक्य झाले आहे. या सर्व गोष्टी घडण्याकरता ज्यांनी अतिशय कष्ट घेतले तसेच सदैव आर्थिक साहाय्य व मार्गदर्शन केले ते आपले मेंटॉर व प्रमुख सल्लागार व आजचे प्रमुख पाहुणे श्री. आदित्य सरनोबत साहेब व त्यांच्या पत्नी यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो!! टाळ्यांच्या गजरात आदित्य आणि रॅचेल व्यासपीठावर विराजमान झाले. प्रेक्षकांमधे बसलेल्या मला आणि माझ्या मीत्रांच्या डोळ्यासमोरुन गेल्या १० वर्षांचा कालावधी क्षणात येऊन गेला.
आप्पांच्या मृत्यु नंतर आदित्य नित्य नियमाने भारतात येऊ लागला होता. त्याने गावी जाऊन सर्वांच्या ओळखी करुन घेतल्या. “आप्पा गेले तरी शाळेची मदत सुरुच राहिल” हे आश्वासन त्यांनी दिले. वाड्याची डागडुजी म्हणजे फारच खर्चीक काम होते पण आमचे शाळा सोबती पुढे सरसावले. आमच्या मित्रांमधील, सिव्हिल इंजिनिअर, आर्किटेक्ट वैगरे मंडळींनी कमी खर्चात वाड्याची डागडुजी केली. त्याचं रुपडं बदललं. कोणी गेस्ट आले तर रहायला म्हणून खोल्या अद्ययावत करुन त्याची जबाबदारी, पूर्वीच्या चहाटपरीवाल्या मुलाला दिली. आप्पांच्या मदतीने त्याच्या चहाच्या टपरीचे, सुरेख रेस्टॉरंट आधीच झाले होते.
बाळुअण्णा काही वर्षांपूर्वीच गेले होते. ते ज्या खोलीत रहात तो भाग आणि पडवी यांची दुरुस्ती करुन तेथे धर्मादाय दवाखाना काढला. गावातल्याच एका डॉक्टरला तो चालवायला दिला होता.
शाळेच्या सल्लागार मंडळावर काही लोकल तर काही बाहेरील तज्ञ मंडळींना घेऊन आदित्यने शाळेचा पंचवार्षिक प्लॅन बनवला. अमेरिकेतून देखील तो त्याच्यां संपर्कात राहत होता. चर्चा करत होता, जेव्हा शक्य असेल तेव्हा सल्ला देत होता. आर्थिक हातभार लावत होता. गावातील तरुणांसाठी त्याने व्यवसाय मार्गदर्शन केंद्र स्थापन केले होते. विविध प्रकारचे प्रशिक्षण तेथे चाले.
दर वर्षी दीड महिना तो सहकुटुंब येई. कधी त्याच्या बरोबर आमचा मीत्र परिवार असे, कधी रॅचेलचे आईवडील, तर कधी सरनोबतांपैकी उत्साही नातेवाईक. तो येऊन गावातल्या जेष्ठांना भेटे. सरकारी अधिकारी, कलेक्टर त्याच्या ओळखीचे झाले होते. कुठच्याही अपेक्षेशिवाय, गावाकरता काम करणाऱ्या आदित्यचं सर्वत्र स्वागतच असे. गेल्या दहा वर्षांत रॅचेल देखील सर्वांच्या परिचयाची झाली होती. आपल्या नवऱ्याला सर्वतोपरी मदत करणार्या रॅचेलचे तिकडच्या आया-बायांना फार कौतुक होते. बायकांनी गृहउद्योग करुन आत्मनिर्भर होण्यासाठी ती उपाय सुचवे. लघुउद्योगांचे ब्रॅंडींग कसे करावे याबद्दल गाईड करे. मोठ्या बायका व गृहीणींकरता तीने English speaking class सुरु केला होता. गावातली ग्रॅज्युएट मुली तो घेत. कधीकधी रॅचेल अमेरिकेतून स्वतः डीजिटल क्लास घेई.
गावातला हनुमान जयंतीचा उत्सव आता पंचक्रोशीत प्रसिद्ध झाला होता. विवीध कलागुणस्पर्धा, रक्तदान शिबीरे, आरोग्य शिबीरे, पुस्तक प्रदर्शन, कुस्ती व कबड्डी सामने, विवीध मान्यवरांची भाषणे व सत्कार. गावाकरता लक्षणीय कामगिरी करणाऱ्या तरुणांचा सत्कार, अशा अनेक करमणुक आणि समाजोपयोगी गोष्टी त्यात होत असतं. आदित्यचा मुलगा अनिश देखील, शाळेतल्या मुलांमधे मिसळत असे. गेले दहा वर्षे भारतात आल्यामुळे त्याचा ही एक छान मित्र परिवार तयार झाला होता. सरनोबतांचा मुलगा, सून व नातू म्हणून गावाने या तिघांचा मोकळ्या मनाने कधीच स्विकार केला होता. आप्पांनी बघितलेलं स्वप्न आदित्यने प्रत्यक्षात आणलं होतं. परदेशात राहुन सुध्दा आदित्यने आपल्या मातीशी ऋणानुबंध कायम ठेवले होते. आप्पांनी शिकवलेल्या संस्कारांचा, समजावलेल्या परंपरेचा आणि माणुसकीचा वारसा त्याने अखंड जपला होता!
समाप्त
अभिप्राय