योगा - निरोगी जीवनाचे रहस्य

योगा - निरोगी जीवनाचे रहस्य - [Yog - Nirogi Jivanache Rahasya] रोगप्रतिकारशक्ती व मनोबल वाढविण्यात योग, प्राणायाम आणि ध्यान हे अगदी अग्रस्थानी आहेत.

रोगप्रतिकारशक्ती व मनोबल वाढविण्यात योग, प्राणायाम आणि ध्यान हे अगदी अग्रस्थानी आहेत

योगा हा शब्द ‘युज’ ह्या संस्कृत शब्दावरून घेतलेला आहे. आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे म्हणजेच योग. “योगक्षेमम वाहम्यहं” या गीतेतील ओळीत खुद्द परमेश्वराने सांगितलेले आहे, कि जो आत्म्याला परमात्म्यात विलीन करून माझी साधना करेल त्याच्या संरक्षणाची जबाबदारी साक्षात परमात्म्याचीच आहे. योगाभ्यास हा केवळ योगासनांचा सराव नसून ती एक साधना आहे. या साधनेतून आपल्या शरीराचे आणि सोबतच मनाचे स्वास्थ्य जपून आपण एक प्रकारे परमेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करीत असतो. प्रकृतीने देणगीस्वरुपात दिलेले सुंदर शरीर आणि सुंदर मन आणखी सुंदर बनविणे याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.

योगाभ्यास ही ५,००० वर्ष जुनी ज्ञानशाखा आहे. योगशात्र हे सगळ्या जीवनाचे सार असलेली एक जीवनशैली आहे. ज्ञानयोग किंवा तत्वज्ञान, भक्तीयोग किंवा भक्तीयुक्त शाश्वत सुखाचा मार्ग, कर्मयोग किंवा सुखप्रद कर्ममार्ग आणि राजयोग किंवा मनावर ताबा मिळविण्याचा मार्ग. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला सगळं इन्स्टंट हवं असतं. हे अमुक अमुक औषध खा आणि ७ दिवसात वजन कमी करा किंवा तमुक “जिम” लावा आणि म्हणे “झिरो फिगर“ मिळवा आणि एक क्षण मानलेही कि खरंच होत असेल असे, पण कधी विचार केलाय की शरीरासाठी, आरोग्यासाठी हे किती फायदा किंवा नुकसानकारक आहे? शिवाय मानसिक स्वास्थाचं काय? आपण विसरून जातो कि मनाचे आरोग्यही तितकेच महत्वाचे आहे.

योगशास्त्र प्राणायाम शिकवतं. प्राणायाम म्हणजे आपल्या श्वासोश्वासाचे विस्तारीकरण आणि नियंत्रण. योग्य तंत्रांचा सराव केल्यास रक्तातील व मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. त्यामुळे प्राणशक्ती व जीवन उर्जा यांच्या नियंत्रणास मदत होते. प्राणायाम आणि योगासने हे एकमेकांस पूरक आहेत. ह्या दोन योगतत्वांचा मिलाफ हे मन आणि शरीराचे सर्वोच्च प्रतीचे शुद्धीकरण व अनुशासन समजले जाते. या दोन विलक्षण प्रभावी गोष्टींच्या अभ्यासाने रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड आणि असे अनेक आजार आपल्यापासून कितीतरी दूर पळून जाऊ शकतात. त्यासाठी फक्त सातत्य आणि सराव याची आवश्यकता आहे आणि यात “ध्यानाची“ भर पडली तर सर्वांगीण विकास सहज रीतीने होऊ शकतो. सोप्या आणि समजेल अश्या शब्दात सांगायचे तर “योगा, प्राणायाम आणि ध्यान (मेडिटेशन)” हे स्वतःला निरोगी आणि प्रसन्न ठेवण्याचे पॅकेज आहे. या तीन गोष्टी अंगवळणी पडल्यास कुठलाच विकार किंवा व्याधी तुमच्या आसपासही फिरकू शकत नाही.

आपल्यात बर्‍याच जणांना असे वाटते कि योगा केवळ वयोवृद्ध किंवा मुबलक वेळ उपलब्ध असणाऱ्या लोकांसाठी आहे. योगाभ्यास हा केवळ एका विशिष्ट वयोगटापुरता किंवा विशिष्ट वर्गापुरता मर्यादित ठेवणे ही खूप मोठी चूक ठरू शकते. सांगायचंच झालं तर अगदी शालेय वर्गापासून वृद्धांपर्यंत, स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत सगळेच योगा करू शकतात आणि करायलाच हवा. आजचा विद्यार्थी वर्ग उद्याचा भावी नागरिक आहे जो देशाचा आधारस्तंभ बनू शकतो. त्याला शारिरिक तसेच मानसिकरित्या सबळ बनवायला योगाभ्यास खूप महत्वाचा घटक ठरू शकतो. आजची स्थिती बघितल्यास देशात पाश्चात्य संस्कृतीच्या नावाखाली सगळा गदारोळ माजलाय आणि दुःख सोबतच आनंदाचीही बाब अशी आहे कि जगभरात योगाभ्यासाची महिमा जाणून त्याला महत्व दिलं जातंय. दुःखाची बाब यासाठी कि योगशास्त्राचा उगम भारत देशातून झालाय आणि आम्हा भारतीयांनाच त्याची किंमत उरली नाहीये. समस्त मानवजातीच्या कल्याणाचे काम जगभरात योगाभ्यासामुळे घडतंय यासारखा आनंद दुसरा नाही. पण अजूनही वेळ गेलेली नाहीय. २१ जून जागतिक योगा दिवसाच्या मुहूर्तावर सगळे अबालवृद्ध स्वतःला आणि स्वतःभोवतीच्या समस्त जगाला शरीराने आणि मनाने निरोगी आणि सशक्त बनविण्याचा संकल्प करूया. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी मागे ठेवलेल्या अमूल्य ठेव्याचा उपयोग सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी करूया. “आरोग्यम धनसंपदा” हे लक्षात ठेवून खऱ्या अर्थाने सधन बनूया.

- अश्विनी तातेकर-देशपांडे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.