बाबा आमटे - मातीतले कोहिनूर

बाबा आमटे, मातीतले कोहिनूर - [Baba Amte, People] कुष्ठरुग्णांच्या शुश्रूषेसाठी उभं आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ समाजसेवक म्हणजे बाबा आमटे.
बाबा आमटे - मातीतले कोहिनूर | Baba Amte - People

कुष्ठरुग्णांच्या शुश्रूषेसाठी उभं आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ समाजसेवक म्हणजे बाबा आमटे


बाबा आमटे / मुरलीधर देवीदास आमटे - (२६ डिसेंबर १९१४ - ९ फेब्रुवारी २००८) कुष्ठरुग्णांच्या शुश्रूषेसाठी उभं आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्रातल्या चंद्रपूर येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. महारोग्यांसह समाजातील इतर उपेक्षितांसाठी देखील बाबा आमटे यांचे कार्य उल्लेखनीय आहे.बाबा आमटे यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ साली वर्धा जिल्ह्यातील एका संपन्न जमिनदार कुटुंबात झाला होता. संपन्न आणि उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेल्या बाबा आमटेंना वेगाने गाडी चालविणे, इंग्रजी चित्रपट पाहणे, त्यांची समिक्षा लिहिणे अतिशय आवडायचे.

नागपूर येथे महाविद्यालयीन शिक्षण झालेल्या बाबा आमटेंना डॉक्टर होण्यात रस होता मात्र वडिलांच्या आग्रहाखातर त्यांना वकीलीचे शिक्षण पूर्ण करावे लागले. पुढे एके दिवशी कुष्ठरोगाच्या अखेरच्या पायरीवर असलेल्या एका कुष्ठरोग्याची अवस्था पाहून बाबा आमटे यांचे लक्ष कुष्ठरोगासारख्या भयंकर रोगाकडे वेधले गेले आणि हाच त्यांच्या आयुष्याला वळण देणारा क्षण ठरला.

सन १९४९ मध्ये त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या शिफारशीने केवळ डॉक्टरांसाठी असलेला एक अभ्यासक्रम पूर्ण केला जो कुष्ठरोग्यांवरील निदान आणि चिकित्सेशी संबंधित होता; येथुनच पुढे त्यांच्या हातुन कुष्ठरोग्यांसाठी होणाऱ्या सेवेचा प्रवास सुरु होणार होता.

बाबा आमटे यांनी सन १९४९ साली महारोगी सेवा समितीची स्थापना केली. शिवाय त्यांनी आनंदवन, सोमनाथ प्रकल्प, अशोकवन आणि लोकबिरादरी प्रकल्प सारख्या संस्था देखील स्थापन केल्या. आनंदवन म्हणजे असंख्य मनांना उभारी देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारी सेवाभावी संस्था आहे. तत्कालीन समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जाई तसेच आजही काही लोक ते अंधश्रद्धेमुळे तसे मानतात. यामुळे कुष्ठरोग्यांस वाळीत टाकले जाई. तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोग अभ्यासायला सुरुवात केली. इ.स. १९५२ साली वरोड्याजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. अशोकवन (नागपूर); सोमनाथ (मूल) या ठिकाणीही उपचार व पुनर्वसन केंद्रे स्थापन केली. ‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे’ या बा. भ. बोरकरांच्या ओळीचा ‘देखणा प्रत्यय’ या प्रकल्पांच्या ठिकाणी येतो. इ.स. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे. भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. गेल्या ३५ वर्षांपासून या प्रकल्पाची जबाबदारी बाबांचे सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे व स्नुषा डॉ. मंदाकिनी आमटे समर्थपणे सांभाळत आहेत.

सहा कुष्ठरोगी, १४ रुपये रोख, १ आजारी गाय व सरकारकडून मिळालेली ५० एकर नापीक जमीन यावर त्यांनी कार्य सुरू केले. या कार्यात बाबांच्या पत्‍नी श्रीमती साधना आमटे यांचाही त्याच तोडीचा वाटा आहे. साधनाताईंनी लिहिलेल्या ’समिधा’ या आत्मचरित्रपर पुस्तकातून साधनाताईंच्या संयमी, त्यागी व बाबांच्या कार्यासह त्यांना सांभाळणार्‍या समर्थ व्यक्तिमत्त्वाचा परिचय आपल्याला होतो. ‘समिधा’तून बाबांच्या जीवनकार्याचा आढावाही आपल्यासमोर येतो.

बाबा आमटे यांनी स्वतः ‘ज्वाला आणि फुले’, ‘उज्वल उद्यासाठी’ आणि ‘माती जागविल त्याला मत’ ही कविता संग्रहे देखील लिहिली आहेत; शिवाय बाबा आमटे यांच्या कार्यविषयी माहिती देणारी असंख्य पुस्तके आजतागायत लिहिली गेली आहेत.

संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्‍चयी वृत्ती, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणासातत्य या सर्व गुणांच्या आधारे बाबांनी आपले सर्व प्रकल्प यशस्वी केले.

बाबा आमटे यांना देशातील सर्वोच्च असे पद्मश्री (१९७१) आणि पद्मविभूषण (१९८६) पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे शिवाय डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार (१९९९) आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कारासारखे आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील देण्यात आले आहेत.

कुष्ठरोग्यांसाठी अवघे आयुष्य वेचलेल्या या महामानवाचे ९ फेब्रुवारी २००८ रोजी वरोडा येथील निवासस्थानी रक्तातील कर्करोगाने निधन झाले.

बाबा आमटे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त गुगल डूडलने त्यांना सन्मानित केले आहेमराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.