आठवतेय का तुला आपली पहिली भेट, गणिताच्या पेपराचाच मुहूर्त होता थेट
आठवतेय का तुला आपली पहिली भेटगणिताच्या पेपराचाच मुहूर्त होता थेट
तु नववीत आणि मी दहावीत होतो
तू पुढच्या बाकावर बसली होतीस
मी मागच्या बाकावर बसलो होतो
त्या दिवशी झालं असं
तुझ्या नाजूक बोटांतून
एक पेन्सिल अलगद निसटली होती
माझ्या पायाजवळ घरंगळत
बाकाखाली येऊन बसली होती
मी तुला ती उचलून दिल्यावर
तू गालातच गोड हसली होतीस
तुला काय सांगू माझी नजर मात्र
तुझ्या गालातल्या खळीवरच खिळली होती
पुढचे तीन तास पेपरात काय लिहिलं
काही आठवत नाही
तुला मात्र पुरवण्यांवर पुरवण्या लावण्याची
झाली होती नुसती घाई
तुझ्या एका खळीनं मला पुरतं घायाळ केल होतं
तुझ्या एका खळीनं मोठं राजकारण केल होतं
तरी नशीब
ती सराव परीक्षाच होती
नाही तर
नापासांच्या यादीत
माझी जागा निश्चितच होती