मराठी भाषा दिवसाला ऑडियो बुकची सलामी

मराठी भाषा दिवसाला ऑडियो बुकची सलामी - [Marathi Audiobook Launch on Marathi Bhasha Diwas by Prajakta Gavhane] प्राजक्ता गव्हाणे यांनी मोबाईल माध्यमामधून मराठी ऑडियोबुक्स पोहोचवण्याचा अभिनव प्रयत्न केला आहे.
मराठी भाषा दिवसाला ऑडियो बुकची सलामी | Marathi Audiobook Launch on Marathi Bhasha Diwas by Prajakta Gavhane

‘इल्जं इन वंडरलॅंड’ (ilze in Wonderland), मराठी ऑडियोबुकचे प्रकाशन

जाहलो खरेच धन्य ‘एकतो मराठी’. एक घास चिऊचा नि एक घास काऊचा ऐकत आजही आपली चिमुकली मुलं आजी आजोबांच्या मांडीवर खेळत मराठी भाषेचं बाळकडू घेत आहेत. मात्र ही मुले शाळेत जाऊ लागताच इंटरनॅशनल स्कूल्सच्या वातावरणात त्यांचा गोंधळ उडतोय; हे समजून घेताना की तो जो एक घास ‘काऊचा’ आहे, तो नेमका मराठीतल्या काव् काव् करणाऱ्या कावळ्याचा आहे की इंग्रजीतल्या ‘हम्माऽऽऽ करून मिल्क देणाऱ्या काऊचा!’ संस्कारक्षम गोष्टी वाचण्याच्या वयातच नेमका त्यांच्या हातांना मोबाईल येऊन चिकटलाय आणि इंटरनेटच्या जंजाळात मुलं पुस्तकांना मात्र पारखी झाली आहेत. जगाची भाषा समजून घेताना मातृभाषेला नेमके कुठे स्थान द्यावे किंवा शिक्षणाचे माध्यम कुठले असावे या वादात न पडता मुलांसाठी, त्यांच्या आवडत्या मोबाईल माध्यमामधून मराठी ऑडियोबुक्स पोहोचवण्याचा अभिनव प्रयत्न केला आहे प्राजक्ता गव्हाणे यांनी.

‘दि इल्जं’ हे ख्रिस्टीयानं न्योस्टींगरलिखित जर्मन भाषेतील प्रसिद्ध पुस्तक तिने मराठीत अनुवादित केले आहे आणि कथा प्रभावीपणे मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी साऊंड इफेक्ट्सची जोड देऊन अभिवाचनही केले आहे. साहित्य चिंतन या ई - चळवळीच्या माध्यमातून ‘लिसन स्टोरीज’ या नावाचा मोबाईल अ‍ॅप बनवला गेलाय, त्यावर येत्या ‘२७ फेब्रुवारी’ला म्हणजेच मराठी भाषा दिवसानिमित्त या ऑडियो बुकचे प्रकाशन होत आहे. घरात बोललेली मराठी भाषा समजते परंतू पुस्तके वाचण्याइतपत अक्षरओळख किंवा वेळ नाही अशा पिढीला आता मराठी भाषा पुस्तकातून ऐकवण्याचा आणि ग्लोबलायझेशनच्या जगात मराठी टिकवण्याचा हा प्रयोग आहे. ऑडियो बुकची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून व्हिडिओ ट्रेलरही बनवला गेलाय.

ऑडिओ रूपांतरणासाठी मार्गदर्शन आणि संपूर्ण तंत्रसहाय्य हे श्री. रोहन शिंगाडे, ध्रुवी फिल्म्स, पुणे यांनी केले आहे. ध्वनी मुद्रण व्ही. एस. एच. स्टुडिओज मध्ये पार पडले. साहित्य चिंतन च्या चेतन अकर्ते यांनी मोबाईल अ‍ॅपवरून ते सर्वांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

अँड्रॉइड ॲप्लिकेशन येथे मोफत डाऊनलोड करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.