“मराठी शाळा वाचवा” अशी ओरड गेली काही वर्षे सर्वत्र ऐकू येते
आहे...
इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा अतिशय दर्जेदार पर्याय पालकांना मिळाल्यामुळे मराठी
शाळा ओस पडत आहेत असे जर आपल्याला वाटत असेल तर सावधान! आपण एका कारस्थानाला बळी
पडत असल्याचे हे लक्षण आहे. इंग्रजी शाळांमध्ये परभाषा माध्यम, नफेखोरी, आर्थिक
लूटमार, अप्रशिक्षित व शोषित शिक्षक, दर्जाहीनता असे असंख्य दोष असताना इंग्रजी
शाळा पालकांना आकर्षून कशा काय घेत आहेत? हे सर्व दोष पालकांना दिसत नाहीत का?
वरलिया रंगाला भुलून वर्षानुवर्षे लोक मूर्ख बनत आहेत का? तर नाही. मग काय आहे
यामागचे कारण? वास्तव हे आहे की इंग्रजी शाळा पालकांना आकर्षून घेत नसून मराठी
शाळांपासून पालकांचे अपकर्षण होते आहे. त्यामुळे पालक मुलांना मातृभाषेतून
शिकवण्याची इच्छा असूनही नाइलाजाने, अनिच्छेने वरील सर्व दोष असलेल्या इंग्रजी
माध्यमाच्या शाळांत जात आहेत. हे व्हावे यासाठी एक फार मोठे कारस्थान कार्यरत
असून मोठे अर्थकारण त्यामागे आहे.कारस्थान असे आहे की समाजातील तसेच मराठी शाळांमधे आपल्या मुलांना घालणार्या सधन व ऐपतदार पालकांना वेगळे करून शिक्षणाच्या बाजारीकरणासाठी इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांकडे वळविण्याकरिता मराठी शाळेत इंग्रजी माध्यमाच्या शाळांची जाहिरात करायची आणि त्याला मराठी शाळांवर आपणच हल्ले करून दुरवस्था केल्याने घटलेल्या पटसंख्येच्या समस्येवर उपाययोजना असे गोंडस नाव द्यायचे. ‘सेमीइंग्रजी’ या नावाने ही ‘उपाय योजना’ आणली गेली. सेमीइंग्रजीचा अंतस्थ उद्देश पालकांच्या मनात मराठीबद्दल न्यूनगंड, भयगंड निर्माण करून मराठी ही शिक्षणाचे माध्यम म्हणून अयोग्य आहे असे त्यांच्या मनावर ठसवून त्यांना मराठी शाळेत प्रवेश घेण्यापासून दूर पिटाळणे हा आहे.
[next] सेमीइंग्रजी हा प्रकार पूर्णपणे अशैक्षणिक असून यात विज्ञान व गणित या विषयांचे शिक्षण बालकाला एक परभाषा आत्मसात करण्याच्या अटीवर दिले जाते. पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनावर असे बिंबवले जाते की आता सर्व जग इंग्रजी झाले असून आपापल्या मातृभाषेतून कोणीही शिकत नाही. मातृभाषेतून शिकायला सांगणारे जगातील सर्व शिक्षणतज्ज्ञ व्यवहारज्ञान नसलेले आहेत. मराठी आपली मातृभाषा असली आणि मराठीतून समजायला कितीही सोपे असले तरी ती आता जुनाट, मागास असल्याने शिकण्याचे माध्यम म्हणून उपयोगाची नाही. आपली मातृभाषा मराठी असल्याने आपण दुय्यम शैक्षणिक जातीचे आहोत. इंग्रजी माध्यमातून शिकल्याने आपण नीच शैक्षणिक जातीतून उच्च शैक्षणिक जातीचे बनतो. तुम्हाला थोडेसे का होईना उच्च शैक्षणिक जातीचे बनवण्यासाठी महत्त्वाचे विषय इंग्रजी माध्यमातून शिकवत आहोत. अशी खोटी व शैक्षणिक जातीयवादी शिकवण बालक व पालकांना सेमीइंग्रजी देते.
सेमीइंग्रजीचा आणखी शिक्षणविरोधी पैलू म्हणजे हे असामान्य किंवा प्रतिभावंत विद्यार्थ्याला सामान्य बनवते. सर्व जग जेंव्हा विकासाची वाट चुकलेल्या रोमन अंकांच्या सहाय्याने गणित मांडण्याची केविलवाणी धडपड वर्षानुवर्षे करीत होते तेंव्हा आपल्या देशाने आर्यभट्ट तसेच भास्कराचार्य यांसारखे असामान्य गणिती निर्माण केले. त्यांनी जगाला शून्य ते नऊ हे क्रांतिकारी अंक दिले; आणि जगाची रोमन अंकांच्या अंधारात चाचपडण्यापासून सुटका केली. भारतीय गणिती हे क्रांतिकारी शोध जगाला देऊ शकले ते यामुळेच की त्यांच्या शिक्षणात कोणताही भाषिक अडथळा आला नव्हता. कोणत्याही परभाषेत पारंगत होण्याच्या अटीवर त्यांना गणिताचा, विज्ञानाचा अभ्यास करावा लागला नव्हता. त्यावेळी जर सेमीइंग्रजीसारखी धोंड त्यांच्या शिक्षणात आली असती तर नक्कीच हे बुद्धीमान भारतीय गणिती घडलेच नसते. ह्या सेमीइंग्रजीने गेल्या वीस एक वर्षांत अशा कितीतरी गणिती, वैज्ञानिक मराठी प्रतिभांची भ्रुणहत्या केली आहे व आजही करीत आहे.
[next] अशा ह्या सेमीइंग्रजीचा द्वैभाषिक (बायलिंग्वल) शिक्षणपद्धती म्हणून गौरव करून लोकांना मूर्ख बनवले जाते आहे. द्वैभाषिक शिक्षणपद्धती ही अत्यंत शास्त्रीय पद्धती असून अनेक प्रगत देशांमधे तिचा वापर प्रभावीपणे केला जातो. तिच्यात व सेमीइंग्रजीत काडीचेही साम्य नाही. दोन्हींच्या उद्दिष्टांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. द्वैभाषिक शिक्षण पद्धतीमध्ये दोन वेगवेगळ्या मातृभाषा असलेल्या बालकांना एकाच वर्गात दोन्हीही भाषामाध्यमातून शिकवले जाते. बालकावर परभाषा लादली जाऊ नये यासाठी हे असते. त्याच्या मातृभाषेतून प्रत्येक विषय शिकण्याची व व्यक्त करण्याची संधी त्याला मिळते. एवढेच नव्हे तर दोनपैकी कोणत्याही भाषेतून किंवा दोन्ही भाषा मिश्र स्वरूपात वापरूनही परीक्षेत उत्तरे लिहिण्याची मुभा असते. कारण विषयाचे आकलन हे उद्दिष्ट्य असते, साध्य असते; आणि भाषा हे साधन असते. सेमीइंग्रजीत मात्र याच्या अगदी उलट आहे. उद्दिष्टे छुपी व दाखवण्याची वेगवेगळी आहेत. दाखवण्याची जरी खरी मानली तरी विज्ञान व गणित या विषयांचे आकलन ही दुय्यम बाब मानून इंग्रजी भाषा शिकण्याचे साधन म्हणून वापरले जाते. साध्याला साधन व साधनाला साध्य बनवणे हा प्रकार शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने सर्वात वाईट व हानीकारक असून विषयाच्या अभ्यासक्रमातील समावेशाच्या मूळ उद्दिष्टावरच पूर्णपणे बोळा फिरवणारा आहे. सेमीइंग्रजीचे हे अतिशय लज्जास्पद वैशिष्ट्य आहे. बालकाला (तेही इयत्ता १ ली पासूनच्या) त्याच्या परीक्षेत मातृभाषेतून उत्तरे लिहिण्यास सेमीइंग्रजी बंदी घालते. आणि हे म्हणे बायलिंग्वल एज्युकेशन! सेमी इंग्रजीला बायलिंग्वल एज्युकेशन म्हणणे म्हणजे विषाला औषध म्हणण्यासारखे आहे. आणि कहर म्हणजे हे विष मुलांना जनतेच्या पैशाने पाजले जाते आहे. मराठी शाळेतील बालकांना मातृभाषेतून उत्तरे लिहिण्यास बंदी घालण्यासाठी शिक्षकांना शासन पगार देते आहे. या सर्वांच्या परिणामी परीक्षेसाठी बालके विज्ञान व गणित न समजताच फक्त स्पेलिंग व प्रश्नोत्तरे पाठ करतात. शिक्षकांनाही ह्या मूर्खत्त्वपूर्ण पद्धतीनेच शिकवणे सक्तीचे असल्याने ते आज्ञाधारकपणे हे हास्यास्पद काम करीत असले तरी अनेक प्रामाणिक शिक्षक याबद्दल तीव्र नापसंती दबक्या आवाजात व्यक्त करतात.
वास्तव हे आहे की महाराष्ट्रात मराठी भाषा ही अत्यंत दृढमूल झालेली आहे. दीडशे वर्षांची इंग्रजी राजवट, त्यानंतर गेल्या सत्तर वर्षांच्या स्वातंत्र्योत्तर भाषिक गुलामगिरीच्या काळात मराठीवर केले गेलेले चौफेर हल्ले, गेल्या वीस-पंचवीस वर्षांत तर मराठीतून शिक्षण घेणे मागास, गावंढळपणाचे आहे असे चित्र निर्माण केले गेले. मराठी शाळा बंद पडाव्यात यासाठी सर्व सत्ता व शक्ती एकवटून जंग जंग पछाडले. परंतु तरीही आज राज्यातील ७०% विद्यार्थी मराठी शाळांमधून शिक्षण घेत आहेत. अशा या बलाढ्य मराठी भाषेचा महाराष्ट्रात निःपात करणे शिक्षणाच्या बाजारीकरणासाठी आवश्यक असले तरी त्यासाठी मराठी शाळांच्या शैक्षणिक दर्जाशी स्पर्धा करणे इंग्रजी शाळांना शक्यच नाही. फक्त कट कारस्थानानेच हे शक्य आहे. म्हणून मराठीला बदनाम करणे, मराठीतून शिकण्याबाबत लोकांच्या मनात न्यूनगंड, भयगंड निर्माण करणे हे आवश्यक होते. त्यासाठी बाजारू इंग्रजी शाळांची जाहिरात केवळ बाहेरून न करता मराठी शाळांमधे घुसून करणे आवश्यक होते. परंतु राजरोसपणे अशी जाहिरात करता येत नसल्याने सेमीइंग्रजी या पटसंख्यावाढीच्या कथित उपायाचे पांघरुण घालून मराठी शाळांमधे ती घुसवली गेली.
[next] शिक्षणाच्या बाजारीकरणासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना ज्या वेगाने शासन मान्यता देत सुटले आहे त्या वेगाने त्यांना विद्यार्थी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मराठी शाळा बंद पाडल्याशिवाय ते शक्य नाही. मराठी शाळांची पटसंख्या वाढवण्याचे उपाय करूनही पटसंख्या कमी होते आहे असे दाखवणे आवश्यक होते. उपाय कोणता केला? तर सेमीइंग्रजीचा! खरोखरच उपाय केला असता तर पटसंख्या वाढण्याची भीती होती. म्हणून सेमीइंग्रजीसारखा पाताळयंत्री उपाय योजून मराठी आता बुडणार! मराठीतून शिकलेल्यांना भाविष्य नाही, महाविद्यालयीन शिक्षण अवघड जाणार, नोकर्याही मिळणार नाहीत. याचा पुरावा म्हणून मराठी शाळांचे जाणीवपूर्वक अनाकर्षक केलेले रंगरूप दाखवून, बघा! म्हणूनच मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांनासुद्धा आता यातून वाचवण्यासाठी इंग्रजीतून शिकवायला सुरुवात केली आहे. असे पालकांच्या मनावर बिंबवले गेले. परिणामी इच्छा असूनही लोकांना मराठी शाळेत मूल घालण्याची धास्ती वाटू लागली. मराठी शाळांची पटसंख्या वाढवण्याचा उपाय करण्याच्या पांघरुणाखाली लपवलेले मराठीला कमी लेखण्याचे, मराठीबाबत पालकांना भयभीत करण्याचे कारस्थान लोकांच्या अज्ञानामुळे तसेच शिक्षकांच्या भिडस्तपणामुळे काही प्रमाणात यशस्वी झाले. त्यामुळे मराठी शाळांची पटसंख्या आणखी घटू लागली.
पटसंख्या टिकवण्यासाठी पालकांच्या मनातील खोटा भयगंड दूर करून सत्य लोकांसमोर मांडणे हा खरा उपाय होता. परंतु तो भयगंड मोठ्या प्रयत्नांती निर्माण केलेला असल्याने तो वृद्धिंगत करणारा पटसंख्येवरील ’उपाय’ केला गेला. आपल्या हुजर्यांना त्यासाठी शिक्षणतज्ञ म्हणून दाखवले गेले. मराठी शाळांना सेमीइंग्रजी सुरू करण्याची परवानगी! हा तो उपाय. यात वरकरणी त्यासाठी काही नियम असल्याचे दाखवले गेले. ते सर्व नियम धाब्यावर बसवून सेमीइंग्रजी राबवली जाते आहे. मुळात पटसंख्येच्या समस्येवर सेमीइंग्रजी हा जर खरेच उपाय असता तर ती समस्या वाढते कशी काय आहे? तर सेमीइंग्रजी ही उपाययोजना नसून मराठी शाळा संपवण्याचे एक कारस्थान आहे. सेमीइंग्रजी ही त्याबाबतचे सर्व कथित नियम पाळून जरी राबवली तरीही तिच्यामुळे मराठी शाळांची पटसंख्या वाढणे हे कदापि शक्य नाही. कारण त्यामुळे पालकांच्या मनातील मराठीबाबत खोटे न्यूनगंड, भयगंड व अज्ञान दूर न होता ते वृद्धिंगत होत आहेत. परिणामी मराठी भाषिक उच्चशिक्षित वर्ग, अभिजन वर्ग मराठी शाळेपासून दूर गेला आहे; तर इंग्रजी शाळेत मूल घालणे कधीही न परवडणार्या पालकांमधे सेमीइंग्रजी तुकडीत मुलाला घालून आपणही अर्ध का होईना उच्च शैक्षणिक जातीचे झाल्याचे भाबडे समाधान मिळवण्याची स्पर्धा मराठी शाळेतील पालकांमधे लागली आहे. या वर्गाकडे बोट दाखवून पटसंख्या वाढल्याचे खोटे दावे केले जात आहेत. वास्तविक सेमीइंग्रजी तुकडीत आपल्या मुलांना घेण्यासाठी पालकांकडून चालणारे आकांडतांडव हा पटसंख्या वाढल्याचा किंवा सेमी इंग्रजीच्या उपयुक्ततेचा पुरावा नसून पालकांच्या मनात मराठीबाबत अज्ञान, न्यूनगंड व भयगंड वाढून ते ह्या कारस्थानाची शिकार झाल्याचा पुरावा आहे.
[next] म्हणे “महाविद्यालयीन शिक्षण सोपे जावे यासाठी शाळाप्रवेशापासूनच काही विषय इंग्रजीतून शिकवतोय.” असे जर आहे तर हे सेमीइंग्रजी महाविद्यालयात सुरू करण्याची बुद्धी का नाही झाली ह्या ‘शिक्षणतज्ज्ञांना’? देश स्वतंत्र आहे की पारतंत्र्यात? अजूनही आपल्या भाषेत महाविद्यालयीन शिक्षण नको द्यायला लोकांना? पण मग मराठीबाबत न्यूनगंड, भयगंड कसा पसरणार? आणि शालेय शिक्षणाचे बाजारीकरण कसे होणार? मराठी शाळेत इंग्रजी भाषा हा एक विषय म्हणून अधिक व्यवहार्यतेने व परिणामकारकपणे शिकवणे पुरेसे होते. पण त्याऐवजी बालकाने शाळेत पाऊल टाकताच त्याला परभाषेच्या माध्यमातून आणि तेही गणित व विज्ञान हे विषय शिकवून त्या विषयांच्या उद्दिष्टांची मोडतोड केली जाते, आणि हे सर्व त्याला इंग्रजी भाषा चांगली यावी यासाठी! असे सांगून मराठी शाळा बंद करण्याचे कारस्थान रचले जाते, अज्ञानी पालक भाबडेपणे या कारस्थानाचे गोडवे गातात आणि शिक्षक आपली नोकरी टिकून आजचे मरण उद्यावर ढकलण्यात धन्यता मानतात हे भयंकर दुर्दैवी आहे. पारतंत्र्याच्या काळात इंग्रजांकडूनही इतके भयानक शैक्षणिक अत्याचार या देशात बालकांवर झाले नव्हते.
मराठी शाळांना पर्यायाने विद्यार्थ्यांना सेमीइंग्रजीसारख्या अन्याय्य व शैक्षणिक नुकसान करणार्या प्रकारापासून वाचवायचे असेल तर शिक्षकांची यात प्रमुख भूमिका असणार आहे. मराठी शाळांमधील शिक्षक हे उच्चशिक्षित व प्रशिक्षित असतात. शिक्षणशास्त्राचा, बालमानसशास्त्राचा त्यांनी अभ्यास केलेला असतो. तेच फक्त बालकांच्या बाजूने त्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करू शकणारे असतात. शिक्षक म्हणजे कळसूत्री बाहुल्या नाहीत. विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सगळ्या समाजालाच योग्यायोग्य, सत्यासत्य सांगणं हे त्यांचं कर्तव्य असते. ते पार पाडण्यासाठी त्यांना जनता पगार देते. कुणाच्या तालावर नाचण्यासाठी नाही. ज्या मराठी भाषेच्या निकषावर महाराष्ट्र निर्माण झाला त्या मराठीविरुद्ध पालकांच्या मनात रुजवलेले खोटे न्यूनगंड, भयगंड दूर करण्याचे आव्हान शिक्षकांनी पेलायचं आहे. ते जर स्वतःच या जाळ्यात फसणार असतील, ज्या शिक्षणशास्त्र, बालमानसशास्त्र यांचे प्रशिक्षणादरम्यान अध्ययन केलं त्याच्याशी प्रतारणा करून आपल्या मनात उद्भवणारे प्रश्न विचारण्यास भीड बाळगणार असतील तर असल्या कारस्थानांना पालक बळी पडतच राहाणार. पालकांची आर्थिक लूट करण्यासाठी शिक्षणाचा दर्जा घटवून मराठी शाळांचा बळी दिला जातो आहे. याला शैक्षणिक विकास म्हटले जाते आहे. हे कारस्थान शिक्षक व पालक यांनी लवकरात लवकर ओळखण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची जबाबदारी पूर्णपणे राज्यातील मराठी शाळांवरच आहे. कारण राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा संबंध फक्त नफेखोरीशी असून शिक्षणाच्या दर्जाशी अजिबात नाही. त्यामुळे मराठी शाळांच्या विकासाचे, सक्षमीकरणाचे कोणतेही कार्य करायचे असेल तर त्याची पहिली पायरी म्हणजे सेमीइंग्रजी ह्या पालकांना भुलवणार्या व मूर्ख बनवणार्या गोंडस नावाच्या कारस्थानाचा बुरखा फाडून त्याचे मराठी शाळांतून समूळ उच्चाटन करणे! शिक्षकांनो, पालकांनो, शिक्षणप्रेमी अणि मराठीप्रेमींनो, ११ कोटींच्या महाराष्ट्राची ज्ञानभाषा होऊ पाहणारी मायमराठी शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या आड आल्याने पाठीत खंजीर खुपसून तिला नष्ट करण्याच्या कारस्थानांनी वेढली आहे. तिची मूक आर्त हाक ऐका!