जातबळी भाग १० - मराठी भयकथा

जातबळी भाग १०, मराठी कथा - [Jaatbali Part 10, Marathi Katha] आकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी.

जातबळी भाग १० - मराठी कथा | Jaatbali Part 10 - Marathi Katha

आकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी

पुर्वार्ध: नभाचे मामा जेवणावर ताव मारत असतात, तिची आई तिला आकाशच्या मृत्यूची बातमी देते. नभाचा विश्वास बसत नसल्यामुळे रवी मामा तिला आकाशला मारल्याचे आणि आकाशला विसरून लग्नासाठी तयार व्हायला सांगतो. वडीलांकडून आकाशच्या मृत्यूबद्दल ऐकल्यावर नभाचा त्यावर विश्वास बसतो. तो धक्का सहन न झाल्याने तीला मृत्यू येतो. तिच्या पाठोपाठ तिचे वडीलही मरतात. पूनम आपल्या आईला खूप दूषणे देते. रवी तिला कोणालाही काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देतो. आकाशचा आत्मा नभा गेल्याचे समजल्यावर बेभान होतो तेव्हा त्याला जोशी गुरुजी मार्गदर्शन करतात. आकाशचा आत्मा नभाला आपल्या खुनाचा बदला घेण्याचे वचन देतो. नभा आणि तिच्या वडीलांचा आत्मा मुक्त होतो. आकाश पूजा कडून सर्व काही समजून घेतो. पूजाला गोळी लागल्यावर मरण्याआधी ती आकाशला तिने केलेल्या रेकॉर्डिंग बद्दल सांगते. आकाश ते रेकॉर्डिंग इंस्पे शिंदेंना मिळावे अशी व्यवस्था करतो. आकाशचा आत्मा रश्मीच्या शरीरात प्रवेश करतो आणि साक्ष देतो. राकेश, नाभाचे मामा, मांत्रिक आणि गुंडाना अटक होते व त्यांच्यावर खटला चालवला जातो. सर्वाना शिक्षा होते. नभाच्या आईला वेड लागते. आकाश आपल्या घरच्यांना समजावतो आणि आपला अंतिम संस्कार करण्यास सांगतो. साळवी कुटुंबीय त्याची इच्छा पूर्ण करतात. पुढे चालू...

जेल मध्ये राकेश आणि चारही मामांना बाजू बाजूच्याच कोठड्या मिळाल्या होत्या. राकेशला फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे त्याच्या तोंडचे पाणीच पळाले होते. तो एक एक दिवस मोजत होता. चौघे मामा मिळून रोज त्याला दोष देत होते. "एक काम धड करता आले नाही तुला. त्या आकाशला ठार मारणे एवढे कठीण होते का? आता स्वतः फासावर चढ आणि आम्ही बसतो आयुष्यभर इथेच सडत. १ लाख १० हजार बुडाले ते वेगळेच. जिच्यासाठी एवढे सगळे केले ती पण मेली. हे तर सालं असं झालं की तेलही गेलं आणि तुपही गेलं, हाती आलं धुपाटणं" रवी म्हणाला.

"तेव्हा म्हणालो होतो याला एवढे रुपये देऊ नकोस म्हणुन तर मला गप्प बसवलंस. काय गरज होती याला सुपारी द्यायची? मीच रात्री जाऊन त्या आकाशला आणि त्याच्या खानदानाला झोपेतच संपवलं असतं. त्याच्या आत्म्याला शरीराबाहेर पडायला चान्सच दिला नसता. पण नाही, नेहेमी प्रमाणे स्वतःच्या मनाचे करायला गेलास आणि आम्हाला पण गोत्यात आणलेस. आता बस उरलेले आयुष्य जेल मध्ये हरी हरी करत. त्या आकाशचं आणि पिंकीचं लग्न झालं असतं तरी आपल्या बापाचं काय जाणार होतं? त्याला मारून काय मिळालं? उलट आपला संसार उघड्यावर पडला, समाजात इज्जत गेली, घरदार सुटलं आणि नशीबी हा तुरुंग आला." सुभाष रवी वर चांगलाच भडकला होता.

[next] रवीकडे बोलण्यासारखे काही नसल्यामुळे तो मान खाली घालून बसला . तेव्हा विकास मध्ये पडत म्हणाला, "अरे त्याला काय स्वप्न पडलं होतं का, असं काही होईल म्हणुन? पिंकीने त्या आकाश सोबत लफडं केलंच नसतं तर ही वेळंच आली नसती. आकाश सोबत लग्न करून आपल्या घराण्याचे नांव खराब करण्यापेक्षा ती मेली तेच बरं झाले. आपल्याला जेल झाली पण आपण वरच्या कोर्टात अपील करू आणि जामीन मिळवण्याचे बघूया. एकदा का जामीन मिळाला की केस सुरु राहील वर्षानुवर्षे आणि आपण बाहेर बिनघोर फिरायला मोकळे. फक्त आपापसात भांडू नका. झोपा आता."

रात्रीचे साडे बारा वाजून गेले होते. सर्व कैदी आपापल्या कोठडीत झोपले असताना अचानक व्हरांड्या मधील लाईट बंद चालू होऊ लागले. राकेशच्या कोठडीतील वातावरण खूप थंड झाले. थंडीने अंगावर शहारा आल्यामुळे राकेशला जाग आली. त्याच्या कानावर एका स्त्रीच्या मंजुळ हसण्याचा आवाज पडला. तो आवाज ऐकताच राकेशला आश्चर्य वाटले. तो आवाजाच्या दिशेने रोखून पाहू लागला. कोपऱ्यात काही तरी तरंगत असल्यासारखे त्याला जाणवले. काळोख असल्यामुळे त्याला नीट अंदाज येत नव्हता पण तिथे नक्कीच काहीतरी होते हे त्याने ओळखले.

आता राकेशच्या डोळे अंधाराला सरावले होते. त्याच्या कोठडीत एक काळी आकृती स्त्रीचा आकार घेत होती. हळू हळू तरंगत ती राकेशच्या जवळ जाऊ लागली. जस जशी ती जवळ येत होती तस तसा राकेश बेचैन होऊ लागला. त्याचा घसा कोरडा पडू लागला. समोर त्या आकृतीला पाहून त्याला घामच फुटला. त्याचे डोळे विस्फारले. त्याच्या पाठीतून भीतीची एक थंड शिरशिरी दौडत गेली. आपल्या डोळ्यांवर विश्वास न बसल्यामुळे त्याने आपले डोळे चोळले, पुन्हा पाहतो तर समोर कोणीच नव्हते. त्याने झोपायचा प्रयत्न केला पण त्याला झोप काही लागेना. तो स्वतःशीच विचार करू लागला.

[next] "ती रश्मी होती का? नाही, हे कसं शक्य आहे. मला भास तर नाही झाला? मी स्वतः तिला मरताना पाहिले होते. ती इथे कशी काय येऊ शकतेस? ते रश्मीचे भूत तर नव्हते? नाही, मला भासच झाला असणार. मी पण ना! काही पण विचार करतोय, उगाच घाबरलो." असे म्हणून तो डोळे बंद करून पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागला. अचानक राकेशला कसला तरी थंडगार स्पर्श आपल्या हातावर जाणवला. तो डोळे उघडून समोर पाहतो तर रश्मी त्याच्या हातावर आपले पांढरे फटक पडलेले हात फिरवत होती. रश्मीला समोर पाहून राकेश तीन ताड उडालाच. धावत तो कोठडीच्या दरवाज्याजवळ पोहोचला.

त्याने दरवाजा उघडायचा प्रयत्न केला पण बाहेरून कुलूप असल्यामुळे तो भक्कम दरवाजा तसूभरही हलला नाही. तोच त्याच्या कानावर रश्मीचा आवाज पडला, "राकेश, अरे असं काय करतोस? अरे मी रश्मी, तुला मी हवी होते ना? बघ तुझी रश्मी तुझ्यासाठी स्वतः परत आली आहे. मला पाहून तुला आनंद नाही का झाला? आजची रात्र फक्त आपली दोघांची आहे. बघ आपल्या आसपासही कोणी नाही. मला जवळ घे ना!" असे म्हणुन तलवारीच्या वारामुळे अंगावर मोठी खोल जखम झालेली रक्तबंबाळ अवस्थेतील रश्मी आपले हात पसरून त्याच्या दिशेने तरंगत येऊ लागली. राकेश ओरडायचा प्रयत्न करू लागला पण त्याच्या घशातून केवळ घरघर बाहेर पडत होती.

भीतीने त्याची बोबडीच वळली होती. तो पुन्हा दरवाजा उघडायचा केविलवाणा प्रयत्न करू लागला. ते पाहून रश्मी कुत्सित हसली. तिचे ते काळीज गोठवणारे हास्य ऐकल्यावर राकेशच्या पायातले उरले सुरले त्राणच गेले. रश्मी वेगाने त्याच्या जवळ गेली आणि त्याची गचांडी धरून तिने एखादा कागदाचा बोळा फेकावा तसा त्याला फेकला. वेगाने जाऊन तो कोठडीतील लोखंडी कॉटच्या कडेवर आपटला. त्याच्या डोक्याला खोक पडली आणि त्यातून रक्ताची धार वाहू लागली. रश्मीने आपला आ वासला. तिची जीभ लांब होत गेली आणि ती त्याच्या डोक्यातून गळणारे रक्त पिऊ लागली.

[next] राकेशच्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागला. चक्कर येऊन तो खाली पडणार एवढ्यात रश्मीने त्याला अलगद उचलले आणि पुन्हा एकदा त्याला वेगाने फेकून दिले. यावेळी राकेश कोठडीच्या दगडी भिंतीवर आदळला आणि खाली पडला. त्याचा उजवा हात खांद्यातून निखळला. राकेश वेदनेने ओरडू लागला पण रश्मीने त्याला दया माया न दाखवता त्याच्या छातीवर आपला पाय ठेवला आणि एका झटक्यात त्याचा तो हातच उखडून टाकला. राकेश प्राणांतिक वेदनेने ओरडला. ते पाहून रश्मी खदाखदा हसू लागली.

अचानक ती हसायची थांबली आणि त्याचा तुटलेला हात त्याच्या डोळ्यांसमोर नाचवत म्हणाली, "माझ्या आकाशचा हात असाच तोडला होतास ना तू? तेव्हा तर फार हसत होतास, आता हस ना!" राकेश वेदनेने किंचाळत होता. रडत भेकत तो रश्मीची माफी मागु लागला, "मला माफ कर रश्मी, मी चुकलो." पण रश्मीने त्याला पुढे बोलूच दिले नाही. तिच्या बोटांवरील चाकू सारखी लांब तीक्ष्ण नखे राकेशच्या पोटात, लोण्याच्या गोळ्यात सूरी शिरावी तशी शिरली आणि बाहेर येताना त्यांनी राकेशचा कोथळाच बाहेर काढला.

राकेश तिथेच कोसळला. रश्मीचा राग अजून शांत झाला नव्हता ती राकेशवर आपल्या तीक्ष्ण नखांनी वेड्यासारखी वार करत सुटली. तिने अक्षरशः त्याच्या शरीराची खांडोळी करून टाकली. राकेशचा प्राण केव्हाच गेला होता. उरला होता तो फक्त राकेशच्या रक्तामांसाचा सडा. आश्चर्य म्हणजे राकेशच्या कोठडीत एवढे सगळे घडूनही आजू बाजूच्या कोठडीतील कोणालाही कसलाच आवाज ऐकू गेला नव्हता. सर्व कैदी गाढ झोपेत होते. राकेश मेल्याचे लक्षात येताच रश्मीचा राग थोडा शांत झाला. ती जाण्यासाठी वळली तोच तिला बाजूच्या कोठडीत नभाचे मामा असल्याचे लक्षात आले.

[next] भिंतीतून आरपार जात ती नभाच्या मामांच्या कोठडीत डोकावली. ती कोठडीत येताच क्षणी कोठडीतील वातावरणात कमालीचा बदल घडला. थंडगार वातावरणाने विकासाची झोप उघडली. त्याला घुसमटल्यासारखे होऊ लागले. दीर्घ श्वास घेण्यासाठी त्याने मान वर केली. रश्मीला दगडी भिंतीतून कोठडीत आत शिरताना पाहून त्याचा श्वासच अडकला. तो आपल्या भावांना गदा गदा हलवू लागला. वैतागतच ते उठले आणि विकासला शिव्या घालू लागले. विकासच्या तोंडून आवाज बाहेर पडत नसल्याने त्याने भिंतीकडे आपले बोट केले. रश्मीला भिंतीतून आत शिरताना पाहून इतर तिघांची अवस्था विकास सारखीच झाली.

ऐकल्यावर काळीज बंद पडावे अशा भेसूर आवाजात ती हसली आणि म्हणाली, "माझ्या आकाशला मारायला तुम्ही राकेशला सुपारी दिली होती ना? त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मी दिली आहे. आता लवकरच तुमची पाळी आहे. माझ्या आकाशला तुम्ही सर्वांनी हाल हाल करून मारलत, तुम्हाला पण तसंच मरण येईल. आकाशला मारण्यात जे कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी होते, त्यापैकी कोणालाच मी सोडणार नाही. मी बदला घेणार, सगळे मेले की मग तुम्हा चौघांचा नंबर." असे म्हणुन ती विकट हास्य करत धुक्यात विरून जावी तशी गायब झाली.

पुढील तासभर चौघांपैकी कोणाच्याच तोंडून आवाज फुटला नाही. हळूहळू ते सावरले. तसा रवी म्हणाला, "जे मी पाहिलं तेच तुम्ही पण पाहिलत का? कोण होती ती? मला तर काही कळेनासेच झालंय." तेव्हा सुभाष म्हणाला, "ते रश्मीचे भूत होते." ते ऐकताच सर्वांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहात एकाचवेळी विचारले. "तुला कसे माहित?" "तुम्ही ऐकले नाही का? ती सतत माझा आकाश असे म्हणत होती. आता आकाश वर प्रेम करणाऱ्या दोघीच होत्या एक आपली पिंकी आणि दुसरी रश्मी, जी त्याला वाचवताना मेली. म्हणजे ते रश्मीचेच भूत होते हे निश्चित." सुभाषच्या या लॉजीक वर सगळ्यांनी माना डोलावल्या.

[next] "अरे ते ठीक आहे, पण ती आपल्याला धमकी देऊन गेली आहे की सर्वांना ती एक एक करून मारेल म्हणुन. जन्मठेपेत निदान जीवंत तरी राहिलो असतो. पुढे मागे सुटण्याचे प्रयत्न सुद्धा करता आले असते पण आता हे भलतेच लचांड मागे लागले त्याचे काय करायचे?" रवी डोक्याला हात लावत म्हणाला. "आता या अडचणीतून आपल्याला एकच माणूस वाचवू शकेल तो म्हणजे तो मांत्रिक." सुभाष गंभीर आवाजात म्हणाला. "अरे ते कसे शक्य आहे? तो मांत्रिक स्वतः पण जेल मधेच आहे. तो स्वतःला वाचवू शकला नाही तर आपल्याला काय वाचवणार?" विकास वैतागत म्हणाला.

"ते जरी खरे असले तरी इथे पंगा एका भूताशी आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या मांत्रिकाशिवाय दुसरा पर्यायच नाही. तो जरी जेल मध्ये असला तरी तो काहीतरी उपाय तर सुचवू शकेलच. तसेही जेव्हा ते रश्मीचे भूत त्याचाही जीव घ्यायचा प्रयत्न करेल, तेव्हा तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काही ना काही तर नक्कीच करेल. फक्त रश्मीचा हल्ला आपल्याआधी त्याच्यावर झाला पाहिजे, म्हणजे आपले वाचायचे चान्सेस वाढतील." सुभाष आपला अंदाज लावत म्हणाला. "ते तर तसेही होणारच आहे कारण आपल्याला ती शेवटी मारणार आहे असे म्हणाली होती." विकासचा मेंदू आता वेगात काम करू लागला होता.

"हो तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. फक्त आता त्या मांत्रिकाला सावध करावे लागेल जेणेकरून तो आधीच काहीतरी उपाय करून ठेऊ शकेल. पण त्याच्या पर्यंत हा निरोप पोहोचवायचा कसा? तो तर कडक पहाऱ्यामध्ये आहे." रवी विचारात पडला. "तू त्याचे टेन्शन नको घेऊस, उद्या वॉर्डनच्या मुलीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त बडा खाना आहे. सर्व प्रकारच्या कैद्यांना उद्या जेवणाच्या निमित्ताने एकत्र येता येणार आहे. आपण हीच संधी साधून त्या मांत्रिकाला शोधून काढू आणि त्याला ही बातमी देऊ." विकासची ही आयडिया इतर तिघांना पसंत पडली आणि त्यांनी त्याला होकार दर्शविला.

[next] राकेशला ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी सकाळी सहा वाजता जेव्हा गार्डस त्याच्या कोठडीजवळ आले तेव्हा आतील नजारा पाहून त्यांची मतीच गुंग झाली. मोठमोठ्याने शिट्टी वाजवत ते या घटनेची वर्दी द्यायला वॉर्डनच्या केबीनकडे धावले. जेलमध्ये राकेशच्या खुनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. जो तो तर्कवितर्क लावू लागला. चर्चांना नुसते पेव फुटले होते. खून ज्या निर्घृणपणे झाला होता ते पाहता सर्व कैद्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. वॉर्डन पण टेन्शन मध्ये आला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काहीच आढळले नव्हते त्यामुळे खून कोणी व कसा केला हे एक मोठे कोडेच होते.

वॉर्डनने डॉक्टर्स, जल्लाद, गार्डस वगैरे सर्वांना हाताशी धरून मोठ्या शिताफीने प्रकरण दाबायचे ठरवले. मोठ्या हुशारीने त्याने राकेशचे प्रेत शिवून घेतले आणि ठरलेल्या वेळेत राकेशला फाशी दिल्याचे जाहीर केले. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधेही गळफासामुळे मृत्यू असेच नोंदवण्यात आले. राकेशच्या मृत्यू मागचे सत्य जर समोर आले असते तर त्याची नोकरी जाऊ शकली असती. सगळेच काम बिनबोभाट पार पाडले गेले. कोणाला काही संशय येऊ नये म्हणुन ठरल्या प्रमाणे त्याने आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त कैद्यांना मिठाई आणि जेवण दिले. सर्व कैद्यांना आज कामात विशेष सूट देण्यात आली होती.

इतर कैदी जेवण आणि मिठाई वर ताव मारत असताना नभाचे चारही मामा त्या मांत्रिकाला शोधत होते. बराच काळ शोधल्यावर एका स्पेशल कोठडीत त्या मांत्रिकाला ठेवले असल्याचे त्यांना कळले. वॉर्डनच्या मुलीचा वाढदिवस असल्यामुळे गार्डस पण जरा निवांत होते. त्यांचे लक्ष नसल्याचा फायदा घेत ते त्या मांत्रिकाच्या कोठडीपाशी गेले. त्यांना पहाताच त्या मांत्रिकाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो त्यांना दोष देऊ लागला, "झक मारली आणि तुमच्या सारख्या मूर्खांची मदत करायला गेलो. त्या पोराच्या शरीराला पूर्ण नष्ट केले असतेत तर आज ही वेळ आलीच नसती. तुमच्या सोबत आता मी पण फसलोय."

[next] तेव्हा रवी हात जोडत म्हणाला, "आम्ही त्या बद्दल तुमची माफी मागतो पण आता एक वेगळेच संकट आलय. काल रात्री त्या रश्मीच्या भुताने राकेशचा जीव घेतला आणि आम्हाला धमकी देऊन गेली की ती आकाशच्या मर्डरमध्ये जे कोणी सहभागी होते त्या सर्वांचा बदला घेईल म्हणुन. तुम्ही प्लिज काही तरी करा, आम्हाला मरायचे नाही." यावर तो मांत्रिक हसला आणि म्हणाला, "मी जरी या कोठडीत बंदिस्त असलो तरी ती माझे काहीच वाकडे करू शकत नाही. येऊ दे तिला मी पाहून घेईन. पण या कामाचा मोबदला मी सुटल्यावर मला मिळाला पाहिजे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे हे विसरू नका. चला निघा आता."

जोशी गुरुजी ध्यानाला बसले असताना अचानक त्यांना आसपास कोणाचे तरी अस्तित्व जाणवले आणि त्यांचे ध्यान तुटले. त्यांच्या लक्षात आले की ते अस्तित्व अमानवीय आहे. त्यांनी लगेच स्वतःला सुरक्षित करून घेतले आणि आवाजात जरब आणत म्हणाले, "कोण आहे? समोर ये." त्याबरोबर एका स्त्रीची आकृती आकार धारण करू लागली. तो रश्मीचा आत्मा होता. ती समोर येताच जोशी काकांनी हातात गंगाजळ घेतले आणि मंत्र पुटपुटू लागले. त्यांनी रश्मीच्या आत्म्याला विचारले, "कोण आहेस तू? आणि माझ्याकडे का आली आहेस? जर का तुझा काही वाईट हेतू असेल तर आत्ताच इथून निघून जा नाहीतर नंतर पश्चात्ताप करायलाही वेळ मिळणार नाही.

रश्मीच्या आत्म्याने जोशी गुरुजींसमोर हात जोडले, "मी रश्मी, माझे आकाशवर प्रेम होते. त्याला वाचवताना मला मृत्यू आला होता. मला त्याच्या खुन्यांचा बदला घ्यायचा आहे. काल मी राकेशला ठार मारले. जे कोणी आकाशच्या खुनाला कारणीभूत आहेत ते सर्व त्याच्याच वाटेने जातील पण मला फक्त त्या मांत्रिकाचेच भय वाटत आहे. मी त्याला मारण्याऐवजी कदाचित तो मलाच त्याचा गुलाम बनवेल अशी मला भीती वाटत आहे आणि त्यासाठीच मी तुमच्याकडे मदत मागायला आले आहे." रश्मी नम्रपणे म्हणाली. जोशी गुरुजी तिच्याकडे पाहात गंभीर आवाजात म्हणाले, "तुला माझ्याकडून नक्की कश्या प्रकारच्या मदतीची अपेक्षा आहे?"

[next] "मला त्या मांत्रिकाचा खून करायचा आहे पण ते इतके सोपे नाही त्यामुळे त्याला कसे मारता येईल याबद्दल मला तुमच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. तुम्ही आकाशचे गुरूच नव्हे तर त्याला त्याच्या वडीलांच्या जागी होतात. त्याला हाल हाल करून ठार मारले गेले, याचा बदला घ्यावासा नाही वाटत तुम्हाला? तुम्ही मंत्र तंत्र जाणता, अनेक विद्या तुम्हाला ज्ञात आहेत. तुमच्या मदती शिवाय त्या मांत्रिकाला ठार मारणे माझ्यासाठी केवळ अशक्य आहे. आकाशचा आत्मा तडफडत असेल, त्याला मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही मला मदत केलीच पाहिजे. सांगा मी काय करू?" रश्मीचा आत्मा जोशी गुरुजींची विनवणी करत म्हणाला.

जोशी गुरुजी विचारात पडले. थोडा वेळ विचार करून ते म्हणाले, "जरी सध्या तो मांत्रिक कैदेत असला आणि त्याच्या जवळ कोणतीच साधन सामग्री नसली तरीही त्याचे मंत्रसामर्थ्य अद्वितीय आहे. केवळ मंत्रांच्या बळावर तो तुला शह देऊ शकतो. त्यामुळे त्याला मारणे तू म्हणतेस त्याप्रमाणे खरंच कठीण आहे पण प्रत्येक अडचणींवर उपाय हा असतोच. तुला असे काही करावे लागेल की जेव्हा तू त्याच्यावर हल्ला करशील तेव्हा तो मंत्रोच्चार करू शकणार नाही. जर हे शक्य झाले तर तुझ्यासमोर तो केवळ एक सामान्य माणूस असेल, आणि मग तुला तुझा कार्यभाग साधता येईल. तुला तुझ्या कार्यात नक्कीच यश मिळेल."

जोशी गुरुजींनी तिला एक पुडी दिली आणि म्हणाले, "या पुडीत जे आहे ते तुझी मदत करेल पण ते कसे वापरायचे हे तुझ्या कल्पकतेवर अवलंबुन आहे. जर का तुझ्या कडून उशीर झाला किंवा काही चूक घडली तर मात्र होणाऱ्या परिणामांना तुला सामोरे जावे लागेल, हे लक्षात ठेव. आकाश जरी मला माझ्या मुलासारखा असला तरी मी कोणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरणे माझ्या तत्वात बसत नाही. पण तुझ्या आकाशवरील खऱ्या प्रेमापुढे माझा नाईलाज झाला. तुझा प्रतिशोध पूर्ण झाल्यावर तुला मुक्ती मिळेल. जा आता वेळ घालवू नकोस कारण वेळ ही अनमोल आहे." एवढे बोलून जोशी गुरुजी पुन्हा ध्यानस्त झाले.

[next] जोशी गुरुजींकडून मिळालेली पुडी घेऊन रश्मीचा आत्मा रात्री १.३० च्या सुमारास जेलमध्ये आला. आदल्या रात्री झालेल्या राकेशच्या हत्याकांडामुळे जेलमध्ये गार्ड्सचा पहारा कडक करण्यात आला होता. रश्मीचा आत्मा कोणाला दिसणे जरी अशक्य होते तरी त्याने मांत्रिकाला मारताना त्याला कोणाची मदत मिळू नये म्हणुन आकाशला मारण्यासाठी जे भाडोत्री गुंड राकेशने आणले होते त्यांना आधी टार्गेट करायचे ठरवले. अदृश्य रूपात रश्मीचा आत्मा त्या गुंडांच्या कोठडीत आला आणी त्याने सभोवार नजर टाकली. तिथे चार गुंड घोरत पडले होते. कोणाचा जीव घेऊन यांना एवढी गाढ झोप लागते तरी कशी? या विचाराने रश्मीच्या आत्म्याच्या मुठी वळल्या.

रश्मीच्या आत्म्याने त्या चौघांच्या कानाखाली असे काही आवाज काढले की त्यांची झोप खाडकन उतरली. आपला गाल चोळत ते उठले. मला का मारले असे जो तो एकमेकांना विचारू लागला. त्यातील एक गुंड तर एवढा भडकला की त्याने बाजुला असलेल्या एका गुंडाला धरून बडवायला सुरवात केली. झाले, एकच गोंधळ उडाला. चौघांची चांगलीच जुंपली. गडबड ऐकून गार्ड्स तिकडे धावले. ती संधी साधून रश्मीचा आत्मा मांत्रिकाच्या कोठडीकडे जाऊ लागला. आपल्या कोठडीत मांत्रिक गाढ झोपला होता. त्याची कोठडी एका बाजुला असल्यामुळे बाहेर चाललेल्या प्रकाराबद्दल त्याला काहीच अंदाज नव्हता.

रश्मी तयारीत होती, सावधपणे कोठडीच्या गजातून आरपार जात ती मांत्रिकापर्यंत पोहोचली. मांत्रिक जरी गाढ झोपेत असला तरी रश्मी कोठडीत येताच त्याच्या अंतरात्म्याने त्याला सावध केले आणि तो जागा झाला. त्याने डोळे उघडले आणि समोर रश्मीला पाहताच त्याचा आ वासला, रश्मीने तोच क्षण साधला आणि त्याच्या तोंडात पुडीतील शेंदूर टाकला. अचानक शेंदूर एकदम घशात गेल्याने मांत्रिकाला मोठा ठसका लागला आणि तो खोकू लागला. रश्मी याच क्षणाची वाट पाहत होती. तिने मांत्रिकाचे डोके आपल्या हातात पकडले आणि जोराचा हिसका दिला. कट असा आवाज स्पष्टपणे ऐकू आला.

[next] मांत्रिकाचे काम तमाम झाले होते, त्याची मान तुटली आणि जीभ तोंडातून बाहेर लटकू लागली. त्याला सावरायलाच वेळ मिळाला नाही, मग मंत्रोच्चार करणे तर दुरच राहिले. शेंदुराने त्याचा आवाज जाणार अशी तिला खात्री होती पण रश्मीने तो चान्सच घेतला नाही. तिच्या बदल्यातील दुसरा महत्वाचा बळी तिने मोठ्या हुशारीने घेतला होता. मांत्रिक मेल्याची खात्री पटल्यावर तिने आपला मोर्चा त्या चार गुंडांच्या कोठडीकडे वळवला. गार्ड्सनी एव्हाना त्यांची मारामारी थांबवली होती. राकेशच्या मर्डर सारखा गवगवा न करता, त्या गुंडांच्या मारामारीचा फायदा उचलून शांतपणे आपला कार्यभाग साधायचे रश्मीने ठरवले.

ते गुंड अजुनही आपापसात धुसफुसत होते. ती अदृश्य रूपात कोठडीत शिरली. कोठडीतील वातावरण आपसूकच थंड झाल्यामुळे थोड्याच वेळात चारही गुंड पेंगू लागले. ती त्याच्या झोपी जाण्याची वाट पाहू लागली. थोड्या वेळाने ते गुंड सुरात घोरू लागले. रश्मी शांतपणे तरंगत झोपेत असलेल्या एका गुंडाजवळ गेली. तिने आपल्या हातांचा विळखा त्याच्या मानेला घातला आणि त्याची मान दाबू लागली. श्वास अडकल्यामुळे तो गुंड घुसमटला. त्याने रश्मीच्या पकडीतून सुटायचा प्रयत्न केला पण रश्मीच्या अमानवीय ताकदी पुढे त्याची ताकद तोकडी पडली आणि काही क्षणातच हात पाय झाडत तो मृत्युमुखी पडला.

अशा प्रकारे रश्मीने एक एक करत चारही गुंडांना त्यांच्या पुढच्या प्रवासाला पाठवले. चारही गुंडांचा खात्मा केल्यावर रश्मी शांतपणे कोठडीच्या बाहेर आली त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर समाधान विलसत होते. रश्मी आपल्या कार्यात यशस्वी झाली आहे हे जोशी गुरुजींना अंतर्ज्ञानाने समजले होते. आकाशच्या आठवणीने त्यांचे मन भरून आले आणि नकळत त्यांच्या डोळ्यातून अश्रू पाझरू लागले. भावनेचा भर ओसरल्यावर त्यांनी आपले डोळे पुसले. आपल्या नवऱ्याला रडताना पाहून त्यांच्या पत्नीने काळजीने त्यांची विचारपूस केली. "काही नाही गं, आकाशची जरा आठवण आली. झोप तू" असे म्हणुन ते झोपी गेले.

[next] दुसऱ्या दिवशी आकाश साळवी आणि रश्मी सावंत या दुहेरी खुनातील चार आरोपी व मांत्रिक त्यांच्या कोठडीत मेलेले आढळल्याची बातमी जेल मध्ये वाऱ्यासारखी पसरली. "माझ्या जेल मध्ये हे चाललंय काय? आधी राकेश जाधव आणि आता हे पाच जण. नक्कीच कोणी तरी बदला घेतंय, माझी खात्री आहे. अरे हे असेच चालू राहिले तर माझी आणि तुमची नोकरी काही फार दिवस टिकणार नाही. एका मागून एक मर्डर होत आहेत. त्या राकेश जाधवच्या शरीराची तर काय अवस्था केली होती! ते प्रकरण निस्तारताना माझ्या तोंडाला फेस आला होता आणि आता हे नवीन प्रकरण!" वॉर्डन डोक्याला हात लावत म्हणाला.

"काल रात्री गार्डनी त्या चौघांची मारामारी सोडवली होती. कदाचित नंतर त्यांच्यात परत मारामारी होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला असावा असे प्रथमदर्शनी जरी दिसत असले तरी त्यांचा मृत्यू एकाच पद्धतीने झालाय. तो म्हणजे गळा दाबून. चौघातील एक तरी वाचणे अपेक्षित होते पण चौघेही मेले, ईजंट इट स्ट्रेंज? एकाच रात्रीत पाच जणांना ठार मारणे हे कोणा एका माणसाचे काम नसावे. ते चार कैदी तर तब्येतीने मजबूत आणि सराईत गुंड होते आणि तो मांत्रिक पण पोचलेला होता. त्या आकाश साळवींच्या जवळचे कोणी आपल्या जेल मध्ये तर नाही ना?" वॉर्डन साळुंखेंनी आपली शंका व्यक्त केली."

"सर, आणखी विशेष म्हणजे तो मांत्रिक त्याच्या कोठडीत एकटाच होता तरी त्याची मान तुटलेली होती आणि तोंडात शेंदूर होता. नक्कीच कोणीतरी त्याचा आवाज बंद व्हावा म्हणुन शेंदूर त्याच्या तोंडात टाकला असावा पण कोठडी कुलूपबंद असताना आत शिरून त्याची मान कशी काय मोडली? कदाचित त्या चार कैद्यांच्या मारामारीचा फायदा घेऊन कोणीतरी त्या मांत्रिकाला संपवला तर नसेल आणि नंतर त्या चौघांनाही मारले असेल. पण कसे शक्य आहे? त्या मांत्रिकाची कोठडी जेलच्या पार टोकाला आहे आणि सर्व कोठड्यांच्या चाव्या डेप्युटी वॉर्डनच्या ताब्यात असतात, मग कोणी आत शिरलेच कसे?" असिस्टंट वॉर्डन पण चक्रावला होता.

[next] "सीसीटीव्ही फुटेज तपासलेत? त्यात काही आढळते का ते पहा? त्या राकेशच्या वेळीही काहीच सापडले नव्हते. खुन करणारा माणुस आहे की भूत? काहीच समजत नाही. या चौघांचा मृत्यू आपापसात झालेल्या मारामारीत झाला असावा असे आपल्याला दाखवता येईल पण त्या मांत्रिकाचा मृत्यू किंवा खुन कसा झाला यावर आपल्याकडे काहीच उत्तर नाही. एवढा पहारा बसवुनही काही उपयोग झाला नाही. इतक्या सहजतेने त्यांना मारणारी व्यक्ती एकतर प्रचंड ताकदवान असावी किंवा हे काही तरी बाहेरचे असावे असे मला आता वाटू लागले आहे. डोकंच काम करेनासे झालंय" वॉर्डन दूरवर पाहत म्हणाला.

एव्हाना त्या मांत्रिकाच्या आणि इतर चार गुंडांच्या मर्डरची बातमी नभाच्या मामांच्या कानावर गेली होती. रवी मामा तर जाम टरकला होता. "तिने मांत्रिकाला पण सोडले नाही तिथे ती आपल्याला काय सोडणार? आपला मृत्यू अटळ आहे. कुठून या आकाशच्या भानगडीत पडलो देव जाणे, आता आपल्याला पण हाल हाल होऊन मरण येणार, त्या राकेशची काय अवस्था केली तिने ते पाहिलेत ना? विचार करून अंगावर काटा येतो. आकाशच्या मर्डर मध्ये सामील असलेले आता आपणच उरलोय म्हणजे तिचे पुढचे टार्गेट आपणच असणार हे नक्की. तिची धमकी आठवतेय ना?" रवी थरथरत म्हणाला.

"यातून काहीतरी मार्ग निघेल, तू धीर सोडू नकोस. मला वाटते की आपण वॉर्डनच्या कानावर हा सगळा विषय घालूया. आता या सगळ्यातून जर आपल्याला कोणी वाचवू शकेल तर केवळ तोच आहे बाकी कोणाकडून अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. हे बघ, शेवटी मरायचे तर आहेच मग एक शेवटचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? जर नशीबात असेल तर आपण वाचूही शकू. तुम्हाला काय वाटते?" विकासच्या या बोलण्याला रमेशने दुजोरा दिला. "हा बरोबर बोलतोय. तसेही मरणार तर आहोतच बघू प्रयत्न करून. फक्त वॉर्डनने आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे." रमेश पुढे म्हणाला.

[next] सुभाष अचानक म्हणाला, "मला तर वाटतंय की आपण जेल मधून बाहेर पळून जाऊया आणि कोणतातरी मांत्रिक गाठूया, हा वॉर्डन आपली काय मदत करणार? त्या रश्मीच्या भुतापासून आपल्याला केवळ एखादा मोठा मांत्रिकच वाचवू शकतो. मी काही इतर जुन्या कैद्यांशी बोलून गार्ड्सच्या शिफ्ट्स कधी बदलतात हे जाणून घेतलंय. तुरुंगातून बाहेर जाणारा एक गुप्त मार्ग आहे. आज रात्री जेवण सुरु असताना आपण कुणाच्या नकळत त्या गुप्त मार्गाचा वापर करून जेल मधून आधी बाहेर पाडूया मग बघू काय करायचे ते." इतर तिघेजण सुभाषच्या तोंडाकडे पाहतंच बसले.

"अरे वा सुभाष, तू तर छुपा रुस्तम निघालास! तू तर फुल प्लॅन वगैरे बनवून तयार आहेस. आम्हाला काहीच थांगपत्ता लागू दिला नाहीस. तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे पण काही गडबड तर होणार नाही ना?" रमेश आपली शंका व्यक्त करत म्हणाला. "गडबड तर केव्हाच झाली आहे. इथेच थांबलो ना तर रश्मीच्या हातून मरण निश्चित आहे, पण इथून बाहेर पडलो तर एक चान्स मिळू शकेल. आत्ता जर का काही केले नाही ना तर इथून आपल्या तिरड्या उठतील हे ध्यानात ठेवा. अभी नही तो कभी नही. बोला काय बोलता?" सुभाष आपले म्हणणे रेटत म्हणाला.

"इथून पळून जाण्यात रिस्क आहे त्यापेक्षा आपण जर का आजारी पडल्याचे नाटक करून हॉस्पिटलला भरती झालो तर तिथून पळून जाणे कंपॅरिटिव्हली सोपे पडेल. फक्त हॉस्पिटलपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे." रवीने आपले मत मांडले. त्याचे म्हणणे खोडून काढत सुभाष म्हणाला, "अरे तो वॉर्डन काय वेडा आहे का? एव्हाना त्याच्या लक्षात आले असेल की एकाच केस मधले आरोपी मरत आहेत. आपण चौघे एकदम आजारी पडलो तर संशय नाही का येणार? त्यापेक्षा मी म्हणतो तसं करूया. इथून बाहेर पडू आणि एखादा मांत्रिक गाठूया, म्हणजे आपल्या जगण्याचे थोडे तरी चान्सेस बनतील. मग वाटल्यास सरेंडर करून परत जेल मध्ये येऊ."

[next] शेवटी रवी, रमेश आणि विकास तिघांनाही सुभाषचे म्हणणे पटले आणि ते यासाठी तयार झाले. रात्री ८ वाजता जशी जेवणाची घंटा झाली तसे ते चौघे जेवणाच्या रांगेत उभे राहिले. पटापट त्यांनी जेवण उरकून घेतले. १० वाजता जशी जेवणाची वेळ संपून कैद्यांची आपापल्या कोठडीत परतण्याची घंटा वाजली, तसे सर्व कैदी आपापल्या कोठडीत परतु लागले. नभाचे चारही मामा मात्र मागे रेंगाळले. अचानक सुभाष जेलच्या उंच भिंतीच्या दिशेने वेगाने धावू लागला. गुप्त रस्त्याऐवजी तो तिकडे कुठे धावू लागला असा विचार इतरांच्या मनात आला पण काय करावे ते न समजल्यामुळे तेही त्याच्या मागे धावू लागले.

जेलच्या भिंतीच्या दिशेने धावणारे चार कैदी दिसल्यावर ड्युटीवर तैनात असलेल्या गार्ड्सनी त्यांच्यावर प्रकाशझोत टाकला आणि लाऊड स्पीकर वर त्यांना थांबण्यास सांगितले. दोन वॉर्निंग राऊंड फायर करण्यात आले तरी सुद्धा ते धावत राहिले. भिंतीजवळ पोहोचल्यावर अचानक सुभाष धावायचा थांबला आणि बावचळल्यासारखा इकडे तिकडे पाहू लागला. त्याला थांबलेले पाहून इतर तिघेही थांबले आणि धापा टाकत त्याच्याकडे पाहू लागले. अचानक सुभाषच्या शरीरातून एक आकृती बाहेर पडली. तो रश्मीचा आत्मा होता. ती भयाकारी आवाजात हसू लागली. रश्मीला पाहताच ते तिघे एकदम घाबरले. रश्मीचा डाव त्यांच्या लक्षात आला पण वेळ निघून गेली होती.

सुभाषचा हात धरून ते वाट फुटेल तिकडे पळू लागले. ते जेमतेम ८ ते १० फुटच पुढे गेले असतील तोच सरसरत आलेल्या चार गोळ्यांनी त्यांचा वेध घेतला. चौघेही जबरदस्त जखमी होऊन जमीनीवर कोसळले. रश्मी त्यांच्या जवळ गेली आणि म्हणाली, "काय, कशी वाटली माझी आयडिया? तुम्हाला काय वाटले होते की तुम्ही माझ्या तावडीतून सुटाल म्हणुन? सुभाषच्या तोंडून मीच बोलत होते आणि तुम्ही माझ्या जाळ्यात अलगद येऊन पडलात. आज माझा बदला पूर्ण झाला. आता मारायला तयार व्हा" असे म्हणुन तिने एक एक करून चौघांच्याही माना काकडी मोडावी तशा मोडल्या. गार्ड्सना येताना पाहून ती तिथून गायब झाली.

[next] गार्ड्स तिथे पोहोचल्यावर चारही कैद्यांच्या मृतदेहांची अवस्था पाहून आश्चर्यचकित झाले. चौघांचेही डोळे बाहेर आले होते, जीभा लोंबत होत्या आणि मानेचे मानके तुटले होते. चौघांना केवळ गोळ्या लागल्या असताना त्यांची अशी अवस्था कशी झाली हेच त्यांना समजेना. फायरिंग बद्दल समजल्यावर वॉर्डन तातडीने तिथे आला. त्याला पडलेल्या प्रश्नाचे आपसूकच उत्तर मिळाले होते. त्या चौघांबरोबर मेलेल्या इतर पाच आरोपींचे मुडदे तिथे आणायला सांगून त्यांच्या पाठीत गोळ्या घालण्यास त्याने गार्ड्सना सांगितले. वॉर्डनच्या मनात काय आहे हे त्यांना बरोबर समजले.

खुनाच्या खटल्यातील शिक्षा भोगत असलेले ९ आरोपी संगनमत करून जेल मधून पळून जाण्याच्या प्रयत्नात मारले गेल्याची बातमी दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमान पत्रात झळकली. वॉर्डनने सुटकेचा निश्वास टाकला. ते आरोपी कसे मेले यामागील सत्य जाणून घेण्यात त्याला काडीचा इंटरेस्ट नव्हता. त्याची नोकरी वाचली होती यातच तो खुश होता. त्याचबरोबर असिस्टंट वॉर्डन आणि डेप्युटी वॉर्डनचा जीव पण भांड्यात पडला. आता चौकशी समिती बसण्याचे कारणच उरले नव्हते. एकूण प्रकरणावर व्यवस्थित पडदा पडला होता. रश्मीने आकाश आणि तिच्या खुन्यांचा मृत्यू पश्चात अत्यंत हुशारीने बदला घेतला होता.

आता फक्त मेंटल हॉस्पिटलमध्ये नभाची आई उरली होती. इतर सर्वांना मारून झाल्यावर रश्मीच्या आत्म्याने तिच्याकडे आपला मोर्चा वळवला. नभाच्या आईला एका कोठडीत बंद करून ठेवले होते. सतत दिल्या जाणाऱ्या शॉक्समुळे ती अर्धमेली झाली होती. तिला पाहताच रश्मीला तिचा राग अनावर झाला. तिने नभाच्या आईची गचांडी धरली आणि तिला उचलून जमीनीवर आदळणार इतक्यात ती थांबली. "या अवस्थेत तुला मारले तर तुझ्यावर उपकार केल्यासारखेच आहे कारण तू यातनांतून मुक्त होशील. तुला तर शिक्षा मिळाली पाहिजे. तू केलेल्या अपराधाची बोच तुला सतत झाली पाहिजे." असे म्हणुन रश्मीने नभाच्या आईचे डोके आपल्या दोन्ही हातात गच्च धरले त्याबरोबर नभाच्या आईला एक जबरदस्त शॉक बसला.

[next] तिला प्रचंड असह्य वेदना झाल्या. वेदनेने तिचा चेहरा पिळवटून निघाला. थोड्या वेळाने जसे तिने डोळे उघडले तशी ती भानावर आली आणि तिच्या समोर रश्मी दृश्य स्वरूपात आली. रश्मीला पाहून ती घाबरली तशी रश्मी म्हणाली, "मला ओळखलेस? मी रश्मी, जिला तुझ्या भावांच्या गुंडांनी ठार मारले होते. तुझा बदला घ्यायला आले होते पण तुला मृत्यू देणे चुकीचे ठरले असते म्हणुनच तुला मी बरं केलंय. आता तू वेडी राहिली नाहीस पण हे फक्त तुला ठाऊक राहील. तुझे वागणे तसेच पूर्वीसारखे वेडसर राहील त्यामुळे तुझी इथून कधीच सुटका होणार नाही. तू तुझ्याच शरीरात कैद राहशील. टाचा घासून घासून तू इथेच मरशील.

आपल्या नवऱ्याच्या आणि मुलीच्या मृत्यूला आपण कारणीभूत असल्याचे शल्य तुला मरेपर्यंत बोचत राहील. तू स्वतःचा तिरस्कार करशील. जीवंतपणी तिला तू जशा नरक यातना दिल्यास तशाच तुला सुद्धा भोगाव्या लागतील. तुला कधीही शांत झोप लागणार नाही सतत तुला त्या दोघांचे चेहरे डोळ्यासमोर दिसत राहतील. हीच तुझी खरी शिक्षा आहे." रश्मीचे बोलणे ऐकल्यावर नभाची आई हमसून हमसून रडू लागली. "यापेक्षा तू मला मारून का नाही टाकत? पश्चात्तापाच्या आगीत मी किती काळ जळू? मी केलेल्या गुन्ह्यासाठी मला प्रायश्चित्त घ्यायचय. मला जगण्याचा अधिकार नाही. तू माझ्यावर उपकार कर, मला मारून टाक."

नभाच्या आईला स्वतःशीच बडबडताना पाहून डॉक्टरांनी तिला शॉकरूम मध्ये आणण्यास वॉर्ड बॉयला सांगितले. पुन्हा शॉक थेरपी सुरु झाली. नंतर पूर्णपणे गळून गेलेल्या तिच्या शरीराला आणून तिच्या कोठडीत बंद करण्यात आले. तिचे मन आक्रंदत राहिले पण शरीर काहीही करण्यास पूर्णपणे असमर्थ होते. आपल्याच शरीराच्या कुडीत तिचा आत्मा बंदिस्त झाला होता. स्वतःला आणि नशिबाला दोष देण्यापलीकडे तिच्याकडे आता काहीच शिल्लक राहिले नव्हते. उरलेले आयुष्य आता तिला असेच त्रिशंकू अवस्थेत जगायचे होते. रश्मीच्या आत्म्याला आता खऱ्या अर्थाने शांती मिळाली आणि ती आपल्या पुढच्या प्रवासाला लागली.

आकाश साळवी आणि रश्मी सावंत या दुहेरी खून खटल्यावर कोर्टाचा निकाल हा जातीच्या हव्यासापोटी पोटच्या मुलांचा निर्घुणपणे खून करणाऱ्या जात्यांध पालकांच्या तोंडात मारलेली एक जबरदस्त चपराकच होती. पण अजुन किती तरुण तरुणींना जातीबाहेर प्रेमात पडण्याच्या गुन्ह्यासाठी या जातीव्यवस्थेचा बळी जावे लागणार आहे हे काळ आणि समाजच ठरवेल. या निकालाने नभा आणि आकाशच्या आत्म्यांना मुक्ती मिळाली की नाही हे माहित नाही. पण जर का आज ते जीवंत असते तर लग्न करून एकमेकांसोबत नक्कीच जास्त सुखी झाले असते.

संसार सुखाने करण्यासाठी एकमेकांवर जीवापाड प्रेम असणे गरजेचे आहे की एकाच जातीतील असणे; तुम्हाला काय वाटते?

शुभं भवतु!!!
केदार कुबडे | Kedar Kubade
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा, मराठी भयकथा, मराठी कविता या आणि अशा विविध विभागांत लेखन.

अभिप्राय

ब्लॉगर
नाव

अजय दिवटे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,3,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,348,अमन मुंजेकर,1,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,177,आईच्या कविता,11,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,7,आज,405,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,3,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,1,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,8,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,11,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरती संग्रह,1,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,5,इंद्रजीत नाझरे,2,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,7,उमेश कुंभार,10,ऋचा मुळे,1,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,34,कर्क मुलांची नावे,1,कार्यक्रम,7,किल्ले,1,किशोर चलाख,1,कुठेतरी-काहीतरी,2,केदार कुबडे,30,कोशिंबीर सलाड रायते,3,कौशल इनामदार,1,गणपतीच्या आरत्या,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,6,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,14,घरचा वैद्य,2,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,152,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,1,तिच्या कविता,3,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,388,दिनविशेष,366,दुःखाच्या कविता,8,दैनिक राशिभविष्य,8,धोंडोपंत मानवतकर,1,निसर्ग कविता,10,नोव्हेंबर,30,न्याहारी,15,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पाककला,107,पावसाच्या कविता,7,पी के देवी,1,पुडिंग,8,पुणे,5,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,6,पौष्टिक पदार्थ,4,प्रतिक्षा जोशी,1,प्रवासाच्या कविता,1,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,24,प्रेरणादायी कविता,5,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,7,बातम्या,2,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,5,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बेकिंग,3,भाग्यवेध,8,भाज्या,11,भाताचे प्रकार,8,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,13,मनाचे श्लोक,205,मराठी कथा,31,मराठी कविता,121,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,20,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,1,मराठी भयकथा,30,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,17,मराठी विनोद,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,294,मसाले,3,महाराष्ट्र,55,महाराष्ट्र फोटो,5,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,11,मांसाहारी पदार्थ,10,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,7,मार्च,31,मुंबई,7,मुलांची नावे,1,मे,31,मैत्रीच्या कविता,3,यशवंत दंडगव्हाळ,6,यादव सिंगनजुडे,1,राजकीय कविता,1,राशिभविष्य,8,राहुल अहिरे,2,रोहित साठे,11,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,1,लोणची,7,वाळवणाचे पदार्थ,4,विचारधन,211,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,17,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,1,विवेक जोशी,1,विशेष,48,विज्ञान तंत्रज्ञान,1,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,8,व्हिडिओ,17,शांततेच्या कविता,2,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,शेतकर्‍याच्या कविता,2,श्रावणातल्या कहाण्या,4,श्रीनिवास खळे,1,संघर्षाच्या कविता,5,संजय पाटील,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत तुकाराम,6,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,7,संस्कृती,14,सचिन पोटे,2,सण-उत्सव,8,सणासुदीचे पदार्थ,8,सनी आडेकर,9,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सामाजिक कविता,15,सायली कुलकर्णी,2,साहित्य,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,4,स्त्रोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वाती खंदारे,106,स्वाती दळवी,2,ह मुलांची नावे,1,हर्षद खंदारे,16,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,2,होळी,5,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: जातबळी भाग १० - मराठी भयकथा
जातबळी भाग १० - मराठी भयकथा
जातबळी भाग १०, मराठी कथा - [Jaatbali Part 10, Marathi Katha] आकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी.
https://2.bp.blogspot.com/-5msaLaXk9rM/Wzy8KttcLrI/AAAAAAAAAUU/EkJ4EjCFLNUPbLneY8ojp3OI0rttVIy7ACLcBGAs/s1600/jaatbali-part-10-marathi-katha.jpg
https://2.bp.blogspot.com/-5msaLaXk9rM/Wzy8KttcLrI/AAAAAAAAAUU/EkJ4EjCFLNUPbLneY8ojp3OI0rttVIy7ACLcBGAs/s72-c/jaatbali-part-10-marathi-katha.jpg
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2018/07/jaatbali-part-10-marathi-katha.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2018/07/jaatbali-part-10-marathi-katha.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy