जातबळी भाग ९ - मराठी भयकथा

जातबळी भाग ९, मराठी कथा - [Jaatbali Part 9, Marathi Katha] आकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी.
जातबळी भाग ९ - मराठी कथा | Jaatbali Part 9 - Marathi Katha
पुर्वार्ध: आकाशला फार्महाऊस वर रामा गड्याने सांगितल्याप्रमाणेच सर्व काही आढळते. तो नभाला शोधत असताना, राकेश समोर येतो आणि त्याला फसवून तिथे आणल्याचे सांगतो. राकेश, त्याचे गुंड विरुद्ध आकाश अशी चकमक होते. आकाशला वाचवताना रश्मी जबर जखमी होते. नंतर आकाशसुद्धा जखमी होतो आणि मरणासन्न अवस्थेत पोहोचतो. राकेश त्याला ठार मारणार एवढ्यात तो आपला आत्मा शरीराबाहेर काढतो. राकेश कारचा आवाज ऐकून गडबडीत आकाशच्या शरीरावर पेट्रोल टाकून काडी लावतो आणि इतर गुंडांसह तिथून पळून जातो. आकाशचा आत्मा त्याच्या वडीलांना सर्व प्रकार सांगतो एवढ्यात एक भयंकर पिशाच्च त्याला पकडून मांत्रिकाकडे घेऊन जाते. जोशी गुरुजी आकाशच्या शरीराला शवागारात सुरक्षित ठेवण्यासाठी सांगतात. मांत्रिक आकाशच्या आत्म्याला कैद करतो, आणि त्या पिशाच्चाला मुक्त करतो. आकाशच्या आत्म्याला अदृश्य रूपात स्मशानात सोडून तो निघून जातो. जोशी गुरुजी आकाशच्या आत्म्याला त्याच्या समोर असलेले पर्याय समजावून सांगतात व कैदेतून सोडवतात. पुढे चालू...

नभाच्या घरी तिचे मामा आपला विजय साजरा करत जेवणावर मस्त ताव मारत होते. नभाची आई तिला लग्नासाठी तयार होण्यासाठी मनधरणी करत होती. आकाशपेक्षा रवीच्या मेव्हण्याचा मुलगा नभासाठी किती जास्त योग्य आहे हे पटवून देत होती. नभा काही ऐकण्याच्या मनःस्थितीतच नव्हती. एकतर आकाशशी काहीच संपर्क न झाल्यामुळे त्याच्या काळजीने तिचा जीव कासावीस झाला होता, त्यात तिच्या आईने तिच्यामागे लग्नासाठी भुणभुण लावली होती. नभा कसेच ऐकत नाही हे पाहिल्यावर तिच्या आईने शेवटी तिला ती दुःखद बातमी दिली.

"बास कर आता तुझे आकाशपुराण, ज्या आकाशची तू वाट पाहत आहेस ना, तो आता परत कधीही तुला दिसणार नाही." आपल्या आईचे हे वाक्य ऐकल्यावर नभाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने धावत जाऊन आपल्या आईचे खांदे धरले आणि तिला गदागदा हलवत विचारू लागली, "मला नीट सांग, माझ्या आकाशला काय झालंय? कुठे आहे तो? काय केलंत तुम्ही माझ्या आकाशचे? आई, प्लिज सांग. मी आकाश शिवाय जगू शकणार नाही, मला माझा आकाश हवाय. बोल ना! तुझ्या वाक्याचा काय अर्थ आहे? बोल ना आई बोल. कुठे गेलाय आकाश?"

[next] नभा मोठं मोठ्याने रडू लागली. तिचे रडणे ऐकून तिचे बाबा आणि चारही मामा आत आले. रवी मामा म्हणाला, "मी सांगतो तुला. तुझा आकाश पळपुटा निघाला, आम्ही जरा दम दिला तर पार हवा टाईट झाली त्याची. तुला सोडून तो कायमचा निघून गेलाय. त्यासाठी मी त्याला दहा लाख रुपये दिलेत. पैसे पाहिल्यावर नियत फिरली त्याची. अशा फालतू मुलासाठी तू तुझा जीव जाळत होतीस?"

"साफ खोटं, आकाशला माझ्या इतके कोणीच ओळखत नाही. तो माझ्यासाठी जीव देईल पण मला कधीच सोडून जाणार नाही आणि पैशासाठी तर नाहीच नाही. तुम्ही मला आजवर जे काही सांगितले त्यावर मी त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. कधीच प्रश्न विचारला नाही पण आज तुम्ही जे सांगत आहात ते मी मान्य करूच शकत नाही." नभाने रवीला पार धुडकावून लावले.

"खरं आहे तुझे आणि म्हणुनच आमचा नाईलाज झाला. आम्हाला त्याची सुपारी द्यावी लागली. आज त्याला आम्ही कायमचा संपवला. त्याच्या आत्म्याला त्याच्या शरीरातून बाहेर पडूच दिला नाही. भाड्याच्या गुंडानी त्याच्या शरीराची पार खांडोळी करून टाकली. आता जर का तू गपगुमान लग्नाला तयार झाली नाहीस तर त्याचे सगळे खानदानंच संपवून टाकू हे लक्षात ठेव." सुभाष मामाचे हे शब्द गरम लाव्हा कानात शिरावा तसे नभाच्या कानात शिरले. ती मटकन खालीच बसली.

[next] तिचे मामा काय ठरला जाऊ शकतात हे ती जाणून होती. तरीही तिचा विश्वास बसेना. "तुझा यावर विश्वास बसत नसेल तर उद्या पेपर मध्ये बातमी येईलच ती वाचल्यावर नक्की बसेल. त्याच्या बरोबर ती रश्मी पण फुकट मारली गेली. त्याच्यावरचा वार तिने स्वतःवर घेतला असे कळले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याचा मृत्यू अटळ होता. कुत्र्याच्या मौतीने मेला तो." रवीच्या या वाक्यावर नभाने त्याच्याकडे मान वर करून पाहिले. तिचे डोळे अंगार ओकत होते.

रश्मीचे नांव ऐकल्यावर ती दचकली होती. रवी मामा जे बोलतोय त्यात काहीतरी तथ्य असावे असे तिला वाटून गेले, कारण त्याला रश्मी बद्दल माहीत असण्याचे काही कारणच नव्हते. जर रवी मामा जे बोलला ते खरे असले तर? आकाश या जगात नसण्याची कल्पनाच तिला सहन झाली नाही. तिने डोळे गच्च मिटून घेतले आणि कानावर हात दाबून धरले. रवीने तिचे हात तिच्या कानांवरून बाजूला केले.

"मी काय सांगतोय ते नीट ऐक. तुझा आकाश मेलाय, आता तो परत कधीही येणार नाही. तुला जे काय रडायचंय ते आज रडून घे. उद्यापासून आकाश हे नांव तुझ्या ओठांवरही येता कामा नये, नाहीतर मी तुला वचन देतो की त्याच्या पुऱ्या खानदानाला त्याच्या भेटीला पाठवल्याशिवाय राहणार नाही. तुझी मर्जी असो वा नसो, तुझे लग्न माझ्या मेव्हण्याच्या मुलासोबत होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आकाश आता या जगात नाही ही वस्तुस्थिती तू जेवढ्या लवकर स्विकारशील तेवढे तुझ्या भल्याचे आहे." एवढे बोलून रवी आपल्या भावांसोबत बाहेर निघून गेला.

[next] नभाच्या डोळ्यातून अश्रुंचे पाट वाहू लागले. कुठेतरी तिला अजूनही आशा होती की आकाश सुखरूप असेल. तिने आपले अश्रू पुसले आणि कुठेतरी शून्यात हरवल्यासारखी पाहात बसली. तिचा चेहरा दगडासारखा कठोर बनला होता. नभाची अवस्था पाहून तिच्या वडीलांचा जीव राहीना. त्यांनी तिला जवळ घेतले. कातर स्वरात ते म्हणाले, "पिंकी, मी तुला म्हणालो होतो की आता फक्त स्वतःच्या सुखाचा विचार कर, आकाश सोबत कुठे तरी दूर निघून जा कायमची, परत कधीही येऊ नकोस. या जातीसाठी माती खाणाऱ्या स्वार्थी लोकांचा विचार करशील तर आयुष्यभर केवळ तुझ्या नशीबाला दुःखच येईल.

आज माझे ऐकले असतेस तर आकाश सोबत कुठेतरी सुखाने संसार करत असतीस पण आता संपलय सगळं. या जातीपायी बिचाऱ्या आकाशचा हकनाक जीव गेला." नभाच्या वडीलांचे हे वाक्य पूर्ण होताक्षणी नभाने एक हुंदका दिला आणि तिचे शरीर एकदम ढिले पडले. तिच्या वडीलांनी आपली मिठी सैल करून तिच्याकडे पहिले. जगात सर्वात जास्त प्रिय असलेल्या आपल्या लाडक्या मुलीचा निष्प्राण चेहरा पाहून त्या पित्याच्या तोंडून मोठी किंकाळी बाहेर पडली. आपल्या भावोजींचा दुःखाने भरलेला आवाज ऐकून चारीही मेव्हणे धावतच आत आले. "काय झाले भावोजी?" म्हणत रवी त्यांच्या जवळ गेला.

तसे त्यांनी नभाचा मृतदेह खाली जमीनीवर ठेवला आणि समोर आलेल्या रवीची कॉलर पकडली. रागाने ते थरथरत म्हणाले, "तू केवळ आकाशची सुपारी दिली नाहीस तर त्याच्या सोबत तू नभाची पण सुपारी दिलीस. आकाश मध्ये तिचा जीव अडकला होता, त्याला मारल्यावर ती कशी काय जीवंत राहू शकणार होती? बघ तिच्याकडे, तू मारलंस माझ्या निष्पाप मुलीला. तुझ्यामुळे आज मी माझ्या मुलीला मुकलो. मी तुला जीवंत सोडणार नाही." अचानक एका हाताने आपली छाती आवळून धरत ते खाली कोसळले. त्यांना हृदयविकाराचा मोठा झटका आला होता आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.

[next] प्रेम हा शब्द जरी छोटा असला तरी त्याचे आयुष्यातले महत्व किती मोठे आहे! आकाशला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता तलवारीचा वार स्वतःच्या अंगावर घेणारी रश्मी, आपला जोडीदार या जगात नाही हे कळल्यावर प्राण सोडणारी नभा, आणि तिच्या मृत्यूचे दुःख पचवू न शकल्यामुळे तिच्या पाठोपाठ आपला देह ठेवणारे तिचे वडील, या तिघांच्याही मृत्यू मागचे खरे कारण हे त्यांचे निस्सीम प्रेमंच होते. आजच्या स्वार्थी जगात एक प्रेमंच आहे ज्याच्यामुळे लोक एकमेकांसाठी जीवाची बाजी लावल्याची उदाहरणे दिसतात. नाहीतर प्रत्येकजण काही ना काही हेतूनेच एकमेकांशी जुळलेला आहे. हेतू साध्य झाला की मग बंध तुटायला वेळ लागत नाही.

जातीच्या हट्टापायी आपल्या भावांच्या नादाला लागून एका क्षणात नभाच्या आईने आपली मुलगी आणि आपले कुंकू दोन्हीही गमावले होते. ती मोठमोठ्याने हंबरडे फोडून रडू लागली. तिला तसे रडताना पाहून पूनमचा संताप अनावर झाला, "आता कशाला रडतेस? तु तर खुश व्हायला पाहिजेस, ताईने आकाशशी लग्न करून तुझ्या तोंडाला काळे फासायच्या आधीच ती मेली. आता मिरव ना तुझ्या जातीचा अभिमान! ओरडून सांग सगळ्यांना की मी माझ्या पोरीला ठार मारली पण जाती बाहेर लग्न करू दिले नाही. कौतुक करतील सगळे तुझे! केवळ तुझ्या खोट्या आणि पोकळ अभिमानामुळे आज तू तुझी मुलगी गमावलीस.

तुला कळतंय का? तू विधवा झाली आहेस विधवा! बाबांचे वय झाले होते पण जर ताईला त्यांनी सुखाने संसार करताना पाहिले असते तर ते अजून बरीच वर्ष जगले असते. तू मारलंस त्यांना. तुम्ही सगळे खुनी आहात त्या दोघांचे." इतक्यात दरवाजा वाजवला जाऊ लागला. घरातून येणाऱ्या आवाजामुळे बाहेर शेजारी जमा झाले होते. "बास झाले पूनम, खूप बोललीस. बाहेर लोक जमा झाले आहेत. आता जर का एक शब्द जरी वर बोललीस तर याद राख. तोंडातून एक अवाक्षर जरी काढलेस तरी उभा चिरून टाकेन तुला. लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे."

[next] रवीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून पूनम नखशिखांत हादरली. कोणत्याही क्षणाला तो आपला खून करू शकतो हे तिला समजून चुकले होते. तिने निमूट जाऊन दरवाजा उघडला. अदृश्य रूपातील आकाशचा आत्मा तिथे पोहोचला, पण खूप उशीर झाला होता. सगळे संपले होते. जिच्यासाठी त्याने एवढे सगळे केले होते ती त्याची जीवन संगिनी बनण्याआधीच त्याला कायमची सोडून गेली होती. तो दुःखाने बेभान झाला व चारही मामा आणि नभाच्या आईच्या नरडीचा घोट घेण्यासाठी पुढे सरसावला.

इतक्यात त्याच्या गुरूंचे शब्द त्याच्या कानावर पडले. "वेडेपणा करू नकोस, झाले ते घडायला नको होते पण गुन्हेगारांना शिक्षा कायदा देईल. तुझ्या हातात तीन दिवस आहेत, आपल्या बुद्धीचा वापर करून तू त्यांना फासावर लटकावण्यासाठी पुरावे गोळा कर. जर आत्ता तू त्यांना काही करायचा प्रयत्न जरी केलास तर त्या मांत्रिकाला तू मुक्त झाल्याचे कळेल. तो मांत्रिक खूप शक्तिशाली आहे. जर का तू पुन्हा त्याच्या तावडीत सापडलास तर कदाचित मी सुद्धा काही करू शकणार नाही. आपली सगळी मेहनत वाया जाईल.

एवढ्यात नभाचा आत्मा तिच्या शरीरातून बाहेर पडला. नभाच्या आत्म्याने आकाशच्या आत्म्याला पाहिले, ती वेगाने त्याच्या जवळ गेली. आकाश तुला माझ्या मामांनी मारले असे मला सांगितले. तू समोर का आला नाहीस? तू गेल्याचे जेव्हा बाबांनी सांगितले त्याच क्षणाला काय झाले ते मला कळलेच नाही. मला झोप लागल्यासारखे वाटले. नंतर काही वेळाने मी माझ्या शरीरातून बाहेर पडतेय असे मला वाटू लागले. आणि आता मला तू समोर दिसतोयस. नक्की काय होतंय मला? तुझ्यासारखे शरीराबाहेर पडणे मला कसे काय जमले?

[next] तेव्हा दुःखी स्वरात आकाश तिला म्हणाला, "तू स्वतःहून तुझ्या शरीराच्या बाहेर पडली नाहीस, तुझा मृत्यू झालाय नभा. सगळं संपलय आता. मला मारण्यात तुझ्या मामांनी कोणतीच कसर सोडली नव्हती पण मी मृत्यू येण्याआधीच शरीरातून बाहेर पडलो होतो त्यामुळे त्यांना मला ठार मारता आले नाही. माझ्या शरीराची त्यांनी पार वाट लावली आहे. इतकी की मी माझ्या शरीरात जर का शिरलो तर तत्क्षणी मरेन. तुझ्या मृत्यूमुळे आपण आपली लढाई हरलोय, आता आपल्या हातात काहीच उरलेले नाही. तुला मुक्त व्हावे लागेल. माझ्यासमोर पण आता मुक्त होण्यापलीकडे काहीच पर्याय उरलेला नाही. पण तुझ्या मामांना आणि त्या राकेशला त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळालीच पाहिजे."

नभाचा आकाशच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता, "अरे आकाश तू काय बोलतोयस? मी कशी काय मरू शकते. बाबा माझ्याशी आत्ता बोलत होते, अचानक मला झोप लागली. तू काय म्हणतोयस की माझा मृत्यू झालाय?" एवढ्यात नभाच्या खांद्यावर तिला हाताचा स्पर्श जाणवला. तिने वळून पहिले तर तिचे बाबा होते. "बाबा, हा आकाश पहा ना काहीही वेड्यासारखे बोलतोय. म्हणे की माझा मृत्यू झालाय. तुम्हीच सांगा याला." नभाचा अजूनही विश्वास बसत नव्हता.

तिचे वडील जड आवाजात म्हणाले, "तो खरं बोलतोय. केवळ तुझाच नव्हे तर माझाही मृत्यू झालाय. तुझा वियोग मी सहन नाही करू शकलो. झाले ते चांगलेच झाले आता सगळी बंधने संपली. आता त्या ईश्वराशी एकरूप होण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. ते पहा घरात आपल्या दोघांचेही मृतदेह पडले आहेत." त्यांचे बोलणे ऐकल्यावर नभाने घरात डोकावले ती भिंतीच्या आरपार गेली. आपला व आपल्या वडीलांचा मृतदेह आणि सभोवती जमलेले कुटुंबीय आणि शेजारी पाहून तिला धक्काच बसला.

[next] तिला फार दुःख झाले. आकाश जवळ जाऊन ती रडत म्हणाली, "हेच का वाढून ठेवले होते आपल्या नशिबात? जातीसाठी ही लोकं मरा-मारायला कशी काय तयार होतात? एवढी का जात महत्वाची आहे? जातीत लग्न केले की आयुष्य सुखातच जाईल याची गॅरंटी देऊ शकतात का हे लोक? लग्न यशस्वी होण्यासाठी केवळ जात एक असली की झाले, मग दोघांच्या मध्ये प्रेम, समजूतदारपणा, विश्वास, तडजोड करायची तयारी वगैरे काही नसले तरी चालेल असे आहे का? या जन्मी आपण एक होणे बहुतेक देवालाच मान्य नव्हते. पुढच्या जन्मी तरी आम्हाला एकाच जातीत जन्माला घाल म्हणावं त्याला."

आकाशने तिला आपल्या बाहुपाशात भरले आणि म्हणाला, "मी लवकरच तुझ्याकडे येईन पण त्या आधी मला तुझ्या मामांचा आणि त्या आकाशचा बदला घ्यायचाय. त्या शिवाय मला मुक्ती मिळणार नाही. माझी वाट बघ. आकाशचे वाक्य पूर्ण होते न होते तोच नभाच्या आत्म्याच्या डोक्यावर एक तेजस्वी प्रकाश पसरला. तिच्या आत्म्याने आकाशच्या आत्म्याला डोळे भरून पाहिले. पुढच्याच क्षणाला त्या तेजस्वी प्रकाशात नभा आणि तिच्या वडीलांचा आत्मा नाहीसा झाला. आकाशच्या आत्म्याला अतीव दुःख झाले पण तो काही करू शकत नव्हता.

इतक्यात त्याच्या कानावर त्याच्या गुरूंचा आवाज पडला, "ही वेळ दुःख करत बसायची नाही, नभा आणि तुझ्या गुन्हेगारांना शिक्षा देण्याची आहे. चल लाग कामाला." आकाशचा आत्मा तिथून आपल्या घरी निघाला. त्याच्या घरात पार सुतकी वातावरण होते. कोणीच जेवले नव्हते. त्याची आई आणि आजी दोघी रडत होत्या. आकाशचे बाबा त्यांना धीर देत होते. आकाश त्यांच्या समोर दृश्य रूपात आला. त्याला पाहून त्याची आई ताडकन उठली आणि तिने धावत जाऊन त्याला मिठी मारली.

[next] "काय झाले रे हे? तू का घरातून बाहेर पडलास? आजचा शेवटचा दिवस होता थोडे थांबायचे होते ना माझ्या राजा! त्या नराधमांनी काय अवस्था करून टाकली तुझ्या शरीराची!" असे म्हणून ती धाय मोकलून रडू लागली. तिला धीर देत आकाशचा आत्मा म्हणाला, "नभाची अब्रू धोक्यात आहे कळल्यावर मी उद्याची वाट पाहात कसे बसू शकलो असतो तूच सांग. हे सगळे विधिलिखितच होते त्याला आपण काय करणार? मला मारल्याचे कळल्यावर नभाने लगेचच प्राण सोडला आणि तिच्या पाठोपाठ तिच्या बाबांनीही. तिच्या मामांचा आणि त्या राकेशचा बदला घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

मला सांगा मी बाहेर पडून गेल्यावर काय काय झाले?" आकाशच्या आजीने पूजा नावाच्या मुलीचा फोन आल्याचे सांगितले. त्याबरोबर आकाशच्या आत्म्याला एकदम स्ट्राईक झाले की पूजा पहिल्यापासून राकेश सोबत आहे, तीच आपल्याला सर्व पुरावे देऊ शकेल. लगेचच आकाशचा आत्मा निघाला तेव्हा सर्वांनीच त्याला अडवले. आकाश त्यांना म्हणाला, "प्लिज मला अडवू नका, माझ्याकडे वेळ कमी आहे.

मला माझ्या आणि नभाच्या मारेकऱ्यांना फासावर लटकावण्यासाठी पुरावे गोळा करायचे आहेत. माझे काम झाले की मी लगेच परत येईन, पण आता मात्र मला जाऊ द्या." आकाशच्या आत्म्याच्या या वाक्यावर त्याचे वडील म्हणाले, "जाऊ द्या त्याला, त्या दुष्टांना शिक्षा ही झालीच पाहिजे." "थँक्स बाबा." म्हणत आकाशचा आत्मा घरातून बाहेर पडला. नभा आणि तिच्या वडीलांच्या मृत्यूच्या बातमीने साळवी कुटुंबाला खुप दुःख झाले. शेवटी नियतीने आपला डाव साधला होता.

[next] पूजा आपल्या बेडरूम मध्ये सामान पॅक करत होती. ती प्रचंड तणावाखाली होती. जे झाले ते तिला अजिबात पटले नव्हते पण या प्रकरणात आपले नांव गोवले जाऊ नये म्हणुन ती मुंबईला आपल्या बॉयफ्रेंडकडे जायच्या तयारीत होती. ती आपल्याच विचारात असताना अचानक तिला आपल्या पाठीमागे कोणीतरी उभे असल्याची जाणीव झाली. तिने वळून पाहिले पण कोणीच दिसले नाही. आपल्याला भास झाला असेल असे समजून ती पॅकिंग करण्यात मग्न झाली.

अचानक तिच्या गालावर आकाशची पाच बोटे उमटली. तो फटका एवढा अनपेक्षित होता की ती तिच्या बेडवरुन उडून खाली पडली. बावचळलेली पूजा आपला गाल चोळत उभी राहते तोच तिच्या दुसऱ्या गालावर आकाशच्या आत्म्याने प्रसाद दिला. पूजाच्या रूममध्ये पाच सहा वेळा थोबाडात बसल्याचा आवाज घुमला. ती रडत भेकत कोपऱ्यात पाय मुडपून बसली आणि तिने आपला चेहरा हातांच्या ओंजळीत लपवला.

तिला कळेना की काय घडतंय. इतक्यात तिच्या पावलांवर मजबूत पकड तिला जाणवली. काही कळायच्या आत ती जोरात खेचली गेली. झटक्यामुळे तिचा तोल गेला आणि तिचे डोके जमीनीवर जोरात आपटले. ती कळवळली. तिच्या लक्षात आले की तिची अशी अवस्था करणारा दुसरा तिसरा कोणी नसून आकाशचा आत्माच असू शकतो. डोके हातांनी गच्च दाबून धरत ती म्हणाली, "आकाश मी तुझी आणि नभाची गुन्हेगार आहे, पण हे असे काही होईल असे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते." या तिच्या वाक्यासरशी आकाशचा आत्मा दृश्य रूपात आला.

[next] तो तिच्या अंगावर धावून आला तसे ती पुढे म्हणाली, "मी तुला सगळे काही सांगते पण प्लिज मला मारू नकोस. राकेश मला ब्लॅकमेल करत होता त्यामुळे मनात नसतानाही मला त्याची साथ द्यावी लागली. मी त्याचा विरोध केला तेव्हा त्याने मला रेप करण्याची धमकी दिली. प्लिज मला माफ कर." "माफ करू? तुला माफ करू? काय बिघडवले होते मी तुझे? तुझ्यामुळे हकनाक रश्मी मारली गेली. मी माझ्या नभाला कायमचा मुकलो. ती गेल्यावर लगेचच तिच्या वडीलांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. माझ्या शरीराची वाट लागली आणि मला आत्मा बनून भटकणे भाग पडले.

काय मिळवलस तू चार चार आयुष्य अशी बरबाद करून? कॉलेज मध्ये रश्मीला माझ्यापासून दूर केलेस नंतर नभालाही दूर करायचा प्रयत्न केलास? तुला माफ केले तर मला देवसुद्धा माफ करणार नाही. तुला मरावे लागेल." आकाशचा आत्मा रागाने थरथरत म्हणाला. यावर पूजा गयावया करत म्हणाली, "मी तुझे दुःख समजू शकते पण या सगळ्याला कारणीभूत राकेश आणि नभाचे मामा आहेत, मी तर फक्त त्यांच्या हातातली कठपुतळी होते. त्यांचे ऐकण्यावाचून माझ्या जवळ काही पर्यायच नव्हता. प्लिज माझे म्हणणे तरी ऐकून घे!" असे म्हणुन पूजाने त्याला सर्व काही सांगण्यास सुरवात केली.

राकेशने नभाच्या घरी तिचे आकाश सोबत असलेले प्रकरण उघडकीस आणण्यास पूजाला सोबत नेणे, तिथे तिच्या मामांचे भेटणे, त्यांनी राकेशला आकाशची सुपारी देणे, आकाशला घराबाहेर काढण्यासाठी नभाच्या किडनॅपिंगची खोटी बातमी रश्मीमार्फत आकाशपर्यंत पोहोचवणे, राकेशने गुंडाना आणि मांत्रिकाला आकाशचा बंदोबस्त करण्यासाठी नेमणे वगैरे सगळे काही तिने एका दमात सांगून टाकले. आपल्या विरोधात एवढे मोठे षडयंत्र रचलेले समजल्यावर आकाशचा आत्मा रागाने लाल झाला.

[next] "हे जे तू मला सांगितलेस ते तुला कोर्टात सांगावे लागेल. मला राकेश आणि नभाच्या मामांना फासावर लटकलेले पाहायचे आहे." आकाशचा आत्मा म्हणाला. इतक्यात सायलेंसर लावलेल्या पिस्तुलातून सुटलेली एक गोळी सरसरत पूजाच्या छातीत शिरली. एक किंकाळी मारून ती तिथेच कोसळली. आकाशचा आत्मा वेगाने तिच्या जवळ गेला. त्याने पूजाचे डोकं आपल्या मांडीवर घेतले, वेदनेने कळवळत ती म्हणाली, "माझ्या जीवाला राकेशपासून धोका होता म्हणूनच मी मुंबईला जाण्यासाठी निघत होते पण त्याने वेळ साधलीच."

मोठ्या कष्टाने तिने आपला हात उचलला आणि आपल्या लॅपटॉपच्या दिशेने बोट करून म्हणाली. "मी राकेश आणि नभाच्या मामांच्या भीतीने आम्ही जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा झालेले सगळे बोलणे त्यांच्या नकळत रेकॉर्ड करून ठेवले होते. जेणेकरून पुढेमागे मी फसले तर ते माझ्या सुटकेसाठी उपयोगी पडेल. माझ्या लॅपटॉपच्या D ड्राईव्ह मध्ये एक हिडन फोल्डर आहे त्यात ते सर्व रेकॉर्डिंग्स सेव्ह केले आहेत. त्या सर्वांना फासावर लटकवायला ते पुरेसे आहेत. लॅपटॉपचा पासवर्ड आहे क्रोनोज. मी तुझी गुन्हेगार आहे, माझ्या सोबत असेच व्हायला हवे होते. शक्य झाले तर मला माफ कर आकाश". असे म्हणुन पूजाने आकाशच्या मांडीवर प्राण सोडला.

आकाश रागाने बेभान झाला. वेगाने तो पूजाच्या घराच्या बाहेर आला पण त्याला कोणीच आढळले नाही. मारेकरी आपले काम करून गायब झाला होता. आकाशने पूजाच्या लॅपटॉप मधून तो फोल्डर शोधून काढला आणि त्यातील सर्व फाईल्स पूजाच्या गुगल ड्राईव्ह वर अपलोड केल्या. नंतर इंस्पेक्टर शिंदेंना पूजाच्या मोबाईल वरून तिच्या गुगल ड्राईव्हचे क्रेडेंशिअल्स मेसेज केले. एवढे सगळे केले तरी राकेश आणि नभाच्या मामांना फासावर लटकावण्यासाठी एखाद्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीची साक्ष आवश्यक होती अन्यथा ते सुटण्याची भीती होती. प्रत्यक्षदर्शी फक्त रश्मी होती आणि ती तर आता या जगात नव्हती.

[next] आता काय करायचे या विवंचनेत तो असताना अचानक त्याच्या डोळ्यांसमोर जोशी गुरुजींचा चेहरा आला. त्याने ध्यान लावले आणि तो आपल्या गुरूंचे स्मरण करू लागला. त्याला जोशी गुरुजींनी सांगितलेले पर्याय आठवले आणि त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. "रश्मीच्या शरीराचे पोस्ट मॉर्टेम झाले नसले म्हणजे मिळवले" असे स्वतःशीच म्हणत तो शवागाराच्या दिशेने निघाला. सुदैवाने रश्मीचे शरीर शवागारात फ्रीझर मध्ये सुरक्षित होते. आकाशच्या आत्म्याने रश्मीच्या मृत शरीरात प्रवेश केला आणि रश्मीने डोळे उघडले. फ्रीझर मधील थंडावा तिला चांगलाच जाणवला. थंडीने तिच्या शरीरावर काटा उभा राहिला.

तिने फ्रिझरच्या दरवाज्यावर वाजवण्यास सुरवात केली. शवागाराच्या बाहेर बसलेल्या वॉचमनने तो आवाज ऐकलं आणि त्याची पाचावर धारण बसली. आत जायची त्याची काही हिम्मत होईना. त्याने ही गोष्ट ड्युटीवर असलेल्या गार्डला आणि डॉक्टरांना सांगितली. तुला भास झाला असेल असे म्हणत डॉक्टर त्याच्या सोबत शवागारात आले. रश्मीचे प्रेत ठेवलेल्या फ्रिझर मधून ठोकल्यासारखा आवाज येत होता. त्यांनी फ्रिझरच्या दरवाज्याचे हॅण्डल पकडून त्याला बाहेर खेचले. त्याबरोबर रश्मी उठून बसली.

तिला असे उठून बसलेले पाहिल्यावर सर्वांचीच भीतीने गाळण उडाली. ते तिथून पळून जायला वळणार एवढ्यात रश्मी म्हणाली, "घाबरू नका, मी भूत नाही. मी जीवंत आहे. माझ्या वडीलांना बोलवा." तिचे बोलणे ऐकल्यावर डॉक्टरांनी सब इन्स्पेक्टर सावंतांना फोन लावला. रश्मी जीवंत असल्याचे समजताच तिच्या वडीलांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. त्यांनी लगेच इन्स्पेक्टर शिंदेंना फोन लावला आणि तातडीने हॉस्पिटलला रवाना झाले. रश्मीला जीवंत पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. रश्मीने जबानी द्यायची असल्याचे त्यांना सांगितले.

[next] त्यांनी आवश्यक असलेल्या अरेंजमेंट्स केल्या आणि रश्मीची जबानी नोंदवली. रश्मीने तिला पूजा आणि राकेशने आकाशच्या विरोधात कसे भडकवले. राकेशने तिचा गैरफायदा घेण्याचा केलेला प्रयत्न, राकेशने आकाशवर केलेला हल्ला, नभाला किडनॅप करून तिच्यावर रेप करण्याचा राकेशचा प्लॅन, आकाशवर गुंडांमार्फत केलेला हल्ला, आकाशला वाचवताना तिचे जखमी होणे, तिच्या डोळ्यादेखत राकेशने आकाशला ठार मारणे सगळे काही सांगितले. रश्मीच्या फोनमध्ये असलेल्या कॉल रेकॉर्डरमध्ये राकेश आणि पूजाचे बोलणे रेकॉर्ड झाले होते. हा एक मोठा पुरावा होता.

इन्स्पेक्टर शिंदेनी वेगाने हालचाल करून राकेश जाधव विरुद्ध अरेस्ट वॉरंट इशू करून घेतले. त्या रात्रीच राकेशला बेड्या ठोकण्यात आल्या. राकेशच्या वडीलांना मुलाचे प्रताप कळल्यावर त्यांनी आपले राजकीय वजन वापरून राकेशला सोडवण्याऐवजी त्याच्या अटकेसाठी पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य केले. ओळख परेड मध्ये रश्मीने राकेशला ओळखून तोच खुनी असल्याचे सांगितले. राकेशला पोलिसी खाक्या दाखवल्यावर तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने पोलिसांसमोर सर्व काही भडा भडा ओकून टाकले. नभाच्या मामांनी त्याला आकाशची सुपारी दिल्याचे त्याने कबुल केले. तसेच पूजा त्याच्यासाठी प्रॉब्लेम करू शकली असती म्हणुन तिचाही खून केल्याचे राकेशने मान्य केले.

बेळगावीला पळण्याच्या तयारीत असलेल्या नभाच्या चारही मामांना आणि आईला अटक करण्यात आली. मांत्रिक आणि भाडोत्री गुंडाना सुद्धा कायद्याचा बडगा दाखवण्यात आला. सर्वांना अटक झाल्याचे समजल्यावर रश्मीची तब्येत अचानक बिघडली तिला श्वास घेण्यात अडथळा येऊ लागला. तिची फुफ्फुसे व्यवस्थित प्रसरण पावू शकत नसल्याने ऑक्सिजन अभावी तिचा गुदमरून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले. खरे तर सर्व गुन्हेगारांना शासन होणार याची खात्री पटल्यामुळे आणि रश्मीच्या शरीरात शिरून ३ दिवस पूर्ण होत आल्यामुळे आकाशच्या आत्माला तिच्या शरीराबाहेर पडावे लागले होते.

[next] त्याला भरून आले. जीवंतपणीच नाही तर मेल्यावरही रश्मी त्याच्या उपयोगी पडली होती. धन्य ते प्रेम. मोठ्या युक्तीने आकाशने रश्मीच्या मृत शरीराच्या मदतीने राकेश विरुद्ध साक्ष दिली. शेवटी कोर्टात केस उभी झाली. रश्मी या खुनातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्यामुळे तिच्या जबानीने केसला मजबुती आली. सब इन्स्पेक्टर सावंत आणि आणि इन्स्पेक्टर शिंदेंनी आपले कौशल्य पणाला लावून गोळा केलेले सर्व पुरावे कोर्टात सादर केले. त्यांना मर्डर वेपन्स हस्तगत करण्यात पण यश आले होते.

रश्मीची मृत्यूपूर्व जबानी, तिच्या मोबाईल वरील राकेश आणि पूजाच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग, पूजाने राकेश आणि नभाच्या मामांशी प्रत्येक भेटीत झालेल्या संभाषणाचे केलेले रेकॉर्डिंग, मर्डर वेपन्स वरील रक्ताचे आकाशच्या रक्ताशी मॅच होणे तसेच त्याच्यावरील बोटाच्या ठशांचे राकेशच्या व इतर गुंडांच्या बोटांच्या ठशांशी मॅच होणे हे सर्व पुरावे फार मोलाचे ठरले. पूनम, सचिन आणि हेमंतने सुद्धा आपल्या आई व मामांविरुद्ध दिलेल्या साक्षीमुळे कायद्याचा फास आरोपींच्या गळ्याभोवती चांगलाच आवळला गेला.

आकाश आणि रश्मीच्या खुनात प्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे राकेश जाधवला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. नभाच्या मामांना आकाशची सुपारी देणे, खुनात अप्रत्यक्ष सहभाग वगैरे आरोपांसाठी आजन्म कारावास देण्यात आला. भाडोत्री गुंड व मांत्रिक यांनाही वेगवेगळ्या सेक्शन्स खाली शिक्षा झाली. नभाच्या आईला पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. पण तिला दुःखातिरेकाने वेड लागल्यामुळे मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी ठेवण्याचे कोर्टाने आदेश दिले. आपल्या मुलाच्या विरहात जाधव बिल्डर इतका खचला की त्याने आपला सर्व बिझनेस आपल्या पत्नीच्या नांवे केला आणि स्वतः संन्यास घेतला.

[next] आपल्या गुन्हेगारांना शिक्षा मिळाल्यावर आकाशने आपल्या शरीराचा अंतिम संस्कार करावा अशी आपल्या वडीलांना विनंती केली जेणेकरून त्याला मुक्त होता येईल. त्याच्या या इच्छेचा त्याच्या कुटुंबीयांनी कडाडून विरोध केला. पण त्याने त्यांना समजावले की त्याच्या शरीराची जी अवस्था आहे ती पाहता, तो त्यात शिरताच तसाही त्याला मृत्यू येईल. मग त्याला मुक्त व्हावेच लागेल त्यामुळे एक तर त्याला कायम याच अवस्थेत राहावे लागेल अथवा कोणा मरणासन्न व्यक्तीने स्वेच्छेने त्याला आपले शरीर देऊ केले तर उर्वरित आयुष्य तो ती व्यक्ती बनून आपल्या कुटुंबासोबत जगू शकेल.

असे होणे केवळ अशक्य होते. कारण जगण्याचा मोह कधी कोणाला सुटलाय? शेवटी सर्वांनाच सरणावर जायचंय पण मरताना वाटायचंच अजून थोडं जगायचंय. आकाश म्हणाला, "आई बाबा, मला पण तुम्ही हवे आहेत पण माझ्या अशा अवस्थेत असण्याला काहीच अर्थ असणार नाही. तुम्ही माझ्या शरीराचे अंतिम संस्कार करा म्हणजे मला मुक्त होता येईल. मी नभाला वचन दिले होते की आमच्या मारेकऱ्यांचा बदला घेतल्यावर मी तिच्याकडे येईन. ती माझी वाट पाहात असेल. मी तुम्हाला वचन देतो की जेव्हा अनुजचे लग्न होईल जेव्हा मी त्याच्या बायकोच्या पोटी जन्म घेऊन पुन्हा याच घरात येईन.

आत्तापर्यंत तुमचा मुलगा बनून लाड करून घेतले आणि पुढे नातू बनून लाड करून घेईन. मी तुमच्याजवळ नक्की परत येईन. जी स्वप्न तुम्ही माझ्यासाठी पाहिली होती ती आता तुम्ही अनुजसाठी पाहा." आकाशने आपल्या कुटुंबाला दुःखाच्या सागरात लोटून या जगाचा कायमचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचा मान ठेवत शवागारात सुरक्षित ठेवलेल्या त्याच्या शरीराला त्याच्या वडीलांनी जड अंतःकरणाने भडाग्नी दिला आणि आकाशचा आत्मा अनंतात विलीन झाला. पण ही लव्ह स्टोरी एवढ्यावरच संपत नाही. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!

क्रमशः


केदार कुबडे | Kedar Kubade
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा, मराठी भयकथा, मराठी कविता या आणि अशा विविध विभागांत लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.