जातबळी भाग ८ - मराठी भयकथा

जातबळी भाग ८, मराठी कथा - [Jaatbali Part 8, Marathi Katha] आकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी.
जातबळी भाग ८ - मराठी कथा | Jaatbali Part 8 - Marathi Katha
पुर्वार्ध: जोशी काका आकाशच्या पत्रिकेतील वाईट योगाबद्दल त्याच्या घरच्यांना माहिती देतात व सुरक्षेसाठी आकाशच्या घराभोवती एक सुरक्षा कवच बनवतात. चार दिवस कोणीही घराबाहेर पडू नका असा सल्ला देऊन ते निघून जातात. आकाशच्या पत्रिकेतील घाणेरड्या योगा बद्दल समजल्यावर काळजीने नभा त्याच्या घरी जाते. आकाशची आई नभाची पारख करते आणि हीच मुलगी आकाशसाठी योग्य असल्याचे तिला जाणवते. घरातील सर्वजण नभाला सून म्हणुन पसंत करतात. नभाच्या मागावर असलेले राकेश आणि सुभाष मामा याबद्दल रवी मामाला जाऊन सांगतात. राकेश आकाशच्या मर्डरचा प्लॅन बनवतो व त्यासाठी २ लाख रुपये मागतो. आकाशच्या मोठ्या मामाची तब्येत बिघडल्याने त्याच्या वडीलांना घराबाहेर पडावे लागते. राकेश आकाशवर वॉच ठेवण्यासाठी गुंडाना नेमतो. आकाशचे वडील त्याला इंस्पे शिंदेंना फोन करून बोलावण्यास सांगतात. इंस्पे शिंदे काही वाटल्यास कळवण्यास सांगून निघून जातात. रवी मामा आकाशच्या पत्रिकेतील योगाबद्दल राकेशला सांगतो. बागेच्या नासधुशी बद्दल रामा गडी आकाशला कळवतो. साळवी कुटुंबाला चार दिवसासाठी बाहेरील जगाशी सर्व संबंध तोडण्यास जोशी गुरुजी सांगतात. मामाची तब्येत बिघडल्यामुळे आकाशचे आई बाबा बाहेर पडतात. राकेश पूजासोबत प्लॅन बनवून आकाशला घरातुन बाहेर काढण्यासाठी रश्मीचा उपयोग करून घेतो. रागाच्या भरात आकाश घरातुन फार्म हाऊसवर जाण्यास बाहेर पडतो. त्याच्या पाठोपाठ रश्मी आणि आकाशचे वडील सुद्धा फार्म हाऊसकडे निघतात. पुढे चालू...

आकाश आपल्या फार्महाऊस वर पोहोचताच त्याला रामा गड्याने सांगितल्याप्रमाणेच सर्व काही आढळले. गेटच्या आत बरोबर समोर एका पत्रावळीत पिशाच्चाला चढवलेला भोग पडला होता. जो कोणीतरी अर्धवट खाल्ल्यासारखा दिसत होता, बरीचशी झाडे उन्मळून पडली होती तर अनेक झाडे पिरगळल्यासारखी दिसत होती. एका झाडाने तर त्याचे फार्महाउस पार उध्वस्त केले होते. त्याच्या ढिगाऱ्यावर ते मुळासकट उन्मळलेले झाड केविलवाणे होऊन पडले होते. ते सगळे पाहत असतानाच त्याला नभाची आठवण झाली.

तो बुलेट वरून उतरला व नभाच्या नावाने हाका मारू लागला. तो तिला वेड्यासारखा सगळीकडे शोधू लागला. आपल्याला काय बघायला मिळेल या विचाराने तो नखशिखांत हादरला होता. अचानक राकेशचा आवाज त्याच्या कानात शिरला. "या मजनूजी तुमचीच वाट पाहत होतो." आकाशने वळून पाहिले, राकेशला पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने आपले पिस्तूल खिशातून काढले आणि राकेश वर रोखले आणि गरजला, "राकेश बऱ्या बोलाने नभाला माझ्या स्वाधीन कर, नाही तर आज तुझा मुडदा पडलाच म्हणुन समज."

[next] "अरे बापरे, किती घाबरलो मी! माझी पॅन्ट ओली व्हायची तेवढी राहिली." राकेश आकाशला खिजवत म्हणाला. "नभा तिच्या घरी सेफ आहे, तुला तुझ्या बिळातून बाहेर काढण्यासाठी मी तिला बेट म्हणुन वापरले आणि तू अलगद माझ्या जाळ्यात सापडलास. नभाच्या मामांनी मला तुझी सुपारी दिली होती. तुझ्या प्रेमात डोक्यावर पडलेल्या रश्मीने माझे काम एकदम सोपे करून दिले. तिला हे माहीतच नाही की तिचा मुर्खपणा तुझ्या मृत्यूला कारणीभुत ठरणार आहे. आज तुला मारून मी माझा बदला घेणार आकाश. पकडा रे याला!" राकेशने आपल्या गुंडाना ऑर्डर सोडली.

समोर आलेल्या एका गुंडांवर नेम धरून आकाशने ट्रिगर खेचला आणि पुढच्याच क्षणाला तो गुंड खाली कोसळला. आकाशने नेम धरून दुसरी गोळी राकेशच्या दिशेने चालवली पण तोपर्यंत राकेश झाडाआड लपला आणि आकाशचा नेम चुकला. "अरे वा आकाश, पिस्तूल मध्ये गोळ्या पण आहेत आणि चालवायचा जिगर पण आहे तुझ्यात! पण काय उपयोग आज तुझा सगळा दम इथे तुझ्या फार्म हाऊस मध्येच मी बाहेर काढणार आहे आणि इथेच तुझी चिता रचणार आहे." राकेश आकाशला डिवचत म्हणाला.

"कोण कोणाची चिता रचतो ते कळेलच. तू सत्त्याने मला कधीच हरवू शकत नाहीस कारण तू एक नंबरचा भ्याड आणि शेपूट घाल्या आहेस. तू फसवून पाठीवर वार करणाऱ्यांच्या पैकी आहेस. खरा मर्द असतास तर समोरा समोर भिडला असतास असे नभाच्या नांवाचा आधार घेऊन मला इथे यायला लावले नसतेस." आकाश बोलत असतानाच गुंडांनी त्याला घेरण्यास सुरवात केली. आकाश बेसावध आहे हे पाहून एका गुंडाने मागून त्याच्यावर तलवारीने वार केला पण आकाश पाठोपाठ आलेल्या रश्मीने तो वार आपल्यावर घेतला.

[next] रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि रश्मी किंचाळून खाली कोसळली. आकाशने वळून पाहिले मात्र आणि त्याच्या पिस्तूल मधून सुटलेल्या तिसऱ्या गोळीने त्या गुंडाच्या कपाळाचा वेध घेतला. आकाशने कोसळलेल्या रश्मीला सावरले, त्याचे डोळे भरले. "रश्मी, काय केलेस हे रश्मी!" तो तिला हाका मारत असताना तिने फक्त त्याच्या डोळ्यात समाधानाने पाहिले. एक मोठी रक्त वाहिनी तुटल्यामुळे अतिरक्तस्त्रावाने तिला ग्लानी आली आणि तिने मान टाकली. आकाश आणि राकेश दोघांनाही वाटले की रश्मी मेली. आकाश दुःखाने बेभान झाला.

राकेश क्षणभर पाहातच राहिला आणि म्हणाला, "व्हॉट अ वेस्ट! साली, माझी असून कधी माझी झाली नाही आणि तुझ्यासाठी स्वतःचा जीव दिला. मी आज तुझ्यावर जेलस होतोय आकाश!" राकेशच्या त्या वाक्याने आकाश प्रचंड संतापला आणि त्याने राकेशच्या दिशेने पिस्तूल रोखत ट्रिगर दाबला. राकेश सावध होता. त्याने बाजूलाच असलेल्या एका गुंडाला समोर खेचले आणि राकेशसाठी सुटलेली ती गोळी त्या गुंडाचा वेध घेत त्याच्या गळ्यातून आरपार निघून गेली. राकेश दोन वेळा वाचला होता. एवढ्यात एक सरसरत आलेला रामपुरी आकाशच्या पोटात घुसला.

आकाश वेदनेने कळवळला आणि खाली गुडघ्यांवर बसला. ते पाहताच झाडाआडून एक किडकिडीत इसम बाहेर आला. त्याच्याच चाकूने आकाशचा वेध घेतला होता. सूरा फेकण्यात त्याचा हात कोणीच धरू शकत नव्हता. राकेशने आकाशच गेम वाजवायला अगदी पारखून माणसे आणली होती. आकाशचा खेळ संपला असे वाटत असतानाच त्याच्या पिस्तूल मधुन सुटलेल्या पाचव्या गोळीने त्या किडकिडीत माणसाला काही समजायच्या आतच त्याचे प्राण घेतले होते. पुढे येणारा राकेश परत मागे गेला.

[next] आकाशने उठायचा प्रयत्न केला पण सत्तूरचा एक जोरदार वार त्याच्या हातावर झाला आणि काही समजायच्या आतच त्याचा पिस्तूल पकडलेला हात तुटून जमीनीवर पडला. आकाशच्या हातातून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. वेदनेने ओरडत तो खाली कोसळला. त्या बरोबर राकेश पुढे सरसावला त्याने हातातील तलवार आकाशच्या पोटात खुपसण्यासाठी मागे घेतली. आकाशच्या लक्षात आले की तो आता काही वाचणार नाही. आता फक्त एकच मार्ग होता तो म्हणजे मृत्यू येण्याआधीच आत्मा शरीरातून बाहेर काढणे आणि आकाशने तेच केले.

आकाशचा आत्मा त्याच्या शरीरातून बाहेर पडला आणि त्याच्या आत्माविरहित शरीरात राकेशची तलवार घुसली. आकाशच्या तोंडून किंकाळी बाहेर पडलीच नाही. राकेश वेड्यासारखा आकाशच्या अचेतन शरीरावर वार करत सुटला. त्याने आकाशच्या शरीराची अक्षरशः खांडोळी केली. आपल्या शरीराची दुर्दशा पाहून आकाशचा आत्मा अक्षरशः तडफडला. एवढ्यात आकाशचे वडील कार घेऊन तिथे आले. कारचा आवाज दुरूनच कानावर पडताच राकेशने जमेल तेवढे पेट्रोल आकाशच्या शरीरावर ओतले आणि काडी पेटवून त्याच्या शरीरावर फेकली. आकाशची पिस्तूल घेऊन तो आणि बाकीचे गुंड तिथून पसार झाले.

राकेशने फेकलेली जळती काडी आकाशच्या पँटवर पडली पण तिथे पेट्रोल पडलेले नसल्यामुळे आगीचा भडका उडाला नाही. पण त्याच्या पॅन्टने हळू हळू पेट घ्यायला सुरवात केली. आकाशचे वडील आकाशला शोधत तिथे आले आणि त्यांना एका मुलीचा आणि चार गुंडांचे असे पाच मृतदेह पडलेले दिसले ते पाहून ते हादरले. पुढे जे दिसू नये म्हणुन ते देवाची प्रार्थना करत होते नेमके तेच त्याच्या नशिबी पाहणे आले. त्यांना दिसला तो त्याच्या मुलाचा जळत असलेला रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह.

[next] त्यांनी पटकन आपला कोट काढला आणि आकाशच्या पेटलेल्या पँटवर टाकून आग विझवली. समोरचे दृश्य पाहून ते मटकन खालीच बसले. तो धक्का एवढा जबरदस्त होता की त्यांचे अश्रूच गोठून गेले, तोंडातून शब्द फुटेनात. एवढ्यात त्यांना कानावर एक ओळखीची हाक ऐकू आली. "बाबा". त्यांचे लक्ष आकाशच्या धुमसत असलेल्या मृतदेहाकडे गेले. आशेने त्यांनी तिकडे पाहिले. पण पदरी निराशाच आली. आकाशचे शरीर जमिनीवर अचेतन अवस्थेत पडले होते. पुन्हा त्यांना आकाशची हाक ऐकू आली, वेड्यासारखे ते इकडे तिकडे पाहू लागले.

हळूहळू त्यांच्या समोर आकाशचा आत्मा दृश्य स्वरूपात आला. ओक्साबोक्शी रडत ते त्याला बिलगले. "हे काय झाले रे बाळा? कशाला बाहेर पडलास तू घरातून? तुला सांगितले होते ना की बाहेर पडू नकोस म्हणुन? मग का ऐकले नाहीस या दुर्दैवी बापाचे? दोन दिवसांचा प्रश्न होता रे फक्त. हे काय घडून बसले? असे म्हणत ते मोठमोठ्याने विलाप करू लागले. आकाशने त्यांचे सांत्वन केले आणि घडलेला प्रसंग थोडक्यात सांगितला.

त्या राकेशला आणि नभाच्या मामांना शिक्षा ही झालीच पाहिजे. मला नभाच्या कानावर हे सगळे घातले पाहिजे, तुम्ही शिंदे काकांना बोलावून घ्या. मी नभाकडे जातो. असे म्हणुन आकाशचा आत्मा नभाकडे जाण्यासाठी वळणार इतक्यात एक भयंकर पिशाच्च तिथे आले. हे तेच पिशाच्च होते ज्याने आकाशच्या फार्महाऊसची ही अवस्था केली होती. राकेशने एका मांत्रिकाकडून ते पिशाच्च वश करून घेतले होते. त्या पिशाच्चाने आकाशच्या आत्म्याला आपल्या पंजात पकडले आणि तिथुन त्याला घेऊन ते मांत्रिकाकडे जाऊ लागले.

[next] आकाशचा आत्मा ओरडला, "बाबा, जोशी काकांच्या कानावर घाला सगळे, तेच मार्ग काढतील यातून." आणि डोळ्याचे पाते लावते न लावते तोच ते पिशाच्च आकाशच्या आत्म्याला घेऊन तिथून गायब झाले. हे सगळे इतक्या फास्ट घडले की आकाशच्या वडीलांना काही समजायला वेळच मिळाला नाही. त्या प्रचंड आणि भयंकर पिशाच्चाला पाहून त्यांचे पुरते अवसानंच गळाले होते. ज्या गोष्टी अस्तित्वातच नसतात असा ठाम विश्वास आज एवढी वर्षे बाळगणारे ते, त्याच गोष्टी याची देही याची डोळा पाहत असल्यामुळे थिजल्यासारखे एका जागी उभे होते.

महत्प्रयासाने त्यांनी स्वतःला सावरले आणि इन्स्पेक्टर शिंदेना फोन लावला. सुदैवाने त्यांनी फोन उचलला. त्यांना थोडक्यात जे घडले आहे ते फोनवर सांगितले ते ऐकताच इन्स्पेक्टर शिंदे तातडीने जीप मधून घटनास्थळी निघाले. मग त्यांनी जोशी गुरुजींना फोन लावला व मोठमोठ्याने रडू लागले. तेव्हा जोशी गुरुजी त्यांना म्हणाले, "शंतनू घाबरू नकोस. मला सगळे काही समजले आहे. सुदैवाने आकाशचे शरीर पुर्णपणे नष्ट झालेले नाही.

आकाशने योग्य वेळी आपला आत्मा आपल्या शरीरातून बाहेर काढल्यामुळे परिस्थिती अजुनही आपल्या हातात आहे. तू सर्वप्रथम आपल्या शिंदे साहेबांच्या मदतीने आकाशचे शरीर शवागारात सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था कर. बाकी मी बघतो काय करायचे ते. तू वहिनींना आणि घरच्यांना सांभाळ त्यांना धीर दे. आत्ता आकाशला माझी सगळ्यात जास्त गरज आहे. मला माझे काम करू दे." असे म्हणून त्यांनी फोन कट केला."

[next] आकाशच्या वडीलांचा फोन खणखणला, तो फोन त्यांच्या पत्नीचा होता. आता आपल्या पत्नीला, आकाशच्या आईला कसे समजवायचे हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. तिला कसे सांगावे की तिच्या लाडक्या मुलाचे निष्प्राण शरीर त्यांच्या समोर पडले होते आणि ते हतबलतेने फक्त पाहत उभे होते म्हणुन. कसे सांत्वन करणार होते ते तिचे? तिच्या दुःखाच्या लोंढ्याला बांध घालायचे सामर्थ्य त्यांच्या दुबळ्या हातात यत्किंचितही नव्हते. थरथरत त्यांनी फोन रिसिव्ह केला आणि कानाला लावला.

आकाशच्या आत्म्याला सोबत घेऊन ते पिशाच्च गावाबाहेरील वापरात नसलेल्या स्मशानात डेरा जमवलेल्या आपल्या मालकाकडे म्हणजे त्या मांत्रिकाकडे आले. राकेश आणि चारही मामा तिथेच होते. त्या भयानक पिशाच्चाला पाहून राकेशची तर हवाच टाईट झाली. हळूच तो रवी मामाच्या मागे लपला. चारही मामांची अवस्था काही वेगळी नव्हती. भीतीने तेही थरथरत होते. त्यांची ती अवस्था पाहून तो मांत्रिक मोठमोठ्याने हसू लागला.

थोड्या वेळाने तो त्यांना म्हणाला, "घाबरू नका, हे पिशाच्च माझे गुलाम आहे. जो पर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ते तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही." नंतर राकेशकडे पाहत त्याने विचारले, "मी सांगितल्याप्रमाणे तू त्या मुलाचे शरीर नष्ट केलेस ना?" राकेश त्या पिशाच्चाकडे पाहायचे टाळत पुढे आला व म्हणाला, "मी तलवार आणि सत्तूरने त्याच्या शरीरावर असंख्य वार केले. पण त्याची पूर्ण वासालात लावण्याआधीच कोणाची तरी कार तिथे आली. कोणी आम्हाला पाहू नये म्हणून मी पटकन पेट्रोल ओतून त्याचे शरीर पेटवून दिले आणि तिथून सटकलो."

[next] "त्याचे शरीर पूर्णपणे जळाले की नाही ते मला सांग." तो मांत्रिक म्हणाला. तसा राकेश गडबडला. "मी शक्य तेवढे पेट्रोल ओतले होते. पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे मला ते चेक करता आले नाही पण ते पूर्णपणे जळाले असावे असा माझा अंदाज आहे." "तुझा अंदाज चुकीचा ठरला तर तू तुझ्यासोबत मलाही गोत्यात आणशील. मी माझे काम नेहेमी चोख करतो. असे तुझ्यासारखे अंदाज लावून काम करत आलो असतो ना तर आज इथवर पोहोचलो नसतो. तुझी एक चूक सगळ्यावर पाणी फिरवू शकते याची तुला कल्पना तरी आहे का?" तो मांत्रिक भडकला होता.

राकेशने त्याची माफी मागितली. त्यानंतर त्या मांत्रिकाने आपला मोर्चा आकाशच्या आत्म्याकडे वळवला. "मानलं पाहिजे तुला, जे मला पण अजुन शक्य नाही झाले ते तू साध्य केलेस. पण काय उपयोग? आज माझ्यासमोर तुला असे आगतिक झालेले पाहून मला खुप छान वाटत आहे. पिंजऱ्यात अडकलेल्या पोपटासारखा तू फक्त फडफडू शकतोस. आता फक्त तीन दिवस तुला माझा कैदी बनुन राहावे लागणार आहे."

ते ऐकल्यावर रवी पुढे आला व त्या मांत्रिकाला म्हणाला, "तीन दिवस तरी कशाला? याला आताच नष्ट करून टाका, म्हणजे कसलेच टेन्शन उरणार नाही. हा सुटला तर काहीही करू शकेल." त्यावर तो मांत्रिक उसळून म्हणाला, "मूर्खा तो आत्मा आहे, त्याला नष्ट करू शकत नाही. तीन दिवसा नंतर त्याला स्वतःच मुक्त व्हावे लागेल कारण त्याचे शरीर आपण नष्ट केले आहे. जर का एखादे मृत शरीर त्याला मिळाले तरी ते तो फार फार तर तीनच दिवस धारण करू शकतो. जर तीन दिवसात त्याने ते स्वेच्छेने सोडले नाही तर ते शरीर सडू लागेल आणि त्या शरीरात त्याला अनंत काळासाठी अडकून पडावे लागेल.

[next] म्हणुन जर तुम्हाला जगायचे असेल तर आपल्याला त्याला किमान तीन दिवस कैद करून ठेवावे लागेल. त्या मांत्रिकाने मंत्रसामर्थ्याने आकाशच्या आत्म्याच्या सभोवती एक तेजस्वी गोल निर्माण केला आणि आकाशचा आत्मा त्यात कैद झाला. आकाशच्या आत्म्याने त्यातुन सुटायचा खुप प्रयत्न केला पण व्यर्थ. आकाशच्या आत्म्याल्या बंधनात बांधल्यावर त्या मांत्रिकाने त्या पिशाच्चाला त्याचा भोग अर्पण करून आपल्या गुलामीतून मुक्त केले. मोठ्या आनंदाने चित्कारत ते पिशाच्च तिथून गायब झाले. पिशाच्च तिथुन निघुन गेल्यावर राकेश आणि सर्व मामांनी मोकळा श्वास घेतला.

आपण मोठ्या संकटात सापडल्याचे आकाशच्या आत्म्याच्या लक्षात आले. तो स्वतःशीच विचार करू लागला, "बाबांनी जोशी काकांशी संपर्क केला असला म्हणजे मिळवले नाहीतर तीन दिवसांनंतर ह्या सगळ्याला काहीच अर्थ उरणार नाही. माझे मारेकरी मोकाट सुटतील आणि माझ्या नभाला तर या सगळ्याबद्दल काही कल्पनाच असणार नाही. तिचे मामा नक्कीच तिला ही खात्री पटवून देतील की मला तिच्याशी लग्न करायचे नसल्यामुळे मी कुठेतरी दूर निघुन गेलो आहे म्हणुन. मग तिला नाईलाजाने, ते म्हणतील त्याच्याशी लग्न करावे लागेल.

ती मला भ्याड समजून माझा द्वेष करेल का? मी पण काय निगेटिव्ह विचार करत बसलो आहे? "काका, मला वाचवा. नाहीतर माझा पण नारायणराव पेशवा होईल." आकाशचा आत्मा स्वतःशीच पुटपुटला. इतक्यात आकाशच्या आत्म्याला जोशी काकांचे शब्द ऐकू आले, "आकाश, काळजी करू नकोस मी तुला यातून बाहेर काढेन. जे झाले ते झाले पण यापुढे जे होईल ते या सगळ्यांची पळता भुई थोडी करेल एवढे नक्की." त्यांचे शब्द ऐकून आकाशच्या आत्म्याला हुरूप आला. त्याने जोशी काकांना उद्देशुन विचारले, "तुम्ही इथे आहात का काका? मला दिसत का नाही?"

[next] पुन्हा त्याला काकांचे शब्द ऐकू आले, "मी तुझ्याशी टेलिपथीच्या मध्यमातुन बोलतोय आकाश. मी स्वतः जरी तिथे नसलो तरी इंटेलेक्च्युअली मी तुझ्याशी जोडला गेलोय. तो मांत्रिक आणि इतर लोक तिथुन गेले की मी तुला या बंधनातून मुक्त करेन. मग पुढे काय करायचे ते तुझे तुलाच ठरवावे लागेल. तुला तुझ्या शरीरात पुन्हा शिरता येणार नाही. कारण तुझ्या शरीराची अवस्था पाहता तू त्यात शिरताच तुझा मृत्यू होईल आणि सगळा खेळच संपेल.

मी तुला जीवंत तर करू शकणार नाही कारण ती ताकद माझ्यात नाही. पण तुझ्या मारेकर्यांना त्यांच्या परिणामांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी हरप्रकारे तुझी मदत करेन. जरी तुझ्या शरीराची वाताहत लागली असली तरी सुदैवाने तुझे शरीर पुर्णपणे नष्ट झालेले नाही. तुझ्या वडीलांनी तुझे शरीर पुर्णपणे जळू दिले नाही. इन्स्पेक्टर शिंदेंच्या मदतीने तुझे शरीर शवागारात प्रिझर्वेशनसाठी पाठवायला मी त्यांना सांगितले आहे. जोपर्यंत तुझे शरीर पुर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत तुला तीन दिवसांचे बंधन उरणार नाही. तुझ्या समोर काही पर्याय आहेत.

पहिला म्हणजे जोपर्यंत तुझे शरीर सांभाळून ठेवता येईल तोपर्यंत तुला शरीर विरहित अवस्थेत पुढील काळ व्यतीत करता येईल पण अशा अवस्थेत कायम स्वरूपी राहण्याला काही अर्थ नाही. दुसरा म्हणजे ज्याचा मृत्यू होऊन २४ तास उलटले नाहीत अशा एखाद्या मृत व्यक्तीच्या शरीरात पुढील तीन दिवसांसाठी वास्तव्य करता येईल. पण फक्त तीन दिवसांकरिता, त्यानंतर तुला त्या शरीराचा स्वेच्छेने त्याग करावाच लागेल. अन्यथा तुला त्या सडणाऱ्या शरीरात कायमचे अडकून पडावे लागेल.

[next] तीन दिवसानंतर जर का तुला त्या शरीरातून बाहेर पडल्यावर असेच एखादे शरीर मिळाले तर पुन्हा तू त्या शरीरात तीन दिवस वास्तव्य करू शकतोस पण हा पर्यायही तितकासा फायद्याचा नाही. तिसरा म्हणजे एखादी व्यक्ती शेवटच्या घटका मोजत असेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याआधीच जर का तू त्या व्यक्तीच्या इच्छेने त्याच्या शरीरात प्रवेश करू शकलास तर त्या व्यक्तीचा आत्मा मुक्त होईल आणि तुला त्या व्यक्तीच्या शरीरात वास करता येईल.

पण जर का तू त्या शरीराच्या बाहेर तीन दिवस राहिलास तर चौथ्या दिवसापासून मात्र ते शरीर सडू लागेल आणि तुला त्या शरीरात प्रवेश करता येणार नाही. जर का हा नियम तू पाळलास तर मग तुला ती व्यक्ती बनून उर्वरित आयुष्य मनुष्य रूपात जगता येईल. त्यानंतर तू आपल्या स्वतःच्या शरीराला अग्नीच्या सुपुर्द करू शकतोस. आता या सगळ्या प्रकरणात एकच जोखीम आहे ती म्हणजे तुझ्या शरीराची सुरक्षा. जर का कोणी तुझ्या शरीराला नष्ट केले तर तुला तीन दिवसात मुक्त व्हावेच लागेल.

फारतर तुला एखाद्या मृत शरीरात फक्त तीन दिवस वास्तव्य करता येईल. हे सगळे ऐकल्यावर आकाशच्या आत्म्याला काय बोलावे तेच कळेना पण भयाण अंधारात एखादा दिवा सापडावा तसे त्याला झाले. जोशी काकांच्या रूपात त्याच्या त्रिशंकू आयुष्यात आशेचा एक किरण आला होता. त्यांचे बोलणे शाब्दिक नसले तरी का कोणास ठाऊक, पण मांत्रिकाने आकाशच्या आत्म्याच्या दिशेने अशा रितीने पाहिले की जणु काही त्याने त्यांचे संभाषण शब्दशः ऐकले आहे.

[next] आकाशच्या आत्म्याला प्रचंड टेन्शन आले. त्याला त्या मांत्रिकाच्या नजरेला नजर देणे अवघड जाऊ लागले आणि त्याने त्याची नजर चोरली. मांत्रिक कुत्सितपणे हसला. तो म्हणाला, "तुला आता कोणीही वाचवू शकत नाही. अजुन फक्त तीन दिवस मग तुझा खेळ खल्लास.

आकाशच्या फार्महाऊसवर चार गुंडांसह त्याच्या मृतदेहासोबत रश्मीला मरणासन्न अवस्थेत सापडलेले पाहून तिचे वडील सब इन्स्पेक्टर सावंत आणि इन्स्पेक्टर शिंदेही संभ्रमात पडले. त्यांनी रश्मीच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले, ती अर्धवट शुद्धीत आली. आपल्या वडीलांना समोर पाहून तिच्या चेहऱ्यावर एक स्मित उमलले. ते तिला विचारून लागले की काय झाले? तिने खुणेनेच त्यांना जवळ येण्यास सांगितले. सावंतांनी तिच्या तोंडाजवळ आपला कान नेला. तिच्या तोंडून राकेश खून असे काही मोडके तोडके शब्द पडले. तिने एक मोठा आचका दिला आणि त्यांच्या हातातच प्राण सोडला.

शरीरातून खूप जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा प्राण गेला होता. जणू ती फक्त त्यांना पाहण्यासाठीच थांबली होती. शोकाकुल सावंतांना इन्स्पेक्टर शिंदेनी महत्प्रयत्नांनी सावरले. या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या मुलीचा काय संबंध हेच त्यांना समजत नव्हते. जो कोणी त्यांच्या मुलीच्या खुनाला जवाबदार होता त्याला फासावर लटकवायचा निश्चय करून त्यांनी जड अंतःकरणाने पंचनामा सुरु केला. इन्स्पेक्टर शिंदेनी राकेश जाधव विरुद्ध कोणताच पुरावा उपलब्ध नसल्यामुळे आकाशचा आकस्मिक मृत्यू म्हणून एफ.आय.आर नोंदवली.

[next] आकाशच्या वडीलांनी याला विरोध केला पण त्यांना या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन दोषींवर कारवाई करण्याचे त्यांनी आपल्या मित्राला वचन दिले तेव्हा कुठे ते शांत झाले. सगळा वृत्तांत समजल्यावर आकाशच्या घरावर अवकळा पसरली. आकाशच्या आईची तर रडून रडून फार वाईट अवस्था झाली होती. तिला सावरणे आकाशच्या वडीलांना खूप अवघड झाले होते. आकाशचे शरीर शवागारात सुरक्षित ठेवल्याचे आणि जोशी गुरुजींनी सर्व काही ठीक होईल असे सांगितल्याचे कळल्यावर ती थोडी शांत झाली पण तिचा विलाप सुरूच होता.

तिकडे रश्मीच्या घरी याहून वेगळी परिस्थिती नव्हती. रश्मीची आई आपल्या नवऱ्याला दोष देत होती. "काय उपयोग तुमच्या पोलिसात असण्याचा? जिथे पोलिसांचे कुटुंबच सुरक्षित नाही तिथे इतरांनी काय अपेक्षा ठेवायच्या?" तिचे शब्द सब इंस्पेक्टर सावंताचे काळीज चिरत होते. कसे बसे तिचे सांत्वन करून सावंत पोलिस स्टेशनला आले. इंस्पेक्टर शिंदेंकडून त्यांना या खुनात जाधव बिल्डरचा मुलगा आणि इतर काही जण इन्व्हॉल्व्ह असल्याचे त्यांना समजले. काही झाले तरी या हत्याकांडात सहभागी असलेल्या आरोपींना सोडायचे नाही असे त्यांनी मनोमन ठरवले आणि आपल्या खबऱ्यांना कामगिरीवर सोडले.

स्मशानात आकाशच्या आत्म्याला कैद करून झाल्यावर मांत्रिक आणि इतर सर्व जण आपापल्या घरी निघाले. रवी मामाने आपली शंका उपस्थित केली, "आकाशच्या आत्म्याला आपण असेच सोडून जाणे कितपत योग्य आहे? नाही म्हणजे तो कैदेतून सुटला किंवा कोणी त्याला पाहिले आणि मदत केली तर?" यावर तो मांत्रिक खदाखदा हसू लागला. "माझ्या विद्येवर तुला शंका आहे का? माझ्या कैदेतून कोणत्याही आत्म्याची सुटका होणे केवळ अशक्य आहे.

[next] या भयाण स्मशानात दिवसा पण कोणी माणूस येत नाही, मग रात्री येण्याचा तर प्रश्नच नाही आणि समजा चुकून माकून कोणी आलाच तर त्याला हा आत्मा दिसणारच नाही त्यामुळे याची सुटका करणे तर लांबच राहिले. आता डायरेक्ट तिसऱ्या दिवशी इथे यायचे ते याची मुक्ती पाहायलाच. एकदा का हा मुक्त झाला की मग हा कोणाचेच काहीही बिघडवू शकत नाही. चला आता आपापल्या घरी जाऊन बिनधास्त झोपा." असे म्हणुन तो मांत्रिक आणि त्याच्या पाठोपाठ सगळे जण त्या स्मशानातुन निघून गेले.

ते सर्व गेल्याची खात्री झाल्यावर जोशी गुरुजींचा आत्मा त्या स्मशानात प्रकट झाला. त्यांना पाहताच आकाशच्या आत्म्याच्या जीवात जीव आला. वेळ न दवडता जोशी गुरुजींचा आत्मा कामाला लागला. त्यांच्या असे लक्षात आले की मांत्रिकाने खुप मजबूत अशा बंधनात आकाशच्या आत्म्याला बांधले होते. त्याला यातून सोडवण्यासाठी जोशी गुरुजींना काही सामग्री लागणार होती आणि त्यांचे सदेह तिथे असणे गरजेचे होते. आकाशच्या आत्म्याला धीर देऊन जोशी गुरुजींचा आत्मा आपल्या घरी परतला व त्याने आपल्या देहात प्रवेश केला. लागणारे साहित्य सोबत घेऊन ते लागलीच आपल्या ऍक्टिवा वरून निघाले.

जोशी काकांनी गावाबाहेरील स्मशानात येताच सोबत आणलेल्या वस्तू मांडण्यास सुरवात केली. सर्व वस्तू मनासारख्या मांडून झाल्यावर त्यांनी मंत्रोच्चारण सुरु केले. काही वेळातच आकाशचा आत्मा व त्याच्याभोवतीचा तो तेजस्वी गोल दृश्य स्वरूपात आला. जसजसे जोशी गुरुजींचे मंत्र त्या स्मशानात घुमू लागले तसतसे त्या गोळ्याचे तेज फिके पडू लागले. शेवटी तो गोल पूर्णपणे नाहीसा झाला आणि आकाशचा आत्मा त्या बंधनातून मुक्त झाला.

आकाशच्या आत्म्याने कृतज्ञतेने जोशी गुरुजींचे पाय धरले. तसे जोशी गुरुजींनी त्याला आशीर्वाद दिला आणि सावध केले, "तुझ्याकडे फार वेळ नाही, त्या मांत्रिकाच्या लक्षात येण्याआधीच तुला तुझी चाल खेळावी लागेल. जा यशस्वी हो." असे म्हणुन जोशी गुरुजींनी आपल्या सामानाची आवरा-आवर सुरु केली. आकाशचा आत्मा वेगाने नभाच्या घरी निघाला.

क्रमशः


केदार कुबडे | Kedar Kubade
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा, मराठी भयकथा, मराठी कविता या आणि अशा विविध विभागांत लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.