आठवणी - मराठी कविता

आठवणी, मराठी कविता - [Aathvani, Marathi Kavita] त्या क्षितीज किनारी आकाश ते निळेशार, त्या चंचल स्वच्छंद आठवणींचा खुमार.
आठवणी - मराठी कविता | Aathvani - Marathi Kavita
त्या क्षितीज किनारी आकाश ते निळेशार
त्या चंचल स्वच्छंद आठवणींचा खुमार
त्या भेट देती अन् सहजच मी ही रडतो
अन् मधूनच हसता विचित्र क्षण तो घडतो

त्या नेती कधी मज तान्ह्या अल्लड काळी
धूसर तरीही दुधभात त्या ढवळी
मांडीत आईच्या अंगठा चोखत निजतो
निमिषात झोपुनी स्वप्नरंगी मी रुजतो

कधी नेती मज त्या शाळेमधल्या बाकी
तो धाक बाईंचा अन् शेंबूड माझ्या नाकी
कधी पळतो पडतो रडून हट्ट मी करतो
अन् भीती वाटता बाबा मी ओरडतो

त्या घेऊन जाती कॉलेजच्या कट्ट्यात
बेधुंद मित्र अन् कटिंग चहाची साथ
जाणूनी अर्थ मी प्रेम जिव्हाळा जपतो
बेभान रात्री त्या सहजच मी ही खपतो

आठवणी अस्पष्ट तरीही अलगद दाटून येती
त्या भूतक्षणांना सहज कडेवर देती
परतणार नाही ‘ते’ हे ही जाणून घेतो
ते गोंदण बघुनी त्रास मला मी देतो
रोहित साठे | Rohit Sathe
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.