होय मी गर्भाशय बोलतोय - मराठी कविता

होय मी गर्भाशय बोलतोय, मराठी कविता - [Hoy Mi Garbhashay Boltoy, Marathi Kavita] होय मी गर्भाशय बोलतोय, असहाय झालेला.
होय मी गर्भाशय बोलतोय - मराठी कविता | Hoy Mi Garbhashay Boltoy - Marathi Kavita

होय... मी गर्भाशय बोलतोय
असहाय झालेला
कसल्याशा पाण्यात ठेवलेला
अन् चक्क बाटलीत कोंडलेला

वयाच्या चौदा-पंधराव्या वर्षी तर
किती सोहळे माझ्या आगमनाचे
आजीला आनंद, मुका नातू झाला
अन् हिरवा फ्रॉक
गच्च ओटीने भरला

विवाहानंतर तर माझी किंमत
आभाळा एवढी झाली
तुझी अडीच किलोची ओझी
पृथ्वी होउन मी पेलल

अगं, माझा जीव तो किती?
पण त्यात आणखी एक जीव
तो ही अडीच तीन किलोचा
नऊ महिने पोसायचा
पण चकार शब्द ही नाही काढायचा?

पण, कधी बाहेर आलो नाही
अन् किरकिर ही केली नाही
आधारहीन आभाळासारखं
मुकाटपणे वेदना झेलल्या
अन् सुखकर सावल्या
तुझ्या पदरात अलगद ठेवल्या

पण... पण
आज तू मला विसरलीस?
करा करा कापून
बाटलीत भरून
स्ट्रेचरवर शांत पहुडलीस?

कारण काहीही असो
पण यौवनाची जाणीव अन् अनुभव
कायम देणारा तुझा मित्र
तू कायमचा दूर केलास

अगं, एकदाच बघ माझ्याकडे
अन् विचार तरी तू का चाललास?
खरं खरं सांग
मी गेल्यावर आठवेल ना
जुना सोहळा कौतुकाचा?

कधी तरी थॅंक यु म्हणून
कटाक्ष टाक ना ग शेवटचा
श्रीमंत मी केलं
तुला मातृत्व बहाल करून
तू मात्र मला रितं केलं
उकिरड्यावर फेकून

- साक्षी खडकीकर

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.