मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर भाग ५ - मराठी भयकथा

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर भाग ५, मराठी भयकथा - [Mirror Mirror a Tale of Terror Part 5, Marathi Bhaykatha] अमोल, गोपाळ आणि श्रीनिवासचे दोन सहकारी त्या वाड्याच्या दिशेने जायला निघतात.

डॉक्टर कुलकर्णी प्रियाला तपासून सुशीलाबाईंशी बोलत असताना अचानक...

पुर्वार्ध: मागील भागात आपण पाहिले की, प्रियाला कनिष्कपासून कसे वाचवता येईल याचा विचार करत असताना अमोलच्या लक्षात येते की तो आरसा आपल्या घरात आल्यापासून हा सगळा त्रास सुरु झाला आहे. तो दुकानातून आरसा विकणाऱ्या माणसाचा पत्ता मिळवतो व त्याला गाठून त्याच्याकडून सर्व गुढ समजुन घेतो. डॉक्टर कुलकर्णी प्रियाला तपासून सुशीलाबाईंशी बोलत असताना अचानक क्लिनिक मधुन प्रिया गायब होते. गोपाळ आरशाचे रहस्य सर्वांसमोर उघड करतो. त्याबरोबर श्रीनिवासला सर्व गोष्टींची सांगड लागते आणि तो ते सर्वांना समजावून सांगतो. नंतर अमोल, गोपाळ आणि श्रीनिवासचे दोन सहकारी त्या वाड्याच्या दिशेने जायला निघतात. पुढे चालू...

अमोल, गोपाळ आणि ते दोन असिस्टंट त्या जळक्या वाड्यापाशी आले तेव्हा बरीच रात्र झाली होती. त्यांनी वाड्याच्या गेट मधुन आत पाय टाकताच दिवाभितांचे (वटवाघळांचे) घुत्कार वातावरणात घुमू लागले. थंडगार हवेच्या झोताने त्यांच्या अंगावरचे केस ताठ झाले. आपल्या आसपास कोणाचे तरी अस्तित्व त्यांना जाणवत होते. समोर असलेला तो भयाण वाडा आ-वासून आपल्याला गिळायचीच वाट पाहत आहे असे वाटू लागल्यामुळे गोपाळ वाड्यात जायला कचरू लागला, तसे अमोलने त्याला धीर दिला.

प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला हे दिव्य करावेच लागेल अशी स्वतःची समजुत घालुन गोपाळ पुढे सरसावला. सोबत असलेल्या रमेश आणि जयेशनी ई.एम.एफ रिडरवर रिडिंग्स चेक केली. आजुबाजुला बर्‍याच अमानवीय शक्ती घोटाळत असल्याचे ती दर्शवत होती पण कनिष्कचा कुठेच मागमुस नव्हता. त्या जळक्या वाड्याच्या दरवाजातून अमोल आत शिरला, पाठोपाठ भीतीने गळपटलेला गोपाळ आणि त्याच्या मागे रमेश व जयेशही आत शिरले. तोच मोठा चित्कार करत वटवाघळांचा एक मोठा थवा त्यांच्या डोक्यावरून फडफडत गेला. अमोल पटकन खाली वाकला पण दचकून मागे कोसळायच्याच बेतात असलेल्या गोपाळला मागे उभ्या असलेल्या रमेशने वेळीच सावरले.

[next] अमोलच्या म्हणण्यानुसार तळघरात जाणारा रस्ता दाखवण्यासाठी गोपाळ आता पुढे आला व सर्व त्याच्या मागे चालू लागले. जसजसे ते तळघरात जाणारा जिना उतरू लागले तसतसे ई.एम.एफ रिडर वर मिळणारे कनिष्कचे सिग्नल जास्त तीव्र होऊ लागले. रमेशने ही गोष्ट अमोलच्या निदर्शनास आणून दिली. गळ्यातील रुद्राक्ष माळा चाचपून पाहत अमोलने गोपाळला न घाबरता पुढे चालण्यास सांगितले. जिना उतरून ते चौघे तळघरात पोहोचले आणि कनिष्कचा चिडलेला आवाज त्यांच्या कानावर पडला.

आपला अंदाज खरा ठरल्याने गोपाळला आनंद झाला पण त्याच बरोबर आता पुढे काय होणार या विचाराने त्याच्या अंगावर काटा आला. अल्ट्रा व्हायोलेट किरणांचा मारा करणाऱ्या गन्स घेऊन रमेश आणि जयेश पुढे सरसावले. त्यांच्या अंदाजापेक्षा ते तळघर बरेच मोठे दिसत होते. आत शिरल्यावर त्यांना डाव्या बाजुला एक, उजव्या बाजुला एक आणि समोर एक असे तीन अंधारलेले रस्ते दिसले.

“अरे हे तळघर कसले ही तर गुहाच आहे आणि हे तीन रस्ते आत कुठवर गेले असतील देव जाणे. पूर्वीच्या लोकांना प्रत्येक गोष्ट गुंतागुंतीची करण्याची काय हौस होती कुणास ठाऊक! आता कसे शोधणार प्रियाला? आणि तो भाला पण नक्की कुठे लपवला असेल याचीही काही कल्पना नाही. त्यात भरीस भर म्हणुन इथे लाईटही नाही. काळोखात काय कप्पाळ शोधणार आपण! आणि आता तो कनिष्क पण चवताळलेला असेल. आज मी पक्का मरणार बहुतेक!” गोपाळचा त्रासिक आवाज त्या शांततेत घुमला.

त्याबरोबर अमोल म्हणाला, “कदाचित हे तिन्ही रस्ते एकमेकांशी कनेक्टेड असतील पण आपण वेगवेगळे जाण्यापेक्षा दोघा-दोघांचा ग्रुप बनवू आणि आधी या दोन रस्त्यांनी जाऊन प्रियाला शोधू. ज्या ग्रुपला प्रिया सापडेल त्याने तिला घेऊन इथेच यायचे जर का नाही सापडली तर सर्व मिळून ह्या तिसऱ्या रस्त्याने जाऊन शोधू.” “पण काही अडचण आल्यास एकमेकांशी संपर्क कसा साधणार? मोबाईलला तर रेंजच नाही” गोपाळने आपली शंका व्यक्त केली.

त्यावर रमेश म्हणाला, "त्याच्यावर पण उपाय आहे. आमच्याकडे ही अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्ह्ज प्रोड्युस आणि रिसिव्ह करणारी मशिन्स आहेत. जर काही अडचण आलीच तर यांच्यामार्फत आपण एकमेकांकडे मदतीसाठी सिग्नल पाठवू शकतो. “गुड आयडिया! चला तर मग.” असे म्हणून अमोलने गोपाळ व जयेशला डाव्या बाजुच्या रस्त्याने जाण्यास सांगितले आणि स्वतः रमेश सोबत उजव्या बाजुच्या रस्त्याने निघाला.

अमोल, गोपाळ व दोन असिस्टंट्स त्या वाड्यापाशी येतात. तळघरात गेल्यावर त्यांना तीन रस्ते दिसतात. दोन दोनच्या ग्रुपमध्ये ते प्रियाला शोधायला निघतात. प्रिया सापडते का? कनिष्कचे काय होते ते ते आता वाचूया...

[next] त्यावर गोपाळने परत आपली शंका काढली. “अरे चला काय? या काळोखाचे काय करणार? मला काळोखाची भीती वाटते.” “आमच्याकडे हे हेड माऊंटेड सर्च लाईट्स आहेत ना, मग अंधाराची भीती कसली?” जयेश म्हणाला. “अरे वा! तुम्ही तर फुल तयारीनेच आला आहात. बेटा गोपाळ! आज काही खरे नाही बाबा तुझे!” गोपाळच्या या उद्गारांवर सगळेच हसले. त्यामुळे वातावरणातील ताण थोडा कमी झाला. रमेश म्हणाला, “ते तर आम्हाला रहावेच लागते, केव्हा काय परिस्थिती येईल हे सांगता थोडेच येते? सश्याच्या शिकारीला जाताना वाघाच्या शिकारीच्या तयारीने जावे म्हणतात ते काही उगाच नाही.” “ससा आणि वाघाबद्दल तर माहीत नाही पण आज कनिष्क माझी शिकार मात्र नक्की करणार असे दिसतंय.” गोपाळच्या या वाक्यावर पुन्हा एकदा सर्वांमध्ये खसखस पिकली.

आम्ही सर्व आहोत ना सोबत? चल आता, जास्त बहाणे नको शोधत बसू असे म्हणुन जयेश त्याला ओढत त्या अंधाऱ्या रस्त्याकडे नेऊ लागला. त्याचवेळी जयेशच्या हातातील ई.एम.एफ रिडर वर बिप वाजू लागली आणि काही कळायच्या आत गोपाळला जोराचा धक्का बसला आणि तो हवेत उडाला त्याच्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ बाजुला फेकली गेली आणि तो त्या तळघराच्या भिंतीवर आदळून जमिनीवर खाली कोसळला. त्या प्रकाराने सगळेच भांबावले. “गद्दार!” कनिष्कचा आवाज त्या तळघरात घुमला. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच गोपाळच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या आणि कनिष्कच्या आत्मा वेगाने त्या तळघरातून बाहेर निघून गेला.

[next] जे घडले ते इतके अचानक आणि विलक्षण वेगाने घडले होते की क्षणभर कोणाला काही समजलेच नाही. दोन मिनिटांपूर्वी विनोद करणाऱ्या गोपाळचे शरीर आता केवळ रक्ता मांसाचा चिखल बनले होते. त्या प्रकाराने सर्वच हादरले. गोपाळने मस्करीत बोललेले वाक्य खरे ठरले होते. राजे उदयभान, त्यांचे संपुर्ण कुटुंब आणि वाड्यातील निरपराध नोकर चाकरांना आपल्या स्वार्थासाठी आगीच्या भक्ष्यस्थानी देणाऱ्या गोपाळला त्याच्या पापाची शिक्षा मिळाली होती. त्या तळघरात एकदम भयाण शांतता पसरली होती. इतक्यात प्रियाचा खूप क्षीण झालेला आवाज अमोलच्या कानांवर पडला आणि तो धावतच कनिष्क ज्या रस्त्याने बाहेर आला होता त्या रस्त्याने आत शिरला. पाठोपाठ जयेश आणि रमेश ही धावले. साधारण शंभर एक मीटर आत गेल्यावर त्यांना एक मोठी मोकळी जागा दिसली. तिथे त्यांना एका मोठ्या चौथऱ्यावर मरणासन्न अवस्थेत पडलेली प्रिया दिसली.

अमोलने धावत जाऊन प्रियाला सावरले. तिची अवस्था पाहून त्याचे डोळे भरले आणि त्याचवेळी संतापाने त्याच्या मुठी आवळल्या गेल्या. त्याला स्वतःचाच राग येऊ लागला. काय उपयोग आपल्या या तगड्या शरीराचा आणि ताकदीचा जर आपण आपल्या बहिणीच्या अब्रूचे रक्षण करू शकत नसू तर? कोणी मनुष्य असता तर त्याने त्याला उभा चिरला असता पण त्याची गाठ होती एका वासनांध आत्म्याशी. कनिष्कच्या अमानवीय ताकदीपुढे त्याची मानवी ताकद अगदीच तुच्छ होती.

जयेश आणि रमेश तो भाला शोधू लागले. बराच वेळ शोधूनही तो भाला त्यांना कुठेच आढळला नाही. तेव्हा "आधी प्रियाला इथून घरी घेऊन जाऊ, नंतर भाल्याचे काय ते बघू" असे म्हणुन अमोलने प्रियाला आपल्या हातांमध्ये उचलले आणि वळला तोच त्या चौथऱ्यावरील फरशी कर्कश्य आवाज करत बाजुला सरकली आणि सर्च लाईटच्या प्रकाशात त्या भाल्याचे धारधार पाते चमकले. ते पाहताच त्या तिघांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. प्रियाला उचलताना नकळत एक गुप्त कळ दाबली गेली आणि इतकी वर्ष त्या फरशीखाली आपले इप्सित साध्य करण्यासाठी वाट पाहत असलेला तो भाला दुग्गोचर झाला.

कनिष्कचा नाशास कारणीभुत ठरणारे शास्त्र तर सापडले होते पण अजून बरेच काम बाकी होते. श्रीनिवास आणि त्याचे असिस्टंट्स त्याच कामात गुंतले होते. तळघरातून प्रियाला सोबत घेऊन अमोल आणि श्रीनिवासचे दोन्ही असिस्टंट बाहेर पडताना गोपाळच्या चिंधड्या झालेल्या शरीराकडे पाहून हळहळले, पण शोक करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. भस्मसात झालेल्या त्या वाड्यातील काही अर्धवट जळलेली लाकडे गोळा करून त्यावर गोपाळचे तुकडे त्यांनी रचले आणि तिथेच त्याला भडाग्नी दिला.

ज्या वाड्याला गोपाळने आगीच्या स्वाधीन केले होते त्याच वाड्याच्या तळघरात गोपाळ सरणावर चढला होता याहून मोठा दैवदुर्विलास तो कोणता? अमावस्या सुरु व्हायची वेळ जवळ येत होती. त्यामुळे गोपाळचे कलेवर तसेच जळते सोडून ते तिथून तातडीने मार्गस्थ झाले. वाड्यातून बाहेर पडताच जयेशने श्रीनिवासला भाला मिळाला असल्याचे सांगितले, त्याबरोबर श्रीनिवासच्या चेहऱ्यावर एक हलके स्मित झळकले. त्याने कनिष्कसाठी एक सापळा रचला होता. सरदेशमुखांच्या बंगल्याभोवती त्याने एक सुरक्षा चक्र निर्माण केले होते. जेणेकरून कनिष्कला त्या बंगल्यात प्रवेश करण्यापासून रोखता यावे.

चेष्टा मस्करी करणाऱ्या गोपाळच्या शरीराच्या कनिष्क चिंधड्या करतो व तिथुन निघुन जातो. गोपाळच्या मृतदेहास भडाग्नी दिल्यावर मरणासन्न अवस्थेतील प्रियाला घेऊन अमोल व दोघे असिस्टंट भाला सोबत घेऊन अमोलच्या घराकडे निघतात. ते घरी पोहोचतात का? कनिष्कचा आत्मा नष्ट होतो का? ते आता वाचूया...

[next] इकडे वाड्यातून बाहेर पडलेला कनिष्क, अमोलने प्रियाला बाहेर आणण्याची वाट पाहत होता. जसे ते बाहेर आले तसे त्याने प्रियाला वश करण्यासाठी सूक्ष्म रूप धारण केले आणि तिच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अमोलची दूरदृष्टी आणि समयसूचकता उपयोगी पडली. त्याने गोपाळच्या गळ्यातून खाली पडलेली रुद्राक्षांची माळ प्रियाच्या गळ्यात घातली होती त्यामुळे एखादा शॉक बसावा तसे कनिष्कला झाले आणि तो चरफडत प्रियापासून दूर झाला.

रमेशने अमोलची गाडी वेगाने बंगल्याच्या दिशेने दामटली. वाटेत कनिष्कने त्यांचा रस्ता अडवण्यासाठी नाना प्रयत्न केले पण त्यावर मात करत रमेशने मोठ्या शिताफीने गाडी बंगल्यापर्यंत आणली. अमोल प्रियाला घेऊन घाईघाईत बंगल्यात शिरला पाठोपाठ रमेश आणि जयेशही शिरले आणि कनिष्क तिथे येऊन धडकला. श्रीनिवासला कनिष्कला संपवण्यासाठी प्रियाची मदत लागणार होती त्यासाठी कनिष्कला काही काळ थोपवून धरणे आवश्यक होते म्हणूनच त्याने ते सुरक्षाचक्र बनवले होते आणि त्या सुरक्षाचक्राने त्याचे काम चोख बजावले होते.

बंगल्यात कुठूनही प्रवेश करता येत नसल्याचे लक्षात येताच कनिष्क प्रचंड चवताळला, आणि तेच श्रीनिवासला हवे होते. संतापलेला कनिष्क अलगद आपल्या जाळयात सापडेल याची त्याला खात्री होती. त्याच्या वडीलांच्या सल्ल्याप्रमाणे त्याने कनिष्क सोबत आलेल्या इतर आत्म्यांना आधी त्या आरशातून त्यांच्या जगात परत जाण्यास भाग पडले आणि मंत्र उच्चारुन तो आरसारूपी दरवाजा बंद केला. प्रियाच्या रूममध्ये श्रीनिवासने कनिष्कच्या स्वागताची जय्यत तयारी करून ठेवली होती. आज काही झाले तरी कनिष्कचा वासनेचा खेळ कायमचा संपवायचेच असे त्याने ठरवले होते. त्यामुळे प्रियाच नव्हे तर कनिष्कच्या वासनेचे बळी जाणारे इतर अनेक दुर्दैवी स्त्रियांचे आत्मे कायमचे मुक्त होणार होते.

[next] डॉक्टर कुलकर्णीनी प्रियाची नाडी तपासली आणि तिला काही औषधे दिली, साधारण तासाभरात प्रिया शुद्धीत आली. तिच्या शरीरात खूप अशक्तपणा होता पण ती सावरली होती. डॉक्टरांनी संमत्ती दिल्यावर श्रीनिवासने प्रियाला आपला प्लॅन समजावून सांगितला व तो पूर्णत्वास नेण्यास एकच संधी मिळणार असल्याने चुकीला जागाच नसल्याचे सांगितले. आधी प्रियाने थोडे आढेवेढे घेतले. पण प्रियाच्या मदतीने हे कनिष्क नावाचे संकट कायमचे दूर होऊ शकते असे समजावल्यावर प्रियाने उसने अवसान गोळा केले व मदत करायचे कबुल केले.

ठरल्याप्रमाणे प्रियाला आपल्या रूममध्ये एकटे सोडून श्रीनिवास व इतर सर्व जण बंगल्यातून बाहेर पडले. त्यांना जाताना पाहून कनिष्कचा आत्मा खुश झाला. आता त्याला प्रियाला आपल्यासोबत घेऊन जाता येणार होते. पण बंगल्यात शिरायचे कसे हा प्रश्न होता, तोही श्रीनिवासनेच सोडवला. बाहेर पडताना त्याने ते सुरक्षा चक्र तोडले होते त्यामुळे कनिष्कचा बंगल्यात शिरायचा मार्ग सुकर झाला. त्याने सूक्ष्म रूपाने बंगल्यात प्रवेश केला. क्षणात तो प्रियाच्या रूममध्ये शिरला. प्रिया पलंगावर पहुडली होती. तो तिच्या जवळ गेला व दृश्य स्वरूपात आला.

त्याला पाहताच प्रियाने एक मोहक हास्य केले आणि आपले हात पसरून त्याला मिठीत घेण्यास सुचवले. कनिष्कला आश्चर्य वाटले की आपल्या पासून दूर पळणारी प्रिया आता स्वतःच आपल्याला कशी काय बोलावते आहे. कनिष्कने प्रियाला आपल्या मिठीत घेतले आणि दोघांनी धुंद प्रणय केला. प्रियाच्या प्रतिसादाने कनिष्क प्रचंड खुश झाला. आता प्रियाच्या आत्म्याला तिच्या शरीरातून मुक्त करायची वेळ जवळ आली असल्याने कनिष्कची बोटे प्रियाच्या गळ्यावर फिरू लागली.

तसे लाडाने त्याचे हात आपल्या गळ्यावरून दूर करत प्रियाने फ्रेश होण्यासाठी शॉवर घ्यायला जात असल्याचे सांगितले आणि बाथरूम मध्ये गेली. कनिष्क तिच्या पाठोपाठ बाथरूम मध्ये गेला. तो योग्य जागी पोहोचताच प्रिया चपळाईने बाजुला झाली आणि तिने शॉवर चालू केला आणि पाण्याच्या जागी लिक्विड नायट्रोजन बरसू लागला. कनिष्क दृश्य स्वरूपात असल्यामुळे लिक्विड नायट्रोजन त्याच्या अंगावर पडताच कनिष्क गोठू लागला.

प्रियाची चलाखी कनिष्कच्या लक्षात आली पण त्याला खूप उशीर झाला होता. काही सेकंदात कनिष्क जागेवरच पूर्णपणे गोठला. त्याने अदृश्य होण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. प्रियाने श्रीनिवासला काम झाल्याचे कळवले तसा ‘परकायाबंध मंत्र’ म्हणत तो बाथरूम मध्ये शिरला व त्याच्या हातातील भाला कनिष्कच्या मस्तकाला भेदत आर पार गेला. त्यासरशी कनिष्कने एक करूण किंकाळी फोडली. कनिष्कने उपभोगलेल्या स्त्रियांचे आत्मे, जे त्याने आपले गुलाम बनवले होते ते सगळे एक एक करून मुक्त झाले.

अमोलच्या पाठोपाठ आलेला कनिष्क, बंगल्याभोवतीचे सुरक्षाचक्र भेदून बंगल्यात प्रवेश करू शकत नाही. श्रीनिवास प्रिया सोबत प्लॅन करून कनिष्कला ट्रॅप करतो व भाल्याने त्याच्या मस्तकात छेद करतो. कनिष्कला पूर्णपणे नष्ट करणे श्रीनिवासला शक्य होते का? प्रिया कायमची मुक्त होते का? ते आता पुढे वाचूया.

[next] सर्व आत्मे मुक्त झाल्याची खात्री पटताच श्रीनिवासने आपल्या हातातील भाल्याला एक जोराचा झटका दिला आणि गोठलेल्या कनिष्कच्या देहाचे शेकडो तुकडे बाथरूमच्या फरशीवर इतस्त: विखुरले. पण अजूनही कार्य पुर्ण झाले नव्हते. अमावस्या सुरु व्हायला फक्त दोन मिनिटे बाकी होती. बाथरूमच्या फरशीवर आधीच अंथरलेल्या प्लॅस्टीकच्या शीटमध्ये कनिष्कच्या शरीराचे झालेले तुकडे त्याने गुंडाळले आणि बाहेर धावला. त्यासरशी त्याची असिस्टंट 'दिव्या कुलकर्णी' त्या आरशाच्या मागे गेली आणि आत्म्याच्या जगाशी संपर्क स्थापित करणारा दरवाजा उघडण्यासाठी तिने मंत्र म्हटला.

कनिष्कच्या देहाची परत जुळण्याची सुतराम शक्यताही उरू नये म्हणुन त्याच्या तुकड्यांनी भरलेली ती शीट श्रीनिवासने त्या आरशातून आत फेकून दिली. पाठोपाठ दिव्याने तो दरवाजा बंद होण्याचा मंत्र म्हटला आणि तो दरवाजा बंद होताच क्षणी अमोलने तो भाला त्या आरशावर नेम धरून फेकला. पण त्या आरशावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ते पाहून श्रीनिवासला आपल्या पूर्वजांनी राजा यशवर्धनाला सांगितलेले वाक्य आठवले आणि तो ओरडला, “अमोल, हा आरसा तुझ्या हातून नष्ट नाही होणार, त्यासाठी एक राजाध्यक्षच पाहिजे.”

एवढे बोलून त्याने जमीनीवर पडलेला तो भाला उचलला आणि संपुर्ण ताकदीनिशी त्या आरशामध्ये घुसवला. त्यासरशी मोठा आवाज करत त्या आरशाची काच तडकली आणि तिचे तुकडे खळाळत जमीनीवर कोसळले. ते पाहताच श्रीनिवासने ते सर्व तुकडे लागलीच गोळा करून एका मोठ्या बॉक्स मध्ये बंद करून त्यावर सुरक्षेसाठी मंतरलेला धागा बांधला आणि जमीनीत खोलवर पुरण्यासाठी जयेशच्या ताब्यात दिला व समाधानाचा निश्वास सोडला.

[next] श्रीनिवास मुळे आपल्या मागचे शुक्लकाष्ट आता पूर्णपणे नाहीसे झाले आहे याची खात्री पटताच प्रियाच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. तिने धावत जाऊन कृतज्ञतेने श्रीनिवासचे पाय धरले. श्रीनिवासने तिला उठवले आणि म्हणाला, “अगं माझ्या कसले पाया पडतेस? तुझ्या मदतीशिवाय मी हे अवघड कार्य कधीच करू शकलो नसतो. कितीतरी स्त्रियांच्या आत्म्यांनी तुला आशीर्वाद दिले असतील. प्रिया मॅडम! आता परत असला आरसा वगैरे आला तर मंत्र वगैरे म्हणु नका बरं, नाहीतर कनिष्कपेक्षा कोणीतरी भयानक आत्मा या जगात यायचा आणि आमची सगळ्यांचीच पळता भुई थोडी व्हायची, काय?” असे श्रीनिवास म्हणताच प्रिया ओशाळली आणि सर्वजण हसण्यात सामील झाले.

अशा तर्हेने आपल्या पूर्वजांनी अर्धवट सोडलेले कार्य श्रीनिवास राजाध्यक्षने आपली अक्कल हुशारी तसेच आध्यात्मिक व टेक्निकल नॉलेजच्या बळावर पुर्ण केले. प्रिया सरदेशमुख व शेकडो वर्षे बंदिवासात असलेल्या राजस्त्रियांच्या आत्म्याची मुक्तता केल्यावर श्रीनिवास राजाध्यक्ष एक नवा अनुभव गाठीशी बांधुन आपल्या सहकाऱ्यांसमवेत तिथून मार्गस्थ झाला. जाता जाता तो प्रियाला नवी उमेद, नवे स्वप्न, नवे उद्दिष्ट आणि जगण्यासाठी नवी प्रेरणा देऊन गेला. हळूहळू प्रिया शारीरिक आणि मानसिक दृष्टीने पूर्ववत झाली. पुढे तीने श्रीनिवासच्या घोस्ट हंटर ग्रुपमध्ये आणि त्याच्या हृदयात देखील आपले स्थान पक्के केले व सौ. प्रिया श्रीनिवास राजाध्यक्ष बनली. अमोलही आपला पिढीजात व्यवसाय, आपले घर, आई, बायको आणि दोन्ही जुळ्या मुलांना उत्तम रीतीने सांभाळू लागला.

जुन्या वस्तु, वास्तु वगैरे खरेदी करण्यापूर्वी त्यांचा पुर्वातिहास जाणणे किती गरजेचे आहे हे वाचकांच्या एव्हाना लक्षात आले असेलच. आपण सर्वाना कथा आवडली असावी अशी आशा करतो आणि एक अल्पविराम घेतो पुढच्या खिळवून ठेवणाऱ्या कथेसाठी...

शुभं भवतु...!

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेररकेदार कुबडे | Kedar Kubade
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा, मराठी भयकथा, मराठी कविता या आणि अशा विविध विभागांत लेखन.

1 टिप्पणी

  1. तुम्ही जी कथा लिहिली आहे वाचताना माला सर्व गोष्टी डोळ्यासमोर दिसत होत्या
    फार छान सर hatts off to you sir
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.