मिरर मिरर अ टेल ऑफ टेरर भाग ३ - मराठी भयकथा

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर भाग ३, मराठी भयकथा - [Mirror Mirror a Tale of Terror Part 3, Marathi Bhaykatha] प्रियाची लैंगिक छळवणुक करणाऱ्या कनिष्कच्या आत्म्याच्या बंदोबस्तासाठी डॉक्टर कुलकर्णी त्यांच्या ओळखीतल्या एका पॅरानॉर्मल एक्स्पर्टला बोलावतात.

कनिष्क सुशीलाबाईंच्या शरीरात प्रवेश करतो आणि...

पुर्वार्ध: आपण पाहिले की प्रियाची लैंगिक छळवणुक करणाऱ्या कनिष्कच्या आत्म्याच्या बंदोबस्तासाठी डॉक्टर कुलकर्णी त्यांच्या ओळखीतल्या एका पॅरानॉर्मल एक्स्पर्टला बोलावतात. कनिष्क सुशीलाबाईंच्या शरीरात प्रवेश करतो आणि श्रीनिवास राजाध्यक्षांवर हल्ला करतो. कनिष्कचा कसा बंदोबस्त करायचा याचा विचार करत असताना श्रीनिवासला त्याच्या आजोबानी सांगितलेली गोष्ट आठवते ज्यात कनिष्कचा उल्लेख झालेला असतो. श्रीनिवासचे वडील देवव्रत राजाध्यक्ष, कनिष्क मुक्त झाल्याचे कळताच चिंताक्रांत होतात आणि पिढी दर पिढी ऐकत आलेली कनिष्कची कथा सांगू लागतात. पुढे चालू...

आरशाचा पुर्व इतिहास:
सरदेशमुख राहत असलेल्या गावावर फार वर्षापुर्वी यशवर्धन राजाचे राज्य होते. त्याची राणी रूपमती ही नावाप्रमाणेच रूपवान होती. तिच्या सौंदर्याचे वर्णन करताना मोठमोठ्या कवींनाही शब्द अपुरे पडायचे. राजा यशवर्धनला आपल्या सुंदर अशा पत्नीचा अभिमान वाटायचा. तो तिच्या सर्व इच्छा पुर्ण करायचा आणि तिला खुश ठेवण्यासाठी काहीही करायची त्याची तयारी असायची. राणीच्या सौंदर्याची माहिती दूर दूर पसरली होती. राणीचे अधुन मधुन दर्शन व्हावे या हेतुने आजुबाजुच्या राज्याच्या राजांनी राजा यशवर्धनशी मैत्रीपुर्ण संबंध ठेवले होते.

राणीवर वक्र दृष्टी असलेल्यांची काही कमी नव्हती पण राजा यशवर्धनपुढे कुणाचेही काहीच चालत नव्हते. राणी रूपमतीही देखील एक पतिव्रता स्त्री होती त्यामुळे राजाच्या अपरोक्ष राणीचे मन जिंकणे ही एक अशक्य गोष्ट होती. राजा कनिष्क हा राणी रूपमती वर वक्र दृष्टी ठेवणाऱ्यांच्या यादीत सर्वात वर होता. त्याने राजा यशवर्धनशी मैत्री करून त्याच्याशी संबंध वाढवले तो सतत राजा यशवर्धनला आणि राणीला किमती भेटवस्तु पाठवत असे. राजा यशवर्धनसोबत शिकारीला जात असे. त्याने राजा यशवर्धनाचा विश्वास संपादन केला.

[next] असेच एकदा राजा कनिष्क उंची वस्त्राभुषणे, हिरेजडित अलंकार वगैरे घेऊन राजा यशवर्धनच्या भेटीला त्याच्या राज्यात आला. राजा यशवर्धन आणि राणी रुपमतीने त्याचे स्वागत केले. राजा कनिष्क राणी रुपमतीचे सौंदर्य, तिचे मधाळ हास्य आणि प्रमाणबद्ध गोरे शरीर पाहुन पुरता कामज्वराने घायाळ झाला होता. काहीही करून तिचा उपभोग घ्यायचाच असा विचार त्याच्या मनात तरळुन गेला. त्याच्या मनातील भाव काही क्षणासाठीच त्याच्या चेहेऱ्यावर उमटले पण चाणाक्ष राणीने ते बरोबर टिपले. राजा कनिष्कचा दिखावेपणा आणि त्याच्या आड असलेला त्याचा दुष्ट मनसुबा तिने ओळखला. त्यावेळी राजदरबारात शोभा नको म्हणुन तिने त्या गोष्टीकडे कानाडोळा केला, पण याचा राजा कनिष्कने चुकीचा अर्थ घेतला. राणी आपल्यावर लट्टू आहे असे समजुन तो मनात मांडे खाऊ लागला.

राजा कनिष्कचा यथोचित आदरसत्कार केल्यावर राजा यशवर्धनने काही दिवस पाहुणचार घेण्याविषयी त्याला गळ घातली. आंधळा मागतो एक डोळा अन देव देतो दोन असेच राजा कनिष्कला झाले. थोडे आढेवेढे घेत त्याने राजा यशवर्धनचे म्हणणे स्विकारले. रात्री यथेच्छ मदिरापान व जेवण झाल्यावर राजा कनिष्क आपल्या शयन कक्षात गेला पण त्याला झोप काही लागेना. वासनेने त्याचे मन व्याकुळ झाले होते. मद्याचा अंमल चढल्यामुळे त्याची सारासार विवेकबुद्धी नष्ट झाली होती. मध्यरात्रीच्या सुमारास तो वासनेने धुंद झालेल्या मस्तवाल वळुसारखा राणी रुपमतीच्या महालाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला.

राजा यशवर्धनाच्या पत्नीवर वाईट नजर ठेऊन असलेला राजा कनिष्क, उंची भेटवस्तू देऊन राजा यशवर्धनाशी मैत्रीचे नाटक करतो. त्याचा पाहुणचार स्वीकारून रात्री राणी रूपमतीच्या महालाकडे जाऊ लागतो. तो आपल्या दुष्ट मानसुब्यात यशस्वी होतो का ते आता पुढे वाचूया...

[next] त्याच्या अंगरक्षकांनी राणीच्या शयनकक्षाबाहेर उभ्या असलेल्या पहारेकऱ्यांना केव्हाच यमसदनी धाडले होते. राजा यशवर्धन मद्याच्या अंमलाखाली गाढ झोपी गेला होता. बाजुलाच त्याची प्रिय पत्नी रुपगर्विता राणी रूपमती झोपली होती. शयनकक्षाचा दरवाजा उघडुन राजा कनिष्क आत शिरला व त्याच्या अंगरक्षकांनी पहारेकऱ्यांची जागा घेतली. शांतपणे झोपलेल्या राणी रुपमतीला पाहुन राजा कनिष्कचे मन चाळवले व तो राणीच्या शरीराशी लगट करू लागला. आपला पती असावा असे समजुन राणी रुपमतीही त्याला प्रतिसाद देऊ लागली. इतक्यात राजा कनिष्काचा हात लागुन पलंगाशेजारी ठेवलेल्या मेजावरचा रत्नजडित पेला खाली पडला त्याने राजा यशवर्धनची झोप चाळवली आणि तो झोपेतच जाबडला, “कोण आहे?”

आपल्या पतीचा आवाज विरुद्ध बाजुने आल्याचे ध्यानात आल्यावर राणी रूपमती एकदम गडबडली आणि तिच्या लक्षात आले की ती ज्याला आपला पती समजत होती तो कोणी दुसराच आहे. “हा कनिष्क तर नव्हे?” या विचाराने तिच्या शरीरातुन भीतीची एक थंड लहर सरसरत गेली. आणि तिने पुर्ण ताकदीने राजा कनिष्कला आपल्यावरून ढकलून दिले. त्या अनपेक्षित धक्क्याने राजा कनिष्क पलंगावरून खाली कोसळला आणि त्याच्या धक्क्यामुळे पलंगा शेजारी ठेवलेले ते छोटे मेज त्याच्यावर ठेवलेल्या फळांच्या चषकासकट आडवे झाले. मोठ्या आवाजाने राजा यशवर्धनाची झोप खाडकन उघडली आणि त्याने बाजुला असलेल्या दिव्याची ज्योत मोठी केली. दिव्याच्या प्रकाशात त्याला कट्यार उपसलेली आपली राणी आणि जमिनीवर पडलेला राजा कनिष्क दिसला.

[next] त्याने पलंगाला असलेली गुप्त कळ दाबताच हत्यारबंद शिपायांची तुकडी तिथे आली. दरवाजावरील अंगरक्षकांना कंठस्नान घालुन त्यांनी राजा कनिष्कला बंदी बनवले. राणी रुपमतीने घडलेला प्रसंग सांगण्यासाठी आपले ओठ विलग केले पण राजा यशवर्धनाने इशाऱ्यानेच तिला थांबवले आणि शिपायांना राजा कनिष्कला नेऊन काळ कोठडीत डांबण्यास सांगितले. राजा कनिष्क रागाने चवताळुन राणी रुपमतीच्या अंगावर धाऊन जायचा प्रयत्न करू लागला पण शिपायांनी त्याला घट्ट धरून ठेवले आणि फरफटत शयनकक्षाबाहेर घेऊन गेले.

ते तिथुन गेल्यावर राणी रूपमती राजा यशवर्धनाच्या पायावर कोसळली आणि रडत म्हणाली, “मला माफ करा महाराज, मला वाटले की तुम्ही आहात म्हणुन अनावधानाने माझ्या हातुन हा गुन्हा घडला.” राजाने तिला खांद्यांना धरून उठवले आणि आपल्या छातीशी धरले व म्हणाला, “रडू नका महाराणी, यात तुमची काहीच चुक नाही. आज सकाळी ज्या नजरेने कनिष्क तुमच्याकडे पाहत होता ते मी पाहिले होते आणि मला खात्री होती की तो काही ना काही प्रमाद नक्की करणार. म्हणुन मी मद्य पिण्याचे नाटक केले होते आणि खबरदारी म्हणुन हत्यारबंद शिपायांची तुकडी तयार ठेवली होती. आणि मला अपेक्षित होते तेच झाले.”

गाढ झोपलेल्या राणी रुपमतीशी कनिष्क लगट करू लागतो. त्याचवेळी पडलेल्या पेल्याच्या आवाजाने जागा झालेला राजा यशवर्धन पहारेकऱ्यांकरवी राजा कनिष्कला अटक करवतो. कनिष्कच्या गुन्ह्याबद्दल राजा यशवर्धन त्याला कोणती कठोर शिक्षा देतो ते आता पुढे वाचूया...

[next] दुसऱ्या दिवशी राजदरबार भरवला गेला, राजा यशवर्धन आणि राणी रूपमती सिंहासनावर बसले होते आणि समोर साखळदंडामध्ये बंदिस्त उभा होता राजा कनिष्क. जमिनीत रोवलेल्या लाकडी खांबाला राजा कनिष्कला मजबुतीने बांधण्यात आले होते. अमात्य चंद्रसेन यांनी राजा कनिष्कने केलेल्या गुन्ह्याची दरबारातील मान्यवर, इतर राजे महाराजे आणि जनतेला माहिती दिली. राजा यशवर्धनाला प्रजा आणि इतर राजांसमोर एक उदाहरण ठेवायचे होते की राणी रुपमतीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची काय अवस्था होऊ शकते.

त्याने राजा कनिष्कला खुप भयंकर शिक्षा ठोठावली. सर्वप्रथम राजा कनिष्कचे दोन्ही हात तोडण्यात आले. जीवघेण्या वेदनांमुळे राजा कनिष्क किंचाळत होता. पण कोणतीही दयामाया न दाखवता नंतर त्याचे दोन्ही पायही तोडण्यात आले. कनिष्कच्या शरीरातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. स्वतःच्याच रक्ताच्या चिखलात बरबटलेला राजा कनिष्क त्या लाकडी खांबावर लटकलेल्या अवस्थेत मरणप्राय यातनांनी तडफडत होता. थोड्या वेदना कमी झाल्यावर कनिष्कने मान वर करून राणी रूपमतीकडे वासना आणि सुडाने भरलेल्या विखारी नजरेने पाहिले आणि कुत्सित हसला.

ते पाहताच राजा यशवर्धनच्या संतापाचा उद्रेक झाला आणि तप्त लाल झालेल्या शिगा राजा कनिष्कच्या डोळ्यात खुपसण्यात आल्या. लोण्याच्या गोळ्यात शिराव्या तशा त्या शिगा कनिष्कचे डोळे फोडत आरपार झाल्या. वेदनातिरेकाने कनिष्क किंचाळत होता. ते पाहुन जमलेल्या सर्व लोकांच्या अंगावर काटा उभा राहिला. कनिष्काची अवस्था पाहणे शक्य न झाल्यामुळे अनेकांनी आपले डोळे झाकुन घेतले तसे राजा यशवर्धन गरजला, “कोणीही आपले डोळे बंद करायचे नाहीत. महाराणीवर वाईट नजर ठेवणाऱ्याची काय अवस्था होते हे सगळ्यांनी बघणे गरजेचे आहे. खबरदार जर कोणी डोळे बंद केलेत तर! त्याचीही हीच अवस्था होईल!”

[next] वेदनांनी तडफडणारा राजा कनिष्क, राजा यशवर्धनाला म्हणाला, “यशवर्धन! तु माझा जीव घेतलास तरी हरकत नाही पण मी तुझ्या राणीचा उपभोग घेण्यासाठी परत येईनंच. रूपमती! मी तुला सोडणार नाही. तुला तुझ्या पतीसमोर भोगल्याशिवाय माझा आत्मा शांत होणार नाही. मी परत येईन.” ते ऐकताच रागाने बेभान झालेल्या राजा यशवर्धनाने सिंहासनावरून उडी मारली आणि कनिष्कच्या समोर उभा राहिला. “नीच, तुझी ही हिंमत?” असे म्हणत तलवारीच्या एका वारात राजा कनिष्कचे मस्तक धडा वेगळे केले.

ते मस्तक गडगडत राजा यशवर्धनाच्या पायापाशी आले. तसे राजा यशवर्धनाने त्याला लाथेने दूर उडवले. कनिष्कच्या धडातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. राजा यशवर्धनाचा राग अजूनही शांत झाला नव्हता. त्याने कनिष्कच्या धडा पूर्ण ताकदीने लाथ मारली. ती लाथ एवढी जबरदस्त होती की कनिष्कचे धड बांधलेला तो लाकडी खांब मोडला आणि कनिष्कच्या धाडसकट सहा फुट लांब जाऊन पडला.

कनिष्कच्या छातीवर पाय देऊन त्याच्या रक्ताने माखलेली आपली तलवार उंचावून राजा यशवर्धन गरजला, “कनिष्क, तु येच परत. तुझ्या आत्म्याची याहून दुरावस्था नाही केली तर राजा यशवर्धन नांव नाही सांगणार.” जमलेल्या सर्व लोकांकडे एक विजयी नजर टाकत राजा यशवर्धन दमदार पावले टाकत आपल्या महालाकडे निघाला. राणी रुपमतीने कनिष्कच्या कलेवराकडे एकवार पाहिले आणि आपल्या पतीच्या पाठोपाठ दरबारातून तिही निघून गेली.

राजा यशवर्धन कनिष्कला अत्यंत वेदनादायी मृत्युदंड देतो पण मारता मारता कनिष्क मृत्यूनंतरही परत येऊन राजा यशवर्धन समोर त्याच्या पत्नीचा उपभोग घेण्याची वल्गना करतो. कनिष्कचा वध केल्यावर पुढे काय काय घडामोडी घडतात? हे आता पुढे वाचूया...

[next] त्या रात्री राजा व राणी दोघांना एकक्षणही झोप लागली नाही. राजा यशवर्धनच्या कानात सतत कनिष्कचे शेवटचे शब्द घुमत होते, मी परत येईनऽऽऽ, मी परत येईनऽऽऽ! डोळे फुटण्याआधी कनिष्कची नजर राणी रुपमतीवरच रोखलेली होती. त्या नजरेतील धग तिला बेचैन करत होती. खरंच तो परत आला तर काय होईल? या विचाराने ती नखशिखांत घाबरली होती.

अख्खी रात्र तळमळत काढल्यावर पहाटे पहाटे दोघांना झोप लागली. इतक्यात कनिष्कचा भाऊ कुलदीप भावाच्या खुनाचा बदल घेण्यासाठी, राज्यावर आक्रमण करण्यासाठी येत असल्याची बातमी गुप्तहेरांकरवी यशवर्धन राजापर्यंत पोहोचली. तो खडबडुन जागा झाला. त्याने युद्धाच्या तयारीचे आदेश सोडले. तीन दिवसांनी कुलदीप, राज्याच्या वेशीपर्यंत येऊन पोहोचला. त्याने दुतामार्फत राजा यशवर्धनाने विश्वासघाताने आपल्या भावाला मारल्याबद्दल शरण यावे आणि त्याच्या राणीला आपल्या स्वाधीन करावे, अन्यथा त्याच्या राज्यावरून गाढवाचा नांगर फिरवला जाईल असा संदेश धाडला.

यावर कनिष्कनेच मैत्रीच्या मुखवट्याखाली आपल्या पत्नीवर वाईट नजर ठेवुन लांच्छनास्पद कृत्य केल्याबद्दल त्याला योग्य तो दंड दिला गेला आहे, त्यात विश्वासघाताचा प्रश्नच येत नाही. आता त्याचा भाऊही त्याच्याच पावलावर पाऊल ठेऊन जर राज्यात प्रवेश करत असेल तर त्याने परत जावे अन्यथा त्यालाही त्याच्या भावाकडे पाठवण्यात येईल असा उलट जवाब पाठवला.

[next] शेवटी युद्धाला तोंड फुटले. दहा दिवस घनघोर युद्ध झाले. त्यात कुलदीप मारला गेला, त्याचे उरले सुरले सर्व सैन्य कत्तल केले गेले. राजा यशवर्धन विजयी होऊन परतला आणि नगरात आनंदी आनंद झाला. हे युद्ध तर राजा यशवर्धन जिंकला, पण ‘आता जे अघटित घडणार होते त्यासाठी तोच काय कोणीच तयार नव्हत.’

युद्धाने थकलेला राजा यशवर्धन आपल्या प्रिय पत्नी समवेत श्रमपरिहारासाठी आपल्या राजउद्यानात विहार करत होता. तलावात नौकानयन करत असताना राणी रूपमती पाण्यात हात घालुन आपल्या पतीवर पाणी उडवीत होती. तिच्या सुंदर चेहऱ्यावरचे खट्याळ भाव पाहुन राजा यशवर्धनही आपला थकवा विसरून तिच्याशी क्रीडा करत होता. संध्याकाळ होत आली होती. पाणी उडवण्यासाठी राणी रूपमती नौकेतुन खाली वाकली आणि अचानक तिला पाण्यात कनिष्कचा चेहरा दिसला. तो पाहताच तिच्या चेहऱ्यावरचे खट्याळ भाव आणि हास्य लोप पावले आणि त्याची जागा भयाने घेतली. आपली शंका खरी तर नाही ना ठरणार? या विचाराने तिला कापरे भरले.

अचानक तिच्यात आलेला बदल राजा यशवर्धनाने टिपला होता. काळजीने त्याने तिला विचारले, “काय झाले महाराणी? तुम्ही अचानक अशा घाबऱ्या घुबऱ्या कशामुळे झालात?” यावर राणीने तिला पाण्यात कनिष्कचा चेहरा दिसल्याचे सांगितले. तेव्हा तिला भास झाला असेल असे सांगून राजाने तिचे मन पुन्हा रमवायचा प्रयत्न केला पण त्यात त्याला अपयश आले. शेवटी ते दोघे आपल्या महालात परत आले, राणी रुपमतीला अंगात कणकण जाणवु लागल्यामुळे राजवैद्याला बोलावण्यात आले. त्याने दिलेल्या वनौषधींचा काढा घेऊन राणी निद्राधीन झाली.

कुलदीपचा त्याच्या सर्व सैन्यानिशी खात्मा केल्यावर राजा यशवर्धन आपल्या पत्नीसह राजउद्यानात श्रमपरिहार करत असताना राणीला कनिष्कचा चेहरा पाण्यात दिसतो आणि भीतीने तिला ताप भरतो. खरंच कनिष्क परत येतो का? तो आपला बदला घेतो का? ते आता पुढे वाचूया...

[next] मध्यरात्रीच्या सुमारास वातावरण अचानक थंड झाले, हुडहुडी भरून आल्यामुळे राणी रुपमतीला जाग आली आणि तिने अंगावर पांघरून ओढुन घेतले. थोड्यावेळाने आपले पांघरून उचलले गेले आहे आणि कोणीतरी खालुन वर सरकत असल्याचे तिला जाणवले. तिला तिच्या शरीरावर थंड स्पर्श जाणवु लागला. हळू हळू तिला आपल्या पुर्ण शरीरावर कोणाचे तरी हात फिरत असल्याचे जाणवु लागले. तिने आपल्या पतीकडे पहिले तर तो गाढ झोपी गेला होता.

मग हा स्पर्श कोणाचा? डोळ्याला तर कोणीच दिसत नाही? तिच्या मनात कनिष्कचा विचार आला आणि भीतीने ती थरथरू लागली. तिच्या कपाळावर घर्मबिंदु जमा होऊ लागले. तिने आपल्या पतीला हाक मारण्यासाठी तोंड उघडले पण आवाजच बाहेर पडला नाही. त्याला हाताने जागे करण्यासाठी तिने आपला हात हलवला तर तोही हलेना. त्यातच तिचे कपडे पायावरून वर सरकु लागले.

पुढे काय होणार याची तिला जाणीव झाली आणि तिने सर्व शक्ती एकवटुन आपल्या पतीला आवाज दिला, “महाराज, मला वाचवा.” तिच्या आवाजाने राजा खडबडुन जागा झाला. तसे तिच्या शरीरावरचा भार ओसरला. राजा यशवर्धन काही बोलणार इतक्यात हवेत उचलला गेला आणि दूर फेकला गेला. बेसावध असलेल्या राजाला काय झाले ते आधी कळलेच नाही. त्याने उठायचा प्रयत्न केला पण जणु त्याला साखळदंडांनी कोणीतरी जखडुन ठेवले होते, तो तसुभरही हलु शकला नाही. त्याने आगतिकपणे आपल्या पत्नीकडे पहिले.

[next] पलंगावर बसलेल्या त्याच्या पत्नीला कोणत्यातरी अदृश्य शक्तीने जबरदस्तीने आडवे पाडले आणि तिचे कपडे आपोआप फाटू लागले. तिच्या अंगावर मारल्यासारखे वळ उठू लागले. कोणीही दिसत नसले तरी राणीच्या शरीरावर पडत असलेला दाब स्पष्ट दिसत होता. एक अदृश्य शक्ती राणीचे शोषण करत होती. ती शक्ती इतर कोणी नसुन कनिष्कचा आत्मा होता हे एव्हाना त्या दोघांच्याही लक्षात आले. मदतीसाठी राजाने मोठ्याने आरोळी ठोकली.

त्याचा आवाज ऐकुन हत्यारबंद विश्वासु सैनिक शयनकक्षाकडे धावले पण दरवाजे, खिडक्या इतक्या मजबुतीने बंद झाले की ते ठोठावण्यापलीकडे काहीच करू शकले नाहीत. शेवटी राणीच्या शरीरावरील सर्व वस्त्रे दूर झाली आणि कनिष्कने आपला बदला घेतला. राजाच्या आणि राणीच्या दोघांच्या डोळ्यातुन अविरत अश्रू वाहत होते. आणि कनिष्कचा आवाज शयनकक्षात घुमला, “यशवर्धन! मी मरताना म्हणालो होतो की मी परत येईन. तुला वचन दिल्याप्रमाणे तुझ्यासमोर मी तुझ्या पत्नीचा उपभोग घेतला आणि तु काहीही करू शकला नाहीस...”

“...आता हे रोज तुझ्या डोळ्यासमोर घडणार. मी रोज माझा बदला घेणार आणि तु एका सामान्य माणसासारखा केवळ असहाय्यपणे पाहण्यापलीकडे काहीही करू शकणार नाहीस.” त्याचे हे वाक्य ऐकायचा अवकाश राणी रुपमतीने उशीखाली असलेली कट्यार काढली आणि सरळ आपल्या छातीत खुपसली आणि ती पतिव्रता राणी खाली कोसळली. कट्यारीने थेट हृदयाचा वेध घेतल्याने राणी क्षणात मृत्युमुखी पडली.

मध्यरात्रीच्या सुमारास कनिष्कचा आत्मा राजा यशवर्धनाला आपल्या सामर्थ्याने जखडून ठेवतो आणि राणी रुपमतीचा उपभोग घेऊन आपला शब्द खरा करतो. राणी रूपमती आत्महत्या करते. कनिष्क तेवढ्यावरच थांबतो की आपले अत्याचार सुरु ठेवतो ते आता पुढे वाचूया...

[next] नाहीऽऽऽ! राजा यशवर्धन दुःखातिरेकाने ओरडला. “कनिष्क, तु माझ्या प्रिय पत्नीला माझ्यापासून हिरावून नेलंस, मी तुला सोडणार नाही.” त्यावर कनिष्क त्याला म्हणाला, “मी जीवंत असताना पण माझ्याशी दोन हात करायची तुझ्यात हिंमत नव्हती. मला साखळदंडांनी बांधुन, मी निशस्त्र असताना तू भ्याडपणे माझ्यावर वार केलास. आता तर मी एक आत्मा आहे. ना तु मला साखळदंडानी बांधु शकतोस, ना माझ्यावर तलवार चालवू शकतोस आणि ना तु माझे डोळे फोडू शकतोस. तु फक्त एक गोष्ट करू शकतोस. षंढासारखा माझ्या नावाने बोटं मोडू शकतोस.” राजा यशवर्धनाला खिजवत कनिष्क म्हणाला.

“तुझी राणी तर गेली, आता माझा बदला मी तुझ्या महालातील स्त्रियांची अब्रु लुटून घेणार. नंतर तुझ्या संपुर्ण राज्यातील स्त्रिया माझ्या वासनेच्या बळी जातील, आणि हे रोज घडणार.” त्यानंतर बराच वेळ कनिष्कचे गडगडाटी हास्य त्या महालात घुमत होते. कनिष्क निघुन जाताच वातावरणातील गारवा आणि राजा यशवर्धनाच्या शरीरावरील दबावही नाहीसा झाला. राजा धावतच आपल्या राणीजवळ गेला पण राणी रुपमती केव्हाच राजा यशवर्धनाला कायमचे एकटे सोडून गेली होती. तिच्या मृतदेहावर राजा ने पांघरूण टाकले आणि तिचा हात हातात घेऊन रडू लागला.

अचानक दरवाजे उघडले गेले आणि राजसैनिक आता शिरले. आपल्या राणीच्या मृतदेहाजवळ राजाला रडताना पाहुन ते हवालदिल झाले. राणीच्या मृत्यूची बातमी हा हा म्हणता सगळीकडे पसरली. सर्व जनता आणि राणीच्या सौंदर्याने घायाळ झालेले राजे महाराजे दुःखाच्या सागरात बुडाले. राणीचा अंत्यसंस्कार झाल्यावर दुसऱ्या दिवशी कनिष्कने आपल्या वासनेची बळी राजाच्या धाकट्या भावाच्या पत्नीला बनवल्यावर राजा यशवर्धन भानावर आला. एकामागुन एक राजस्त्रियांवर कनिष्क अत्याचार करत सुटला होता आणि त्याला कसे आवरावे या विचाराने राजा यशवर्धन चिंतीत झाला होता.

[next] कनिष्कच्या वासनेची सातवी बळी गेल्यावर राजाने दवंडी पिटली की जो कोणी कनिष्कचा बंदोबस्त करेल त्याला तो अर्धे राज्य बक्षीस देईल. अनेक राज्यातुन मांत्रिक, तांत्रिक, भगत वगैरे आले पण कोणालाच यश आले नाही आणि त्यातील बरेचसे स्वतःच जीवानिशी गेले. शेवटी तिसावा बळी गेल्यावर एक तेजस्वी साधु त्या राज्यात आला. तो साधु म्हणजे आपल्या राजाध्यक्ष घराण्याचे पुर्वज, ज्यांचे आपण वंशज आहोत. त्यांनी कनिष्कचा बंदोबस्त करण्याची तयारी दर्शविली व अर्धे राज्य वगैरे नको पण या संकटातून सर्वांची सुटका केल्यास कायमस्वरूपी राजाश्रय मिळावा अशी विनंती केली.

राजा यशवर्धनाने ती विनंती आनंदाने मान्य केली. त्यांनी आपल्या कार्यासाठी एक मोठा सहा फुटी शिसवी आरसा बनवून घेण्यास राजाला सांगितले. कारागीर कामाला लागले, आणि त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन महिन्याभरातच एक पुर्णाकृती सुंदर आरसा बनवला. महालातील सर्व राजस्त्रियांना त्या साधुने एकाच शयन कक्षात झोपण्यास सांगितले व त्या शयन कक्षात त्याने तो आरसा बसवण्याची व्यवस्था केली. रात्री जेव्हा कनिष्क अदृश्य रूपात तिथे आला, त्याने त्या राजस्त्रियांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण एकाही स्त्रीच्या तो जवळ जाऊ शकला नाही.

कुंकवाने घातलेल्या मोठ्या मंडळात गळ्यात रुद्राक्षांची माळ धारण केलेल्या त्या सर्व राजस्त्रिया सुरक्षित होत्या. ते पाहुन कनिष्कचा संताप अनावर झाला आणि तो आपल्या दृश्य रूपात आला. त्याबरोबर त्या आरशावरील शुभ चिंन्हांनी युक्त पडदा दूर झाला. पाठोपाठ त्या आरशावर लिहिलेल्या पहिल्या मंत्राच्या उच्चारणाचा धीर गंभीर स्वर त्या शयनकक्षात घुमला आणि आरशावर लिहिलेल्या त्या मंत्राची अक्षरे उजळली. त्या साधुकडून काही गूढ मंत्राचे आवर्तन होऊ लागले तसे कनिष्क त्या आरशाकडे खेचला जाऊ लागला. कनिष्क सुटण्याचा खुप प्रयत्न करू लागला पण तो निष्फळ ठरला.

कनिष्क त्या आरशाजवळ पोहोचताच, काचेचा घनपणा नाहीसा झाला आणि ती प्रवाही बनली व कनिष्क त्या काचेमध्ये ओढला गेला. कनिष्क काचेतून आत जाताच ती काच पूर्ववत झाली. लगेचच त्या साधुने आरशावर लिहिलेल्या दुसऱ्या मंत्राचे उच्चारण करताच आरशावर लिहिलेल्या दुसऱ्या मंत्राची अक्षरे उजळली आणि कनिष्क त्या काचेत कैद झाला. तो कोणाच्याही दृष्टिपथास पडू नये यासाठी त्या मंतरलेल्या पडद्याने तो आरसा पुन्हा व्यवस्थित झाकला गेला. कनिष्क कैद जरी असला तरी पडदा दूर होताच त्या आरशात पाहणाऱ्या व्यक्तीला आपल्या शक्तीच्या जोरावर संमोहित करून आपली सुटका करून घेण्यासाठी उपाययोजना करू शकु नये यासाठी ते आवश्यक होते...

कनिष्कच्या आत्म्याचा बंदोबस्त करणाऱ्याला अर्धे राज्य बक्षीस देण्याची दवंडी पिटवली जाते. श्रीनिवास राजाध्यक्षचे पूर्वज आपल्या मंत्रसामर्थ्याने आणि अक्कल हुशारीने त्याला एका आरशामध्ये कैद करतात. कनिष्कल मुक्त करू शकणारा मंत्र ते आरशाच्या मागे का लिहितात ते आता वाचूया...

[next] त्या तेजस्वी साधुने कनिष्क आरशात कैद झाल्यावर राजा यशवर्धनाची भेट घेतली. आरशाच्या पाठीमागे संस्कृत मध्ये दोन मंत्र लिहिले असुन एका मंत्राच्या उच्चारणामुळे कनिष्क पुन्हा बाहेर येऊ शकतो; आणि दुसऱ्या मंत्राच्या उच्चारणाने त्याला त्या काचेत कैद करता येऊ शकते हे कळताच राजाच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव उमटले. चिंताक्रांत आवाजात तो म्हणाला, “कनिष्कला कैद करण्याऐवजी नष्ट केले पाहिजे होते. आणि जर कैद केले तर त्याला मुक्त करू शकणाररा मंत्र आरशामागे कशासाठी लिहिला आहे? कुणी कनिष्कला मुक्त केले तर तो काय संकट आणेल याची आपणास जाणीव नाही काय?” या राजाच्या प्रश्नावर त्या साधुने सांगितले, “आपली काळजी अगदी योग्य आहे महाराज. पण मुळात आत्म्यास नष्ट करता येऊ शकत नाही.”

“कनिष्कच्या आत्म्याने ज्या स्त्रियांचे शोषण केले व त्यांना मृत्यू आला, त्यांच्या आत्म्यांना त्याने आपले गुलाम बनवले आहेत. त्यामुळे तो खुप सामर्थ्यशाली झाला आहे. तुर्तास तरी माझ्याजवळ राजा कनिष्कला नष्ट करण्याचा उपाय नाही. त्यामुळे माझ्या हयातीत मला उपाय सापडला तर मी त्याला नष्ट करेनच. माझ्या पश्चात जर का अन्य कोणाला यावर उपाय सापडला तर त्याला आधी कनिष्कला आरशाच्या कैदेतुन मुक्त करावे लागेल, आणी नंतरच तो त्याला नष्ट करू शकेल. जोपर्यंत कनिष्क या आरशात कैद आहे तोपर्यंत काहीच भीती नाही. माझ्या आणि माझ्या वंशजांशिवाय इतर कोणालाही या आरशाला किंवा त्यावरील पडद्याला नष्ट करता येणार नाही परंतु खबरदारी म्हणुन या आरशाला सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.”

“दोन्ही मंत्र संस्कृतमध्ये आहेत आणि फक्त संस्कृत वाचता येणारी एखादी कुमारीच त्याचे उच्चारण करू शकेल असा उपाय केला आहे. राज्यातील स्त्रिया संस्कृत शिक्षित नाहीत आणि कोणतीही स्त्री त्याला मुक्त करण्याचा विचार पण करणार नाही. तशी सुचना देखील आरशाच्या मागे बनवलेल्या एका कप्यामध्ये ठेवलेल्या भुर्जपत्रावर लिहिली आहे. संस्कृत भाषेचे ज्ञान असलेला आणि सात्विक प्रवृत्तीचा कोणताही चारित्र्यवान पुरुष किंवा कुमारी स्त्री त्याला केवळ मंत्राच्या उच्चरणाने पुन्हा या आरश्यात कैद करू शकेल. तुर्तास त्याला नष्ट करणे शक्य नसल्यामुळे केवळ कैद केले आहे. त्यावरही उपाय सापडेलच. चिंता नसावी.”

[next] यावर थोडा विचार करून राजा यशवर्धन म्हणाला, “ठीक आहे. तुम्ही उपाय शोधा पण तोपर्यंत या आरशाच्या सुरक्षेची जवाबदारी मी तुमच्यावर सोपवतो.” त्या साधुने आनंदाने ती जवाबदारी स्वीकारली. अशा तऱ्हेने वासनांध कनिष्कचा आत्मा त्या आरशामध्ये कैद झाला. त्या साधुला कनिष्कला नष्ट करण्याचा उपाय सापडण्याआधीच अकाली मृत्यू आल्यामुळे पुढे आपल्या पुर्वजांकडुन पिढी दर पिढी त्या आरशाचे संरक्षण केले गेले. केवळ संस्कृत जाणणारी एक कुमारीच कनिष्कला त्या आरश्याच्या कैदेतुन मुक्त करू शकत असल्यामुळे ते निर्धास्त राहिले. पुढे राजा यशवर्धनाच्या पिढीतील एका राजाने तो आरसा त्याचा राणीच्या हट्टापायी आपल्याकडुन स्वतःच्या ताब्यात घेतला, आणि आपल्या घराण्याकडुन त्या आरश्याचे संरक्षण करण्याची जवाबदारी काढुन घेण्यात आली.

“नुकतीच राजा यशवर्धनाची शेवटची पिढी आगीत भस्मसात झाल्याचे कळले. पुढे त्या आरश्याचे काय झाले ते माहीत नाही. आता तु सांगतो आहेस की कनिष्क मुक्त झाला आहे. हे योग्य नाही झाले. जे काम आपल्या पुर्वजांनी अपुर्ण सोडले होते ते आता आपण पुर्ण केले पाहिजे. त्या कनिष्कला यावेळी केवळ बंदिस्त नाही तर नष्ट केले पाहिजे.” देवव्रत राजाध्यक्ष प्रचंड चिंतीत झाले होते. त्या आरशाचे आणि त्यावरील श्लोकांचे काही फोटो आहेत, तुम्हाला यात काही आढळते का ते पहा. असे म्हणत श्रीनिवासने आपल्या मोबाईल मधील ते फोटो आपल्या वडीलांना दाखवले.

कनिष्कचा आत्मा खुप शक्तिशाली असल्यामुळे त्याला केवळ कैद केले आहे आणि भविष्यात त्याला नष्ट करण्याचा उपाय सापडल्यास त्याला प्रथम आरशातून मुक्त करावे लागणार असल्यामुळे ते मंत्र आरशामागे लिहिल्याचे साधू सांगतो. श्रीनिवासने दाखवलेल्या फोटोत देवव्रत राजाध्यक्षांना काय आढळते ते पुढे वाचूया...

[next] ते फोटो पाहताच त्याचे वडील खुप भावुक झाले. त्या आरशाचे रक्षण करणारी राजाध्यक्षांची शेवटची पिढी देवाव्रतांच्या खापर पणजोबांची होती. त्यानंतर त्या आरशाच्या रक्षणाची जवाबदारी त्यांच्याकडून काढून घेण्यात आली होती. त्यांना तर तो आरसा पाहण्याचाही योग आला नव्हता. नकळत त्यांचे डोळे भरले.

त्यांच्या आसवांची टिपे त्यांच्या गालावरून ओघळत त्या मोबाईल मधील फोटोवर पडली, त्यांनी ती अलगद पुसली आणि तो फोटो झुम झाला. ते मोबाईल परत देणार इतक्यात त्यांना त्या फोटोत काहीतरी आढळले आणि देवव्रत राजाध्यक्षांच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंता पसरली. "काय झाले बाबा? तुम्हाला काही दिसले का त्या फोटोत?" श्रीनिवासने विचारले.

तेव्हा त्याचे वडील म्हणाले, “या फोटोला नीट बघ, त्या आरशाच्या खालच्या बाजूला हे काही काळे पट्टे उठलेले दिसत आहेत, ते डाग नाही तर ते वाईट आत्मे आहेत ज्यांना त्या आरशात शिरताना तू क्लिक केले आहेस. कानिष्क एकटा परत नाही आलाय, तर तो आपल्या सोबत इतर काही आत्मे पण घेऊन आलाय. तुला कानिष्क सोबत त्यांचाही बंदोबस्त करावा लागणार आहे.”

[next] “तो आरसा नष्ट न केल्यास त्यातुन अजुन काय काय बाहेर येईल याची तू कल्पनाही करू शकणार नाहीस. श्री, तुला खुप सावध राहणे गरजेचे आहे. जा यशस्वी हो. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत.” “थँक यु बाबा, तुम्ही खुप मोलाची माहिती दिलीत. आता मी बघतो पुढे काय करायचे ते!” असे म्हणुन श्रीनिवास राजाध्यक्ष स्वतःशीच काही विचार करत सरदेशमुखांच्या बंगल्याकडे निघाला.

देवव्रत राजाध्यक्षांच्या लक्षात येते की केवळ कनिश्कच नव्हे तर इतर काही आत्मे त्या आरशाच्या माध्यमातून या जगात आलेले आहेत. ते श्रीनिवासला येऊ घातलेल्या संकटापासून सावध करतात. पुढील भागात वाचा, तो आरसा सरदेशमुख परिवाराकडे येण्यामागचे रहस्य आणि घडलेल्या सर्व घटनांचा श्रीनिवासने केलेला उलगडा.

क्रमश:

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेररकेदार कुबडे | Kedar Kubade
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा, मराठी भयकथा, मराठी कविता या आणि अशा विविध विभागांत लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.