जातबळी भाग ३ - मराठी भयकथा

जातबळी भाग ३, मराठी कथा - [Jaatbali Part 3, Marathi Katha] आकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी.
जातबळी भाग ३ - मराठी कथा | Jaatbali Part 3 - Marathi Katha
पूर्वार्ध: स्वतःच्याच विश्वात रमणारी नभा हळूहळू आकाशकडे आकृष्ट होऊ लागते. आकाश नभा एकमेकांवर मनोमन प्रेम करू लागतात. ऑफिसच्या पिकनिकला आकाश नभाला प्रपोज करतो. ती त्याला नकार देते. रसिका आकाशला नभाची परिस्थिती समजावून सांगते व नभाला विसरून जाण्याचा आकाशला सल्ला देते. पण आकाश हार मनात नाही. रसिका आकाशला नभाला घरी सोडण्याची विनंती करते. नभाचे वडील देवळात कीर्तनाला जातात. आकाश नभाच्या घरी रेकी घेतो पण घरातील शक्ती त्याला विरोध करते. नभाच्या वडीलांना देवळातून आणण्यासाठी नभा, तिचे दोन भाऊ आणि आकाश जातात. नभाचे भाऊ कंटाळून घरी निघून येतात. नभाचे वडील नभा आणि आकाशला घरी जाण्यास सांगतात. वाटेत मोरीवर एक लावसट आकाशला जखडते. नभा आपल्या गळ्यातील लॉकेट आकाशच्या गळ्यात घालून त्याला लावसटी पासून वाचवून घरी आणते. तिथे तिची आई तिला फाटकारते. नभाने झालेला प्रसंग सांगितल्यावर घरमालक तिचे कौतुक करतात. आकाश आपल्या घरी निघतो. पुढे चालू...

दरवाज्यातून आत शिरणारा आकाश, जोशी काकांच्या ओरडण्याने दारातच थबकला. “खबरदार आत पाऊल टाकशील तर! तुला सगळे ज्ञान प्राप्त झाले आहे या भ्रमात आहेस असे वाटते! जर तुला माझ्या मार्गदर्शनाची गरजच नसेल तर माझ्याकडे नाही आलास तरी चालेल. तुम्ही आजकालची पोरं अर्ध्या हळकुंडाने पिवळे व्हायला बघता. चल निघ इथून.” जोशी काका फार चिडले होते. आकाश त्यांच्या मित्राचा मुलगा होता. तो त्यांच्याकडे ज्योतिष, अंकशास्त्र, हस्तशास्त्र, अध्यात्म, ध्यान धारणा वगैरे शिकायला यायचा. त्याने आधीच रेकी शिकली होती आणि अशा प्रकारच्या विद्यांमध्ये त्याला खूप इंटरेस्ट होता. [next] आकाशला समजेना की नेहेमी खूप प्रेमाने आणि आपुलकीने बोलणारे जोशी काका आज एवढे उचकले का? तो मान खाली घालून त्यांच्यासमोर उभा राहिला. जोशी काकांचा राग आता निवळला होता तरीही ते चढ्या आवाजात त्याच्यावर खेकसले, "तू काल रात्री जो शहाणपणा केलास, तो केवढ्याला पडला असता याची तुला काही कल्पना तरी आहे का?" आपला उपद्व्याप काकांना कसा कळला याचे आकाशला खूप आश्चर्य वाटले.

“मला कसे कळले हाच प्रश्न डोक्यात घोळतोय ना तुझ्या मनात? अरे तू माझे शिष्यत्व पत्करलेस त्याचवेळी तू माझी जवाबदारी बनलास. आपल्या मध्ये एक अदृश्य बंध आहे. शिष्य संकटात सापडल्यावर जर गुरूला त्याची जाणीव झाली नाही तर तो गुरु कसला? तू स्वतःला सुरक्षा न घेता जे रेकीचे सिम्बॉल्स बनवलेस त्यामुळे तुझी सप्त चक्रे जागृत झाली होती. त्यामुळे तुला त्या घरात एका अमानवीय शक्तीचे अस्तित्व जाणवले. सुदैवाने तिने तुला काही केले नाही. पण नंतर त्या मोरीवर असलेल्या लावसटीसाठी तू एक सोपे टार्गेट होतास.”

त्या मुलीला जर ते हनुमानाचे सिद्ध लॉकेट तुझ्या गळ्यात घालण्याची उपरती झाली नसती तर काही तरी भयंकर घडले असते. कदाचित त्या लॉकेटमुळे तू वाचला असतास पण ती मुलगी मात्र नाहक बळी गेली असती. यापुढे असला आगाऊपणा करणार नाहीस असे मला वचन देत असशील तरच माझ्याकडे शिकायला ये, नाहीतर नाही आलास तरी चालेल. तुझ्या बापाला काय उत्तर द्यायचे ते मी देईन. तसाही त्याचा या सगळ्यावर विश्वास नाही." मग आकाशने जोशी काकांना वचन दिले. पण त्याची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. [next] त्याने विचारले, “पण काका तुम्हाला एवढे डिटेल मध्ये कसे माहीत? ऐकताना असे वाटले की त्या वेळी तुम्ही तिथे उपस्थित होतात की काय?” “ज्या क्षणाला त्या घरातील शक्तीने आपले अस्तित्व दाखवले त्याच क्षणाला मला जाणीव झाली की तू संकटात आहेस आणि मी सुक्ष्मरूपाने तिथे उपस्थित झालो.” काका म्हणाले. “पण मला तुमचे अस्तित्व जाणवले नाही. मला पण शिकवा ना सुक्ष्मरूपाने एका जागेवरून दुसऱ्या जागी कसे जाता येते ते!” आकाशने जोशी काकांना विनंती केली. “कशाला? कोणाच्या नकळत त्या मुलीच्या जवळ जायला?”

काकांनी आकाशच्या मनातील विचार बरोबर पकडला होता हे लक्षात येताच आकाश खजील झाला. “नाही, तसे काही नाही.” आकाश चाचरत म्हणाला. “हे बघ आकाश तुला त्या मुलीची काळजी आहे हे मी जाणतो पण ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाही. उद्या मोठ्या संकटात पडशील. तिच्यापासून लांब हो नाहीतर जीवावर पण बेतू शकते. ज्या मार्गावर तू चालत आहेस तो वन वे आहे. तेव्हा वेळीच सावध हो नाहीतर परत फिरणे केवळ अशक्य होऊन जाईल. बाळा मी काय सांगतोय ते समजण्याचा प्रयत्न कर. तुला मी केवळ माझा शिष्य नव्हे तर मुलगा मानतो म्हणुन सांगतोय.”

जोशी काकांचा आवाज खूप भावुक झाला होता. आकाशला त्यांच्या आवाजातील काळजी जाणवली. पण प्रेमात पडल्यावर अक्कल शेण खायला जाते हेच खरे. “सांगा ना काका! सुक्ष्म रूपात एका जागेवरून दुसऱ्या जागी कसे जाता येते? प्लिज सांगा ना, प्लिज!” आकाश खुपच आर्जव करू लागल्यावर काकांनी त्याला जुजबी माहिती दिली. “अरे ते इतके सहजसाध्य नाही. त्यासाठी खुप साधना करणे आवश्यक आहे. प्रचंड एकाग्रता आणि स्वतःवरती पुर्ण कंट्रोल असणे गरजेचे आहे. आत्मा शरीरातून बाहेर काढून पुन्हा शरीरात घालणे हे खुप कठीण असते.” [next] “यात सर्वात मोठा धोका म्हणजे जेव्हा आत्मा शरीराबाहेर विहार करत असतो त्यावेळी शरीर सर्वात असुरक्षित असते. जर का कोणी शरीर नष्ट केले तर आत्म्याची अवस्था बिकट होऊन जाते. तो ना आपल्या शरीरात घुसू शकतो ना मुक्त होऊ शकतो. मग अशा वेळी त्याला नुकताच मृत्यू प्राप्त झालेल्या एखाद्या शरीरात ७२ तासांकरता आश्रय घेता येतो. त्या ७२ तासात त्याला त्या शरीराकरवी आपल्या काही इच्छा पुर्ण करवून घेता येतात पण मुदत संपताच स्वेच्छेने त्या शरीराचा त्याग करावा लागतो. तसे न केल्यास ७२ तासानंतर ते शरीर सडू लागते व आत्मा त्या शरीरात अनंत काळासाठी अडकून पडतो.”

त्या दिवसाची शिकवणी झाल्यावर आकाश तडक आपल्या घरी आला. हातपाय धुऊन कपडे बदलून झाल्यावर बेडरूम मध्ये जाऊन त्याने दरवाजा लावला व आपल्या नेहेमीच्या ध्यान करायच्या जागेवर जाऊन बसला. जोशी काकांनी सांगितलेली माहिती आकाशला ती विद्या शिकण्यासाठी खुप प्रेरित करून गेली होती. आता नभाचे त्या अमानवीय शक्ती पासून कसेही करून रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे असे त्याच्या मनाने घेतले. त्याने सर्वप्रथम स्वतःला सुरक्षित करून घेतले, नंतर नभाची छोटी आकृती आपल्या तळहातावर बसली आहे अशी कल्पना करून तो त्या आकृतीला डिस्टंस रेकी देऊ लागला.

त्याने नाकाच्या अग्राने हवेत रेकीचे सिम्बॉल्स बनवायला सुरवात केली. आय थँक मायसेल्फ फॉर बिईंग हिअर. आय थँक रेकी फॉर बिईंग हिअर. आय थँक आकाश फॉर बिईंग हिअर. आय थँक नभा फॉर बिईंग हिअर. या वाक्यांचे तो सतत उच्चरण करू लागला. आज्ञाचक्रातून शरीरात शिरलेला रेकीचा प्रवाह त्याच्या शरीरातील सप्तचक्रातून वहात हातांच्या माध्यमातून नभाच्या आकृतीपर्यंत पोहोचू लागला. तिकडे नभाला तिच्या सभोवती एका पॉझिटिव्ह एनर्जीचे अस्तित्व जाणवू लागले होते. जोशी काकांनी सावध करून सुद्धा आकाशचे नभासाठी प्रेम कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालले होते. तो तिच्या प्रेमात एवढा बुडाला होता की तहान भुक विसरला होता. [next] एके दिवशी खुप जोराचा पाऊस पडत होता सोबत सोसाट्याचा वारा पण सुटला होता. स्टूडेंट व्हिजिट लवकर संपवून आकाश आपल्या घरी गेला. पण बाहेरचे वातावरण पाहून नभाच्या काळजीने त्याचा जीव व्याकुळ झाला. ती घरी कशी जाईल? याच विवंचनेत तो होता. शेवटी संध्याकाळी ५.३० वाजता तो घरातून बाहेर निघाला. त्याला तशा भयंकर वातावरणात बाहेर निघताना पाहून त्याच्या आईने अडवले.

आकाश ऐकत नाही हे पाहताच त्याची आई त्याला रागावू लागली पण आकाशला डोळ्यासमोर फक्त नभा दिसत होती. आईच्या बोलण्याला झुगारून आकाश घराबाहेर पडला. विजांचा कानठळ्या बसवणारा आवाज, ढगांचा गडगडाट, मुसळधार पाऊस आणि थैमान घालणारा वारा कशाचीच पर्वा न करता आकाश ऑफिसला पोहोचला. सर्वच निघुन गेले होते. नभा एकटीच ऑफिसमध्ये थांबली होती. त्याला तशा परिस्थितीत आलेले पाहून नभा आधी त्याच्यावर रागावली पण तो केवळ तिच्या काळजीपोटी आला असल्याचे लक्षात येताच तिचे मन भरून आले.

तिने त्याला घट्ट मिठी मारली. चिंब भिजलेल्या आकाशला नभाच्या मिठीतील उब चेतवू लागली. त्याने हातांच्या ओंजळीत नभाचा चेहरा धरला आणि आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले. नभाची कानशिले गरम झाली. तिच्या आयुष्यातील हे पहिले वहिले चुंबन होते. बावरली असली तरी तिला देखील ते हवे हवेसे वाटू लागले. आकाश तिच्यापासून दूर होत आहे हे पाहताच तिने स्वतःहून त्याला आपल्या जवळ ओढले आणि आता तिच्या ओठांनी त्यांच्या ओठांचा ताबा घेतला. दोघे वेड्यासारखे एकमेकांच्या ओठांचे चुंबन घेऊ लागले. एकमेकांना घट्ट बिलगलेले ते दोघे एका वेगळ्याच विश्वात विहरत होते. [next] एवढ्यात ऑफिसमधील टेलिफोनची रिंग वाजली आणि ते भानावर आले. आकाशच्या मिठीतुन नाईलाजाने दूर होत नभाने फोन घेतला. तो फोन सरांचा होता. ते परस्पर घरी गेले होते. त्यांनी नभाला ऑफिस बंद करून घरी जाण्यास सांगितले. आपल्या मर्यादेची जाणीव असल्यामुळे दोघेही तिथेच थांबले. पावसाचा जोर थोडा कमी झाल्यावर आकाश आणि नभा बाहेर पडले. वाटेत पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळे ते एका मोठ्या झाडाखाली थांबले. नभा आकाशला खेटूनच उभी होती. आकाशचा उष्ण श्वास तिला तिच्या गालावर जाणवू लागला तसे ती त्याच्या पासून दूर जाऊ लागली.

आकाशने पटकन तिचा हात पकडला व स्वतःकडे खेचले. नभा त्याच्या छातीवर आदळली आणि त्याच्या हातांनी तिला कवेत घेतले. नभाने कोणताच विरोध दर्शवला नाही. तिही त्याच्या मिठीत विसावली आणि तिने आपले डोके मोठ्या विश्वासाने आकाशच्या रुंद छातीवर टेकवले. त्याच्या हृदयाची धड धड तिला स्पष्ट ऐकू येत होती. शेवटी तिला त्याच्या प्रेमाचा स्वीकार करावाच लागला. दोघे प्रेमाच्या ओल्या पावसात चिंब भिजत होते.

त्या क्षणी नभाला ना तिच्या मामांचा विचार होता, ना आईचा आणि ना समाजाचा. तिने आकाशचा हात आपल्या हातात घट्ट धरला आणि त्याला म्हणाली, “आकाश मी तुझ्या शिवाय नाही जगू शकत. मी माझ्या घरच्यांना आपल्या लग्नासाठी तयार करेन, फक्त तू आता लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभा राहा. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही.” नभाच्या या वाक्यांनी आकाशमध्ये नवा उत्साह संचारला. नभाला घट्ट मिठीत घेऊन त्याने तिचे दीर्घ चुंबन घेतले. [next] मग दोघेही गाडीवर बसून घराकडे निघाले. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता. नभा आकाशला पाठीमागून घट्ट मिठी मारून बसली होती. आकाशला तर आकाशच ठेंगणे झाले होते. असे वाटत होते की हा रस्ता कधी संपूच नये. पण घर जवळ येताच ती सावरून बसली. नभाला आकाश सोबत भिजून आलेले पाहून तिच्या आईचा संय्यम सुटला. ती तिला ओरडू लागली. त्या बरोबर नभाचे एकमेव आशास्थान असलेले तिचे बाबा मध्ये पडले. “अगं पोरं भिजून आली आहेत त्यांना टॉवेल वगैरे दे. आल्याचा गरम चहा व खायला काहीतरी द्यायचे सोडून ओरडतेस कसली?”

“एवढ्या पावसातून आकाशने तिला सुखरूप घरी आणले आहे. त्याचे आभार मानायचे सोडून तू हे काय आरंभले आहेस?” ते ऐकल्यावर नभाची आई थोडी नरमली. तिने दोघांना घरात येण्यास सांगितले पण “नको मी निघतो” म्हणत आकाश आपल्या घरी जाण्यासाठी वळला. त्याला अडवत नभाचे बाबा म्हणाले, “तिचे मनावर नको घेऊस, गरम चहा आणि भजी करायला सांगतो ती खाऊन पाऊस कमी झाला की मग जा.” पण आकाश थांबला नाही, “पुन्हा केव्हा तरी! घरी आई वाट बघत असेल. येतो मी.” असे म्हणुन तो निघाला.

आकाश आपल्याच धुंदीत गाडी चालवत घरी चालला होता एवढ्यात त्याला रस्त्यात गाडी आडवी लावून उभा असलेला राकेश आणि काही मुले दिसली. आकाशने गाडीचा स्पीड कमी केला आणि त्यांच्या पासून काही अंतरावर थांबला. “अरे राकेश! बऱ्याच दिवसांनी भेटतोयस. कसा आहेस? आणि असा रस्ता अडवून का उभा आहेस?” आकाशने विचारले. “माझ्या गर्लफ्रेंडला माझ्यापासून दूर करून वर मलाच विचारतोयस की कसा आहेस?” राकेश कडाडला. “म्हणजे? मी समजलो नाही तू काय म्हणतोयस ते.” आकाशला अंदाज आला होता की आता राडा होणार. [next] “मी सांगतो ना तुला समजावून भाडxx” असे म्हणुन राकेश आकाशवर धावून गेला. तो पर्यंत आकाश बाईकवरून उतरला होता. राकेशने आकाशला पंच मारण्यासाठी हात उचलला पण आकाशने खाली वाकत तो वेळीच चुकवला. वर उठताना त्याने दिलेल्या जोरदार ठोशाने राकेशच्या नाकाचा आकार बदलवून टाकला. वर उसळून राकेश मागच्या मागे रस्त्यावर आदळला आणि त्याचे डोके जमिनीवर आपटले. नाकातून आणि डोक्यातून वाहणाऱ्या रक्ताने त्याचा पांढरा शर्ट लाल होऊन गेला. आकाशचा पंच एवढा जबरदस्त होता की राकेशच्या अंगातली सगळी मस्ती जिरली. तो पलटवार करण्याच्या परिस्थितीत उरला नव्हता.

राकेशला जमिनीवर लाळागोळा झालेले पाहून त्याच्या सोबत आलेल्या चारही पोरांची पुंगीच टाईट झाली होती. तरीही त्यातल्या एकाने डेअरिंग करून आकाशवर रामपुरीने हल्ला चढवला. पुर्णपणे सावध असलेल्या आकाशने त्याच्या हातावर एक साईड किक मारली. त्याच्या हातातील चाकू दूर जाऊन पडला. त्याचवेळी वेगाने पुढे आलेल्या आकाशचा गुडघा त्या मुलाच्या हनुवटीवर बसला आणि पुढच्याच क्षणाला तो राकेशच्या पंगतीत जाऊन पडला. दोघांची ती अवस्था पाहून बाकीच्या तिघांचे उरले सुरले अवसान पण गळाले.

ते आकाशची माफी मागू लागले पण आता आकाश चांगलाच चिडला होता. त्याने तिघांना एक एक करून चांगलेच लोळवले आणि परत त्याच्या वाटेल गेल्यास तंगड्या तोडून गळ्यात घालेन असा सज्जड दम पण भरला. त्या फिल्मी स्टाईल मारामारीने बघ्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. आकाश गाडीला किक मारून निघून गेला आणि एकमेकाला सावरत, रडत-कुंथत उठणाऱ्या त्या चौघांचे लोकांनी पार हसे केले. राकेशला सोबत घेऊन कसेबसे ते तिथून निघाले. [next] आकाशला चोरासारखा घरात शिरताना त्याच्या आईने पकडले. “काय मग प्रेमवीर! आलात का आपल्या प्रियेला घरी पोहोचवून?” आईच्या प्रश्नाने आकाश चांगलाच चपापला. “काय? काही तरीच काय बोलतेस आई? कोण प्रेयसी? मी ऑफिसला गेलो होतो, डॉक्युमेंट्स द्यायचे होते म्हणुन.” आकाशने सावरायचा लंगडा प्रयत्न केला. पण हार मानेल ती आई कसली? “हो का? एवढे कसले अर्जंट डॉक्युमेंट्स होते की एवढ्या मुसळधार पावसात विजा कडकडताना पण जावे लागले? खरे सांग कोण आहे ती मुलगी? नांव काय तिचे?”

“अगं आई कोणीही नाही आहे. तुझे आपले काहीतरीच असते. खरंच डॉक्युमेंट्स द्यायला गेलो होतो.” आकाश नजर चोरत म्हणाला. “आता बऱ्या बोलाने सांगतोस की तुझ्या ऑफिस मध्ये येऊ विचारायला तुझ्या बॉसला? कसले एवढे डॉक्युमेंट्स आणायला सांगितले होते तुला म्हणुन?” आईने गुगली टाकली. “आणि तुझा हा अवतार असा का झालाय? कुणाशी मारामारी करून आल्यासारखा?” या प्रश्नाने तर आकाशचे तोंडच उघडे पडले.

आता आईपासून काही लपवण्यात काहीच अर्थ नाही हे त्याच्या लक्षात आले. त्याने सगळे सांगायचे ठरवले. कॉलेजमध्ये आवडलेली रश्मी, राकेशने केलेले कारस्थान, कॉलेज डेजमध्ये रश्मीने साधलेली जवळीक, नोकरीच्या ठिकाणी भेटलेली नभा, तिच्या घरची परिस्थिती, मोरीवर घडलेला प्रसंग, जोशी काकांनी दिलेली धोक्याची सुचना, नभाने त्याच्या प्रेमाचा केलेला स्वीकार व राकेशने केलेला हल्ला इथपर्यंत सगळे काही आकाशने आपल्या आईला सर्व काही सांगून टाकले.[next] “मला ती हवी आहे गं, मी नाही जगू शकणार तिच्याशिवाय.” आकाशचा स्वर खुप हळवा झाला होता. त्यावरून आकाशच्या आईने ओळखले की आकाश नभासाठी खुप जास्त सिरियस आहे. तिने आकाशच्या वडीलांसोबत हा विषय रात्री डिस्कस करायचे ठरवले. पाऊस थांबल्यावर आकाशला सोबत घेऊन ती जोशी काकांना भेटली. तिने झालेला सगळा प्रकार जोशी काकांना सांगितला. “आकाश तर त्या मुलीमध्ये पुरता गुंतलाय. आता काय करायचं? आज तर आकाशला काही झाले नाही पण उद्या आकाशचे काही बरे वाईट झाले तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे?” तिच्या स्वरात काळजी डोकावत होती.

“आकाश जरा बाहेर बस. मला तुझ्या आईसोबत काही खाजगी बोलायचे आहे.” जोशी काका म्हणाले. आकाश बाहेर गेल्यावर जोशी काकांनी आपल्या पत्नीला चहा टाकण्यास सांगितले. “हे पहा वहीनी! मी आकाशला माझ्या मुलासारखाच समजतो. आणि म्हणुनच मी त्याला आधीच सावध केले होते पण विधीलिखित कुणाला चुकत नाही. ती मुलगी खरंच खुप चांगली आहे पण योगच असे आहेत की आकाशच्या जीवाला धोका होऊ शकतोय.”

आज त्याचाच प्रत्यय आपल्याला आकाशवर झालेल्या हल्ल्याने आला. सुदैवाने त्याला काही इजा झाली नाही पण पुढे येणारी संकटे खुप मोठी असतील तेव्हा त्याने खुप सावध राहणे आवश्यक आहे. आपण त्याचे मन वळवू नाही शकणार पण तुम्ही त्याची आई असल्याने तुम्ही केलेल्या उपासनेचे बळ कठीण प्रसंगात त्याच्या पाठीशी उभे राहील. महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्ही रोज १ माळ करणे आवश्यक आहे त्याच बरोबर घोर कष्टोद्धारण स्तोत्राचा जप आणि गजानन विजय पोथीचे रोज पारायण केलेत तर येणारे संकट टळणार जरी नसले तरी त्याची तीव्रता नक्कीच कमी होईल.

“आकाश! आत ये.” आकाश आत गेल्यावर जोशी काका म्हणाले, “आकाश मी जे सांगतोय ते नीट एक आणि त्याच प्रमाणे वाग, तुझे कल्याणच होईल. मी हा जो ताईत तुला देतोय तो सतत जवळ बाळगायचा. अमानवीय शक्तींपासून तुझे संरक्षण करण्यासाठी तो खुप कामी येईल. ह्यात तुझीच काय, कोणाचीच चूक नाही. हे तुझे प्रारब्ध आहे, तेव्हा जास्त विचार करू नकोस. पण आपली साधना मात्र न चुकता सुरु ठेव. देव तुझे कल्याण करो.” त्यानंतर चहा घेता घेता थोड्या घरगुती गप्पा झाल्यावर आकाश आणि त्याची आई तिथुन निघाली.

क्रमशः


केदार कुबडे | Kedar Kubade
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा, मराठी भयकथा, मराठी कविता या आणि अशा विविध विभागांत लेखन.

५ टिप्पण्या

 1. Chhan
  1. maanasi nisal,

   आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.
 2. Chhan
 3. Khuup chaan. ..pudhil goshta vachnyasathi khup utsuk ahe. .
  1. येत्या आठवड्याभरात जातबळी भयकथेचे सर्व १० भाग प्रकाशित होत आहेत.

   आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.