Loading ...

शुक्रवारची कहाणी (श्रावणातल्या कहाण्या)

श्रावणातली ‘शुक्रवारची कहाणी’: शुद्ध पाठ व सखोल संपादकीय विश्लेषणासह. नातेसंबंध, दारिद्र्य आणि आत्मसन्मानाचा संदेश देणारी कथा अर्थासह वाचा!

शुक्रवारची कहाणी (श्रावणातल्या कहाण्या)

श्रावण मासातील स्त्रियांच्या व्रतांगाचा भाग असलेली ही कहाणी दारिद्र्य, सामाजिक विषमता आणि आभूषण-वस्त्रांना मिळणाऱ्या सन्मानावर भाष्य करत श्रद्धा व आत्मसन्मानाचा हृदयस्पर्शी प्रवास उलगडते…

शुक्रवारची कहाणी

मराठीमाती (मराठीमाती डॉट कॉम, संपादक मंडळ)

प्रस्तावना

लोकसाहित्याच्या परंपरेत श्रावणातील कहाण्यांना अनन्यसाधारण सांस्कृतिक व भाषिक महत्त्व आहे. मौखिक परंपरेतून पिढ्यान्‌पिढ्या संक्रमित झालेल्या या कथांमध्ये तत्कालीन सामाजिक वास्तव, कौटुंबिक नातेसंबंध आणि लोकभावनांचे हुबेहूब प्रतिबिंब पडलेले दिसते.

प्रस्तुत ‘शुक्रवारची कहाणी’ ही केवळ एका धार्मिक व्रताची कथा नसून, माणसाच्या संपत्तीसापेक्ष बदलणाऱ्या वृत्तीवर व लौकिक प्रतिष्ठेच्या फसव्या स्वरूपावर प्रकाश टाकणारा एक श्रेष्ठ लोकानुभव आहे. अत्यंत साध्या, संवादी व लयबद्ध निवेदनातून ही कहाणी गरिबीतील सोशिकतेपासून ते समृद्धीनंतरच्या आत्मभान व समंजस क्षमाशीलतेपर्यंतचा मानवी प्रवास अत्यंत प्रभावीपणे रेखाटते.

आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत असे. तो दारिद्र्याने फार पिडला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. तिने आपल्या गरिबीचे गाणे गायले. शेजारणीने तिला शुक्रवारचे व्रत सांगितले. ती म्हणाली, “बाई बाई, शुक्रवारचे व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपास करावा, संध्याकाळी सवाष्णीला बोलवावे. तिचे पाय धुवावेत. तिला हळदकुंकू द्यावे. तिची ओटी भरावी. साखर घालून दूध प्यायला द्यावे. भाजलेल्या हरभऱ्यांची खिरापत द्यावी. नंतर आपण जेवावे. याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचे उद्यापन करावे.” असे सांगितले. ती घरी आली. देवीची प्रार्थना केली व शुक्रवारचे व्रत करू लागली.

त्याच गावात तिचा भाऊ राहत असे. तो एके दिवशी सहस्रभोजन घालू लागला. साऱ्या गावाला आमंत्रण केले, पण बहिणीला काही बोलावले नाही. ती गरीब, तिला बोलावले तर लोक हसतील. पुढे दुसऱ्या दिवशी भावाकडे ब्राह्मणांचे मारे थवेच्या थवे येत आहेत. पोटभर जेवत आहेत. बहिणीने विचार केला, आपला भाऊ सहस्रभोजन घालतो आहे; बोलावणे करायला विसरला असेल, तर आपल्याला भावाच्या घरी जायला काही हरकत नाही. असा मनात विचार केला. सोवळे नेसली, बरोबर मुलांना घेतले आणि भावाच्या घरी गेली. पुष्कळ पाने मांडली होती. एका पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवले. सर्व पाने भरली. सारे वाढणे झाले. तेव्हा तिच्या भावाने तूप वाढायला घेतले. वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. तिला हाक मारली, “ताई ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही, तुझ्याकडे पाहून सगळे लोक मला हसतात, यामुळे मी तुला काही बोलावले नाही. आज तू जेवायला आलीस ती आलीस. आता उद्या काही येऊ नको.” असे सांगून पुढे गेला. ही आपली तशीच जेवली, हिरमुसलेले तोंड केले. मुलांना घेऊन घरी आली.

दुसऱ्या दिवशी मुले म्हणू लागली, “आई आई, मामाकडे जेवायला चल.” बहिणीने विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झाले? आपली गरिबी आहे, तर आपल्याला ऐकून घेतलेच पाहिजे. आजचा दिवस आपला बाहेर पडला, तितकाच फायदा झाला, असे म्हणून त्याही दिवशी भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावाने तिला हाक मारली, “ताई ताई, भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेले ऐकत नाही. तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितले, आज आपली डुकरिणीसारखी पोरं घेऊन आलीस. तुला लाज कशी नाही वाटली? आज आलीस तर आलीस. उद्या आलीस तर तुला हात धरून घालवून देईन.” तिने ते मुकाट्याने ऐकून घेतले. जेवून उठून चालती झाली. पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली. भावाने पाहिले, हात धरून घालवून दिले. फार दुःखी झाली, देवीची प्रार्थना केली. सारा दिवस उपास पडला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली.

असे करता करता वर्ष झाले. बाईचे दारिद्र्य गेले. पुढे एका दिवशी ती शुक्रवारचे उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलावले. भाऊ मनात ओशाळा झाला. बहिणीला म्हणू लागला, “ताई ताई, तू उद्या माझ्या घरी जेवायला ये. नाही काही म्हणू नको. घरी काही जेवू नको. उद्या तू आली नाहीस तर मी काही तुझ्या घरी येणार नाही.” बहिणीने बरं म्हटले. भावाच्या मनातले कारण जाणले. दुसऱ्या दिवशी लवकर उठली, वेणीफणी केली, दागदागिने ल्याली, उंची पैठणी नेसली, शालजोडी घेतली आणि भावाकडे जेवायला गेली. भाऊ वाट पाहतच होता. ताई आली तसा तिचा हात धरला, पाटावर बसवली, पाय धुवायला ऊनपाणी दिले, पाय पुसायला फडके दिले. इतक्यात जेवायची पाने वाढली. ताईचे पान आपल्या शेजारी मांडले. भाऊ जेवायला बसला. ताईने आपली शालजोडी काढून बसल्यापाठी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली, शालजोडीने उकडत असेल म्हणून काढत असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली, बसल्यापाठी ठेवू लागली. भावाने विचार केला, जड झाले म्हणून काढत असेल. नंतर ताईने भात कालवला, मोठासा घास केला, तो उचलून सरीवर ठेवला; भाजी उचलून ठुशीवर ठेवला; लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला; जिलबी उचलून मोत्यांच्या पेंद्यावर ठेवली. भावाने विचारले, “ताई ताई, हे काय करतेस?” ती म्हणाली, “दादा, मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलावलेस तिला भरवत आहे.” भाऊ काही हे समजेना. त्याने तिला पुन्हा सांगितले, “अग ताई, तू आता जेव तरी.” तिने सांगितले, “बाबा, हे माझे जेवण नाही, हे या लक्ष्मीचे जेवण आहे. माझे जेवण होते ते मी सहस्रभोजनाच्या दिवशी जेवले.” इतके ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीने क्षमा केली. नंतर दोघे जण जेवले. मनातली अढी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला.

देवीने जसे तिला समर्थ करून आनंदी केले, तसे तुम्हा-आम्हा करो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

संपादकीय विश्लेषण

मध्यवर्ती कल्पना व भावगतीची गुंफण:

प्रस्तुत कहाणीची मध्यवर्ती कल्पना ही मानवी नात्यांमधील आर्थिक विषमतेचे वास्तव आणि श्रद्धेच्या बळावर मिळणारे सामाजिक पुनरुज्जीवन यांवर आधारित आहे. कहाणीची भावगती तीन ठळक टप्प्यांतून प्रवाहित होते: प्रारंभी दारिद्र्याने गांजलेल्या आणि समाजात उपेक्षित ठरलेल्या स्त्रीची असहायता, मध्यंतरात भावाकडून होणाऱ्या वारंवार अपमानामुळे निर्माण होणारी कारुण्यपूर्ण व्याकुळता, आणि शेवटी व्रताच्या पुण्याने प्राप्त झालेल्या समृद्धीनंतर आलेले आत्मभान व नैतिक विजय. भावाच्या सहस्रभोजनाच्या प्रसंगी बहिणीच्या मनात असलेली भाबडी आशा — “आपला भाऊ सहस्रभोजन घालतो आहे; बोलावणे करायला विसरला असेल, तर आपल्याला भावाच्या घरी जायला काही हरकत नाही” — तिच्या निष्पाप कौटुंबिक प्रेमाचे दर्शन घडवते; मात्र तिथे तिला मिळणारी हेटाळणी तिच्या गरिबीचे विदारक शल्य उघडे करते.

शैलीवैशिष्ट्ये व संवादात्मक जिवंतपणा:

लोककथेची पारंपरिक शैली हे या कहाणीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. वाक्यांची संक्षिप्तता, नाट्यमयता आणि संवादात्मकता यांमुळे कथनाला अद्भुत प्रवाहीपणा प्राप्त होतो. "आटपाट नगर होते" या पारंपरिक नांदीपासून सुरू होणारा प्रवास श्रोत्याला थेट कथानकात खिळवून ठेवतो. पात्रांचे संभाषण अत्यंत नैसर्गिक असून त्यातून पात्रांची मनोवृत्ती स्पष्ट होते. भावाचा अहंपणा दाखवणारे विधान — “तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही, तुझ्याकडे पाहून सगळे लोक मला हसतात” — आणि बहिणीचा गरिबी स्वीकारणारा समंजसपणा — “आपली गरिबी आहे, तर आपल्याला ऐकून घेतलेच पाहिजे” — यांतील परस्परविरोधी भावच्छटा पात्रांच्या स्वभावरेखा अधोरेखित करतात. निवेदनातील नादमयता व ओघवती भाषा वाचकाच्या मनावर पकड घेते.

प्रतीकात्मकता व नाट्यात्मक वळण:

कहाणीच्या अंतिम टप्प्यात येणारे नाट्यात्मक वळण हे लोकसाहित्यातील उपरोधाचे व प्रतीकात्मकतेचे अप्रतिम उदाहरण आहे. श्रीमंत झाल्यावर बहिणीने दागिन्यांवर (सरी, ठुशी, चिंचपेटी, मोत्यांचा पेंद्या) घास ठेवणे ही केवळ एक कृती नसून, माणसाऐवजी त्याच्या बाह्य श्रीमंतीची पूजा करणाऱ्या समाजवृत्तीवर मारलेला सणसणीत चपराक आहे. “बाबा, हे माझे जेवण नाही, हे या लक्ष्मीचे जेवण आहे. माझे जेवण होते ते मी सहस्रभोजनाच्या दिवशी जेवले” हे तिचे उत्तर अत्यंत बोचक व प्रतीकात्मक आहे. इथे ‘अलंकार’‘वस्त्रे’ ही मानवी मूल्यांपेक्षा वरचढ ठरणाऱ्या बाह्य प्रतिष्ठेची प्रतीके बनतात. बहिणीचे हे शांत पण आक्रमक नसलेले प्रभावी वर्तन भावाचे डोळे उघडण्यास कारणीभूत ठरते.

परिणामकारकता व नैतिक संदेश:

कहाणीचा शेवट सूडभावनेऐवजी क्षमाशीलता व कौटुंबिक मूल्यांच्या पुनर्स्थापनेकडे वळतो, ही या कहाणीची सर्वोच्च परिणामकारकता आहे. भावाने पश्चात्तापपूर्वक पाय धरल्यावर बहिणीने त्याला क्षमा करणे आणि “मनातली अढी काढून टाकली” या उक्तीनुसार नात्यातील गोडवा पूर्ववत होणे, हे भारतीय लोकसंस्कृतीतील औदार्य आणि उदात्त कौटुंबिक मूल्यांचे प्रतिनिधित्व करते. “ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण” ही फलश्रुती केवळ भौतिक समृद्धीची मागणी करत नाही, तर अहंकार गळून पडणे आणि कौटुंबिक सौहार्द प्रस्थापित होणे हाच खरा व्रताचा सुफळ परिणाम आहे, हा सार्वकालिक संदेश देऊन जाते.

सारांश

प्रस्तुत कहाणी ही बाह्य संपत्तीपेक्षा आंतरिक नातेसंबंध आणि आत्मसन्मानाचे श्रेष्ठत्व प्रतिपादित करणारी, क्षमाशीलतेचा उदात्त संदेश देणारी एक अजरामर लोककृती आहे.

हर्षद खंदारे (निर्माते-मुख्य संपादक, मराठीमाती डॉट कॉम)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची