जातबळी भाग ४ - मराठी भयकथा

जातबळी भाग ४, मराठी कथा - [Jaatbali Part 4, Marathi Katha] आकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी.
जातबळी भाग ४ - मराठी कथा | Jaatbali Part 4 - Marathi Katha
पुर्वार्ध: जोशी काका आकाशच्या मुर्खपणाबद्दल खुप सुनावतात. शरीरातून आत्मा बाहेर काढून वाटेल तिथे सुक्ष्म रूपात जाऊन येण्याची विद्या आकाश जोशी काकांकडून जाणून घेतो. वादळ सुरु असतानाही आकाश नभाला घरी सोडण्यासाठी आईचा विरोध झुगारून जातो. नभा आकाशच्या प्रेमाचा स्वीकार करते. तिला सोडून परतत असताना राकेश त्याचा रस्ता अडवतो. आकाश राकेश आणि त्याच्या मित्रांना यथेच्छ बदडतो. घरी आल्यावर आकाशची आई त्याच्याकडून नभा आणि राकेश बद्दल जाणून घेते आणि त्याला जोशी काकांकडे घेऊन जाते. जोशी काका तिला आकाशच्या पत्रिकेतील वाईट योगा बद्दल सांगतात. नंतर अमानवीय शक्तींपासुन रक्षण होण्यासाठी ते आकाशला एक ताईत देतात व आकाशच्या आईला जप व उपासना सांगतात. पुढे चालू...

राकेश आणि त्याचे मित्र ऍक्सीडेन्ट झाल्याच्या सबबीवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते हे कळल्यावर आकाश त्याला भेटायला गेला. रश्मीला पाहिल्यावर तो वॉर्डच्या दरवाज्यातच थबकला. त्याला वाटले रश्मी आता त्याला चांगलाच फैलावर घेणार, पण तसे घडले नाही. उलट रश्मीने हात जोडून राकेशच्या वतीने त्याची माफी मागितली आणि पोलीस कम्प्लेंट न केल्याबद्दल आभारही मानले. राकेश मात्र अजुनही घुश्श्यात होता. आकाशला आलेले पाहून त्याच्या तळपायातील आग मस्तकात गेली होती.

पण आकाशमुळेच आज एवढ्या दिवसानंतर रश्मी त्याला भेटायला आली होती त्यामुळे तो गप्प होता. आकाशचा बदला कसा घ्यायचा हाच विचार त्याच्या मनात घोळत होता. रश्मीने राकेशला त्याच्या बिनडोक वागण्याबद्दल चांगलेच सुनावले आणि आकाशच्या चांगुलपणाचे गोडवे गाऊ लागली. त्यामुळे राकेशच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले. राग अनावर झाल्यामुळे त्याने रश्मीच्या एक जोरदार मुस्काटात ठेऊन दिली.
[next] अचानक झालेल्या या प्रकाराने बेसावध असलेली रश्मी कोलमडून खालीच पडली असती पण आकाशने वेळीच तिला सावरले. रागाने लाल बुंद झालेल्या रश्मीने एकदम रुद्रावतार धारण केला तिने राकेशचे केस पकडून त्याचे डोके लोखंडी कॉटच्या कडेवर आपटले. राकेशच्या मस्तकात जीवघेणी कळ उठली. हे कमी झाले म्हणुन की काय तिने त्याच्या मुस्काटात चांगल्या दोन ठेऊन दिल्या. ती एवढी चिडली होती की काही कळायच्या आत तिची लाथ राकेशच्या छातीत बसली आणि तो कॉटवरून पलीकडे फेकला गेला. आत्तापर्यंत राकेशने दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल तिच्या मनात साचलेल्या संतापाचा तो उद्रेक होता.

सहाजिकच वॉर्डमध्ये असलेले पेशंट, त्यांचे नातेवाईक, वॉर्ड बॉय, नर्स अश्या बघ्यांची गर्दी झाली. आकाशने रश्मीला कसे बसे थोपवून धरले होते. “रश्मी, आवर स्वतःला नाहीतर तुला सोडवायला मला पोलीस स्टेशनला यावे लागेल” असे तो रश्मीच्या कानात पुटपुटला. “नाही आकाश, या कुत्र्याची हीच लायकी आहे. खुप छळले आहे मला याने. प्रेम नुसते बोलण्यापुरते, बघावे तेव्हा याच्या नजरेत केवळ वासनाच दिसायची. मी यांच्यापासून कशी माझी अब्रू टिकवून ठेवली आहे ते माझे मला माहीत आहे. तुला नाही माहीत तुझ्या बद्दल नको नको ते सांगून ह्याने आणि त्या पूजाने माझे मन कलुषित केले होते.”

रश्मीचा आवाज खुपच चढला होता. परिस्थिती हाताबाहेर चाललेली पाहून, “मला सर्व माहीत आहे तू आधी इथून बाहेर चल” म्हणत आकाशने रश्मीला बळेबळेच वॉर्डच्या बाहेर नेले. तिथे आलेल्या सिक्युरीटी गार्ड्सनी राकेशला उचलून परत त्याच्या कॉटवर ठेवले. अपमानाने खजील झालेला राकेश आतल्या आत धुमसत होता. आकाशच्या पाठोपाठ त्याच्या बदल्याच्या लिस्टमध्ये आता रश्मी पण ऍड झाली होती. पुढे मागे संधी मिळाल्यावर आकाशसोबत रश्मीलाही जन्माची अद्दल घडवण्याची त्याने शपथ घेतली.
[next] हॉस्पिटल मधुन बाहेर पडल्यावर रश्मीने आकाशसमोर राकेशच्या चुकांचा पाढा वाचण्यास सुरवात केली पण तिला तिथेच थांबवत आकाशने गाडीवर बसण्यास सांगितले. त्याला तमाशा सुरु होण्याआधीच लवकरात लवकर तिथून निघायचे होते. त्याने वेगाने गाडी हॉस्पिटलच्या कंपाउंड बाहेर काढली आणि बस स्टँडच्या दिशेने दामटली. जयस्तंभावरून लेफ्ट घेऊन तो सरळ समुद्रावर येऊन थांबला. रश्मी गाडीवरून उतरल्यावर आकाशची नजर रश्मीकडे गेली, तिच्या ओठातून रक्त आले होते.

त्याने पटकन आपल्या खिशातून रुमाल काढला. गाडीच्या डिक्कीतून पाण्याची बाटली काढून रुमाल ओला केला आणि रश्मीच्या ओठाला झालेली जखम पाण्याने साफ केली. पाणी जखमेला लागताच तिला चांगलेच चुरचुरले. नकळत तिने आपली जीभ ओठावरून फिरवली. तिचे लक्ष आकाशकडे गेले. तो तिच्याकडे एकटक पाहात होता. त्याच्या एकटक पाहण्यामुळे लाजलेली रश्मी ओढणीशी चाळा करत म्हणाली, “काय झाले आकाश? असा का बघतोयस माझ्याकडे?”

“अगं कुठून आणलेस एवढे धाडस? काय मस्त वाजवल्यास तू राकेशच्या? नाजुक, शांत आणि संय्यमी असलेली ती रश्मी आज कुठे गायब झाली होती?” आकाश आश्चर्याने म्हणाला. “मग काय? किती सहन करायचे? त्याच्या असल्या चिप वागण्यामुळेच मी त्याच्याशी बोलणे भेटणे सोडले होते. तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्याचे त्याच्या मित्राकडून कळले म्हणुन न राहवून मी त्याला बघायला आले तर त्याने माझ्याच कानाखाली वाजवली. मग एवढ्या दिवसाचा राग, अपमान आज बाहेर पडला, त्यात माझी काय चुक आहे?”
[next] “त्याच्या सारख्या नीच माणसाचे ऐकल्यामुळे मी तुला गमावले आकाश! किती मुर्खासारखे वागले मी? मुळात मी त्याच्यावर कधी प्रेम केलेच नाही. तुझ्या धक्क्यातून सावरण्यासाठी मला आधाराची गरज होती आणि पुजामुळे माझ्या मनात नसताना सुद्धा मी त्याच्याशी रिलशनशिप ठेवली. त्याची मोठी किंमत पण मोजलीय मी. मला पण तू आवडायचास आकाश, पण पूजा आणि राकेशने मिळून माझे असे काही ब्रेन वॉश केले की मी काय योग्य, काय अयोग्य हेच समजू शकले नाही आणि ते जसे सांगतील तसेच करत गेले.”

“राकेशने प्रत्येक वेळी माझा फायदा उचलायचा प्रयत्न केला पण मी त्याला कधीही तसे करू दिले नाही. याचा राग त्याच्या मनात असल्यामुळे तो मला खुप काही बोलायचा, प्रसंगी हात पण उचलायचा. माझ्यासमोर इतर मुलींशी फ्लर्ट करायचा. मी हे सगळे सहन केले पण त्या दिवशी त्याने दारू पिऊन माझ्यावर बळजबरी करायचा प्रयत्न केला. मी कसे बसे त्याच्या तावडीतून सुटले आणि तेव्हाच मी निर्णय घेतला की आता बास. पण त्याचा ऍक्सिडंट झाल्याचे कळले तेव्हा राहवले नाही आणि मी त्याला पाहायला हॉस्पिटलला गेले.”

“तिथे त्याच्या मित्राकडूनच कळले की ऍक्सिडंट नाही झालेला उलट तू त्याची आणि त्याच्या मित्रांची धुलाई केली आहेस. त्याने तुला मारायचा प्रयत्न केला तरीही तू त्याची पोलीस कम्प्लेंट केली नाहीस उलट त्याला बघायला हॉस्पिटलला आलास. हे पाहून जाणवले की तू किती मोठ्या मनाचा आहेस! तू त्याला मारून काहीच चुकीचे केलेले नाहीस. आज त्याने माझ्यावर हात उचलून हे दाखवून दिले की डुकराला कितीही स्वच्छ करा, कितीही सुधारायचा प्रयत्न करा पण तो जाणार शेवटी गटारातच कारण त्याची लायकीच ती असते. जाऊ दे, मला आता त्याच्याबद्दल बोलायची अजिबात इच्छा नाही.”
[next] “मला राकेश आणि पूजाने केलेल्या कारस्थानाबद्दल सर्व काही तेव्हाच कळले होते रश्मी.” आकाश पुटपुटला. “काय? तुला सर्व माहीत होते? मग तू मला का नाही समजावून सांगितलेस? कदाचित आज परिस्थिती वेगळी असती.” रश्मी भावुक होत म्हणाली. “त्याचा काही उपयोग झाला नसता कारण तू पुर्णपणे त्या दोघांच्या कह्यात गेली होतीस. मी काही बोलायला गेलो असतो तर तू माझ्यावरच संशय घेतला असतास. त्यामुळे मी ते काळावर सोपवले. खोटं कधी ना कधी उघडं पडतंच आणि खरे समोर आल्याशिवाय राहत नाही. फक्त त्याला काही वेळ जाणे गरजेचे असते. आज तुझे तुलाच उमगले की सत्य काय आहे.” आकाश समजावणीच्या सुरत म्हणाला.

“हो, पण कदाचित सत्य समोर येण्याआधीच जर राकेशने माझ्या आयुष्याची वाट लावली असती तर?” रश्मीने दुःखावेगाने विचारले. “नाही, माझी खात्री होती की तसे झाले नसते. कारण मी राकेशला पण चांगलाच ओळखतो आणि तुलाही. तो तसा प्रयत्न करणार यात शंकाच नव्हती पण तू तसे होऊ देणार नाहीस हा माझा विश्वास होता जो तू सार्थ ठरवलास.” आकाश तिची समजूत काढत म्हणाला. आय एम रिअली सॉरी, खूप मुर्खासारखे वागले मी! मला तुझे प्रेम समजलेच नाही. अल्लड होते रे मी. “आकाश, तू माझ्यावर अजुनही रागावला आहेस का?” रश्मीने आकाशच्या डोळ्यात खोल पाहत विचारले.

तिच्या प्रश्नाचा रोख ओळखून आकाश म्हणाला, “नाही रश्मी, मी तुझ्यावर रागावलेला वगैरे अजिबात नाही कारण मी तुझ्यावर मनापासून प्रेम केले होते. फक्त सुरवातीला थोडा दुखावलो गेलो होतो. वाईट ह्याचे वाटले की तू हलक्या कानांची निघालीस. कसलीच शहानिशा न करता, तू त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेऊन मी न केलेल्या गुन्ह्यासाठी मला शिक्षा दिलीस.” ते ऐकताच रश्मीची नजर शरमेने खाली झुकली. आकाश पुढे म्हणाला, “पण म्हणतात ना जे घडतं ते चांगल्या साठीच आणि पान गळतं ते पालवीसाठीच. तू माझ्याकडे पाठ फिरवलीस आणि नंतर माझ्या आयुष्यात नभा आली.”
[next] ते ऐकताच रश्मीचा चेहरा पडला. “कोण नभा?” रश्मीचा अपेक्षित प्रश्न. “मी ज्या शैक्षणिक संस्थेत काम करतो तिथे ऍडमिन हेड आहे. आमच्या प्रेमाला तिच्या घरच्यांचा फुल्ल टू विरोध आहे. त्यात तिचे मामा म्हणजे कर्दनकाळ आहेत. एकंदर स्टोरी खुपच फिल्मी आहे. माहीत नाही पुढे काय होईल ते पण माझा विश्वास आहे की मी सर्वांचे मन वळवेन.” एवढे बोलून आकाशने एक उसासा सोडला. आकाशचे बोलणे ऐकल्यावर आतून तुटलेल्या रश्मीने स्वतःला सावरायचा अयशस्वी प्रयत्न केला.

“तू काळजी करू नकोस. तुझ्या सारख्या मुलाला ते नाही म्हणुच शकणार नाहीत. होईल सगळे व्यवस्थित.” असे म्हणुन रश्मीने आकाशकडे पाठ करत आपले रडवेले झालेले डोळे टिपले. आकाशच्या ते लक्षात आले पण त्याने काही प्रतिक्रिया दिली नाही. उलट त्याने जाणून बुजून ही गोष्ट रश्मीच्या कानावर घातली होती. त्याला तिला खोटी आशा लावायची नव्हती. जेवढ्या लवकर ती ही गोष्ट मान्य करेल तेवढे तिच्यासाठी आणि त्याच्यासाठीही चांगले होते.

“चल निघूया. तुला घरी सोडतो. होपफुली राकेशने तुझ्या विरुद्ध पोलीस कम्प्लेंट केली नसेल. तसेही सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यात सर्व प्रसंग रेकॉर्ड झाला असेलच. त्यामुळे त्याने पहिला हात उचलला होता हे सहज सिद्ध होईल. तू जरा सावध राहा. तो खुप नीच आहे, कोणत्याही थराला जाऊ शकतो.” आकाश काळजीने म्हणाला. “तू माझी काळजी करू नकोस, आकाश! तो माझे काहीही वाकडे करू शकणार नाही. आणि त्याने प्रयत्न केलाच तर माझे वडील लॉकअप मध्ये त्याची पुरेपूर काळजी घेतील.” रश्मीच्या या वाक्यावर इतक्या वेळानंतर पहिल्यांदाच ते दोघेही हसले. रश्मीला तिच्या घरी सोडून आकाश आपल्या घरी निघून गेला.
[next] इकडे नभाच्या आईचे मन तिला सांगू लागले की आपल्या मुलीचे लक्षण काही ठीक दिसत नाही. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच काही तरी उपाय करावा लागेल हे तिने जाणले. पण त्या आधी आपला संशय खरा आहे का? याची खातरजमा करण्यासाठी तिने एक चाल खेळली. तिने नभा आणि पूनमसोबतचे आपले वागणे एकदम बदलले. ती त्या दोघींशी खुप प्रेमाने वागू लागली. बोलण्यात ती आकाशचा उल्लेख वारंवार करू लागली. एरव्ही आकाशबद्दल सतत उणे दुणे काढणारी ती, आता त्याचे गोडवे गाताना थकत नसे.

आकाशबद्दल बोलताना ती त्या दोघींच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असे. आकाश घरी आल्यावर तो आणि नभा एकमेकांशी खाणा खुणा करतात का? त्यांची सतत नजरा नजर होते का? ते प्रेमात असल्याचा कोणताही पुरावा नकळत देत तर नाहीत याकडे ती बारीक लक्ष ठेवत असे. नभाच्या लक्षात तिचा डाव आला होता त्यामुळे ती काही रिऍक्शन द्यायची नाही. तिने आकाशलाही याची कल्पना दिली होती त्यामुळे तो ही केवळ तिचा एक सहकारी असल्यासारखाच वागायचा.

एकदा पूनम आणि तिची आई दोघीच घरात असताना, तिने बोलता बोलता विषय काढला, “पूनम! आकाश कसा वाटतो तुला? म्हणजे त्याचा स्वभाव, त्याची फॅमिली वगैरे. नभा काही बोलली का तुला?” पूनमला तिचा रोख कळला नाही, ती सहज बोलावे तसे बोलून गेली, “चांगला आहे. समजुतदार आहे. नेहेमी हसतमुख असतो. त्याच्या फॅमिलीत चारच जण आहेत. तो, त्याचे आई वडील आणि भाऊ. हा, एक आजी पण आहे असे ताई सांगत होती. “तिला आवडतो का गं तो?” आईच्या या प्रश्नावर पूनम सावध झाली. कारण तिला चांगले माहीत होते की तिची आई जातीबद्दल किती आग्रही आहे ते.
[next] “नाही मला नाही माहीत, ताई काही बोलली नाही कधी.” पूनम चाचरत बोलली. त्याबरोबर तिच्या आईच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. “अगं नाही कसं? तो तिच्यासाठी किती करतो! आपल्या पण अडी नडीला धावून येतो. ते काय उगाच? त्यांच्या नजरेत एकमेकांसाठी प्रेम दिसते की! मला पण त्याचा स्वभाव खुप आवडतो. आपल्या नभाला तो आवडत असेल तर माझी काहीच हरकत नाही. मी आनंदाने त्यांचे लग्न लावून देईन. शेवटी जातीपेक्षा आपल्या नभाचे सुख जास्त महत्वाचे. ती खुश तर आपण खुश.”

आईचे हे बोलणे ऐकून पूनम आवाक झाली. “अगं पण मामांना कोण समजावणार?” पूनमच्या भाबडा प्रश्न. “तू मामांची काळजी करू नकोस ते पण आता मॉडर्न झाले आहेत. तसेही आजकाल कोणी एवढी जातपात मानत नाहीत. किती तरी इंटरकास्ट लग्न होतात. तू फक्त मला सांग त्यांच्यात काही आहे का? नाही म्हणजे, काही असेल तर बोलण्यात अर्थ आहे. नाही तर विषय काढून मीच तोंडावर पडायचे.” पूनम आईच्या जाळ्यात पूर्ती फसली आणि तिने आईला सर्व काही सांगितले.

नभाच्या आईला जे हवे होते ते तिने पूनमकडून हळूच काढून घेतले. त्या रात्रीच तिने एस.टी.डी बूथ वरून आपल्या मोठ्या भावाला रवीला फोन लावला. त्याच्या कानावर नभा आणि आकाश मध्ये फुलत असलेल्या प्रेमाबद्दल सांगितले. आधी रवी चिडला पण सर्व भाचे कंपनीत त्याचे नभावर सर्वात जास्त प्रेम होते, त्यामुळे त्याने थोडे सबुरीने वागण्याचा सल्ला आपल्या बहिणीला दिला. आधी नभा आकाशमध्ये कितपत गुंतली आहे याचा अंदाज घेऊन मग तुकडा पाडण्यास त्यांने सांगितले.
[next] नाहीतर नभा आकाश सोबत पळून जाऊन लग्न करण्याचा पण धोका होता. ठरल्याप्रमाणे नभाच्या आईने नभाला आकाशबद्दल आडून आडून विचारायला सुरवात केली. प्रथम नभाने तिला टाळायचा प्रयत्न केला पण ती कसेच ऐकत नाही म्हटल्यावर मात्र नभाने स्पष्ट सांगून टाकले की तिचे आकाशवर प्रेम आहे आणि तिला त्याच्याशीच लग्न करायचे आहे. पण सर्वांच्या मर्जीने, पळून जाऊन नव्हे. नभाने आपल्या वडीलांच्या कानावर सगळा विषय घातला व त्यांना आईचे मन वळवण्यासाठी विनंती केली.

तिने वडील म्हणाले, “माझा तुझ्या निवडीवर पुर्ण भरवसा आहे. आकाश खुप चांगला मुलगा आहे आणि तो तुला सुखात ठेवण्यासाठी जीवाचे रान करेल याची मला खात्री आहे. पण तुझी आई आणि मामा काही हे लग्न होऊ देणार नाहीत हेही तितकेच खरे. तू तुझ्या आईच्या गोड बोलण्यावर जाऊ नकोस. ती जातीसाठी माती खाईल पण आपल्या मुलांच्या सुखाचा विचार करणार नाही. या सो कॉल्ड समाजासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा बळी देण्याऱ्या विकृत लोकांपैकी ती आणि तिचे भाऊ आहेत.

जर का मुलगा समजूतदार असेल, सुशिक्षित, सुसंस्कारी आणि चांगल्या कुटुंबातील असेल, आपल्या मुलीवर खुप प्रेम करत असेल, तिच्या सुखासाठी झटत असेल व चांगला कमावता असेल तर आणखीन काय पाहिजे मुलीच्या आईवडीलांना? पण हे तुझ्या आई आणि मामांच्या डोक्यात शिरताना महाकठीण. तू नको या फंदात पडूस, यातून तुला फक्त दुःख आणि यातना मिळतील. तू त्याला विसरून जावेस आणि त्याला विसरणे जमत नसेल तर सरळ पळून जाऊन त्याच्याशी लग्न कर आणि दूर कुठेतरी निघून जा. पुन्हा कधी चुकूनही इकडे फिरकू नकोस.
[next] आमचा विचार करशील तर आयुष्यभर दुःखात राहशील. तुझी आई, मामा आणि मी सुद्धा तुला आयुष्याला पुरलेलो नाही. तुझ्या आयुष्याचा जोडीदार हा तुझा नवरा असणार आहे. त्यामुळे त्याचा विचार कर. तोच तुला तुझ्या सुखदुःखात शेवटपर्यंत साथ देणार आहे. तू आपल्या कुटुंबासाठी आत्तापर्यंत खुप खस्ता खाल्ल्या आहेस, आता मात्र फक्त स्वतःच्या सुखाचा विचार कर आणि आकाश सोबत सुखाने संसार कर.” नभा आपल्या वडीलांचे बोलणे ऐकून चाट पडली आणि त्यांच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडू लागली.

तिच्या वडीलांना देखील आपण आपल्या मुलीच्या सुखासाठी काही करू शकत नसल्याचे शल्य बोचू लागले आणि त्यांचेही डोळे भरले. नभाची त्रिशंकू अवस्था झाली होती. एकीकडे आकाशसोबत तिचा भविष्यकाळ होता तर दुसरीकडे तिला लहानपणापासून ज्यांनी तिला मायेने वाढवले, खुप सारे प्रेम आणि संरक्षण दिले त्यांच्या सोबतचा भूतकाळ. या दोघात तिचा वर्तमानकाळ मात्र ढवळून निघाला होता. तिच्या तारुण्यसुलभ भावना तिला आकाशकडे खेचत होत्या आणि संस्कार मात्र आपल्या कुटुंबाकडे खेचत होते. याच टेन्शनमध्ये नभा आजारी पडली.

तिला भेटायला आलेल्या आकाशला नभाच्या आईने दारातूनच अपमान करून परत पाठवले. नभा आणि आकाशची अवस्था फारच बिकट झाली होती. आकाश दिसावा म्हणुन नभाचा जीव तळमळत होता तर नभाच्या काळजीने आकाशचा जीव टांगणीला लागला होता. नभाची आई मात्र आपल्या छोट्याश्या विजयावर खुश होत होती. तिला आपल्या मुलीच्या जीवाची तगमग दिसत नव्हती. ती नभाला डॉक्टरने दिलेली औषधे देत होती पण नभाच्या तब्येतीत काहीच फरक पडत नव्हता कारण आकाश हेच नभाचे खरे औषध होते.
[next] नभा बरी व्हावी म्हणुन आकाश तिला रोज न चुकता रेकी देत होता, देवाची प्रार्थना करत होता. या सगळ्याला आता एक महिना उलटला तरी ना नभाच्या तब्येतीत फरक पडला ना तिच्या आईच्या स्वभावात. एके दिवशी न राहवून आकाशने रसिकाला नभाची विचारपूस करण्यासाठी विनंती केली. नभा जवळची मैत्रीण असूनही तिच्या आईच्या भीतीने रसिका एवढे दिवस होऊनही तिला भेटायला गेली नव्हती. तिलाही नभाची काळजी वाटत होतीच त्यामुळे आकाशने विनंती करताच फारसे आढेवेढे न घेता संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर रसिका नभाच्या घरी तिला भेटायला गेली.

नभाची आई चहा बनवायला किचनमध्ये जाताच नभाने रसिकाला पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे आकाश कसा आहे? यावर रसिका म्हणाली, “कसा असणार? त्याची पण अवस्था तुझ्यापेक्षा वेगळी नाही. नेहेमी हसतमुख असणारा आकाश हल्ली जोक्सवर पण हसत नाही. आपल्याच विश्वात असतो. ऍडमिशनसाठी जातो पण रिकाम्या हातानी परत येतो. परवा त्याला कधी नव्हे ते सर पण रागावले. मी तुम्हा दोघांना आधी पासून सांगत आले की हे वेळीच थांबवा पण तुम्ही माझे ऐकले नाही. आता दोघांना पण त्रास होतोय. आकाशचे एक ठीक आहे पण तू तर सगळे जाणतेस तरीही तू ही चूक कशी काय केलीस याचेच मला आश्चर्य वाटते.”

खोल गेलेल्या आवाजात नभा म्हणाली, “मी पण एक स्त्री आहे, मलाही भावना आहेत, मलाही वाटते कोणाच्या तरी प्रेमात पडावे, कोणाचे तरी हृदय माझ्यासाठी धडधडावे. आपल्या आवडत्या माणसासोबत आयुष्य घालवण्याचे स्वप्न पाहणे काय गुन्हा आहे का? माझ्या कुटुंबाच्या सुखापुढे मी माझ्या सुखाचा कधीच विचार केला नाही. नेहेमी त्यांच्यासाठीच झटत आले मग आज जेव्हा माझ्या आयुष्यात सुख येतय तर मला सपोर्ट करायचा सोडून त्यांचा विरोध का? जाती साठी? शी! विट आलाय मला सगळ्याचा.
[next] मला माझा आकाश हवाय. तो जर नसेल मिळणार तर मग जगण्यात काय अर्थ आहे? मी काय आयुष्यभर केवळ कष्टच उपसू? मला हसण्याचा, आनंदी राहायचा, मोकळेपणाने जगण्याचा हक्कच नाही का?” एवढे बोलल्यावर गहीवर आल्याने नभाने आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली. रसिका तरी काय बोलणार? नभाला जवळ घेऊन ती तिचे सांत्वन करू लागली. आवेग ओसरल्यावर नभा म्हणाली, “रसिका, अगं इतकी वर्ष मी माझ्या हृदयाची दारं घट्ट बंद करून ठेवली होती, पण आकाश कधी कसा माझ्या हृदयात शिरला ते माझे मलाच कळले नाही.

एखाद्या वादळासारखा तो माझ्या आयुष्यात आला आणि मला नखशिखांत हलवून गेला. त्याच्यामुळे मला प्रथमच माझ्यातील स्त्रीत्वाची जाणीव झाली. त्याने मला खऱ्या अर्थाने जगायला शिकवले. आयुष्याचा उपभोग घ्यायला शिकवले. आयुष्य म्हणजे केवळ आपण जे श्वास घेतो ते नसून असे क्षण आहेत, जे आपल्याला श्वास रोखायला भाग पाडतात हे मला त्याच्यामुळे कळले. कालचा दिवस निघून गेला, उद्याची काहीच गॅरंटी नाही पण हा जो आज आहे तो सर्वार्थाने आपला आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण भरभरून जगला पाहिजे.

अखेर सर्वांनाच सरणावर जायचंय पण तेव्हा असे वाटायला नको की अरे आयुष्यभर आपण केवळ सुखाच्या मागे धावतच राहिलो आणि जगायचं तर राहूनच गेलं. आयुष्यात प्रेम खुप महत्वाचे आहे कारण ते आपल्याला कसं जगावं हे शिकवतं. खरंच रसिका तू पण कोणाच्या तरी प्रेमात पड मग बघ आयुष्याला कसा अर्थ येतो ते? आयुष्य खुप सुंदर आहे याची जाणीव प्रेमात पडल्यावरच होते. आकाश माझ्या आयुष्यात जर आलाच नसता तर मी झापडं लावलेल्या बैलासारखी केवळ कष्टच करत राहिले असते. ते झापड काढून आकाशनेच मला जाणीव करून दिली की आजूबाजूला किती सुंदर गोष्टी आहेत.
[next] कष्ट करताना आपण त्यांचा पण आस्वाद घ्यायला पाहिजे, म्हणजे कष्ट हे कष्ट न राहता मौज बनतात. प्लिज रसिका, माझा निरोप आकाशला दे, की त्याने काहीच काळजी करायची गरज नाही, शेवटच्या श्वासापर्यंत मी फक्त त्याचीच आहे.” भान हरपून रसिका फक्त ऐकत होती. नभा शांत झाल्यावर रसिका म्हणाली, “किती सुंदर बोलतेस तू नभा? आकाशमुळे खरंच तुझ्यात केवढा बदल झालाय? तुला पाहून मला पण वाटू लागलंय की कुणाच्या तरी प्रेमात पडावं म्हणुन. यापुढे मी तुला अडवणार नाही नभा, उलट तुझे प्रेम तुला मिळो म्हणुन देवाला प्रार्थना करेन.

तुझा निरोप मी आकाशला नक्की देईन. बिचारा आजकाल खुप उदास असतो, तुझ्या निरोपाने त्यांच्या मध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारेल यात मला काहीच शंका नाही. देव करो आणि तुमचे प्रेम सफल होवो.” एवढ्यात नभाची आई चहा बिस्कीटे घेऊन नभाच्या खोलीत आली त्याबरोबर दोघी सावरून बसल्या. “झाल्या का गप्पा मारून? घ्या गरम गरम चहा. रसिका तुझ्या मैत्रिणीला चार शहाणपणाच्या गोष्टी तूच सांग बाई. त्या भिकारड्या आकाशचा विचार डोक्यातून काढून टाक म्हणावं आणि लवकर बरी हो. बघ काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची.”

नभाच्या आईच्या या वाक्यावर रसिका फक्त कसंनुसं हसली. चहा झाल्यावर नभाला लवकर बरी होण्यास सांगून ती निघाली. नभा पुन्हा आपल्या खोलीत एकदम एकाकी झाली. रात्री ती न जेवताच झोपी गेली. साधारण मध्यरात्रीच्या सुमारास नभाला कोणीतरी मायेने आपल्या डोक्यावरून हात फिरवत आहे अशी जाणीव झाली आणि ती जागी झाली. उठून पाहते तर ती तिच्या खोलीत एकटीच होती. मग तिला झालेला भास होता की सत्य?

क्रमशः


केदार कुबडे | Kedar Kubade
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा, मराठी भयकथा, मराठी कविता या आणि अशा विविध विभागांत लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.