नयना - मराठी भयकथा

नयना, मराठी कथा - [Nayana, Marathi Katha] रक्तपिशाच्चापासुन नयना नावाच्या एका गोड मुलीची केलेली सुटकेची रोमहर्षक भयकथा.
नयना - मराठी कथा | Nayana - Marathi Katha

रक्तपिशाच्चाने नयना नावाच्या एका गोड मुलीची केलेली अवस्था, तिला वाचवण्यासाठी केलेला संघर्ष आणि...


एका रक्तपिशाच्चाने नयना नावाच्या एका गोड मुलीची केलेली अवस्था, तिला वाचवण्यासाठी केलेला संघर्ष आणि त्या रक्तपिशाच्चापासुन तिची केलेली सुटका याची रोमहर्षक भयकथा म्हणजेच नयना...१९९० साली माझे बाबा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगावातील देना बँकेत शाखा प्रबंधक म्हणुन रुजु झाले. माणगाव हे एक छोटे गाव असल्यामुळे राहण्याच्या आणि माझ्या शाळेच्या दृष्टीने काही किलोमीटर अंतरावरील सावंतवाडी हे शहर त्यांनी निवडले. वैश्य वाडा भागात एका कॉलनीत आम्ही एक कौलारू घर भाड्याने घेतले, भाडे रुपये ६०० मात्र. माझ्या आयुष्यातील पहिले भाड्याचे घर. हॉल, किचन, एक बेडरूम आणि अट्याच्ड टॉयलेट बाथरूम बस एवढेच. रूम्स मोठ्या होत्या पण आमच्या रत्नागिरीच्या बंगल्याच्या मानाने मला ते छोटेच वाटत होते. पहिल्यांदाच कौलारू घरात राहायला मिळाल्याने मी थोडा एक्साईट झालो होतो. सामानाची लावालाव झाल्यावर त्याला घराचे रुप आले. आणि अश्या तऱ्हेने आमच्या सावंतवाडीतील वास्तव्याचा श्रीगणेशा झाला.

मी कळसुलकर न्यु इंग्लिश स्कुलमध्ये इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेतला. शाळेच्या पहिल्या दिवशी बाबा मला राजदूत वरून शाळेच्या गेट वर सोडून त्यांना उशीर होत असल्यामुळे बँकेत निघुन गेले. शाळेच्या गेटमधुन आत प्रवेश केला. समोर खुप मोकळी जागा होती. उजव्या बाजुला मुलांच्या सायकली रांगेत लावल्या होत्या आणि डाव्या बाजुला शिक्षकांच्या गाड्या लावल्या होत्या. शहर नवीन, रस्ते नवीन, माणसे नवीन, घर नवीन, शेजारी नवीन आणि शाळा पण नवीन अश्या अनेक नवीन गोष्टींचे दडपण घेऊन मी शाळेत दाखल झालो पण वर्ग शोधणे म्हणजे एक दिव्य वाटत होते, नवीन असल्यामुळे थोडा बुजलो होतो. कोणाला विचारायलाही संकोच वाटत होता. थोडा वेळ तसाच शाळेच्या आवारात घुटमळण्यात गेला आणि अचानक ‘तु केदार ना’? असा प्रश्न कानावर पडला. मी गर्‌कन वळुन पाहीले तर एक गोड चुणचुणीत मुलगी माझ्याकडे पाहात उभी होती. तिचे डोळे खूप सुंदर होते, मी तिच्या डोळ्यांकडे बावळटासारखा पाहात उभा होतो. अचानक तिच्या प्रश्नाने भानावर आलो. ‘तु केदार ना’? तिने मला पुन्हा विचारले.

मी: हो आणि तु?

ती: मी नयना. (अगदी योग्य नाव ठेवले होते तिच्या घरच्यांनी)

मी: तु मला कसे काय ओळखतेस?

ती: अरे, आम्ही तुमच्या शेजारच्या घरात राहतो. काल मी माझ्या आईबरोबर तुमच्या घरी आले होते तेव्हा तु तुझ्या बाबांच्या बरोबर बाजारात गेला होतास त्यामुळे आपली भेट नाही झाली. पण तुझी आई भेटली. त्यांनी आमच्याशी खूप गप्पा मारल्या आणि तुझ्याबद्दल माहिती पुरवली.

मी: तरी पण मीच केदार हे तु कसे ओळखलेस? तु तर मला पाहीले नव्हतेस म्हणालीस ना? (माझा अतिहुशार प्रश्न!)

ती: स्मार्ट आहेस हा तु! (आपल्या स्तुतीने मी जरा सुखावलो). अरे तु परत आलास तेव्हा मी खिडकीतच होते आणि तु माझ्या समोरूनच गेलास तेव्हा मी तुला बघितले होते. तुझी आईच म्हणाली मला, की जरा लक्ष्य दे ग बाई! माझ पोरगं जरा धांदरट आहे. (जेवढी छाती फुगली होती तेवढी सगळी या वाक्याने खाली बसली)

मी: (स्वगत) आई पण ना!

ती: चल लवकर वर्गात जाऊ, सर येतीलच, आता पिरीयड सुरु होईल. उशीर झाला तर पहिल्याच दिवशी इम्प्रेशन खराब होईल तुझे!

मी: ५ वी अ (मी थोड्या गर्वाने सांगितले)

ती: (हसुन) हो माहित आहे मला, स्कॉलर! मी पण त्याच वर्गात आहे. चल लवकर.

मी पुरता ओशाळलो होतो. ही मुलगी काय फटाफट आपली विकेट घेत आहे! स्वतःशीच बडबडत मी गुमान तिच्या मागुन चालत वर्गात गेलो.

अशा रीतीने नयनाशी माझी पहिली भेट झाली. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने सगळी दंगामस्तीच सुरु होती. संध्याकाळी नयनाशी गप्पा मारत, रमत गमत मी घरी निघालो. गोरा रंग, नाजुक जिवणी, शेलाटा बांधा, तरतरीत नाक, डोळ्यात असणारी चमक, चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा उत्साह, ओठांवर सतत असणारे हसु, मोगऱ्याच्या कळयांसारखे दात आणि अविरत सुरु असलेली बडबड अशी ही नयना म्हणजे जणु एक चैतन्यच होते. नवीन जागी पहिल्याच दिवशी एक छान मैत्रीण मिळाली म्हणुन मी खुप खुश होतो. तिने घरी जायचा एक शॉर्टकट मला दाखवला. दुतर्फा झाडे असल्यामुळे ऊन अजिबात जाणवायचे नाही त्या रस्त्यावर! मस्त गार वारा पानांमधुन सळसळत जायचा तेव्हा शिळ घातल्यासारखा आवाज यायचा.

एकंदर शाळा आणि मोकळी ढाकळी नयना मला आवडली होती. आईने विचारले, ‘कसा गेला पहिला दिवस? आणि कशी वाटली शाळा’? मी हसुन म्हणालो, ‘छान आहे’ आणि खेळायला पळालो. नयनामुळे मला शाळेची, शिक्षकांची आणि शहराची खुप माहिती कळली. ती मुळची औरंगाबादची, तिचे वडील पोलिस इन्स्पेक्टर होते आणि आई गृहिणी होती. तिच्या घरी आई, बाबा, छोटा भाऊ विकी आणि नयना असे चौघे राहायचे. घरची परिस्थिती चांगली होती. सुखवस्तू कुटुंब होते. शाळेपासुन त्यांची क्वार्टर खूप दूर पडायची आणि ती त्यांना अपुरीही पडायची म्हणुन त्यांनी या कॉलनीत घर भाड्याने घेतले होते. नयना अभ्यासात हुशार होती पण इंग्लिशमध्ये कच्ची होती आणि मी गणितात त्यामुळे आम्ही एकत्रच अभ्यास करू लागलो. मी तिला इंग्लिशमध्ये मदत करायचो आणि ती मला गणितात. हळू हळू आमची खुप छान गट्टी जमली. कॉलनीत इतरही मुले होती पण जास्त करून आम्ही दोघच एकत्र खेळायचो. सुट्टीच्या दिवशी तर खाणे-पिणे, अभ्यास, मस्ती सगळे एकत्रच चालायचे, कधी तिच्या तर कधी माझ्या घरी. छोटी-मोठी भांडणे, अबोला, रुसवा - फुगवा आणि परत गोडी असे आमचे मस्त रुटीन सुरु होते. या सगळ्यात चार पाच वर्षे कशी गेली ते कळलेच नाही.

तरुणपणी माझे वडील ऑर्केस्ट्रामध्ये मुकेशची गाणी खुप छान गायचे. त्यामुळे घरचे वातावरण कलेला पोषक होते. ‘गवयाचे पोरगे सुरात रडते’ या चालीवर मला पण थोडा गळा लाभला होता. त्यांनी मला क्लासिकल गाण्याच्या शिकवणीला घातले मग सुरु झाली माझी गायनाकडे वाटचाल. गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला नेहेमी प्रोत्साहन मिळायचे, छोटी मोठी बक्षिसे पण मिळायची त्याने उत्साह वाढायचा. घरी कोणी आले की मग फर्माईश व्हायची, बाबांची दोन चार गाणी झाली की बाबा मला पण एखादे गाणे म्हणायला सांगायचे. मी आढेवेढे न घेता आणि न लाजता गाणी गायचो त्याचे त्यांना केवढे कौतुक! आलेल्या पाहुण्यात किंवा मित्रात तेवढीच त्यांची कॉलर टाईट व्हायची. मला गाताना नयना खिडकीतून बघायची आणि डोळ्यांनीच दाद द्यायची. आलेल्या लोकांच्या स्तुतीपेक्षा मला तिची दाद जास्त भावायची. नयनाला पण नृत्याची आवड होती आणि तिच्या आईने तिला नृत्याची शिकवणी लावली होती. जिथे कुठे कार्यक्रम असेल तिथे आम्ही आपापली कला सादर करायचो. असेच एकदा गणेशोत्सवात एका मंडळाने गाण्याच्या आणि डान्सच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि अर्थात आम्ही दोघांनी त्यात भाग घेतला होता. दहावीमुळे गणेशोत्सवाची सुट्टी फक्त गणेश चतुर्थीला आणि अनंत चतुर्दशीलाच होती. शाळेत दिवसभर एक्स्ट्रा क्लास असायचे. त्यातच वेळात वेळ काढुन स्पर्धेसाठी सराव करायचो. बँकेत सत्यनारायणाची पुजा असल्यामुळे बाबा रात्री तिकडेच थांबणार होते आणि नयनाचे वडील एक्स्ट्रा ड्युटीमुळे घरी नव्हते त्यामुळे आमच्या बरोबर विकी, काकु आणि माझी आई असे तिघेच येणार होते. लोकांच्या सततच्या वन्स मोअर मुळे स्पर्धा थोडी जास्त लांबली, शेवटचा पर्फोमंस झाला तेव्हा रात्रीचे २ वाजले होते. निम्म्याहून अधिक पब्लिक उशीर होत असल्यामुळे निघुन गेले होते त्यामुळे आयोजकांनी विजेत्यांच्या नावांची घोषणा आणि बक्षीस समारंभ दुसऱ्या दिवशी करायचे ठरवुन स्पर्धेची सांगता केली.

गणेशोत्सवामुळे रस्त्यावर वाहने चालवण्यास बंदी होती. त्यामुळे सर्व लोक गाड्या दूर लावून किंवा पायीच आले होते. मी, नयना, तिचा लहान भाऊ आणि आम्हा दोघांच्या मातोश्री असे पाच जण इतर लोकांसोबत घराकडे मार्गस्थ झालो. थोडे दूर चालल्यावर गर्दी विरळ होऊ लागली तसे मोती तलावाच्या बाजुने काही अंतर चालून उजवीकडे वळुन आम्ही घराकडे जाण्यासाठी एक शॉर्टकट पकडला. स्पर्धेसाठी नयना मस्त नटुन थटुन आली होती. काय गोड दिसत होती म्हणुन सांगु! तिने केसात माळलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुगंध येत होता आणि तिच्या पायातील चाळ छन्‌ छन्‌ आवाज करत शांततेला चिरत होते. थोडे पुढे गेल्यावर आम्ही पिंपळाच्या पाराला वळसा घालुन डावीकडे वळलो तसा वातावरणात एकदम बदल झाला, अचानक थंडी वाजू लागली. तेवढ्यात नयना कशाला तरी अडखळली, ती तोल जाऊन पडणार एवढ्यात मी तिला पकडली, पण तिच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागलीच, आणि त्यातुन रक्त वाहू लागले. बिचारी नयना कळवळली म्हणुन मी किती लागलंय ते पाहायला टॉर्च तिच्या पायाकडे वळवली. अचानक थंड वाऱ्याचा झोत आमच्या पायातून वेगाने निघुन गेला. त्याने आम्ही सर्वच जण पुरते शहारलो. तो वारा जरा विचित्रच वाटला. क्षणभर विचार करून मी परत एकदा टॉर्च नयनाच्या दुखऱ्या अंगठ्याकडे फिरवली आणि माझ्या तोंडातून आश्चर्योद्गार निघाले, ‘अरेच्या असे कसे झाले’! ते ऐकून आईने मला विचारले की, ‘काय झाले रे! खुप लागलंय का तिला’? त्यावर मी तिला म्हणालो, ‘पायाला जखम झाली आहे आणि मी रक्त वाहताना पण पाहीले होते पण मगाशी पायाजवळुन तो वारा गेला ना त्यानंतर आत्ता बघतोय तर जखम तर दिसतेय पण रक्त अजिबात नाही जणु कोणी तरी पुसल्यासारखे गायब झालय’. मी एवढे म्हणतोय तोच नयना मटकन खाली बसली म्हणाली, ‘मला चक्कर येतेय’. माझी आई काय ते समजली. पटकन नयनाला वॉटर बॉटल मधले पाणी पाजले आणि मुळ्ये काकुंना म्हणाली की, ‘वाहिनी पटकन नयनाचे चाळ पायातून काढून पिशवीत भरा आणि तिच्या केसातील तो गजरा पहिला काढून फेका. आपण नयनाला दोन्ही बाजुने धरू आणि पटकन घरी जाऊ, तसेही घर जवळच आलंय’. आई इतकी घाई का करतेय हे काकुंना न कळल्यामुळे त्या तिला विचारू लागल्या की ती असे का म्हणतेय तेव्हा आईने सर्व काही घरी गेल्यावर सांगते आधी लवकर घरी चला. आईच्या आवाजातील बदल काकुंना जाणवला त्यामुळे पुढे फार काही न बोलता त्यांनी नयनाच्या पायातील चाळ पटकन काढुन पिशवीत भरले आणि गजरा काढुन रस्त्याच्या कडेला गटारात टाकुन दिला. नंतर आम्ही सर्व लगबगीने आमच्या घरी आलो.

नयनाला दारातच थांबवून आई पटकन घरात गेली आणि मीठ, मोहऱ्या आणि सुक्या लाल मिरच्या दोन्ही मुठीत घेऊन आली. काही तरी पुटपुटत ते सर्व तिने नयनाच्या डोक्यापासून पायापर्यंत तीन वेळा फिरवले आणि आत घेऊन गेली. गॅसवर तवा तापत ठेवला होता त्यावर ते सर्व तिने टाकले त्यासरशी चर चर आवाज करत त्याला धुर सुटला आणि एकच दुर्गंधी उठली. इतकी की ती सहन होईना म्हणुन किचन मधील एक्झोस्ट फॅन लावावा लागला तरी बराच काळ ती दुर्गंधी घरात जाणवत होती. नंतर तिने देवघरातील उदबत्तीची राख अंगाऱ्यासारखी नयनाच्या कपाळाला लावली. मुळ्ये काकु हे सर्व बघत होत्या. त्यांना हे सगळे नवीन होते. इतका वेळ दाबून ठेवलेली उत्सुकता त्यांना स्वस्थ बसू देईना पण त्यांना हे माहित होते की माझी आई जे काही करतेय ते नयनाच्या काळजीनेच तेव्हा तिला डिस्टर्ब न करायचे त्यांनी ठरवले. नंतर वाहिनी काय ते सांगतीलच असा विचार करून त्या गप्प बसल्या. हे सर्व चालु असताना माझी नजर नयना कडे गेली तसा मी दचकलोच, नयनाचे डोळे लाल भडक झाले होते जणु त्यातुन अंगार बरसत होता. माझ्या आईकडे ती खाऊ की गिळु अशा नजरेने बघत होती. क्षणभर वाटले की ही आमची नयना नव्हेच दुसरीच कोणी तरी आहे. छोटा विकी आपल्या बहिणीकडे आणि माझ्या आईकडे आलटून पालटून पाहात होता, नक्की काय सुरु आहे ते न समजल्यामुळे बिचारा भेदरला होता. आईने देवघरातल्या कलशातील पाणी प्यायला दिले. पण ते पोटात जाते न जाते तोच नयनाने उलटी करून काढुन टाकले आणि तिच्या तोंडातून रक्त देखील आले तेव्हा आई घाबरली परत लगबगीने किचन मध्ये जाऊन ती खडामीठ दोन्ही मुठीत घेऊन आली आणि नयना वरून मघाचच्यासारखेच पण ७ वेळा फिरवुन संडासात टाकुन फ्लश करून आली. त्यानंतर हळू हळू नयना शांत झाली. बसल्या जागेवरच ती झोपी गेली तेव्हा नयनाच्या अंगठ्यावर बॅन्डेड पट्टी लावली आणि तिला उचलुन बेडरूम मधील पलंगावर झोपवुन आई आणि काकु बाहेर आल्या.

शेवटी मुळ्ये काकुंनी आईला विचारलेच की, “मगाशी घरी येताना तीने नयनाच्या पायातील चाळ काढुन पिशवीत ठेवायला आणि गजरा काढुन टाकायला का सांगितले आणि आता घरी आल्यावर तुम्ही जे सर्व करत होतात ते कशासाठी? नयनाला काही झालाय का”? तेव्हा आई त्यांना म्हणाली की ‘‘नयना आता वयात आली आहे. एकतर आज एवढी रात्र झालेली त्यात तिने केसात गजरा माळला होता आणि पायात चाळपण बांधले होते. त्यामुळे तिच्याकडे एखादी अमानवी शक्ती आकृष्ट होऊ शकली असती. माझ्या हे आधीच लक्षात यायला हवे होते पण गप्पांच्या नादात आलेच नाही. जेव्हा पिंपळाजवळ नयनाला ठेच लागली आणि केदार म्हणाला की तिच्या अंगठ्याला जखम तर दिसतेय पण रक्त कोणी तरी पुसल्यासारखे दिसतंय तेव्हा मला हे एकदम लक्षात आले आणि मी तुम्हाला घरी चालण्यासाठी घाई केली. घरी जेव्हा मी तव्यावर मीठ मोहरी आणि लाल सुकी मिरची टाकली तेव्हा दुर्गंधी सुटली होती आठवतंय? त्याचे कारण नयनाला कोणाची तरी नजर लागली होती. आज स्पर्धेत ती खुप सुंदर दिसत होती. शेजारी बसलेल्या बायका पण बोलताना मी ऐकल की किती सुंदर आहे ही मुलगी, कोणाची आहे बरं?

तेव्हाच मनात विचार आला की घरी गेल्यावर पहिल्यांदा हिची दृष्ट काढायला सांगेन तुम्हाला”. काकु आ वासुन माझ्या आईकडे पाहताच बसल्या. नंतर आई म्हणाली की “नयनाला देवघरातील कलशातील पाणी पाजले तेव्हा ते तिने ओकुन टाकले आणि माझ्यावर तिचा एवढा जीव आहे; सारखी काकु काकु करत माझ्या अवती भवतीच असते पण आज ती माझ्याकडे कशी बघत होती ते तुम्ही पाहिलत ना? तेव्हाच मला शंका आली म्हणुन मी खडा मीठ दोन्ही मुठीत धरून तिच्यावरून ७ वेळा ओवाळून संडासात फ्लश केले जेणेकरून तिला काही बाधा झाली असेल तर निघुन जावी. मी तसे केल्यावर पाहीलंत ना ती कशी शांत झाली ते’’? हे सर्व ऐकुन काकूंच्या डोळ्यात टचकन पाणी आले. “कोण कुठची बाई, आपली ओळख ना पाळख पण शेजारी म्हणुन एकत्र आलो काय आणि आज आपल्या मुलीच्या काळजीने एवढे सोपस्कार ती करतेय काय”! याचे त्यांना कौतुक वाटले. आईला मिठी मारून त्या रडु लागल्या. आईने मायेने त्यांच्या पाठीवर हात फिरवून त्यांना प्रथम रडु दिले आणि नंतर त्यांचा भर ओसरल्यावर म्हणाली, “नयना मला माझ्या मुली सारखीच नाही का? आता सर्व ठीक आहे. तुम्ही आज इथेच झोपा, सकाळी बघु काय ते”.

निजानीज झाली, तास दोन तास झाले असतील आणि एकदम थंडी भरून आली आणि माझे अंग शहारले. पायावरचे पांघरून मी अंगावर ओढुन घेतले. मगाशी पिंपळाजवळ जसे वातावरण एकदम थंड झाले होते तसेच आता पण जाणवत होते. थंडीने अंगावर काटा आला. मुळ्ये कुटुंबाला नवीन जागी रात्रीचे सोयीचे जावे म्हणुन आईने मंद प्रकाश असणारा झिरोचा बल्ब सुरूच ठेवला होता. नयनाचा विचार मनात आल्यामुळे मी सहज तिच्याकडे बघितले तर माझ्या अंगाचा थरकाप उडाला. तिच्या पायाजवळ काही तरी होते, काही तरी विचित्रच, थोडेफार माणसाच्या शरीरासारखे पण ना धड आकार होता ना चेहरा. हवेत अधांतरी तरंगत असलेल्या काळ्या ढगासारखे ते दिसत होते आणि त्याचा तोंडासारखा भाग नयनाच्या पायाला चिकटला होता. मी उठुन बसलो आणि त्या आकाराकडे पाहु लागलो तसे त्या आकाराने माझ्याकडे पाहिल्यासारखे मला वाटले. त्याचे तोंड आता नयनाच्या पाया पासुन दूर झाले होते आणि ते आता माझ्याकडेच पाहात होते. माझ्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकु येत होती, इतक्या वेगात ते धडधडत होते. काही क्षण असेच गेले आणि डोळ्याचे पाते लावते न लावते तोच तो काळा आकार अत्यंत वेगाने माझ्या डोक्यावरून उघड्या खिडकीच्या दिशेने जात खिडकीतून बाहेर निघुन गेला आणि एकदम खोलीतील वातावरण नॉर्मल झाले. मला दरदरून घाम फुटला होता. अंगातील बनियन पूर्ण ओली झाली होती. तो सगळा प्रकार पाहुन माझी दातखीळीच बसली होती. त्याही अवस्थेत माझी नजर नयनाकडे गेली, तिचा चेहरा पांढरा फाटक पडला होता जणु तिच्या शरीरातील रक्तच गायब झाले होते. बराच वेळ मी तसाच अंथरुणात बसून होतो. तहानेने माझा घसा कोरडा पडला होता पण उठुन किचन मध्ये जायची काही माझी हिम्मत होईना. आईला उठवावेसे वाटले पण ती एकदम गाढ झोपली होती आणि ‘मला भीती वाटतेय, किचन मध्ये पाणी प्यायला माझ्या बरोबर चल’ असे सांगायला मला शरम वाटली म्हणुन शेवटी तहान असह्य झाल्यावर मी हळू हळू भिंतीला घासत किचन पर्यंत गेलो आणि लाईट लावला. किचन मध्ये सर्व कोपरे, भिंती बराच वेळ नीट निरखुन पहिले आणि कोणी नाही याची खात्री झाल्यावर मगच जाऊन पाणी प्यायलो. पाणी प्यायल्यावर लाईट बंद करून धावतच बेडरूम मध्ये घुसलो आणि अंथरुणात शिरून डोक्यावरून पांघरून घेऊन पडून राहिलो. झाला प्रकार सारखा डोळ्यासमोर येत होता. कुशीवर वळायची पण भीती वाटत होती त्यामुळे तसाच शवासनात पाठ जमिनीला घट्ट लावुन किती तरी वेळ पडून होतो. नंतर कधी तरी मला झोप लागली.

सकाळी सगळेच जरा उशिराच उठले. १० वाजता आईने मला हलवुन हलवुन जागे केले तेव्हा मी प्रचंड दचकुन उठलो. मी खुप घाबरलो होतो. आईला वाटले स्वप्न पडले असेल पण मी काहीच बोललो नाही. रात्रीच्या प्रकाराबद्दल सांगु की नको तेच कळत नव्हते. मला भास तर झाला नव्हता? मी स्वतःशीच विचार करत होतो, पण मी तर चक्क जागा होतो आणि स्वतःच्या डोळ्यांनी मी ते अभद्र, अमंगल आणि अमानवीय बघितले होते, तो भास खचितच नव्हता. शेवटी मी खरे काय ते कळल्याशिवाय कोणाला काही न सांगण्याचा निर्णय घेतला. अंथरुणातून उठुन नयना कुठे दिसते का म्हणुन तिला शोधू लागलो तर ती, काकु आणि विकी त्यांच्या घरी गेल्याचे आईने सांगितले. नयना शाळेत आज येणार नव्हती असे कळले त्यामुळे मी थोडा हिरमुसलो. मी पटकन आवरून तयार झालो आणि जाता जाता नयनाची विचारपूस करून पुढे जावे असा विचार केला पण शाळेला उशीर होत असल्यामुळे संध्याकाळी घरी आल्यावर तिला भेटायचे ठरवले. मी सायकलला टांग मारली आणि शाळेकडे सरसरत निघालो. दिवसभर शाळेत माझे मनच लागत नव्हते. सतत नयनाची आठवण येत होती, रात्रीचा तो प्रकार पहिल्या पासून तिची खूपच काळजी वाटत होती. तिच्याबाबतीत काहीतरी भयंकर घडणार असे माझे मन सारखे सांगत होते. नयनाच्या विचारात वर्गात माझे लक्ष नसल्यामुळे चार पाच वेळा ओरडा पण खाल्ला त्यामुळे कधी एकदा क्लास संपतो आणि घरी जाऊन नयनाला भेटतो असे मला झाले होते. शाळा सुटल्याची घंटा वाजताच धावतच मी सायकल स्टॅंडकडे गेलो व सायकल दामटत घरी आलो. दप्तर तसेच बेडवर टाकुन मी नयनाच्या घरी पळालो.

मला पाहताच काकु म्हणाल्या, ‘बरं झाले तु आलास, घरातले पीठ संपलय आणि मला जरा दळण आणायला जायचं आहे. रात्री काका घरी आले तर पोळ्या करायला पीठच नाही आहे. अरे हो! सांगायचे विसरलेच, आज नयनाला तपासायला डॉक्टर आले होते. ते म्हणाले की तिच्या शरीरात रक्ताची खुप कमी झाली आहे आणि त्यामुळे ती अशक्त झाली आहे. तिला सकस आहार, हिरव्या पालेभाज्या, गाजर, काकडी बीट सारखे सलाड आणि डाळिंब खायला द्या ती ठीक होईल; काळजी करू नका. तु जरा नयना जवळ थांब. ती आत झोपली आहे, मी आलेच’. मला पाणी देऊन, काकु दळण आणायला निघुन गेल्या. पाणी घटाघटा पिऊन मी नयनाला बघायला तिच्या रूमकडे धावलो आणि रूमच्या दारातच थबकलो. आदल्या रात्री दिसलेला तो काळा आकार आता पण तिच्या पायाजवळ होता. मी दरवाज्यात थबकताच त्या आकाराने माझ्याकडे पहिले. यावेळी ते माझ्याकडे रागाने पाहात आहे असे मला वाटले. पुढच्याच क्षणाला ते जे काही होते ते नयनाच्या पायापासून दूर झाले आणि वेगाने माझ्याकडे झेपावले त्याबरोबर अडखळून मी मागच्या मागे जमिनीवर पडलो. चांगलाच आपटलो होतो. माझे दोन्ही कोपरं आणि डोके दाणकन जमिनीवर आदळले होते. माझ्या अंगावरून तो काळा आकार वेगाने निघुन गेल्याचे पडताना मला जाणवले. मी उठुन डोके चोळत नयनाच्या रूममध्ये आलो तर दोन्ही खिडक्या बंद होत्या. कदाचित म्हणुनच तो आकार माझ्यावर चाल करून आला होता आणि दरवाज्यातुन बाहेर निघुन गेला. मी नयना जवळ गेलो तर ती झोपेत होती. एका रात्रीत तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे बनली होती, चेहरा पांढरा फटक पडला होता आणि ती खुप कृश वाटत होती. तिची अवस्था बघुन मला खुप वाईट वाटले. मी तिच्या जवळ बसलो आणि तिचा हात हातात घेतला तर तिचे शरीर एकदम थंड पडले होते. त्यात उबदारपणा बिलकुल जाणवत नव्हता. मी तिला हाक मारली तसे मोठ्या कष्टाने तिने डोळे उघडले. मला पाहुन कसेनुसे हसली आणि खोल गेलेल्या आवाजात म्हणाली, ‘स्पर्धेचा रिझल्ट काय लागला’? माझ्या डोळ्यातुन घळा घळा पाणी वाहु लागले, माझा बंध फुटला आणि मी ओक्साबोकशी रडू लागलो. तिची ती अवस्था माझे काळीज पिळवटून टाकत होती. मला रडताना पाहुन तिचे पण डोळे भरून आले. म्हणाली, ‘अरे वेड्या रडतोस काय असा? मुलगा आहेस ना तु! मुलं अशी रडतात का मुलींसारखी’? त्याही परिस्थितीत ती मला हसवायचा प्रयत्न करत होती. पुढच्या क्षणाला मी डोळे पुसले आणि मनाशी ठरवले की या प्रकरणाचा लवकरच छडा लावायचा आणि नयनाला यातुन वाचवायचे.

माझी नजर तिच्या अंगठ्याकडे गेली, तिची जखम अजुन ओली होती. पण रक्त बिलकुल नव्हते. अचानक माझ्या डोळ्यासमोरून आदल्या रात्रीपासून आत्तापर्यंतचा सर्व प्रसंग तरळुन गेला. नयनाला ठेच लागल्यानंतर रक्त वाहताना मी स्वतः पहिले होते पण तो अनैसर्गिक वारा पायातून गेल्यानंतर वाहणारे रक्त गायब होते. घरी आल्यापासून दोन वेळा तो अभद्र काळा गोळा तिच्या पायालाच चिकटलेला दिसला. नयना खुप अशक्त आणि सुकल्यासारखी दिसत होती, तिचा चेहरा पांढराफटक दिसत होता जणु तिच्या शरीरातील रक्त कमी कमी होत चालले आहे. हा विचार मनात येताच मला लिंक लागली. जो काळा गोळा मला दोन वेळा दिसला ते नक्कीच काहीतरी अमानवीय आहे आणि नयनाच्या शरीरातील रक्त कमी होण्याशी त्याचा नक्कीच काही तरी संबंध आहे हे माझ्या ध्यानात आले. अरे हा! डॉक्टरांनी पण सांगितलेच की, की तिच्या शरीरात रक्त खुप कमी झालय म्हणुन. काल तर नयनाला, तु खुप छान दिसतेस असे मी म्हटल्यावर ती मस्त लाजली होती आणि तिचा चेहरा किती आरक्त झाला होता! असे अचानक कसे काय रक्त कमी होऊ शकते? ते जे काय अमानवीय नयना भोवती घुटमळतय ते नयनाचे रक्त तर पीत नाही ना? त्या विचारासरशी माझ्या मणक्यातुन एक थंड शिरशिरी गेली. जर माझी शंका खरी असेल तर नयना फार दिवस वाचणार नाही, काही तरी लवकरच करायला पाहिजे हे माझ्या ध्यानात आले. काकु आल्या तसे मी नयनाला म्हणालो, ‘तु काळजी करू नकोस मी तुला काही होऊ देणार नाही’. धावतच मी घरी गेलो आणि देवघरात जाऊन आईने शेगावहून आणलेला गजानन महाराजांचा अंगारा घेऊन नयनाच्या घरी परत आलो. तो अंगारा नयनाच्या कपाळावर लावला आणि थोडा पायाच्या अंगठ्यावर पण लावला. काकु म्हणाल्या, ‘अरे, अंगारा पायाला लावते का कोणी’? मी म्हणालो, ‘असु देत. महाराज सर्व जाणतात ते नाही रागावणार’. काकु हसल्या आणि म्हणाल्या, ‘किती काळजी करतोस रे तिची! अरे तिला काही नाही झालंय. ती लवकरच बरी होईल बघ’. माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून त्या किचनमध्ये गेल्या. मनाशी काही ठरवून मी नयनाचा निरोप घेऊन घरी गेलो.

दुसर्‍या दिवशी सकाळी मी लवकर उठुन नयनाच्या घरी गेलो. ती शांत झोपली होती, तिच्या चेहऱ्यात थोडा फरक पडला होता. मी परत तिच्या कपाळावर आणि अंगठ्यावर थोडा अंगारा लावला. आपली आयडिया यशस्वी झाली याचा मला आनंद वाटला. मी तिथुन निघणार एवढ्यात मला परत तो अनैसर्गिक थंडावा जाणवु लागला. नीट निरखुन पहिले असता रूमच्या एका कोपर्‍यात तो काळा अभद्र आकार मला दिसला. तो एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यात वेगाने हलु लागला जणु काय रागाने येरझाऱ्या घालतोय. मधेच तो आकार वेगाने माझ्याकडे झेपावला त्यासरशी मी दोन्ही हात चेहऱ्यासमोर क्रॉस धरले आणि माझ्या हातातल्या पुडीतील थोडा अंगारा सांडला. त्यासरशी तो काळा गोळा अंगावर अ‍ॅसिड पडल्यासारखा किंचाळत दरवाज्याकडे वेगाने गेला. बाहेर पडताना माझ्या कानावर शब्द आले, “तु तिला वाचवु शकणार नाहीस”. आता मला खात्री पटली की माझी शंका खरी ठरत होती. त्या पिंपळापाशी त्यानेच नयनावर हल्ला केला होता आणि ते रक्त गायब झाले नव्हते तर त्यानेच ते प्यायले होते यात आता यत्किंचीतही शंका उरली नव्हती. नयनाच्या रक्तासाठीच तो तिच्या मागावर आला होता. काल गजानन महाराजांचा अंगारा लावल्यामुळे तो नयनाचे रक्त पिऊ शकला नव्हता. दोन वेळा माझ्यामुळेच त्यांच्या रक्त पिण्यात व्यत्यय आला होता आणि म्हणुनच आज त्याने माझ्यावर हल्ला केला होता पण मी बचावासाठी हात आडवे धरले आणि तो अंगारा त्याच्यावर सांडला होता आणि त्या अंगऱ्यामुळेच आज मी वाचलो होतो.

मी धावत घरी गेलो आणि आईला म्हणालो की मला कळलंय नयनाला काय झालंय ते. आईने मला प्रथम शांत होण्यास सांगितले. मी आईला रात्री पिंपळापासुन सुरु झालेले आणि आता माझ्यावर झालेल्या हल्ल्यापर्यंत सर्व काही एका दमात सांगुन टाकले. सर्व ऐकल्यावर आईने क्षणभर विचार केला आणि मग माझ्या धाकट्या मामाला रत्नागिरीत फोन केला. त्याला सर्व काही सांगितले, बराच वेळ ती फक्त ऐकत होती आणि नंतर हो म्हणुन तिने फोन ठेवला. माझ्या बाबांचा भुता-खेतांवर विश्वास नसल्यामुळे आईने सर्व काही स्वतःलाच करावे लागेल हे ताडले. ती मला सोबत घेऊन तडक मुळ्ये काकुंकडे आली. तिने त्यांना मामाशी झालेले सर्व बोलणे सांगितले. नयनाच्या जीवाला धोका आहे हे ऐकुन काकुंच्या पायातील शक्ती गेल्या सारख्या त्या मटकन खालीच बसल्या, तेव्हा आईने त्यांना ही धीर सोडायची वेळ नसुन कृती करायची आहे हे समजावले. आपल्याला घाई करावी लागेल नाहीतर पोरगी हातची जाईल असे म्हणताच काकुनी स्वतःला सावरले. काका ड्युटीवर गेले असल्यामुळे ते येईपर्यंत थांबण्या इतका वेळ नव्हता. मग नयनाला रिक्षात घालुन आम्ही सगळे शहराबाहेरील एका दर्ग्याकडे रवाना झालो.

तेथे पीरबाबा आमची वाटच पाहत होते. मामाने त्यांना फोन करून सांगितल्यामुळे ते तयारीतच बसले होते. दर्ग्यावर पोहोचताच प्रथम त्यांनी सर्वांना पाय धुवून येण्यास सांगितले. नंतर त्यांनी नयनाला एका हिरव्या कपड्यावर बसवले व कसले तरी पाणी पिण्यास दिले त्यानंतर ते मोरपिसांच्या पंख्याने नयनाच्या डोक्यावर हलकेच मारू लागले आणि उर्दूत काही मंत्र म्हणू लागले. नंतर त्यांनी त्यांच्या शिष्यास इशारा केला आणि त्याने एक कोहळा नयनासमोर ठेवला. पीर बाबांनी नयनाला प्यायला दिलेल्या पाण्यापैकी उरलेले पाणी त्या कोहळ्याच्या तोंडाला छोटे भोक पाडुन आत सोडले त्यानंतर डोळे मिटुन काही अज्ञात मंत्र म्हणु लागले आणि काय आश्चर्य त्या कोहळ्याला पडलेले भोक आपोआप बुजले. नंतर पीरबाबांनी मंत्र म्हणत आपल्याकडील कटयारीने त्या कोहाळ्यावर एक हलका वार केला आणि आम्ही पाहताच राहीलो त्या चिरे मधून रक्त वाहू लागले. पीरबाबा आता त्या रक्तपिशाच्चाचे आवाहन करू लागले. थोड्याच वेळात तो अभद्र अमंगल काळा ढग तेथे उत्पन्न झाला. नयना आणि माझ्याकडे बघत हवेत तरंगत कोहळ्याच्या दिशेने जाऊ लागला. कोहळ्या जवळ जाताच त्यातून वाहणाऱ्या रक्ताला त्याने तोंड लावले आणि ते रक्त पिऊ लागला. थोड्याच वेळात त्या काळ्या ढगाला एक आकार प्राप्त झाला. ते भयानक पिशाच्च पाहुन सर्वांची भीतीने गाळण उडाली. नयनाला तर भोवळच आली पण पीर बाबांनी सर्वांना न घाबरण्यास सांगितले आणि ते म्हणाले की पिशाच्च त्यांच्या हद्दीत आले आहे त्यामुळे ते कोणालाच त्रास देऊ शकणार नाही. हे ऐकल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. तरीही त्या अक्राळ विक्राळ पिशाच्चाकडे पहायची आमची हिंमत होत नव्हती. पुढच्या क्षणाला ते पिशाच्च भयाकारी चित्कारू लागले त्याच्या आवाज इतका कर्कश्य होता की कानाचे पडदेच फाटतात की काय असे वाटू लागले. पिरबाबांचे मंत्र सुरूच होते. आता ते पिशाच्च भेसूर रडू लागले, त्याचे रडणे आता पराकोटीला पोहोचले होते आणि एखादा स्फोट झाल्यासारखे ते हवेत नष्ट झाले. इकडे कोहळ्याचे तुकडे तुकडे झाले होते. पीर बाबांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले होते. ते म्हणाले की ते पिशाच्च नष्ट झाले आहे आता नयनाच्या जीवाला धोका उरला नाही.

ते ऐकून सगळ्यांना समाधान वाटले. नयना अजून बेशुद्धच होती. पीर बाबांनी थोडे पाणी मंत्रून तिच्यावर शिंपडले तशी ती शुद्धीवर आली. काकुंनी तिला छातीशी कवटाळले. त्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहात होते. नयनाचा जीव वाचला होता. अजुन काही दिवस गेले असते तर त्या पिशाच्चाने सर्व रक्त शोषुन नयनाचा जीव घेतला असता. भावनांचा भर ओसरल्यावर काकुंनी माझ्या आईचे पाय धरले, त्यांना अडवत आई म्हणाली, “अहो वहिनी हे काय करताय”? “आज तुमच्या मुळेच माझी पोरगी वाचली, तुमचे उपकार मी कसे फेडु तेच कळत नाही” काकु डोळ्यांना पदर लावत म्हणाल्या. तेव्हा आई म्हणाली,' “मी काहीच केलेले नाही, जर का केदारने हे सर्व पाहुन वेळेत मला सांगितले नसते तर आज कदाचित आपण नयनाला गमावून बसलो असतो”. ते ऐकताच काकुंनी मला प्रेमाने जवळ घेतले, आम्ही सर्वच भाऊक झालो होतो. पीरबाबांनी एक ताईत नयनाच्या गळ्यात बांधण्यास दिला आणि सोबत एका पुडीत थोडा अंगारा पण दिला रोज लावायला. पीर बाबांचे उपकार मानून दर्ग्यावर काकांच्या हस्ते चादर चढवायचे कबुल करून आम्ही तेथुन घराकडे निघालो.

- केदार कुबडे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.