प्रतिशोध - मराठी भयकथा

प्रतिशोध, मराठी भयकथा - [Pratishodh, Marathi Bhaykatha] आपल्या मुलाचा विश्वासघाताने खून करवणाऱ्या त्याच्या मित्राचा, आपल्या मुलाच्या आत्म्याला साहाय्य करुन सुड घेणाऱ्या भगवानदासांची कहाणी म्हणजेच प्रतिशोध.

आपल्या मुलाचा विश्वासघाताने खून करवणाऱ्या त्याच्या मित्राचा, आपल्या मुलाच्या आत्म्याला साहाय्य करुन सुड घेणाऱ्या भगवानदासांची कहाणी म्हणजेच प्रतिशोध.

कृपया प्रतिशोध ही भयकथा वाचण्याआधी ‘सुड’ ही भयकथा वाचावी ही वाचकांना नम्र विनंती जेणेकरुन संदर्भ लागणे सोयीचे होईल.

गोपाळरावांच्या मृत्युची बातमी भगवानदास आणि कुटुंबियांना आंतर्बाह्य हलवून गेली. कितीही बिघडला तरी आपले संस्कार आपल्या मुलाला एक ना एक दिवस योग्य मार्गावर आणतील अशी भगवानदासांना खात्री होती पण गोपाळरावांच्या मृत्युच्या बातमीने त्यांच्या या विश्वासालाच सुरुंग लागला होता. भगवानदासांच्या खापर पणजोबांपासून सर्वजण दिर्घायुष्य भोगुन गेले होते त्यामुळे आपल्या पंचविशीतील एकुलत्या एक मुलाचा मृत्यु तोही हृदयविकाराच्या झटक्याने व्हावा हे जरी पोस्टमॉर्टम चा रिपोर्ट सांगत असला तरी भगवानदासांच्या काळजाला ते पटणे अशक्य होते. कुठे तरी पाणी मुरतंय हे त्यांचे मन ओरडून ओरडून सांगत होते.

इकडे गोपाळरावांच्या पत्नीची अवस्था तर फार बिकट झाली होती. पतिच्या मृत्युवर रडावं की नियतीच्या क्रुर चेष्टेवर हसावं हेच तिला कळत नव्हतं. तिच्या पदरात तीन वर्षांचा लहानगा रोहित आणि सगळ्या जवाबदाऱ्या टाकून तिचा नवरा निघुन गेला होता. ज्या मुलीने संसाराची रंगीबेरंगी आणि मखमली स्वप्न पहायची तिच्या नशीबात विधवेची बेरंगी साडी यावी याहुन दुसरा दैवदुर्विलास तो कोणता? शुन्यात नजर लावून बसलेल्या आपल्या पांढऱ्या कपाळाच्या सुनेला पाहीले की भगवानदासांना कोणीतरी सणसणीत चपराक लगावल्यासारखे वाटे. जणू तिची ती भकास नजर ओरडून ओरडून सांगतेय की, “तुम्ही मारलत माझ्या नवऱ्याला, वडीलकीच्या नात्याने त्यांना वाऱ्यावर न सोडता योग्य मार्गावर आणले असतेत तर आज हा दिवस पहावा लागला नसता”.

गोपाळरावांच्या अंत्ययात्रेला सारा गाव लोटला होता. लोक भगवानदासांच्या तरण्या ताठया मुलाच्या अकाली मृत्युमुळे खुप हळहळत होते. त्यांना सहानुभुती देत होते. भगवानदासांनी भरल्या डोळ्यांनी गोपाळरावांच्या चितेला भडाग्नि दिला. मुलाने त्यांना अग्नी देण्याऐवजी, आपल्याच मुलाला अग्नी देणे त्यांच्या नाशिबी आले होते. आज त्यांच्याएवढा दुर्दैवी बाप जगात दुसरा कोणीही नव्हता. पिंडाला काही केल्या कावळा शिवेना. गोपाळरावांच्या आवडत्या वस्तु ठेवल्या, तुझ्या बायको मुलाचा सांभाळ करू, त्यांना अंतर देणार नाही, हे ही सांगुन झाले पण व्यर्थ. वाट पाहुन सर्वच वैतागले, शेवटी दर्भाचा कावळा करुन पिंडाला शिववला. घरातील सुतकी वातावरण जीव नकोसा करुन टाकत होते, पण कोणाच्या जाण्याने आयुष्य थोडेच थांबते? नाशिबाला दोष देत सुन आणि सासरे छोट्या रोहितकडे पाहुन गोपाळरावांच्या आठवणींसोबत आयुष्य कंठायच्या तयारीला लागले.

[next] काही महिने गेल्यावर सर्वजण थोडे सावरतात तोच एक दिवस दुपारी रोहितच्या खोलीतून हसण्या खिदळण्याचे आवाज ऐकुन गोपाळरावांच्या पत्नी राधाबाई बेडरूमच्या दारातून आत डोकावल्या आणि जागीच थबकल्या. रोहित हवेत अधांतरीच वर खाली होत होता जणू कोणी त्याचे हात धरले होते आणि पाठीवर झोपुन त्याला आपल्या पायांवर उभे करुन हवेत उडवत होते. रोहितचे असे हवेत तरंगणे पाहुन राधाबाई मोठ्याने ओरडल्या, “रोहित”! त्याबरोबर रोहितचे हवेत वर खाली होणे थांबले आणि तो धावत जाऊन आईला बिलगला. त्याला पटकन उचलुन घेऊन राधाबाई किचनमध्ये पळाल्या. रोहितवरून मीठ मोहरी काढुन त्याला छातीशी धरून त्या बाहेरच्या खोलीत आल्या. झाल्या प्रकाराने त्या खुप घाबरल्या होत्या. रोहितच्या काळजीने त्या माऊलीचा जीव बेचैन झाला होता. सोफ्यावर बसवुन त्यांनी रोहितला कोणाशी खेळत होतास असे विचारल्यावर तो म्हणाला, “पप्पांशी”! तशी एक थंड शिरशिरी तिच्या पुर्ण शरीरातून दौडत गेली.

रात्री जेवण झाल्यावर त्यांनी झालेला सर्व प्रकार आपल्या सासऱ्यांना सांगितला. ते ऐकुन भगवानदास म्हणाले, “म्हणजे मला झालेला तो भास नव्हता तर, गोपाळ खरच आला होता”! ते काय म्हणतात ते न समजल्याने राधाबाई त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागल्या. ते लक्षात येताच भगवानदास सांगु लागले, गेले काही दिवस रोज मला एकच स्वप्न पडतंय. स्वप्नात मला माझा गोपाळ, “बाबा मला वाचवा” असे ओरडत जमिनीवर हात पाय बांधलेल्या अवस्थेत पडलेला दिसतो. तो कशाला तरी खुप घाबरलेला असतो. अचानक कोणी तरी त्याचा गळा दाबल्यासारखा तो तडफडु लागतो. त्या पकडीतून सुटायचा तो खुप प्रयत्न करतो पण त्या शक्तिपुढे त्याची ताकद तोकडी पडते. त्याचा श्वास उखडू लागतो आणि काही क्षणात त्याची धडपड थांबते. एक शेवटचा आचका देऊन त्याचे शरीर निष्प्राण होते”. क्षणभर भयाण शांतता पसरते आणि त्या स्तब्ध वातावरणात भगवानदासांचे कातर शब्द घुमतात. “माझे लेकरु माझ्याकडे आपला जीव वाचवण्यासाठी विनवणी करत असते आणि मी त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही”. राधाबाई आणि भगवानदास दोघांच्याही डोळ्यातून अश्रुंचे पाट वाहू लागतात.

दु:खाचा भर ओसरल्यावर भगवानदास म्हणाले, “परवा रात्री हेच स्वप्न पडल्यावर मी जागा झालो तर माझ्या पायांवर हातांचा स्पर्श मला स्पष्ट जाणवला जणू कोणी माझे पाय चेपत होते. उठून पाहीले तर कोणीच नव्हते. इतक्यात मला माझ्या खोलीचा दरवाजा उघडुन कोणीतरी बाहेर गेल्यासारखे वाटले म्हणुन मी कोण आहे ते बघायला बाहेर आलो तर हॉलमध्ये मला गोपाळ ऊभा असल्यासारखे वाटले, मी पुढे गेलो तसा तो किचन मध्ये गेला त्याच्या मागोमाग मी ही किचनमध्ये गेलो तर तिथे कोणीच नव्हते. मला भास झाला असेल असे वाटुन मी परत माझ्या खोलीत जाऊन झोपलो. पण तु जे सांगतेस त्यावरून मला आता असे वाटतेय की मुलाच्या ओढीने तो परत आला असावा पण तसे असेल तर जेव्हा तुझ्या बायको मुलाचा आम्ही सांभाळ करू त्यांना अंतर देणार नाही असे म्हटले तेव्हा कावळा शिवायला पाहिजे होता पण नाही शिवला. काहीतरी दुसरेच कारण आहे आणि त्यामुळेच गोपाळचा आत्मा भटकतोय. मी त्याला वाचवु तर नाही शकलो पण त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी मी काय वाटेल ते करेन. तु काळजी करू नकोस. जा बिनधास्त झोप. तुला आणि रोहितला तो काहीही करणार नाही”.

[next] दुसऱ्याच दिवशी भगवानदास दुकानातील एका अनुभवी वयोवृद्ध नोकरासमवेत गावातील भगताकडे गेले. भगताला त्यांनी दररोज पडणारे स्वप्न आणि आपला दिवंगत मुलगा आपल्या घरात वावरत असताना पाहिल्याचे सांगितले. ते ऐकताच भगताने देवीला कौल लावला. जवळ जवळ दोन तास तो देवीशी झगडत होता. शेवटी त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर त्याने गोपाळरावांना मुंबई जवळील एका बाबाने गोपाळरावांच्या आत्म्याला बंधनात बांधले असुन गोपाळरावांचा मृत्यु त्याच बाबाने पाठवलेल्या एका खविसामुळे झाला असल्याचे सांगितले. तसेच गोपाळरावांच्या मुक्तीसाठी त्या बाबाची गाठ घ्यावी लागेल असेही सांगितले. हे सर्व समजताच भगवानदासांनी आपला विश्वासु नोकर महादेवसह मुंबई गाठली. गोपाळरावांच्या मृतदेहाचा पंचनामा ज्या इन्स्पेक्टरने केला होता त्याला पैसे दाबून गोपाळरावांचा मृतदेह ज्या लॉजमधुन हस्तगत केला होता त्या लॉजचा पत्ता मिळवला. नंतर इन्स्पेक्टरला सोबत घेऊन लॉजवर चौकशी केली असता त्यात गोपाळरावांना भेटायला सतत एक व्यक्ती येत असल्याचे समजले. CCTV Footage तपासल्यावर त्यात गोपाळरावांसोबत असलेल्या व्यक्तीला त्या लॉजमधे काम करणाऱ्या एका रुमबॉयने ओळखले.

CCTV Footage मधे दिसणाऱ्या व्यक्तीच्या फोटो कॉपीज सर्व पोलीस ठाण्यात पाठवण्यात आल्या. भगवानदासांना त्या व्यक्तीला कुठे तरी पाहिल्यासारखे वाटले. बराच वेळ आठवायचा प्रयत्न करत असताना अचानक ते उद्गारले, ‘अरे हा! हा माणुस तर आपल्या दुकानात येऊन गेलाय, गोपाळची चौकशी करायला आला होता आणि त्याने आपण गोपाळचा शाळेतील जुना मित्र असल्याचे सांगितले होते’. ही लिंक लागताच गोपाळराव आपल्या मेंदुला ताण देत विचार करू लागले की कोण बरं असावा हा! खुप उशीर झाल्याने त्यांनी त्याच लॉजमध्ये रात्र काढायचा विचार केला. रात्रभर ते विचार करत होते पण त्या व्यक्तीचे नाव काही केल्या त्यांना आठवेना. सकाळी सवयीने ते लवकरच उठले प्रार्तविधी उरकुन चहा घेत असताना त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली हा सात्विक तर नव्हे.

इकडे रुमबॉय कडुन बऱ्याचदा गोपाळराव आणि ती व्यक्ती दारुच्या नशेत रात्री अपरात्री लॉजवर आल्याचे इन्स्पेक्टर जाधवना कळले. कोणा रुबीबद्दल बोलताना आपण ऐकल्याचेही त्याने सांगितले. दोघांच्या बोलण्यातून ती बारगर्ल असावी असे वाटते, असेही तो म्हणाला. इतक्या गोष्टी इन्स्पेक्टर जाधवना आपला तपास पुढे न्यायला पुरेशा होत्या. त्याने जवळपासच्या डान्सबारमधे रुबीची काही माहिती मिळते का ते पाहायला आपली माणसे पाठवली सोबत त्या व्यक्तीचा फोटो पण दिला. लवकरच रूबी ज्या डान्सबारमधे काम करता करता आपले सावज पटवायची तो डान्सबार सापडला. तिथल्या वेट्रेसनी रूबीचा सिलेंडरच्या स्फोटात मृत्यु झाल्याचे सांगितले तसेच फोटोतील व्यक्तीला ओळखले पण त्याचे नाव मात्र कोणालाच माहीत नव्हते. दर शनिवारी रात्री तो तिथे येत असल्याची महत्वपुर्ण बातमी पोलिसांना मिळाली. भगवानदासांनी, त्या व्यक्तीचे नाव कदाचित सात्विक कुलकर्णी असावे असे इन्स्पेक्टरना फोन करुन सांगितले. त्यानुसार इन्स्पेक्टर जाधवांनी आपले खबरी सोडले. शनिवारी संध्याकाळी आठ वाजल्या पासुन साध्या वेशातील पोलीस त्या डान्सबार मध्ये आणि अवती भवती सात्विकला पकडण्यासाठी फिल्डिंग लावुन होते. रविवारी सकाळचे सहा वाजले तरी सात्विक डान्सबारकडे फिरकलाही नाही त्यामुळे इन्स्पेक्टर जाधवांची खुप चिडचिड झाली. रविवारी रात्री लावलेली फिल्डिंगपण बेकार गेली आता खबऱ्यांमार्फत मिळणारी माहितीच त्यांचा पुढचा आठवडा वाचवु शकणार होती.

[next] मंगळवारी रात्री १२:३० वाजता इन्स्पेक्टर जाधवांचा मोबाईल खणाणला. सात्विकला अप्सरा डान्सबार मधे पाहिल्याचे एका खबरी कडुन समजताच इन्स्पेक्टर जाधव साध्या वेशातील निवडक पोलीसांना सोबत घेऊन जीप मधुन तडक निघाले. सात्विक चिल्ड बियरचे घोट घेत गोपाळरावांचे पैसे तिथल्या पोरीँवर उडवत होता. गोपाळरावांचा त्या बाबामार्फत बंदोबस्त केल्यामुळे तो एकदम निर्धास्त होता. पोलीस कधी आपल्यापर्यंत पोहोचतील हा विचारही त्याच्या मनाला शिवला नव्हता. स्वत:च्या हुशारीवर त्याला जास्तच गर्व होता. सात्विकची ओळख पटताच पोलिसांनी त्याची गचांडी धरून त्याच्या मुसक्या आवळल्या. सात्विक सापडल्याचे इन्स्पेक्टर जाधवांनी भगवानदासांना कळविले, तसे ते लगबगीने पोलीस स्टेशनला आले. लॉकपमधे इन्स्पेक्टर जाधवांनी सात्विकचा योग्य तो पाहुणचार करताच तो पोपटासारखा बोलू लागला. भगवानदासांनी बालसुधार गृहात रवानगी केल्यापासून ते बाबाच्या मदतीने गोपाळराव आणि रूबीचा काटा काढण्यापर्यंत सर्व काही त्याने पोलिसांना सांगितले. ते सर्व ऐकल्यावर भगवानदास मट्‍कन खालीच बसले. महादेवाने त्यांना सावरले. सुडापायी सात्विकनेच गोपाळरावांची हत्या करवली हे कळताच त्यांच्या मनातील सात्विकवरील पहिल्यापासून असलेल्या रागाची जागा आता द्वेषाने घेतली. कबुलीजबाबावर सात्विकची सही घेतल्यावर इन्स्पेक्टर जाधव भगवानरावांकडे वळणार इतक्यात भगवानदासांनी जाधवांच्या कंबरेला असलेल्या पट्टयातील पिस्तुल खेचुन सात्विकवर गोळी झाडली ती त्याच्या डाव्या कानाला उडवत डोक्याला चाटून गेली. भगवानदास दुसरी गोळी झाडणार इतक्यात इन्स्पेक्टर जाधवांनी झडप घालुन ती पिस्तुल काढुन घेतली.

जखमी सात्विकला त्वरीत हॉस्पिटलमधे भरती करण्यात आले. त्याचा डावा कान जरी उडाला असला तरी त्याच्या जीवाला कोणताच धोका नव्हता. पण कोर्टात केस उभी राहिल्यावर वकीलांनी डोक्यात गोळी लागल्यामुळे सात्विकच्या मेंदुवर परिणाम झाल्याने तो कोर्टात हजर राहण्यास शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या असमर्थ असल्याचे सिद्ध करुन जो पर्यंत तो ठीक होत नाही तोपर्यंत केस पुढे ढकलण्याची विनंती कोर्टाला केली. सात्विकची मेंटल कंडीशन ठीक नसल्याचे डॉक्टरांनी सुद्धा सांगितल्यामुळे कोर्टाने सात्विकला तो ठीक होईपर्यंत पुढील उपचारांसाठी मेंटल असायलम मधे ठेवण्याचे आदेश दिले. अशा रितीने सात्विक कायद्याच्या हातावर तुरी देऊन तात्पुरता का होईना पण निसटला होता, त्यामुळे इतर साक्षीदारांची उलट तपासणी पण रद्द झाली. आता जो पर्यंत डॉक्टर सात्विक ठीक असल्याचा निर्वाळा देत नाहीत तोपर्यंत केस पुढे सरकणे अशक्य होते.

आता काय करावे असा विचार करत असताना त्या बाबाची भेट घ्यावी असे महादेवने भगवानदासांना सुचवले. सात्विकच्या कबुलीजबाबात त्याने दिलेल्या बाबाच्या पत्त्यावर भगवानदास, महादेव इन्स्पेक्टर सोबत पोहोचले. दरवाजा ठोठावताच बाबांच्या मदतनिसाने दरवाजा उघडला. बाबा बद्दल चौकशी करताच तो आढेवेढे घेऊ लागला. बाबा वगैरे कोणी इथे राहत नसल्याचे सांगुन त्याने खांदे वर केले. तो सरळ शब्दात ऐकत नाही हे लक्षात येताच इन्स्पेक्टर जाधवांनी त्याची मानगुट धरून आपल्या जवळील पिस्तुल त्याच्या डोक्याला लावली त्याबरोबर त्याने चुपचाप गुप्त तळघरातील खोलीत त्या तिघांना नेले. पिस्तुलाच्या नळीवर आपल्या मदतनीसाला आणलेले पाहून तो बाबा प्रचंड संतापला पण इन्स्पेक्टर जाधवांना सोबत पाहताच तो नरम झाला. भगवानदासांनी त्या बाबाला आपल्या मुलाच्या आत्म्यास बंधनमुक्त करुन त्याला मुक्ती मिळवून देण्यास विनवले. तेव्हा ‘त्यासाठी बराच खर्च करावा लागेल आणि आत्ता आपण व्यस्त असुन पुढच्या अमावस्येला या’ असे सांगुन उडवून लावले. इन्स्पेक्टर जाधवांनी जारण मारण करण्याच्या आरोपाखाली अटक करण्याची भिती घालत आपला पोलिसी खाक्या दाखवताच तो सुतासारखा सरळ आला. त्याने गोपाळरावांच्या आत्म्यास बंधनमुक्त करण्याच्या विधीची तयारी करण्यास आपल्या मदतनीसाला सांगितले.

[next] अर्ध्या एक तासात त्याने सर्व तयारी करुन बाबाला तसा इशारा केला. अग्नीकुंडात अग्नी प्रज्वलित करून त्याने प्राणरक्षा मंत्र म्हणावयास सुरवात केली त्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थांची तो आहुती देऊ लागला. त्यानंतर त्याने हाडांपासून एक रिंगण बनवले. एका द्रोणात ठेवलेले चिताभस्म घेऊन त्याने त्या रिंगणात एक चौकोन बनवला. आता त्या चौकोनात एक सरळ आणि एक उलटा त्रिकोण बनवून तयार झालेल्या पंचकोनात एक मानवी कवटी ठेवली आणि उरलेल्या पाच त्रिकोणात पंचमहाभूताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वस्तु जसे अग्नीसाठी निखारा, पृथ्वीसाठी माती, पाण्यासाठी एका करवंटीत पाणी, वायुसाठी पेटती उदबत्ती ठेवली, मात्र आकाशासाठी त्याने काहीच ठेवले नाही कारण ते अनंत आहे अमर्याद आहे. एका धाग्याची दोन्ही टोके एकत्र बांधुन एक गाठ मारली आणि ती रिंग त्या कवटीवर ठेऊन त्यावर हळद कुंकु टाकुन तो गोपाळरावांच्या प्रेतात्म्याचे आवाहन करू लागला. त्याचे धीरगंभीर स्वरातील मंत्र वातावरणातील गंभीरता वाढवू लागले. एकंदर सर्वांनाच तिथे जडपणा जाणवू लागला होता. इन्स्पेक्टर जाधवांचा या सर्व गोष्टींवर विश्वास नव्हता पण भगवानदासांनी त्यांना भरपूर पैसे चारले असल्यामुळे ते निमुटपणे सर्व तमाशा पाहात होते.

बाबाने पंचमहाभूतांना आवाहन करताच त्रिकोणात ठेवलेल्या वस्तु हवेत अधांतरी तरंगु लागल्या आणि आता त्या कवटी भोवती वेगाने फिरू लागल्या. त्याबरोबर तो धागा त्या कवटी भोवती आवळला गेला. ते पाहुन जाधवांसह सर्वांनाच खुप भितीयुक्त आश्चर्य वाटले. इतक्यात हवेच्या आवागमनासाठी केलेल्या छतावरील रचनेतून त्या खोलीत प्रवेश करणाऱ्या एका पांढरट आकृतीकडे महादेवने भगवानदासांचे लक्ष्य वेधले. हळुहळु तरंगत ती आकृती त्या बाबासमोर येऊन स्थिर झाली. कवटी भोवती अधांतरी गोल फिरणाऱ्या त्या वस्तु आता त्या आकृती भोवती वेगात फिरू लागल्या. तिला पाहताच त्या बाबाने पंचमहाभुतांना त्या आत्म्यास मुक्त करण्यास सांगणारे मंत्र म्हणण्यास सुरवात केली. मंत्रोच्चार पुर्ण होताच एक एक करुन त्या सर्व वस्तु तिथुन गायब झाल्या आणि त्या आत्म्याने पंचकोनात ठेवलेल्या कवटीमधे प्रवेश केला आणि त्याबरोबर ती कवटी हलु लागली. बाबाने आत्माबंधनमुक्ती मंत्र म्हणत त्या कवटीवर चिताभस्म फेकले त्या बरोबर तो धागा जळून गेला आणि ती कवटी हवेत तरंगु लागली. बाबाने त्या आत्म्यास ‘तु आता माझ्या बंधनातुन मुक्त आहेस’ असे सांगताच ती कवटी परत त्या पंचकोनात जाऊन स्थिर झाली आणि त्यातुन तो पांढरट पारदर्शी आत्मा बाहेर पडुन भगवानदासांसमोर येऊन तरंगु लागला. हळुहळु त्याला गोपाळरावांच्या शरीराचा आकार येऊ लागला. आपल्या मुलाच्या आत्म्याला पाहून भगवानदासांचे डोळे भरले. आत्मारूपी गोपाळरावांनी भगवानदासांची माफी मागितली आणि मुक्त केल्याबद्दल बाबाचे आभार मानुन ते गायब झाले. बाबाने सांगितले की गोपाळरावांचा आत्मा त्याच्या बंधनातुन मुक्त झालाय पण त्याची मुक्ती तेव्हाच होईल ज्या वेळी त्याची अतृप्त ईच्छा पुर्ण होईल.

सात्विक आपल्याला वेड लागले आहे हे इतरांना पटवण्यासाठी मधेमधे वेडेचाळे करुन दाखवायचा, आरडा ओरडा करायचा. असाच एक दिवस तो मेंटल असायलम मधे आपल्या सेलमधील कॉटवर स्वत:च्या अक्कल हुशारीवर स्वत:चीच पाठ थोपटत बसला होता. अचानक त्याला आपल्या सेलचा दरवाजा उघडुन वेगात बंद झाल्यासारखे वाटले. आपल्याला भास झाला असेल असे समजुन त्याने दुर्लक्ष्य केले. त्याच रात्री कोणीतरी आपली मान दाबत असल्यासारखे वाटल्याने सात्विक जागा झाला. आधी त्याला स्वप्न असावे असे वाटले पण गळ्याभोवती अजुनही दबाव जाणवत असल्यामुळे तो घाबरला आणि हातपाय झाडत ओरडू लागला. रोजचेच असल्यामुळे वॉर्डबॉयनी प्रथम दुर्लक्ष केले पण जसा त्याचा आवाज वाढला तसे वैतागुन दोन वॉर्डबॉय त्याच्या सेल पाशी आले आणि सात्विकच्या गळ्यावरील दबाव नाहिसा झाला. त्याबरोबर तो एकदम शांत झाला. पण भांबावल्यासारखा सर्व रूममधे काही तरी शोधु लागला. तो शांत झाल्याचे पाहून ते वॉर्डबॉय तिथुन निघुन गेले पण सात्विक आंतरबाह्य हादरला होता.

[next] रात्रभर त्याला झोप लागली नाही सारखा दचकुन जागा व्हायचा कधी त्याची कॉट हलायची तर कधी सेलमधील दिवे अचानक लागायचे, कधी खुर्ची सरकायची तर कधी टेबलचे ड्रॉवर अचानक आत बाहेर व्हायचे. सात्विकला सकाळी उशीरा झोप लागली. दुपारी त्याची कॉट एका बाजूने उचलली गेली आणि दाणकन खाली आपटली. धक्क्याने तो जागा झाला तर त्याच्या डाव्या कानाखाली एक सणसणित चपराक बसली. सात्विकच्या मस्तकात वेदनेचा आगडोंब उसळला. मोठ्या मुश्किलीने त्याने आपल्या वेदना सहन केल्या. दुसऱ्या दिवशी तो आंघोळीला गेला असताना कोणी तरी त्याची मान धरून त्याचे डोके बादलीत बुडवून दाबून धरले. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे सात्विक पुरता घुसमटला. पाच एक मिनिटे तो खोकत होता. मोठ्या मुश्किलीने त्याचा श्वास ताळ्यावर आला. त्या क्षणापासून त्याची खात्री झाली की कोणी तरी आपल्या जीवावर उठलाय. पण कोण? विचार करुन त्याचे डोके फुटायची पाळी आली होती.

त्या दिवसापासून तो सतत भेदरलेला असायचा. त्याने त्याच्या वकीलांशी संपर्क करायचा प्रयत्न केला पण त्यांनी अजुन काही दिवस तरी मेंटल असायलम मधेच काढायचा सल्ला दिला. असाच एक दिवस तो त्याच्या सेल मधे बसला असताना त्याला गोपाळरावांचा आत्मा सेलच्या बंद दरवाजातून आरपार होत आत आलेला दिसला तसा सात्विक कॉटवर अंग आकसुन बसला. वातावरण एकदम थंड झाले होते इतके की सात्विक कुडकुडु लागला होता. गोपाळरावांचा पुरता बंदोबस्त केला असुनही हा इथे कसा? हा प्रश्न सात्विकच्या मेंदुला पोखरू लागला. अचानक गोपाळरावांचा चेहरा एकदम भेसुर झाला आणि त्यांनी कॉट सकट सात्विकला उचलुन फेकुन दिले. समोरच्या भिंतीवर सात्विक सणकुन आपटला पुन्हा एकदा त्यांच्या डोक्यात वेदनेचा डोंब उठला. त्याने कसाबसा उठायचा प्रयत्न केला पण त्याला उठताच येईना, त्याचा पाय मोडला होता. मोठा आवाज ऐकल्यामुळे वॉर्डबॉय धावत आले तसे गोपाळराव गायब झाले. सात्विकला हॉस्पिटल मधे भरती केले गेले. पायाला प्लास्टर घालुन डिस्चार्ज मिळाल्यावर परत असायलम मधे जायच्या विचाराने सात्विक इतका घाबरला की तो असायलम मधे परतायला तयारच नव्हता. सतत ‘गोपाळराव मला मारून टाकेल मी असायलम मधे परत जाणार नाही’ असे काही बाही बरळु लागला. वॉर्डबॉय नी त्याला जबरदस्ती असायलममध्ये न्यायचा प्रयत्न केल्यावर त्याने खुपच अकांडतांडव केले.

आपल्या सेलच्या दरवाजाला पाठ टेकुन सात्विक तासनतास एकटक समोर पाहात राहायचा, कधी किंचाळायचा तर कधी स्वत:च्या तोंडात मारून घ्यायचा, ‘मला माफ कर मी चुकलो’ असे ओरडायचा तर कधी दिवसभर रडत राहायचा. वॉर्डबॉय त्याला पाहून म्हणु लागले की हा कामातुन गेला! ठार वेडा झाला. गोपाळरावांचा आत्मा सात्विकबरोबर उंदीर मांजराचा खेळ खेळत होते. सात्विकला ना ते खाऊ-पिऊ देत होते ना झोपु देत होते. सतत भयानक रुपे घेऊन घाबरवत होते. आठवडयाभरातच सात्विकची हाडे दिसु लागली, डोळे खोल गेले. तो खुप अशक्त झाला होता. असे करत करत ती तारीख आली ज्या तारखेला गोपाळरावांचा मृत्यु झाला होता. पहाटेचे तीन वाजले होते. डोळे फिरलेल्या अवस्थेतील सात्विकचे शव डॉक्टर स्ट्रेचर वरून पोस्टमॉर्टम साठी घेऊन जात होते. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने सात्विकचा मृत्यु झाला होता. डोळे पुर्ण फिरलेला आणि आपला गळा आपल्याच हातानी दाबून धरलेला, वेड्या वाकडया अवस्थेतील सात्विक, डॉक्टरना त्याच्या कॉटवर सापडला होता. जणू काही श्वासाअभावी प्रचंड तडफडून त्याचा मृत्यु झाला होता. मरण्याआधी सात्विक खुप वेदना आणि पिडेतून गेला होता. गोपाळरावांनी आपला प्रतिशोध घेतला होता. सात्विकच्या मृत्युबरोबरच गोपाळरावांना सुद्धा मुक्ती मिळाली होती. भगवानदासांनी आपल्या सुनेला दिलेला शब्द आज खरा ठरुन एक सुडचक्र पुर्ण झाले होते, खरच?

क्रमशः

वाचा या कथेचा पुढील भाग ‘सुडचक्रभेद
केदार कुबडे | Kedar Kubade
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा, मराठी भयकथा, मराठी कविता या आणि अशा विविध विभागांत लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.