Loading ...
/* Dont copy */

सप्तपदी भाग १ (मराठी भयकथा)

सप्तपदी भाग १ (मराठी भयकथा) - आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या आनंद नावाच्या एका पुरुषाच्या प्रेमात पडण्याची मोजावी लागलेली किंमत.

सप्तपदी भाग १ (मराठी भयकथा)

एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला वाचवण्यासाठी केलेली प्रयत्नांच्या पराकाष्ठेची खिळवुन ठेवणारी कहाणी सप्तपदी भाग १


सप्तपदी भाग १ (मराठी भयकथा)

अस्मिता नावाच्या एका विशीतील मुलीला आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या आनंद नावाच्या एका पुरुषाच्या प्रेमात पडण्याची मोजावी लागलेली किंमत, तिने जिवंतपणी भोगलेल्या नरकयातना, त्याच्या मृत्युनंतरही त्याने तिला दिलेला त्रास आणि तिच्या वडिलांनी आणि तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या महादेवने तिला वाचवण्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा याची खिळवुन ठेवणारी कहाणी म्हणजेच सप्तपदी...



मैत्रिणींसोबत हॉटेलमध्ये खाऊन झाल्यावर अस्मिताच्या लक्षात आले की आपण तर पर्स आणायलाच विसरलो आहोत. आता बिल कसे देणार? तिने मैत्रिणींना पैसे आहेत का? असे विचारताच त्यांनीही हात वर केले; त्या आता काय करायचे असा विचार करत असतानाच समोरच्या दुकानात काम करणाऱ्या आनंदने अस्मितासमोर पाचशे रुपयांची नोट धरली आणि म्हणाला, ‘‘हे घे पैसे.” अस्मिता त्याच्या तोंडाकडे पाहातच राहीली, तसा तिचा संभ्रम आणि संकोच लक्षात येऊन आनंद म्हणाला, “मी ऐकलय तुमचे बोलणे, पैसे आणायला विसरलीस ना? काही काळजी करू नकोस. मी आनंद शिवलकर, समोरच्याच दुकानात कामाला आहे. मी नेहमी पाहातो तुला हॉटेलमध्ये येतेस तेव्हा. हे पैसे घे आणि त्या हॉटेलवाल्याचे बिल देऊन टाक. उद्या येशील तेव्हा माझे पैसे मला परत कर. पैसे काय कुठे पळुन का जाणार आहेत?” क्षणभर विचार करून अस्मिताने ते पैसे घेतले.

सवयीने तिने नोट खरी आहे का ते पाहण्यासाठी वर धरली आणि कसली तरी पांढरी पावडर तिच्या नाकातोंडात गेली आणि तिला ठसका लागला. त्यासरशी आनंदच्या डोळ्यांत एका वेगळीच चमक तरळुन गेली. ओठांना लागलेली पावडर अस्मिताने जीभेने चाटली पण तिची चव न कळल्यामुळे तिने आनंदला विचारले, “काय हो, कसली पावडर लागली होती नोटेला? “सॉरी हं! मगाशी मी गिऱ्हाईकाला एक किलो मैदा दिला होता, कदाचित पैसे घेताना थोडासा मैदा त्या नोटेवर सांडला असेल” असे आनंदने सांगितले. त्यावर अच्छा अच्छा असे म्हणुन तिने बिल चुकते केले. नाकावर सांडलेली पावडर रुमालाने पुसत अस्मिता म्हणाली, “मी अस्मिता कुलकर्णी, तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही. आज वेळेवर तुम्ही मदत केली नसती तर माझी खुप मोठी पंचाईत झाली असती. खरंच खुप खुप आभारी आहे मी तुमची. उद्या तुमचे पैसे आठवणीने परत करते” असे बोलुन अस्मिता तिथुन निघाली.

आनंद फक्त हसला. थोडे पुढे गेल्यावर वळणावर अस्मिताने मागे वळुन पाहिले तर आनंद अजुनही तिच्याकडेच पाहात होता. ती हलकेच हसली आणि पुढे निघुन गेली. बराच वेळ आनंद, अस्मिता गेलेल्या रस्त्याच्या दिशेने पाहात तिथेच उभा होता. “आनंद! गिऱ्हाईक बघायचे सोडुन कुठे उलथलास?” असे मालक कडाडताच आनंद भानावर आला व “आलो!” असे ओरडत दुकानात पळाला. अशी झाली अस्मिता आणि आनंदची पहिली भेट.

वाटेत अस्मिताच्या मैत्रिणी तिला चिडवु लागल्या, “आत्ता काय बाबा! अस्मिताला पैसे जवळ बाळगायची गरज नाही! हे घे पैसे, मी तुला नेहमी पाहतो! हा हा हा हा!” आपल्या खिदळणाऱ्या मैत्रिणींना अस्मिता लटक्या रागाने दटावत होती पण त्यांच्या चिडवण्याने अस्मिताला मनातल्या मनात मात्र गुदगुदल्या होत होत्या. तिच्या चेहऱ्यावर लज्जामिश्रित हसु उमटत होते. अल्लड वयाच्या त्या मुलींच्या हे गावीही नव्हतं की नकळत त्या अस्मिताला एका धोकादायक रस्त्यावर चालायला प्रोत्साहीत करत होत्या की ज्यावरून परतणे अस्मितासाठी केवळ अशक्य होणार होते. आनंदने वेळेवर मदत करून मैत्रिणींमध्ये अस्मिताचे हसे होण्यापासुन वाचवले होते. तिला तो आवडला होता. त्याच्या नजरेतले तिच्यासाठी असलेले आकर्षणही तिला जाणवले होते. कधी कोणाच्या अध्यात ना मध्यात असलेली अस्मिता अचानक एका एकोणचाळीस वर्षाच्या पुरुषाकडे आकृष्ट झाली होती.

दुर्दैवाने तिला त्यापासुन परावृत्त करण्याऐवजी मैत्रिणींनी तिच्या मनात रुजणाऱ्या नाजुक भावनांना नकळत खत-पाणीच घातले होते. एकोणचाळीस वर्षाचा आनंद तिशीतील दिसायचा. व्यक्तिमत्व उमदे होते. कष्टाची कामे करून कमावलेले पिळदार शरीर त्याच्या देखणेपणात भरच टाकत होते. लाघवी बोलण्यामुळे तो लोकांना आपलेसे करून घ्यायचा व आपले काम साधायचा. त्याच्या वागण्या बोलण्याला अस्मिता भाळली नसती तर नवलंच म्हणायचे.

आनंद एकोणचाळीस वर्षांचा होता अडचण नव्हती नव्हती तर तो कुठल्याच बाजुने अस्मिताच्या लायक नव्हता. तो पुर्णपणे वाया गेला होता. विडी, दारु, जुगार यांचे त्याला असलेले व्यसन, त्यातुन होणाऱ्या हाणामाऱ्या त्याच्यासाठी रोजच्याच होत्या. दरवर्षी पहिल्या पाचात नंबर काढणारी अस्मिता, कॉमर्सच्या शेवटच्या वर्षाला होती तर आनंद आठवी नापास होता. अस्मिताच्या वडिलांचा स्वकष्टावर उभा केलेला दुधाचा मोठा व्यवसाय होता. पुऱ्या जिल्ह्याचे ते दुध वितरक होते. स्वतःचे मोठे घर आणि चार फ्लॅट होते, दुधासाठी घेतलेले दहा कंटेनर असलेले ट्रक होते. दारात दिमतीला महागड्या गाड्या होत्या. घरची परिस्थिती चांगली सधन होती. याउलट आनंदच्या घरी अठराविश्वे दारिद्र्य होते पण त्यातुन उभरण्याची ना त्याच्यात धमक होती ना इच्छा.

घरात अर्धांगवात झालेले वडिल अंथरुणाला खिळुन होते. मोठा भाऊ आकाश कुठेतरी रोजंदारी करायचा आणि त्याची बायको सुमन आपल्या सासुसोबत इतरांकडे धुणी भांडी करायची. त्यामुळे एखादी श्रीमंत घरची पोरगी पटवुन तिच्याशी लग्न करून तिच्या वडिलांची सगळी ईस्टेट घशात घालायचे त्याचे मनसुबे होते. अस्मिता त्या हॉटेलमध्ये मैत्रिणींसोबत येत असते आणि नेहमी चार पाचशेचे बील तीच देते हेही त्याने पाहिले होते. त्याने अंदाज बांधला की नेहमी इतके पैसे खर्च करते म्हणजे ही नक्कीच श्रीमंत घरातील असणार. नेमके त्या दिवशी अस्मिता पैसे आणायला विसरली आणि हे त्याच्या पथ्थ्यावरच पडले होते आणि त्याने या संधीचा त्याने पुरेपुर फायदा उचलला. अस्मिताची मदत करून त्याने आपल्या योजनेची पहिली चाल यशस्वीरित्या खेळली होती.

सामान वयाच्या मुला मुलींमध्ये प्रेम जुळणे समजते पण अस्मितासारख्या नाकासमोर चालणाऱ्या मुलीचे केवळ वेळेवर मदत केल्यामुळे एका वयस्क पुरुषाच्या प्रेमात पडणे नक्कीच खटकते. नक्की कशामुळे असे घडले, अस्मिताच्या घरी हे कळल्यावर त्याचा काय परिणाम होतो? अस्मिता आनंदला विसरते की वडिलांशी बंड करते जाणण्यासाठी पुढे वाचा.

दुसऱ्या दिवशी अस्मिता आनंदचे पैसे परत करायला गेली तेव्हा त्याला तिथे न पाहुन संभ्रमात पडली. मालकाला जाऊन आनंदबद्दल विचारायचे तिला धाडस न झाल्याने थोडा वेळ तिथेच घुटमळुन ती परत जायला निघाली. मागे वळुन-वळुन पाहात शेवटी ती हिरमुसली होऊन निघुन गेली. अस्मिता जाताच गोडावूनमधे माल मोजण्याच्या निमित्ताने लपलेला आनंद बाहेर आला. त्याने अस्मितासमोर यायचे मुद्दामहुन टाळले होते. त्याला तिला बेचैन करायचे होते. तिच्या मनात त्याच्याबद्दल उत्सुकता आणि काळजी निर्माण करायची होती. अस्मिताच्या अस्वस्थतेवरून त्याने जाणले की त्यातही तो यशस्वी झालाय. इकडे घरी परतल्यावरही अस्मिताच्या मनात प्रचंड खळबळ उडाली होती. तो का नाही आला? कुठे गेला असेल? आजारी तर नसेल? त्याला मालकाने आपल्यामुळे रागावले किंवा कामावरून काढुन तर टाकले नसेल? असे एक ना अनेक विचार तिला भांडावुन सोडत होते. तिला उगाचच अपराधी वाटत होते.

आपण त्याचा एवढा का विचार करतोय हेच तिला समजेना. कालचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून तरळु लागला तसे नकळत तिच्या चेहऱ्यावर हसु फुलले. तिला स्वतःशीच हसताना पाहुन तिच्या आईने तिला कारण विचारताच, “काही नाही” असे म्हणत ती तिच्या रूममध्ये पळाली. बेडवर पडल्या पडल्या आनंदाला उद्या कसे भेटायचे याचा विचार करता करता तिचा कधी डोळा लागला हे तिला कळलेच नाही.

दुसऱ्या दिवशी कॉलेज मधली लेक्चर्स आटपल्यावर अस्मिता मैत्रिणींना टाळून आनंदला भेटण्यासाठी आपल्या एक्टिवावरुन निघाली. दुपारची वेळ असल्याने दुकानाची शटर्स बंद करून मालक जेवायला घरी गेले होते. आनंद जवळच्याच एका झाडाखाली आराम करत बसला होता. त्याला पाहुन अस्मिताला आनंद झाला. ती त्याच्याकडे जात म्हणाली, काल कुठे होतात तुम्ही? मी तुमची किती वाट पाहिली माहीत आहे? त्याने तिच्याकडे मान वर करून पाहिले तशी ती चक्क लाजली. काय बोलावे ते न सुचल्यामुळे तिने पटकन पाचशे रुपये काढुन त्याच्या पुढे धरले व म्हणाली, “हे घ्या तुमचे पैसे. काल तुम्ही वेळेवर पैसे दिले नसतेत तर माझी पुरती फजितीच झाली असती. थँक्स हं!.” ते घ्यायला त्याने हात पुढे केला खरा पण नोटेबरोबर अस्मिताचा देखील हात धरला. आधी अस्मिता घाबरली, इकडे तिकडे पाहु लागली.

पण तिची नजर त्याच्या नजरेला भिडली आणि त्याच्या डोळ्यातील आश्वासक भाव पाहुन तिच्या नजरेतील भीती जाऊन गालावर लाली पसरली. “आम्ही तुला कॉलेजमध्ये शोधतोय आणि तु इथे आहेस होय! अरेच्या! इथे तर काही भलतेच सुरु आहे”, मैत्रिणींच्या आवाजाने अस्मिता दचकलीच. तिने पटकन आनंदच्या हातातून आपला हात सोडवून घेतला आणि सावरण्यासाठी म्हणाली, “अगं त्यांचे पैसे द्यायला आले होते.” हो का? म्हणत तिच्या मैत्रिणी खो खो हसत सुटल्या. अस्मिताला लाजेने मेल्याहुन मेल्यासारखे झाले. त्यांच्या गराड्यातुन गडबडीने निघुन तिने आपली ऍक्टिवा घराच्या दिशेने सुसाट सोडली.

आता अस्मिताची आनंदशी सतत गाठभेट होऊ लागली. गप्पा होऊ लागल्या. आनंदही तिला दुकानातली महागडी चॉकलेट्स, गिफ्ट आर्टिकल्स चोरून देऊ लागला. जादा क्लासच्या नावावर ती रोज संध्याकाळी त्याला भेटायला जाऊ लागली. आनंदची तिला अशी काही भुरळ पडली की तो आपल्या पेक्षा जवळपास दुप्पट वयाचा आहे, त्याच्याकडे धड नोकरी नाही की शिक्षण नाही, आपल्या आणि त्याच्या राहाणीमानात जमीन आसमानाचे अंतर आहे, आपले वडिल या लग्नाला मान्यता देतील की नाही या सर्व गोष्टी तिच्या खिजगणतीतही नव्हत्या. ती फक्त त्याचा हात धरून प्रेमाच्या लाटांवर झुलत होती. आता ती राजरोसपणे आनंदसोबत समुद्रावर, लव्हर्स पॉईंटवर, बाजारातुन ऍक्टिवा वरून फिरताना दिसू लागली, पिक्चर पाहायला जाऊ लागली. दोघांचे एकत्र काढलेले फोटो फेसबुकवर अपलोड करू लागली. छोट्या शहरात ही बातमी लपुन राहीली असती तर नवलच म्हणायचे.

शेवटी काही दिवसांनी अस्मिताचे कोणातरी मोठ्या वयाच्या माणसाबरोबर अफेयर सुरु असल्याचे तिच्या वडिलांच्या म्हणजेच वामनराव कुलकर्णींच्या कानावर पडलेच. वामनरावांचा आपल्या तसेच आपल्या भावंडांच्याही मुलांवर खुप जीव होता. सर्वांचे हट्ट ते खुप प्रेमाने पुरवत त्यामुळे सर्व मुलांचे ते लाडके होते. पण वामनराव जितके प्रेमळ होते तितकेच तापट म्हणुन पण प्रसिद्ध होते. ते भडकले की कोणी त्यांच्या वाऱ्यालाही उभे राहात नसे.

अस्मिता मान खाली घालुन वामनरावांच्या समोर उभी होती. सुरवातीला वामनरावांना थोडे सबुरीने घेण्याचा सल्ला त्यांचा मोठ्या भावाने केशवरावांनी दिला असल्यामुळे वामनरावांनी आवाज शक्य तेवढा शांत ठेवत अस्मिताशी बोलायला सुरवात केली. अस्मिताला प्रेमाने विचारुनही ती काहीच उत्तर देत नाही हे पाहुन मात्र वामनरावांचा संयम संपला. काही कळायच्या आतच अस्मिताच्या गालावर वामनरावांची पाचही बोटे उमटली होती. अस्मिता कोलमडून खाली पडताच सर्व मुलं आत पळाली. वामनरावांच्या पत्नी, नानी पुढे झाल्या आणि त्यांनी अस्मिताला सावरले पण तिने त्यांना झिडकारले आणि वामनरावांकडे ती रागाने पाहु लागली. ते पाहाताच वामनरावांचा राग अनावर झाला आणि ते अस्मिताच्या अंगावर धाऊन जाताच केशवरावांनी त्यांना अडवले. तरुण मुलगी आहे, हात नको उचलुस, रागाच्या भरात काही बरे-वाईट करून घेतले तर काय करशील? शांत हो, म्हणत केशवराव वामनरावांना ओढतच घराबाहेर घेऊन गेले.

इकडे अस्मिता धुसफुसत लाल झालेला गाल चोळत आपल्या रूममध्ये गेली आणि धाडकन दरवाजा लावून घेतला. विरोधाची पहिली ठिणगी पडली होती. आजवर जिने कधी साधी नजर वर करूनही पाहिले नव्हते ती आपली लाडकी मुलगी आज आपल्या नजरेला नजर देते आणि कोणा परक्या माणसासाठी आपला द्वेषही करते हे पाहुन त्या बापाचे काळीज तीळ-तीळ तुटले. आजवर पुरवलेले सर्व हट्ट, केलेली माया, दिलेले प्रेम सर्व एका क्षणात मातीमोल व्हावे हे त्यांच्या खुप जिव्हारी लागले होते.

आज पहिल्यांदाच त्यांनी अस्मितावर हात उचलला होता पण तिने तर हात न उचलता त्यांनाच एक जोराची चपराक लगावली होती, आणि ती थेट त्यांच्या मनावर आघात करून गेली होती. दु:ख थोडे हलके झाल्यावर त्यांनी आनंदची सगळी माहिती काढली. वस्तुस्थिती समोर येताच त्यांनी कपाळावर हातच मारून घेतला. आनंदचा डाव लक्षात न यायला ते काही मुर्ख नव्हते. त्यांनी वेगळ्या प्रकारे हे प्रकरण हाताळायचे ठरवले.

“ही झाली कुलकर्णी आणि शिवलकर कुटुंबीयांची तोंड ओळख. अस्मिता आनंदच्या जाळ्यात कशी गुरफटत जाते, तिच्या घरी तिचे प्रेमप्रकरण कळल्यावर काय नाट्यमय घडामोडी घडतात हे आपण पहिले. आता वामनराव अस्मिताला पाठिंबा देतात की विरोध करतात? अस्मिता आणि आनंदच्या प्रेमाचे पुढे काय होते हे जाणुन घेण्यासाठी पुढे वाचा.”

दरवाजावरील टकटक ऐकुन अस्मिता सावध झाली. दार ढकलुन आत येणाऱ्या वामनरावांना पाहुन तिने तोंड फिरवले. वामनरावांना वाईट वाटले पण शेवटी ती त्यांची मुलगी होती. मन घट्ट करून ते तिच्यापाशी आले. “अस्मिता! बाळा, मी काय संगतोय ते शांतपणे ऐकुन घे मग तुझा निर्णय तुच घे.” असे म्हणत वामनरावांनी बोलायला सुरवात केली. “मुळात हे तुझं लग्नाचं वय नाही, आणि कॉमर्सचे हे शेवटचं वर्ष आहे पुढे तुला सी.ए. देखील व्हायचय ना? तु आधी तुझं शिक्षण पुर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहा मग पुढचा विचार कर. एकदा का संसारात पडलीस की मग शिक्षणाला वेळ देणे शक्य होतेच असे नाही. तु जो मुलगा पाहिला आहेस त्याची मी सगळी माहिती काढली आहे.

तो तुझ्या दुप्पट वयाचा आहे. शिक्षण नाही, नोकरी करून दोन हजार कमवतो, तिही धड करत नाही. तुझा तर आठवड्याचा पॉकेट मनीच पाच हजार आहे. दुकानात चोरी करताना किती तरी वेळा पकडला गेलाय. मालकाने त्याच्या बापाकडे आणि घरच्या गरीबीकडे पाहुन त्याला काढला नाही आणि पैसे पगारातुन कापुन घेतले. सर्व व्यसनं करतो, जुगार खेळतो. मारामाऱ्या करतो. घरात सतत भांडणे आणि शिवीगाळ करतो. ह्या अशा माणसाबरोबर तु संसाराची स्वप्न पाहात आहेस? काय सुख देणार तुला तो? अगं माझा, आपल्या घराण्याच्या इज्जतीचा, नातेवाईक आणि लोकांचाही सोड पण स्वतःच्या भविष्याचा, निदान स्वतःच्या फायद्याचा तरी विचार कर गं! उद्या तु सी.ए. होशील चार मोठ्या माणसात तुझी उठबस होईल तेव्हा तुला आज जो तुझं सर्वस्व वाटतोय ना, त्याचीच लाज वाटेल. जरा थंड डोक्याने विचार केलास तर तुझे तुलाच पटेल. आपल्या आयुष्याशी नको खेळुस पोरी!” एवढे बोलुन सद्गादित झालेले वामनराव अस्मिताच्या रूममधुन जाण्यास उठले.

“मला सगळे पटतय बाबा, मी असे वागायला नको होते, कसा कुणास ठाऊक पण माझा माझ्यावर ताबाच उरला नव्हता. मला कळतंय की प्रेमाच्या धुंदीत मी माझी मर्यादा ओलांडली आहे, पण आता मी त्याला सोडु शकत नाही. मला माझीच शरम वाटते की मी कशी इतकी बहकु शकते! माझ्या चुकीची शिक्षा मला भोगावीच लागेल. मला माफ करा बाबा. पण मी आता खरंच मागे फिरू शकत नाही.” असे म्हणत अस्मिता धाय मोकलुन रडु लागली. अस्मिता आपल्या जाळ्यात अडकल्यावर पुन्हा सुटु नये म्हणुन आनंदने आधीच सगळी फिल्डिंग लावली होती. वशिकरणाचा प्रयोग करून करून तिला आपल्या जाळ्यात ओढली आणि नंतर तिला खाण्यातुन मानवी हाडांची मंतरलेली भुकटी खाऊ घातली होती जेणेकरुन तिला कोणी कितीही समजवायचा प्रयत्न केला तरी ती त्याला बधणार नाही. खबरदारी म्हणुन त्याने तिच्याकडुन लग्नाचे वचन घेतले होते आणि ते मोडल्यास तिच्या घरच्यांना त्रास देण्याची धमकी दिली होती.

वामनरावांना अस्मिताच्या या निर्लज्ज स्पष्टीकरणाने प्रचंड संताप आला पण त्यांनी स्वतःला सावरले. अस्मिताला प्रेमाने जवळ घेत वामनराव समजावु लागले की जे झाले ते झाले. अजुनही वेळ गेलेली नाही. सगळे काही व्यवस्थित होईल. तेव्हा अस्मिता त्यांना म्हणाली, “आनंदच्या ओळखी गुंडांशी तसेच अघोरी तंत्रिकांशी असल्यामुळे आपल्या घरच्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. मी जर लग्नाला नकार दिला तर तो तुम्हाला नक्कीच काही दगा फटका करेल. माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि मलाही तो हवाय. त्याच्यातील सगळ्या चांगल्या वाईटासह मी त्याला स्विकारले आहे. माझी खात्री आहे की माझ्या प्रेमाने मी त्याला बदलेन. पुढे मी आणि माझे नशीब”, एवढे बोलुन अस्मिता शांतपणे तिच्या रूमच्या बाहेर निघुन गेली. वामनराव तिचे बोलणे ऐकुन आवाकच झाले. अस्मिताच्या पाठोपाठ बंद झालेल्या दरवाज्याकडे पाहात ते दूर कुठेतरी शुन्यात हरवले.

अस्मिताने आनंदचा ध्यास काही सोडला नाही. तिला घरातील सर्व मोठ्या माणसांनी, काका व आत्यांनी समजावुन झाले. वामनरावांनी साम, दाम, दंड, भेद इ. सर्व वापरून पाहिले. तिचे मन बदलावे म्हणुन ज्योतिषी, मांत्रिक, तांत्रिक, देव-धर्म, पुजा-अर्चा या सगळ्यावर जवळपास पाच लाख रुपये खर्च केले पण अस्मितावरील वशीकरण एवढे जालीम होते की कशाचाही उपयोग झाला नाही. वामनराव एवढे हताश झाले की त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटकाही येऊन गेला पण अस्मितावर त्याचा तिळमात्रही परिणाम झाला नाही. ज्योतिषानेही सांगीतले की अस्मिता कोणाचेही ऐकणार नाही. ती हे लग्न करणारच. लग्नानंतर मात्र दोघांचे अजीबात पटणार नाही. तिच्या आयुष्यात कोणी तरी दुसरा आल्यावर ती आनंदपासुन वेगळी होईल आणि नंतर तिच्या आयुष्यात सुख येईल.

तोपर्यंत मात्र तिला खुप दु:ख आणि हाल अपेष्टा सहन कराव्या लागतील. त्याने पुढे सांगीतले की, “तुमचा हा जावई तुम्हालाही खुप त्रास देईल आणि तुम्हाला आर्थिक नुकसान पण घडवील तेव्हा सावध रहा.” हे सर्व ऐकल्यावर वामनरावांनी एक निर्णय घेतला आणि तो सांगण्यासाठी आपल्या बहीणी आणि भावाला बोलावले. सर्वांसमक्ष त्यांनी अस्मिताला शेवटचे विचारले, “अस्मिता ज्योतिषांनी काय सांगीतले ते तु ऐकलेस. या लग्नामुळे तुला आणि आपल्या कुटुंबाला फक्त दु:ख, त्रास, अपमान आणि हाल सोसावे लागणार आहेत तेव्हा तु आनंदचा विचार सोडणार आहेस की नाही हे सगळ्यांसमोर शेवटचे सांग.”

अस्मिताने ठामपणे आनंदशीच लग्न करणार असल्याचे सांगताच मात्र वामनरावांचा नाईलाज झाला. त्यांनी अस्मिताला ठणकावुन सांगीतले की जर का हा तिचा शेवटचा निर्णय असेल, तर ना ते तिचे लग्न आनंदसोबत लावुन देतील ना त्यांच्या लग्नाला येतील. तिच्या लग्नानंतर तिचा कुलकर्णी परिवाराशी काडीचाही संबंध उरणार नाही. इस्टेटीतही तिचा वाटा असणार नाही. आणि एकदा का घर सोडले की घराचे दरवाजे तिला कायमचे बंद होतील. वामनराव ही वाक्ये इतक्या करारीपणे बोलले की मनात असुनही कोणीच अस्मिताची बाजु घेऊ शकले नाही. अस्मिताच्या डोळ्यातुन अश्रु ओघळु लागले. एरव्ही अस्मिताला जरा काही झाले तर हवालदिल होणारे वामनराव; अस्मिताच्या ऊत्तराने एवढे कठोर झाले की आज तिचे अश्रु देखील त्यांचे हृदयपरिवर्तन करू शकले नाहीत. शेवटी परीक्षा झाल्यावर अस्मिताने आनंदसोबत पळुन जाऊन एका देवळात लग्न केलेच. वामनरावांना ही बातमी कळताच स्वतःवर विज कोसळल्यासारखे वाटले.

कधी तरी अस्मिताचे मन बदलेल ही त्यांची वेडी आशा त्या बातमीने साफ धुळीला मिळाली होती. त्यांना अतीव दुःख झाले. मोठ्या कष्टाने त्यांनी स्वतःला सावरले. ईश्वरी इच्छा भली असे म्हणुन त्यांनी स्वतःला कामात बुडवून घेतले जेणेंकरुन त्यांना अस्मितांचा विसर पडेल. दिवस कामात निघुन जात असे पण रात्र मात्र त्यांना बेचैन करत असे. अस्मिताचे विचार त्याची पाठ काही सोडत नसत. आपली मुलगी “बाबा मला वाचवा” असे ओरडत आपल्याकडे मदतीची याचना करत असल्याची त्यांना स्वप्न पडत असत. ते झोपेत अस्मिता!ऽऽऽ असे ओरडत आणि दचकुन जागे होत असत. त्यांच्या सारखीच अवस्था त्यांच्या पत्नीची झाली होती. पण त्या घामाघुम झालेल्या वामनरावांना धीर देत असत.

“आई वडिल स्वतःच्या इच्छा मारून आपल्या मुलांच्या हौशी पुरवतात. आपली मुलंच त्यांचं सर्वस्व असतं, पण पुढे जोडीदार मिळाल्यावर तिच मुलं आपल्या आईवडिलांना विसरतात हे फार दुर्दैवी आहे. आपल्या आईवडिलांना दुःखाच्या खाईत लोटणारी अस्मिता स्वतः तरी सुखी होते का? ते आता पुढे वाचा.”

अस्मिताच्या सासरी येण्यामुळे आनंदच्या घरचे सगळेच खुश झाले होते. अस्मिताच्या पाठोपाठ भरपुर पैसा घरात येणार आणि आपले दारिद्र्य कायमचे मिटणार या विचाराने सर्वांनाच आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पण अस्मिताला तिच्या वडिलांनी आपल्या इस्टेटीतुन बेदखल केल्याचे कळताच मात्र सर्वांचीच तोंडे पाहण्यासारखी झाली. त्यांची सगळी स्वप्नेच धुळीला मिळाली होती. अस्मितासमोर कोणीच काही बोलले नाही पण आनंदला बाजुला घेऊन सगळेजण त्याला शिव्या देऊ लागले. तेव्हा आनंदने त्यांना विश्वास दिला की, सुरवातीला तिचे वडिल थोडी नाटके करतील पण नंतर त्यांना हे लग्न मान्य करावेच लागेल आणि त्यांनी नाही मान्य केले तर ते कसे मान्य करवुन घ्यायचे हे तो व्यवस्थित जाणतो. “थोडे दिवस दम धरा, तिच्या बापाला, नाही नाक घासत माझ्या पायाशी लोळण घ्यायला लावली तर आनंद नांव नाही सांगणार.

आणि समजा आपल्या प्लॅनप्रमाणे काही नाहीच झाले तर जगात श्रीमंत बापांची आणि त्यांच्या मुलींची काही कमी नाही. फक्त बिचाऱ्या अस्मिताला त्यासाठी मरावे लागेल,” असे म्हणुन आनंद खदाखदा हसु लागला आणि त्याचे कुटुंबीय त्याच्या हसण्यात सामील झाले. आपल्या सुखाच्या संसाराची स्वप्ने रंगवत एक हॉल आणि किचन असलेल्या त्या ओबड-धोबड घरातील स्वयंपाकघरामध्ये अस्मिता साजशृंगार करून आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसली होती. बराच वेळ आनंद न आल्यामुळे तिने जाऊन सुमनला तो कुठे आहे असे विचारले. तर “कळेल तुला लवकरच” म्हणत ती फिदी फिदी हसु लागली. अस्मिताला तिचे वागणे जरा विचित्रच वाटले, पण पुढे काही न बोलण्यात शहाणपण मानुन ती गप्प बसली.

घरातील इतर सदस्य जेवुन एव्हाना हॉल मध्ये झोपायच्या तयारीला लागले होते. रात्रीचे बारा वाजुन गेले तरी आनंदचा पत्ता नव्हता, किचन हीच आज त्यांची बेडरूम आणि जमीनीवर अंथरलेली एक गादी हीच त्यांची सुहागरात्रीची शेज होती. आनंदची वाट पाहुन थकलेली अस्मिता गादीवर बसल्या बसल्या पेंगु लागली.

रात्रीचे साधारण दिड वाजले असतील, भांडे पडल्याच्या आवाजामुळे अस्मिता दचकुन जागी झाली. उठुन तिने लाईट सुरु केला तर दारूच्या नशेत झुलणारा आनंद तिला दिसला. त्याच्या अंगावरचे लग्नाचे कपडे चिखलाने बरबटले होते आणि त्याच्या तोंडाला दारूची घाणही मारत होती. तो नशेत बरळू लागला, “अरे अस्मिता, तु झोपली नाहीस अजुन? अरे हो, आज आपल्या लग्नाची पहिली रात्र नाही का? विसरलोच मी! मित्रांनी आज जबरदस्तीने पाजली, नाहीतर मी दारूला हात सुद्धा लावत नाही तुझी शप्पथ” असे म्हणुन तो अस्मिताच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी पुढे सरकला आणि तोल जाऊन धाडकन गादीवर कोसळला. अस्मिता त्याला सावरायला गेली तसे त्याने तिला आपल्या जवळ खेचले आणि जबरदस्तीने तिचा उपभोग घेतला. तिच्याकडे पाहात तो छद्मी हसला आणि तिला वेदनेने तडफडत ठेऊन पुढच्याच क्षणाला झोपी गेला सुद्धा. त्या रानटी प्रकाराने अस्मिताला एखाद्या जंगली श्वापदाने आपल्यावर पाशवी बलात्कार केल्यासारखे वाटले.

आजच्या रात्रीची तिने किती सुंदर स्वप्ने रंगवली होती पण वास्तव मात्र एवढे बीभत्स, ओंगळ आणि यातनामय होईल याची तिला कल्पनाच नव्हती. वामनरावांचा एक एक शब्द तिच्या कानात घुमु लागला. (“आपल्या आयुष्याशी नको खेळुस पोरी! ह्या अशा माणसाबरोबर तु संसाराची स्वप्न पाहात आहेस? काय सुख देणार तुला तो?ऽऽऽ) तिचे डोळे भरले पण ती सांगणार तरी कोणाला? तिने स्वत:हुन हे सगळे निवडले आणि स्वीकारलेही होते. आता तिला ते निभवावेच लागणार होते. ज्या आनंदला तिने “मी त्याला सुधारेन, जवाबदार बनवेन” असे वडिलांना ठणकावून सांगितले होते त्यानेच तिच्या इच्छा, आकांक्षा, तिचे स्त्रीत्व, तिची अस्मिता आणि तिचे प्रेमही निर्दयपणे पायदळी तुडवले होते. ती त्याच्यालेखी पैसे मिळवण्याचे एक साधन आणि केवळ एक भोग्य वस्तु होती. एवढे सगळे होऊनही ती त्याचा द्वेष करत नव्हती. वशीकरणाची जादुच काही और होती. आपल्या मनाची आणि अब्रुची लक्तरे गोळा करून ती त्याच्या बाजुला जमीनीवरच बसुन राहिली. विचारांच्या गर्दीत रात्री उशिरा तीला झोप लागली तशी ती जमीनीवरच झोपी गेली.

सकाळी सासुच्या कर्कश आवाजाने अस्मिताची झोपमोड झाली. तिने उठायचा प्रयत्न केला पण लादीवर झोपल्यामुळे तिचे अंग आखडले होते. आनंदच्या जबरदस्तीमुळे तिच्या गोऱ्या नाजुक अंगावर काळे निळे चट्टे उमटले होते आणि ते ठसठसतही होते. डोळ्यातील पाणी काजळ सोबतीला घेऊन तिच्या गालांवर सुकल्यामुळे सर्व चेहरा काळवंडला होता. अंगाला रग लागल्यामुळे कळ जिरुन तिला उठुन उभे राहायला खुप वेळ लागला. इतक्यात तिची सासु करवादली, “झाली का झोप महाराणीची? उशीरापर्यंत झोपुन राहायला हे काय तुझ्या बापाचे घर नाही, चल उठ, आवर आणि कामाला लाग. कालची भांडी आणि कपडे पडलेत ते धुऊन घे, मग स्वयंपाकाचे पण बघायचे आहे. येतो ना स्वयंपाक की त्यासाठी आता नोकर बोलवायचे तुझ्या घरून? चल ऊठ लवकर.

माझे तोंड नको बघत राहु. आनंद उठला की त्याला कडक चहा पण द्यायचा आहे, त्याशिवाय त्याची रात्रीची उतरणार नाही.” लाडा-कोडात वाढलेल्या अस्मिताने कधी स्वयंपाक घरात जाऊन साधे पाणीही घेतले नव्हते, ते ही घरातील नोकर तिला तिच्या रूम मध्ये आणुन द्यायचे, भांडी घासणे आणि कपडे धुणे याच्याशी तिचा दूरपर्यंत संबंध नव्हता. आपण कुठे आहोत याचा अंदाज यायला तिला काही काळ गेला मग तिने स्वतःला सावरले. काही न बोलता छोट्याश्या मोरीत आपली आंघोळ आणि इतर प्रातर्विधी पटपट उरकले आणि किचन मध्ये आली. गादीवर आनंद वाकडा तिकडा पसरला होता. त्याच्या कपड्यांवरची घाण बेडसीटलाही लागली होती. ती त्याच्याकडे पाहात असताना मागून सासु ओरडली, “हे आम्हाला रोजचंच आहे, तुलाही सवय होईल. आता त्याच्याकडे बघत बसणार आहेस की घरातली कामे उरकणार आहेस? आम्हालाही जायचंय कामावर. जा सगळ्यांसाठी चहा टाक.” अस्मिताने आईला बाबांसाठी चहा करताना अनेकदा बघितले होते पण स्वतः मात्र कधीच केला नव्हता. घरातील माणसे मोजुन तिने अंदाजाने चहाचे आधण ठेवले.

घरातील सर्व सदस्य चहासाठी जमले पण साखर पावडरचे प्रमाण चुकल्यामुळे चहा खुप कडु झाला होता. पहिला घोट घेताच आनंदने चहाची चुळ भरली आणि “तुझ्या बापाने तरी कधी असा चहा केला होता का?” म्हणत सर्वांसमोर अस्मिताच्या एक कानाखाली वाजवली आणि तणतणत घरातुन कामावर निघुन गेला. सुमन फिदी फिदी हसत तिला म्हणाली, “लवकर सगळे शिकुन घे बाई नाहीतर तुझे काही खरे नाही.” अस्मिता रडत रडत किचन मध्ये गेली तशी तिची सासु कडाडली, “साधा चहा सुद्धा करता येत नाही मग संसार कसा करणार आहेस देव जाणे. आणि ही रडायची नाटकं आहेत ना, ती आपल्या बापाच्या घरी जाऊन करायची इथे नाही समजलं! जा जाऊन आधी भांडी घास आणि कपडे धु.” डोळे पुसत अस्मिता मोरीकडे गेली.

कशीतरी भांडी घासुन तिने सासुला दिली व कपडे धुऊ लागली. तिचे डोळे अखंड वाहत होते, आपल्या वडिलांच्या घरी तिने घालवलेले ऐषारामी आयुष्य, तिच्या आई वडिलांनी प्रेमाने पुरवलेले तिचे सर्व योग्य अयोग्य हट्ट तिच्या डोळ्यासमोरून तरळु लागले. माहेरच्या आठवणीने ती खुपच व्याकुळ झाली होती. आपल्या प्रेमळ वडिलांचा मायेचा शब्द ऐकण्यासाठी तिचे मन आतुर झाले होते. सकाळपासुन तिने काहीही खाल्ले नव्हते त्यामुळे पोटात भुकेचा डोंब उसळला होता. आपल्या आईच्या हातच्या अनेक चविष्ठ पदार्थांच्या आठवणीने तिच्या जीभेला पाणी सुटत होते. या सगळ्या आठवणीत ती हरवलेली असतानाच सासुचा आवाज तिच्या कानावर पडला, “आम्ही कामावर जातोय, कपडे धुऊन झाले की नीट वळत घाल. जेवण करून ठेवलय ते त्या पोश्या थेरड्याला (सासऱ्याला) गिळायला घाल आणि तु पण गिळ. नंतर संध्याकाळची भाजी साफ करून ठेव.” अशा सगळ्या सुचना देऊन तिची सासु आणि सुमन धुणी भांडी करायला निघुन गेल्या. त्यांच्या बरोबर आकाशही घराबाहेर पडला.

“अस्मिताच्या स्वप्नांची कशी राख रांगोळी झाली ते आपण पाहीले. वशीकरणाच्या प्रभावामुळे या दुष्टचक्रातुन ती कधी बाहेर पडू शकेल का? की उभा जन्म तिला आनंदच्या लाथा खात काढावा लागेल? या सारख्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी पुढे वाचा.”

घरातील सासरे सोडून सर्व सदस्य कामासाठी बाहेर गेल्यावर अस्मिताला थोडी उसंत मिळाली तशी ती घराबाहेर पडली. तिने कॉईन बॉक्सवरून वामनरावांना फोन लावला, त्यांनी तो उचलला पण अस्मिता काहीच बोलली नाही. एक दोन वेळा हॅलो बोलुनही समोरून काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे वामनराव थोडेसे चिडले पण अस्मिताच्या एक हुंदक्याने त्यांनी ओळखले की विरुद्ध बाजुला आपली लाडकी अस्मि आहे. एका क्षणात त्यांच्या चेहेऱ्यावर उत्सुकता, आनंद, दुःख, राग अशा अनेक भावना तरळुन गेल्या. त्यांचा आवाज कातर झाला पण दुसऱ्या क्षणाला तितकेच कठोर होऊन ते म्हणाले की, “तु मला कायमची मेलीस, परत मला फोन करू नकोस” आणि त्यांनी खाडकन फोन ठेऊन दिला. त्यासरशी इकडे अस्मिताच्या आणि तिकडे वामनरावांच्या दोघांच्याही डोळ्यातुन अश्रुंचे पाट वाहू लागले. डोळे पुसत ते कामाला लागले आणि तिनेही आपल्या घराचा रास्ता धरला.

आता हे जवळ जवळ रोजचेच झाले. ठीक बारा वाजता अस्मिता आपल्या वडिलांना फोन करायची ते तो घ्यायचेही पण कोणीच काही बोलायचे नाही. मग भरल्या डोळ्यांनी फोन कट व्हायचा. असेच दोन महिने निघुन गेले. अस्मिता आता घरकामात बरीच तरबेज झाली होती पण तिचा सासुरवास काही संपायची लक्षणे दिसत नव्हती. असे घरात किती दिवस बसणार म्हणुन तिने एका सी ए च्या ऑफिसमध्ये नोकरी पत्करली. पाच हजार रुपये पगार ठरला. तिने घरी ही आनंदाची बातमी सांगितली पण पगार तीन हजारच सांगितला. तिला खात्री होती जर का खरा पगार कळला तर आनंद तो सगळाच दारूत उडवेल अडचणीच्या वेळी उपयोगी पडतील म्हणुन तिने दोन हजाराची आर.डी. उघडायचे ठरवले. घरी तिच्या नोकरीच्या बातमीचे थंड स्वागत झाले त्यामुळे ती हिरमुसली.

रात्री आनंद घरी आल्यावर तिने त्याला ती बातमी दिली पण त्यावर त्याने तिला शिव्या दिल्या, “तुझ्या तीन हजा

रांनी काय होणार आहे, बापाकडुन चांगले आठ दहा लाख घेऊन ये तर घराची परिस्थिती काही तरी सुधारेल. झक मारली आणि तुझ्याशी लग्न केले. तुझ्या बापाकडुन असा पैसा नाही बाहेर पडणार तो कसा बाहेर काढायचा ते मला माहीत आहे” असे म्हणुन त्याने तिला लाथा बुक्क्यांनी अक्षरशः तुडवून काढले. ती गुरासारखी ओरडत होती पण घरातील कोणालाच दया नाही आली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकुन दारात आलेल्या शेजाऱ्यांना त्यांनी हाकलून दिले. बिचारी अस्मिता त्या भयानक माराने अर्धमेली झाली होती. तिला तसेच जमीनीवर पडलेले सोडुन आनंद दारूच्या गुत्त्यावर जायला निघाला. जाताना त्याने तिला तिच्या वडिलांकडून पैसे आणण्यास सांगितले आणि न आणल्यास पुन्हा असाच मार मिळेल अशी धमकीही दिली. आपल्या आईला तिला जेवायला देऊ नकोस असे सांगुन तो घराबाहेर निघुन गेला. रात्री उशिरा घरी आल्यावर तीची विचारपुसही न करता किंवा तिच्या वेदनांची पर्वा न करता त्याने तिच्यावर पाशवी बलात्कार केला. आणि तिला एखाद्या पोतेर्‍यासारखे दूर सारून तो झोपी गेला. ती रात्रभर वेदनेने कण्हत होती पण कोणालाच दयेचा पाझर फुटला नाही, सर्वाना फक्त हवी होती ती तिच्या बापाची दौलत.

दुसऱ्या दिवशी सुजलेला डोळा, फुटलेला ओठ आणि अंगावर काळे निळे वळ झाकत ती कशीबशी ऑफिसला पोहोचली. ग्रॅजुएशनला तिच्या वर्गात शिकणारा महादेव काळे हा काही कामानिमित्त त्याच सी.ए. कडे आला होता. त्याच्याही वडिलांचा मोठा व्यवसाय होता, परीक्षा झाल्यावर तो आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करत होता. त्यांच्याकडून व्यवसायातील खाचा खोचा शिकुन घेत होता. तो फर्स्ट इयरला असताना अस्मिताने कॉलेजला अकरावीला ऍडमिशन घेतली होती. पहिल्या दिवशी तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला. साधी भोळी, निरागस आणि कुणाच्याही अध्यात ना मध्यात नसणारी अस्मिता त्याच्या मनाला खुप भावली होती.

तो फक्त तिला न्याहाळायचा, सतत तिच्या पुढून जायचा जेणेकरून तिने त्याची दाखल घ्यावी पण अस्मिता कायम आपल्याच तंद्रीत असायची. आपले प्रेम व्यक्त करण्याचे धाडस त्याला कधीच झाले नाही, पण ज्या वेळी त्याने तिला विचारण्यासाठी आपली हिम्मत गोळा केली तेव्हा मात्र अस्मिता कोणाच्या तरी प्रेमात पडल्याचे लक्षात येताच त्याने आपल्या भावनांना आवर घातला होता. आज दोन वर्षांनी तिला पाहुन नकळत काही काळासाठी तो भुतकाळात गेला. आत्मविश्वासाने तिच्या जवळ जाऊन त्याने तिला हाक मारली, “अस्मिता! मी महादेव काळे. ओळखलंस का मला? आपण एकाच कॉलेजला शिकत होतो.” अस्मिताने त्याच्याकडे पहिले पण कॉलेजमध्ये असताना तिचे लक्ष केवळ अभ्यासात असायचे आणि आनंद आयुष्यात आल्यावर तिने इतर कोणाकडे पाहायचा प्रश्नच नव्हता. तिच्या चेहेऱ्यावरचे अनोळखी भाव लक्षात येताच महादेवही वरमला पण त्याने स्वतःला सावरत तिची चौकशी केली.

त्याच्याशी बोलताना ती सतत आपल्या माराच्या खुणा लपवायचा प्रयत्न करत होती. तिला पहिल्याच्या आनंदात महादेवचे तिकडे आधी लक्ष गेले नव्हते पण तिच्या अयशस्वी प्रयत्नांमुळे त्याचे लक्ष तिच्या सुजलेल्या डोळ्याकडे आणि फुटलेल्या ओठांकडे गेले तसा तो आवाकच झाला. अस्मितासारख्या सध्या आणि सुंदर मुलीशी इतक्या निर्दयपणे कोणी कसे काय वागु शकतो याचे त्याला अप्रुप वाटले. त्या अनोळखी माणसाबद्दल त्याच्या मनात चीडही निर्माण झाली. पण तिच्या गळ्यातील मंगळसुत्राने तिच्या अवस्थेला कारणीभुत असलेल्या माणसाचे बिंग फोडले होते.

महादेवने अस्मिताच्या अंगावर उठलेल्या वळांबद्दल आणि चेहेऱ्यावरील जखमांबद्दल बोलणे जाणिवपुर्वक टाळले. आणि तिची विचारपूस करून तो तिच्या बॉसच्या केबिन मध्ये गेला. आपले काम आटपल्यावर अस्मिताशी न बोलताच तो तिथुन निघुन गेला. महादेव अस्मिताच्या ऑफिस मधुन बाहेर पडला खरा पण त्याच्या मनात प्रचंड खळबळ उडाली होती. तो स्वतःशीच बोलत होता. “म्हणजे अस्मितांचे लग्न झाले तर! पण कोणाशी? त्या दिड दमडीच्या आनंद सोबत तर नव्हे? पण हे कसे शक्य आहे? अस्मिताचे वडिल या लग्नाला कसे काय तयार झाले? की अस्मिताने पळुन जाऊन लग्न केले? तिची अवस्था आणि अंगावरचे कपडे पाहून तरी असेच वाटते. अस्मिताला तो आनंद मारझोड करतोय की काय? आणि ती का सहन करतेय हे सगळे.

जिच्या दिमतीला नोकरांची फौज असली पाहिजे ती ह्या सी.ए. कडे चक्क नोकरी करतेय! नाही-नाही, अस्मिता सारख्या मुलीच्या नशिबात असे दुःख आणि कष्ट येणे बरोबर नाही.” अस्मिताला या जाचातुन सोडवणे ही आपली नैतिक जवाबदारी आहे असेच महादेव मानत होता. त्याने अस्मिताच्या मैत्रिणीला प्रतीक्षाला गाठले आणि तिच्याकडुन सगळी वस्तुस्थिती समजल्यावर तर तो थक्कच झाला. अस्मितासारखी सुज्ञ मुलगी त्या भामट्या आनंदला कशी काय भुलू शकते तेच त्याला कळेना? नक्कीच यामागे काहीतरी कारस्थान आहे आणि ते आपल्याला शोधुन काढावेच लागेल. काहीही करून यातुन अस्मिताला बाहेर काढायलाच पाहिजे असे त्याने ठरवले. पुढे अस्मिताने आपल्याला स्वीकारले तर उत्तम आणि नाही स्वीकारले तरी काही हरकत नाही पण तिच्या आयुष्यातुन तो नीच आणि हलकट आनंद दूर गेलाच पाहिजे, असा निश्चय करून महादेव आपल्या विचारांना कृतीत उतरविण्यासाठी कामाला लागला.

“ज्योतिषाने सांगीतलेल्या गोष्टीतील पहिली गोष्ट घडु पाहत होती हे वाचकांच्या लक्षात आले असेलच, आता महादेव काळे अस्मिताच्या आयुष्यात आल्यावर काय काय घडामोडी घडतात ते जाणुन घेणे इथे महत्वाचे ठरेल. पुढे वाचा.”

संध्याकाळचे साडेपाच वाजले होते आणि ऑफिस बंद करण्याची वेळ जसजशी जवळ येत होती, तसतशी अस्मिताची बेचैनी वाढतच चालली होती. आनंदने तिला तिच्या वडिलांकडुन पैसे आणण्यास सांगितले होते. ती वडिलांकडे कोणत्या तोंडाने पैसे मागायला जाणार होती आणि जर का पैसे घेऊन नाही गेली तर रात्री मार खाणे काही चुकणार नव्हते. ती पुरती कात्रीत अडकली होती. शेवटी तिने मार खाणे निवडले आणि घराची वाट धरली. रात्री साडेआठला दुकान बंद झाल्यावर, आज जर का अस्मिताने तिच्या बापाकडुन पैसे आणले असतील तर ठीक नाहीतर तिला चांगलीच तुडवायची असा विचार करून आनंद बारकडे निघाला. खिशात पैसे नसल्यामुळे बारवाला त्याला धक्के मारून बाहेर काढू लागला. तसे इतका वेळ त्याच्या मागावर असलेला महादेव त्या बारवाल्याला अडवत म्हणाला, “याचे बिल माझ्या बिलात ऍड करा, आणि त्याला काय हवे असेल ते द्या” म्हणत एका टेबलवर जाऊन बसला. साहजिकच आनंद त्याच्या समोर जाऊन उभा राहिला. “कोण आहेस तु? आणि माझे बिल भरायची तुला काय गरज? त्यात तुझा काय फायदा?” असे आनंदने महादेवला विचारताच महादेव शांतपणे त्याला म्हणाला “काहीच फायदा नाही, मला वाटले की तुझी मदत करावी आणि मी केली, दुसरे काही नाही.” त्याच्या या वक्तव्यावर अविश्वास दाखवत आनंद म्हणाला, “काही तरी स्वार्थ असल्याशिवाय कोणीच कोणाची मदत करत नाही. काय हवय तुला माझ्याकडुन?” महादेव हसला आणि म्हणाला, “काही वर्षांपुर्वी माझी पण तुझ्यासारखीच अवस्था होती. मला पण एकाने असेच बारमधुन धक्के देऊन बाहेर काढले होते. मी तेव्हाच ठरवले की आपली परिस्थिती सुधारली की जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुझ्यासारख्या कोणाची तरी मदत करायची. माझा झालेला अपमान इतर कोणाच्या वाट्याला येऊ द्यायचा नाही. तुला हवे असेल तर तु मला कंपनी देऊन हवी तेवढी दारू पिऊ शकतोस आणि अजुनही तुझा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर बारचा दरवाजा तुला माहीत आहेच, कसलीच जबरदस्ती नाही.” महादेवने आपली चाल खेळली होती आता तो शांतपणे मासा गळाला लागायची वाट पाहत होता.

आनंदचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नव्हता पण टेबलावरची व्हिस्कीची बाटली त्याला आकर्षित करत होती. फुकटात दारू प्यायला मिळतेय ती पिऊ मग पुढचे पुढे बघु. याच्यासारखे मुर्ख रोज भेटले तर काय मजा येईल! असा विचार करून आनंद महादेव समोरील खुर्चीत बसला. वेटरने दोघांसाठी पेग बनवले व चाखणा ठेऊन निघुन गेला. आनंदने अधाशासारखा पहिला पेग संपवला व आशाळभुतासारखा महादेवकडे पाहु लागला. तसे महादेवने त्याला संकोच न करता हवी तेवढी दारू घेण्यास सांगितले. वेटर येण्याची वाट न पाहता आनंदने आणखीन दोन तीन मोठे पेग रिचवले. दारूचा अंमल त्याच्यावर व्हायला लागला होता. आनंदचे शब्द जड येऊ लागल्यावर महादेवने त्याच्याशी गप्पा मारायला सुरवात केली. नांव गाव विचारून झाल्यावर हळू-हळू आनंद खुलत गेला. स्वतःचा मोठेपणा सांगण्याच्या नादात त्याने एका मोठ्या व्यापाऱ्याच्या मुलीला आपण मोठ्या हुशारीने पटवले आणि तिच्याशी लग्न करून आता तिच्या बापाची सगळी इस्टेट घशात घालणार असल्याचे सांगितले. त्यावर त्याच्या हुशारीचे कौतुक करत महादेवने त्याला हे जमवलेस कसे? असे विचारताच, आनंदने त्याला थोडे जवळ बोलावले. महादेव थोडा पुढे सरकताच तो त्याला म्हणाला, “कोणाला सांगु नकोस, पण मी एका तांत्रिकाची मदत घेतली आणि तिच्यावर जालीम वशीकरणाचा प्रयोग केला. आधी तो तांत्रिक तयार होईना मग मी त्याला खोटेच सांगितले की माझे तिच्यावर खुप प्रेम आहे आणि तिच्याशिवाय मी जगु शकत नाही, रडल्याचे नाटकही केले तेव्हा कुठे तो मुर्ख तांत्रिक माझ्या बोलण्याला फसला. त्या तांत्रिकाने मला सांगितले की तो मला एक पावडर देईल ती काहीही करून तिच्या जिभेवर पडली पाहिजे. मग मला संधी मिळताच एका पाचशेच्या नोटवर ती पावडर टाकुन नोट घडी करून मी तिला दिली. नोट हातात घेताच सवयीने तिने ती खरी आहे का हे तपासण्यासाठी वर धरली आणि त्या नोटवर लावलेली पावडर तिच्या नाकातोंडात गेली आणि माझे काम झाले. मला तिची सवय माहीत होती आणि मी त्याचाच फायदा उचलला.” स्वतःच्या हुशारीवर खुश होत आनंद म्हणाला.

नंतर इतर कोणी तिचे ब्रेन वॉश करू नये यासाठी खबरदारी म्हणुन त्या तांत्रिकाने मानवी हाडांची मंतरलेली भुकटी पण मला दिली. मी तिला अगदी सहजपणे ती खाण्यातुन दिली. आता ती मला सोडुन जायचा विचारही कधी करणार नाही आणि माझ्या आज्ञेतही राहील. पण तिच्या बापाने तिला इस्टेटीतून बेदखल केले त्यामुळे इस्टेटच काय, एक रुपया पण नाही दिला तिच्या बापाने अजुन. काल चांगलीच चामडी सोलुन काढली आहे तिची आणि आज तिला तिच्या बापाकडुन पैसे घेऊन यायला सांगितले आहे. जर का तिने पैसे नाही आणले तर आज तिची कंबक्ती ठरलेली आहेच. बघु तिचा बाप कुठवर पैसे देत नाही ते.” असे म्हणुन आनंद हसु लागला. महादेवच्या मस्तकात तिडीक गेली त्याला वाटले व्हिस्कीची बाटली उचलावी आणि आनंदच्या टाळक्यात हाणावी पण त्याला अजुन माहिती हवी होती त्यामुळे त्याने स्वतःवर संय्यम ठेवला. आनंदची स्तुती करत तो म्हणाला, “तु तर खुप भारी डाव खेळलास, मला पण त्या तांत्रिकाकडे घेऊन चल ना! मला पण एक पोरगी पटवायची आहे.” तेव्हा खुश होऊन आनंद त्याला म्हणाला, “तु उद्या मला अशीच दारू पाज मग नक्की घेऊन जाईन. पण याची कोणाकडे वाच्यता करू नकोस.” असेही ठणकावले. दुसऱ्या दिवशी आजच्या सारखेच भेटायचे ठरवुन झोकांड्या खात आनंद बारमधून बाहेर पडला तसे महादेवने बिल चुकते करून पुरेसे अंतर ठेवत त्याच्या मागे जाण्यास सुरवात केली.

धडपडत ठेचकाळत आनंद आपल्या घरी येऊन पोहोचला. त्याने अस्मिताला हाक मारली तसा अस्मिताच्या जीवाचा थरकाप उडाला पण तिच्या मनाची मार खाण्याची तयारी झाली होती. तिने दरवाजा उघडला तसा दारूचा घाण वास तिच्या नाकात शिरला. तिच्या घरी कोणीच दारू घेत नसे ना मांसाहार करत असे त्यामुळे तिला या सगळ्याची सवय नव्हती. इतर कोणत्याही स्त्रीने आपल्या नवऱ्याचा तिरस्कार केला असता पण वशीकरणाच्या प्रभावामुळे आनंदने तिला कितीही त्रास दिला तरी ती त्याच्यावर प्रेमच करत होती. आनंदने दारातच तिला विचारले, “बापाकडुन पैसे आणलेस?” ती नाही म्हणताच त्याने तिच्या कानाखाली एवढ्या जोरात वाजवली की ती कोलमडुन खालीच पडली. आनंद इतका बेफाम झाला की तिला लाथा बुक्क्यांनी मारू लागला. ते कमी पडले म्हणुन त्याने तोंडातील जळती विडी तिच्या मनगटावर चुरडली. वेदनेने अस्मिता किंचाळली. ते पाहुन महादेव प्रचंड संतापला पण महत्प्रयासाने त्याने स्वतःला आवरले. शेवटी अस्मिता बेशुद्ध पडल्यावर आनंद थोडा थंडावला. अस्मिताच्या सासुने तिच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणले आणि घरात नेले. जावेने दरवाजा बंद करताच काळोखात लपलेला महादेव बाहेर आला व त्याने दरवाजा जवळ जाऊन कानोसा घेतला. आत सगळी शांतता होती, रडण्याचे किंवा शिव्या दिल्याचे कुठलेच आवाज त्याच्या कानावर पडले नाही. अर्धा तास थांबुन आता सगळे ठीक असावे असा विचार करून तो आपल्या घरी जाण्यास निघाला.

“एकीकडे एकतर्फी प्रेमातुन, अस्मिता मिळेल याची काहीही शाश्वती नसताना महादेव तिला आनंदच्या जाचातुन मुक्त करण्यासाठी धडपडतोय. आणि दुसरीकडे आनंद, प्रेमाखातर आपल्या बापाची इस्टेट झुगारून आलेल्या अस्मिताची अवस्था पैशासाठी किती दयनीय करतोय. अजब आहे हे सारे! महादेव आता पुढे काय शक्कल लढवतो ते पुढे वाचा.”

दुसऱ्या दिवशी सकाळीच महादेव वामनरावांच्या घरी पोहोचला. तो अस्मिताचा मित्र आहे आणि तिच्या विषयी त्याला काही बोलायचे आहे असे त्याने सांगताच वामनरावांच्या कपाळावर आठ्या आल्या. “माझी मुलगी मला केव्हाच मेली. मला तिच्या विषयी काहीच बोलायचे नाही. तु जाऊ शकतोस” म्हणुन त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. पण “तिचा जीव धोक्यात आहे” असे महादेव म्हणताच ते जागीच थबकले. “काय म्हणालास? नीट सांग तुला काय माहीत आहे ते!” वामनराव कडाडले. आनंदने दारूच्या नशेत जे काही महादेवला सांगितले होते ते त्याच्या नकळत महादेवने आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले होते. तो व्हिडीओ त्याने वामनरावांना दाखवला. त्यावर वामनराव त्याला म्हणाले, “त्या भिकारड्या आनंदला मी एका फुटकी कवडी पण देणार नाही.” तेव्हा महादेव त्यांना म्हणाला की “आनंदने अस्मिताला तुमच्याकडुन पैसे न आणल्या बद्दल खुप मारले.” ते ऐकुन वामनरावांच्या मनात कालवा कालव झाली पण तरीही तसे न दाखवता ते म्हणाले, मारू दे. तिची तिच लायकी आहे. तिला किती वेळा समजावले पण शेवटी गेली त्या हलकट माणसाबरोबर पळुन. भोग म्हणावं आपल्या कर्माची फळे. त्यासरशी महादेवने आनंद अस्मिताला निर्दयपणे मारझोड करत असतानाचा विडिओ वामनरावांच्या समोर धरला व म्हणाला, “हा विडिओ पाहिल्यावरसुद्धा तुम्ही हेच म्हणाल का?” तो विडिओ पाहताच वामनरावांचा चेहरा पार लालबुंद झाला. त्यांच्या डोळ्यात अंगार भडकले. रागाच्या भरात ते थरथर कापू लागले आणि मोठ्याने ओरडले, “आनंद, मी तुझा जीव घेईन xxxxx. माझ्या फुलासारख्या पोरीला इतक्या निर्दयपणे ती बेशुद्ध पडेपर्यंत मारतोस, षंढ कुठला! स्वतःमध्ये पैसे कमवायची धमक नाही आणि माझ्या पोरीला त्रास देऊन माझ्याकडुन पैसे उकळायला बघतोस, हरामखोर! अरे तुझी लायकी तरी आहे का तिचा नवरा म्हणवण्याची. मी तुला जीवंत सोडणार नाही” म्हणत त्यांनी भिंतीवर लटकवलेली आपली बंदुक काढली.

महादेव त्यांना अडवत म्हणाला, “काका अस्मिताला आनंद मारत असताना माझेही रक्त असेच खवळले होते, पण मी स्वतःवर संय्यम ठेवला. थोडा धीर धरा. ज्या तांत्रिकाकडुन आनंदने अस्मितावर वशीकरण करवले त्याचा पत्ता मला आज संध्याकाळी आनंदकडुन मिळणार आहे. तो एकदा का मिळाला की अस्मिताला त्या जालीम वशीकरणातुन मुक्त करण्याचा उपाय शोधता येईल. मग आपण बघु आनंदचे काय करायचे ते.” महादेव पुढे म्हणाला, “सध्या अस्मितावर त्याच्या वशीकरणाचा प्रभाव आहे त्यामुळे तिला या क्षणाला जरी आपण त्याच्याकडुन उचलुन इथे आणले तरी त्याचा काहीच उपयोग नाही कारण ती त्याच्यातच अडकलेली राहील व संधी मिळताच परत त्याच्याकडेच जाईल. जसे ती या सगळ्यातुन मुक्त होईल तसे तिला त्याच्या तावडीतुन सोडवणे आपल्याला कठीण जाणार नाही. मला वाटते की तुम्ही स्वतः त्याच्याकडे जाऊन त्याला पैसे द्या, वर विनंती करा की हवे तेवढे पैसे तुम्ही त्याला द्याल पण तुमच्या मुलीला त्याने त्रास देऊ नये. त्यामुळे त्याला तो जिंकल्याची भावना होईल, त्याला त्या भ्रमातच राहु दे जेणेकरून तो अस्मितावर अजुन अत्याचार करणार नाही. दिलेले पैसे नंतर कसे वसुल करायचे ते पाहता येईल.” महादेवचे म्हणणे वामनरावांना पटले. त्यावेळी त्यांना त्याचा खुप आधार वाटला. आनंदकडुन त्या तंत्रिकांचा नांव पत्ता वगैरे मिळाल्यावर पुन्हा भेटण्याचे ठरवुन महादेव तिथुन निघाला. महादेव व वामनरावांचे बोलणे आपल्या बेडरूमच्या दाराआडून ऐकत उभी असलेली अस्मिताची आई हॉल मध्ये आली. वामनरावांसारखे तिचेही डोळे भरलेले होते. माझ्या पोरीला वाचावा हो! म्हणत त्या माऊलीने हंबरडा फोडला. वामनरावांनी तिला जवळ घेत तिचे सांत्वन केले. तिच्या दुःखाचा भर ओसरल्यावर ते आपल्या पत्नीला म्हणाले, “तु काही काळजी करू नकोस, मी वाटल्यास माझी सगळी संपत्ती पणाला लावीन पण आपल्या लाडक्या अस्मिला सुखरूप परत आणेन.” त्यांनी बॅगेत पाच लाख रुपये भरले व ड्रायव्हरला आनंदच्या घराकडे गाडी घेण्यास सांगितले.

आनंदच्या घरी पोहोचताच त्यांनी दारावर टक टक केली, तसे “कोण आहे?” असा वैतागलेला आवाज त्यांच्या कानावर पडला. “अस्मिता आहे का? मी तिचा बाबा, अस्मिताला भेटायला आलोय.” वामनरावांचे वाक्य संपताच खाडकन दरवाजा उघडला. दारात आपल्या सासऱ्याला हातात बॅग घेऊन आलेले पाहुन आनंद वेडा व्हायचाच बाकी राहिला होता. त्याच्या पाठोपाठ घरातील सगळे सदस्य उभे होते. बघा! थेरड्याला नाक घासत दारात यायला लावले की नाही असे भाव त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होते. तो बाहेर आला. त्याला पाहताच वामनरावांनी कानशिले गरम झाली पण त्यांनी स्वतःला सावरले व म्हणाले, “अस्मिता आहे का? मला तिला भेटायचे आहे.” तसे आनंद गुर्मीत म्हणाला, “काय काम आहे?” काम असे काही नाही, फक्त भेटायला आलो होतो, लग्नाला येता आले नाही आणि काही भेटही देता नाही आली म्हणुन हे थोडे पैसे सोबत आणले होते.” असे म्हणत वामनरावांनी ड्रायव्हरकडील बॅग हातात घेऊन उघडून दाखवली. त्यातील नोटांची बंडल पाहुन सर्वांचेच डोळे फिरले. हर्षवायु होतो की काय अशी त्यांची अवस्था झाली. त्यांच्या हातातील बॅग जवळ जवळ हिसकावुन घेत आनंद आणि त्याचे कुटुंबीय घरात गेले. या त्यांच्या निर्लज्जपणामुळे आवाक झालेले वामनराव त्यांच्या पाठोपाठ आत गेले. त्यांची नजर अस्मिताला शोधत होती. अस्मि कुठे दिसत नाही, तिला बोलवता का? किचन मध्ये अस्मिता जमिनीवर लाळा गोळा होऊन पडली होती. आपल्या वडिलांचा आवाज कानात शिरताच मोठ्या कष्टाने ती उठली आणि भिंतीचा आधार घेत हळुहळु बाहेर आली.

अस्मिताच्या डोळ्याखाली मारामुळे काळे निळे झाले होते, ओठ फुटून रक्त सुकले होते, अंगावर जागो जागी वळ उठले होते. हाता पायावर सुज आली होती. बिचारीचा चेहरा वेदनेने पुरता पिळवटला होता. तिची ती अवस्था पाहुन वामनरावांच्या हृदयात कालवाकालव झाली. त्यांचे डोळे भरले. संतापाने त्यांचे स्नायु फुरफुरू लागले. आपल्या हृदयाच्या तुकड्याची ती दयनीय अवस्था त्या बापाच्या जीवाला असह्य वेदना देऊन गेली. रागाच्या भरात त्यांनी आनंदला अशी काही जोराची थप्पड ठेऊन दिली की त्याच्या डोळ्यासमोर काजवेच चमकले. तो कोलमडला. ती थप्पड आनंदच्या इतकी जिव्हारी लागली की रागाच्या भरात तो वामनरावांच्या अंगावर धावुन गेला व त्याने त्यांच्या वर हात उगारला पण त्याचवेळी अस्मिता मध्ये आली आणि तिने तो मार स्वतःच्या अंगावर झेलला. त्या फटक्यामुळे ती खाली पडली, तिला सावरायला वामनराव खाली झुकले तसे हात जोडून ती आपल्या वडिलांना म्हणाली, “बाबा का आलात तुम्ही इथे? तुम्ही जा इथुन. मी ठीक आहे. इथे नका थांबु, मी वाटेल तेवढा मार खायला तयार आहे पण तुमचा अपमान मला नाही सहन होणार. प्लिज बाबा तुम्ही जा इथुन.” “अगं पण! तुला अशा अवस्थेत कसे सोडुन जाऊ? ही माणसं नाहीत, सैतान आहेत सैतान. तुझा जीव घेतील ते. माझे ऐक पोरी, चल घरी.” वामनराव काकुळतीने म्हणाले. तेव्हा आनंद त्यांच्या अंगावर खेकसला, “तुझी पोरगी जर जीवंत राहावी असे तुला वाटत असेल ना तर वेळच्या वेळी मला पैसे देत जा, कळलं का रे थेरड्या. आणि तिला इथुन तुच काय तुझा स्वर्गात गेलेला बाप पण नाही नेऊ शकत. सोन्याचे अंड देणारी कोंबडी जाऊ द्यायला मी काय मुर्ख वाटलो की काय? चल निघ आता. भेटीची वेळ संपली.” त्यावर वामनराव हात जोडुन त्याला म्हणाले, “तु म्हणशील तेवढे पैसे तुला द्यायला मी तयार आहे, पण कृपा करून माझ्या मुलीचा छळ करू नकोस. माझी तुला हात जोडुन विनंती आहे. असे म्हणत वामनरावांनी भरल्या डोळ्यांनी अस्मिताच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ते आनंदच्या घरातुन बाहेर पडले. कारमध्ये बसुन ते ओक्सबोशी रडु लागले तसे ड्रायव्हरने गाडी त्वरेने घराच्या दिशेने दामटली.

“महादेवच्या सुचनेनुसार वामनराव आनंदच्या घरी पाच लाख रुपये देतात आणि शिवलकर कुटुंब पैशासाठी किती खालच्या थराला जाऊ शकते हे पाहुन ते पुरते आवाक होतात. आपल्या बुद्धी आणि हुशारीच्या जोरावर महादेव आनंदकडुन तंत्रिकाचा पत्ता काढुन घेतो का? तो तांत्रिक वामनरावांनी मदत करतो की त्यांना हाकलुन देतो ते आता पुढे वाचा.”

पैसे हातात आल्यावर आनंदला आकाश ठेंगणे झाले. त्याने घरच्यांना सांगितले की “आज पाच लाख आले आहेत उद्या सगळी इस्टेट आपली होते की नाही ते बघा. आता आपले गरीबीचे दिवस संपले. आता कोणालाही काम करायची गरज नाही. दुपारी जेवायला मस्तपैकी मटण बनवा.” अस्मिता तशीच जमिनीवर पडुन होती. त्याने तिच्याकडे ढुंकूनही पहिले नाही की तिची साधी विचारपुसही केली नाही. तो आज सकाळीच आपले पहिले यश साजरे करायला बाहेर पडला. इकडे वामनरावांनी फोन करून महादेवला सगळा वृत्तांत कथन केला होता. महादेवच्या अंदाजानुसार पैसे मिळताच आनंद स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. आणि घडलेही तसेच. तो आवरून लगेच घराबाहेर पडला. त्याने दोन किलो मटण व एका वाईन शॉप मधुन दारू खरेदी केली. घेतलेले मटण त्याने घरी आणुन दिले आणि तो पुन्हा घराबाहेर पडला व दारू पिण्यासाठी निवांत ठिकाण शोधु लागला. महादेव त्याच्या मागावर होताच. आनंद कुठे जातोय याचा महादेवने अंदाज घेतला आणि आपली कार फिरवून अशा रितीने आणली की तो आनंदला व्यवस्थित दिसेल. आनंदने महादेवला ओळखले आणि आवाज दिला. तसे महादेवने आश्चर्य दाखवत कार आनंदजवळ थांबवली आणि आनंदला विचारले, “काय आनंदराव आज सकाळी सकाळीच दर्शन झाले, आणि खुप खुशीत पण दिसता! तुमच्या सासऱ्याने पैसे दिले वाटते!” आश्चर्य वाटुन आनंदने त्याला विचारले, “तुला कसे कळले?” “काल रात्री तुम्ही एवढे उदास आणि दुःखी वाटत होतात. दारू प्यायला पण पैसे नव्हते आणि आज एवढे खुश दिसत आहात. शर्टचा खिसा काल छातीला चिकटला होता आणि आज मात्र फुगलेला आहे. हातात वाईन शॉप आणि मटणाच्या दुकानात देतात तसली काळी प्लॅस्टिकची पिशवी दिसते आणि त्यात दारूच्या बाटलीच्या बॉक्ससारखा आकार दिसतो याचा अर्थ न कळण्याइतका काही मी मुर्ख नाही!” महादेवच्या अचुक निरीक्षणामुळे आनंद एकदम प्रभावित झाला आणि म्हणाला, “एकदम बरोबर ओळखले महादेव राव तुम्ही. (नकळत तो महादेवला आदर देऊन बोलु लागला होता.) मानले बुवा तुमच्या निरीक्षण आणि तर्काला. आज सकाळीच तो थेरडा माझ्या घरी आला होता. पाच लाख रुपये देऊन गेला, आहात कुठे? त्याची दुखती नस जी मी आवळली! पैसे न देऊन सांगतो कोणाला?” आणि महादेवला टाळी देत आपल्याच कोटीवर तो खदा खदा हसु लागला. महादेवला त्याच्या निर्लज्जपणाचा भयंकर तिटकारा आला होता पण त्याने चेहेऱ्यावर काहीच भाव न आणता त्याची स्तुती करत त्याच्या नशिबावर जळल्यासारखे दाखवले.

“आमचे तेवढे काम करा की आनंदराव”, असे महादेवने म्हणताच, स्वतःच्या स्तुतीने सुखावलेला आनंद लगेच तयार झाला. हातातील बाटली उंचावत आनंद म्हणाला, “काल तुम्ही मला दारू पाजली, आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी. आपला प्रोग्रॅम झाला की मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो. पण बसणार कुठे? तुमच्या कार मध्ये बसले तर चालेल का?” तेव्हा क्षणभर विचार करून महादेव त्याला म्हणाला, “कार मध्ये बसून दारू प्यायला मला काहीच प्रॉब्लेम नाही पण माफ करा मी दिवसा घेत नाही. मला नंतर ऑफिसलाही जायचे आहे तेव्हा तुम्ही घ्या, मी तुम्हाला फक्त कंपनी देईन. वाटल्यास संध्याकाळी आपण एकत्र बसु.” यावर आनंदने ते मान्य केले आणि गाडीत बसला. आनंदने सांगितलेल्या पत्त्याच्या दिशेने महादेवने कार वळवली आणि एका शांत जागी झाडाच्या सावलीत त्याने आपली कार थांबवली. आनंदनें प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये दारू ओतुन आपला प्रोग्रॅम सुरु केला. बोलण्या बोलण्यात महादेवने त्या तांत्रिकाविषयी बरीच माहिती विचारून घेतली. पत्ता नीट समजून घेतला. जसा आनंदचा कोटा पुरा होत आला तसा महादेवने आनंदचे लक्ष नाही असे पाहुन वामनरावांना एका मिस कॉल दिला, लगेचच वामनरावांनी महादेवला कॉल केला. एक मिनिट हा आनंदराव, ऑफिस मधुन फोन आहे म्हणत त्याने कॉल उचलला. फोनवर केवळ हो नाही अशी जुजबी उत्तरे देत, “हो मी लगेच निघतो” म्हणत त्याने फोन ठेवला. “काय झाले? कुठे निघालात एवढ्या घाईत? तुम्हाला तांत्रिकाकडे जायचे होते ना?” असे आनंदने विचारताच महादेव म्हणाला, ऑफिसमध्ये महत्वाचे काम आले आहे मला तातडीने जावे लागतंय. सॉरी आनंद आपण पुन्हा केव्हा तरी जाऊ. आज संध्याकाळी नक्की भेटु पण आता मला जायला हवं” असे म्हणत महादेवने आनंदच्या बाजुचा दरवाजा उघडला. महादेवचा इशारा समजुन आनंद कारमधुन उतरला. आनंदला तिथेच सोडुन महादेवने कार वामनरावांच्या घराकडे वळवली.

“त्या तंत्रिकांचा पत्ता मिळाला ना? चल आपण आत्ताच निघु त्याच्याकडे”, असे म्हणत वामनराव महादेव सोबत आनंदने दिलेल्या पत्त्यावर जायला निघाले. शहराबाहेर तासभर कार चालवल्यावर ते इच्छित स्थळी पोहोचले. खुण म्हणुन सांगितलेल्या वडाच्या झाडाजवळ त्यांनी कार उभी केली. तिथुन डाव्या हाताला एका पायवाट जाताना त्यांना दिसली. त्या वाटेने ते जाऊ लागले. साधारण पंधरा मिनिटे चालल्यावर त्यांना ओळखीची दुसरी खुण दिसली ती म्हणजे एका छोटेसे तळे. तिथुन पुढे गेल्यावर एका विस्तीर्ण बुंधा असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ ते आले. त्या झाडाच्या बाजूला एका झोपडी वजा घर होते. घराजवळ जाऊन त्यांनी आवाज दिला पण कोणताच प्रतिसाद मिळाला नाही म्हणुन त्यांनी आत डोकावून पहिले. आतमध्ये पुर्ण अंगावर चिताभस्म चोपडलेला एका धिप्पाड माणुस व्याघ्रजिनावर ध्यानस्थ बसला होता. त्याच्या चेहेऱ्यावरील तेज अभुतपुर्व होते. त्या तांत्रिकाची तपस्या भंग करायचे धाडस त्या दोघांनाही झाले नाही त्यामुळे त्याचे ध्यान तुटण्याची ते दोघे वाट पाहु लागले. जवळपास तासाभराने त्या तांत्रिकाने डोळे उघडले. आपल्या समोर बसलेल्या त्या दोघांना पाहुन तो आश्चर्यचकित झाला व म्हणाला, “कोण तुम्ही? माझ्याकडे काय काम आहे? आणि मुळात तुम्हाला माझा पत्ता कोणी दिला?” तेव्हा महादेवने त्या तांत्रिकाला सगळी गोष्ट सांगितली की कसे आनंदने त्यांच्याकडुन एका मुलीवर वशीकरण करवुन घेतले होते, आणि नंतर तिच्या वडिलांकडून पैसे मिळवण्यासाठी कसा तिचा अनन्वित छळ करत होता. सगळे ऐकल्यावर त्या तांत्रिकाने विचारले की तुम्हाला आता माझ्याकडुन काय हवे आहे? त्यावर वामनरावांनी हात जोडत त्या तांत्रिकाला कळकळीने विनंती केली की त्याने आपल्या मुलीवरील वशीकरण नाहीसे करावे नाहीतर ती काही फार जगणार नाही. तेव्हा त्या तांत्रिकाने तसे करण्यास नकार दिला. तो म्हणाला, “तसे करणे उचित होणार नाही, मी आनंदला शब्द दिला होता की त्याचे काम करेन म्हणुन आता जर का मी केलेले वशीकरण काढले तर ती बेईमानी होईल.”

तेव्हा रडवेल्या स्वरात वामनराव त्या तांत्रिकाचे पाय धरून म्हणाले, “माझ्या पोरीला वाचावा, एकुलती एका पोर आहे हो माझी! तो आनंद तिला खुप मारझोड करतो, उपाशी ठेवतो. माझा सगळा पैसा तुम्हाला द्यायला मी तयार आहे पण माझ्या पोरीचा जीव वाचावा.” तरीही तो तांत्रिक बधत नाही हे पाहिल्यावर महादेवने बारमध्ये दारू पिऊन आनंद बरळतानाचा आणि अस्मिताला निर्दयपणे मारहाण करत असतानाचे दोन्ही व्हिडिओ त्या तांत्रिकाला दाखवले. त्याचा अपेक्षित परिणाम झाला. आपली मोठी चुक झाल्याचे त्या तांत्रिकाच्या लक्षात आले. त्या तांत्रिकाने वामनरावांनी माफी मागितली आणि वशीकरण तोडण्याचा उपाय सांगितला. झोपडी बाहेरील एक गुलाबाचे फुल तोडून आणले व वशीकरण नष्ट होण्यासाठी एक अधिष्ठान मांडले. जवळ-जवळ तासभर ते अधिष्ठान सुरु होते. अधिष्ठान संपताच त्याने कसली तरी पावडर त्या गुलाबावर टाकली आणि मंत्राने तो गुलाब भरून टाकला. नंतर ते भारलेले गुलाबाचे फुल त्याने महादेवकडे दिले आणि ते फुल अस्मिताला हुंगायला लावण्यास सांगितले. त्याचवेळी वशीकरण मोडण्यासाठी एक मंत्रही म्हणावयास सांगितला. एवढे केले की वशीकरणाच्या प्रभावापासुन अस्मिता मुक्त होईल असे त्याने सांगितले. त्या तांत्रिकाचे आभार मानत वामनरावांनी आपल्या खिशात हात घातला, तेव्हा त्यांना अडवत त्या तांत्रिकाने पैसे घेण्यास नकार दिला, अनावधानाने त्याच्यामुळे जो त्रास झाला त्याबद्दल त्यांची माफी पण मागितली. “आयुष्यात कधी गरज पडली तर खुशाल माझ्याकडे या, माझ्या झोपडीचे दरवाजे तुमच्यासाठी नेहेमी खुले आहेत”, असे म्हणुन त्या तांत्रिकाने त्यांना निघण्यास सांगितले. तसेच त्या गुलाबाच्या फुलाला त्या दोघांनी किंवा अस्मिता व्यतिरिक्त इतर कोणीही हुंगल्यास फार विचित्र परिणाम होतील असे सांगुन त्याने खबरदारी घेण्यास बजावले, पुन्हा एकदा तांत्रिकाचे आभार मानल्यावर गुलाबाचे फुल सोबत घेऊन त्या मंत्राची मनात उजळणी करत वामनराव आणि महादेव परतीच्या रस्त्याला लागले.

“महादेव आणि वामनराव तांत्रिकाकडुन वशीकरणाचा तोड मिळवण्यात तर यशस्वी होतात पण ते अस्मिताला त्या वशीकरणातुन मुक्त करू शकतात का? की आनंद त्यांचा डाव हाणुन पडतो ते जाणण्यासाठी पुढे वाचा.”

महादेवच्या गाडीतुन उतरल्यावर डोक्यावर दारूचा अंमल चढल्यामुळे आनंद त्या झाडाखाली बसला व बसल्या बसल्याच झोपी गेला होता. त्यावेळी त्यांच्या खिशात वीसेक हजार रुपये आहेत असे कोणी सांगितले असते तरी कोणाला विश्वास बसला नसता. त्याच्या अवतारावरून कोणी तरी बेवडा दारू पिऊन पडला असेल असा समज करून लोक त्याच्या बाजुने निघुन जात होते. दारूची नशा उतरल्यावर साधारण चार वाजता आनंद आपल्या घरी पोहोचला. घरी गेल्यावर त्याने मटणाचे पोटभर जेवण केले व पुन्हा झोपी गेला. पाच वाजण्याच्या सुमारास वामनराव आनंदच्या घरी पोहोचले. आनंदच्या आईला त्यांनी अस्मिताला डॉक्टरकडे घेऊन जायचे असल्याचे सांगितले. अपेक्षेप्रमाणे तिने त्यांना नकार दिला व आनंदला कळले तर तो भडकेल असे सांगितले. तेव्हा वामनरावांनी हजाराच्या नोटांची एका गड्डी तिच्या समोर ठेवली आणि अस्मिताला त्यांच्या सोबत जाऊ देण्याची विनंती केली. आनंदची आई काय करावे या विचारात पडली. तेव्हा तिचा दुसरा मुलगा आकाश तिला बाजुला घेऊन गेला आणि म्हणाला, एवढा कसला विचार करतेस, “ज्या पद्धतीने आनंद तिला मारतो ते पाहता ती काही जास्त जगेल असे वाटत नाही. उद्या जर का ती मेली बिली तर मिळणारे पैसे पण जातील आणि तिचा बाप आपल्या सगळ्यांना खाडी फोडायला पाठवेल ते वेगळे. तो नेतोय तिला डॉक्टरकडे तर नेऊ देत. त्यात आपले काहीच नुकसान नाही उलट फायदाच आहे. आनंदनें ती कुठे जाऊ नये म्हणुन बंदोबस्त केला आहे ना? मग टेन्शन कसले घेतेस? जाऊ दे तिला.” “ते ठीक आहे रे! पण आनंदचे काय? त्याला नाही आवडणार तिला तिच्या बापाबरोबर पाठवलेले.” आनंदच्या आईने आपली काळजी व्यक्त केली. एका तासाने काही होत नाही, तोपर्यंत अस्मिता घरी परत येईल पण पोटात दारू आणि मटण गेल्यामुळे हा काय एवढ्यात उठण्यातला नाही, त्यामुळे तु त्याची काळजी करू नकोस असे सांगुन आकाशने अस्मिताला घेऊन जाण्यास वामनरावांना परवानगी दिली पण एका तासाच्या आता तिला परत घेऊन येण्याची ताकीदही दिली.

अस्मिताला घेऊन वामनराव थेट आपल्या घरी गेले तिथे डॉक्टर आधीच आलेले होते. अस्मिताची अवस्था पाहुन तिच्या आईने तर हंबरडाच फोडला. घरातील सर्वच लोकांचे डोळे पाणावले. पण ही वेळ दुःख करत बसण्याची नव्हती. अस्मिताला तिच्या रूममध्ये नेऊन डॉक्टरांनी तिची पुर्ण शारीरिक तपासणी केली. कुठेही फ्रॅक्चर नव्हते पण मुका मार खुप लागला होता. तिला केवळ चांगले सकस अन्न आणि भरपुर विश्रांतीची गरज होती. काही गोळ्या व औषधे लिहुन देऊन डॉक्टर निघुन गेले. अस्मिताला तिच्या आईने मायेने जवळ घेतले व स्वतःच्या हाताने तिला खाऊ घातले. नंतर अस्मिताला आराम करायला सांगुन ती रूमच्या बाहेर निघुन गेली. इतक्यात महादेवने वामनराव कुलकर्ण्यांच्या घराची बेल वाजवली. आपण काय करणार आहोत याची कल्पना घरातील सदस्यांना न देता वामनरावांसोबत तो थेट अस्मिताच्या खोलीत आला, गुलाबाच्या फुलांचा एका सुरेख पुष्पगुच्छ त्याने अस्मिताच्या हातात दिला व “get well soon अस्मिता!” म्हणत एका छानसे स्मित केले. थँक्स म्हणत जसा अस्मिताने त्या पुष्पगुच्छाचा वास घेतला तसा महादेव आणि वामनरावांनी तांत्रिकाने सांगितलेल्या मंत्राचे उच्चारण हलक्या आवाजात सुरु केले. मंत्राचे उच्चारण संपताच अस्मिता बेशुद्ध झाली. महादेवने त्या पुष्पगुच्छात मांत्रिकाने दिलेले गुलाबाचे फुल खोचले होते. त्यामुळे कोणाला काहीच संशय नाही आला आणि कामही पार पडले होते. वामनराव महादेवच्या हुशारीवर खुप खुश झाले. हातात पाणी घेऊन त्यांनी अस्मिताच्या चेहऱ्यावर शिंपडले आणि झोपेतुन उठल्याप्रमाणे अस्मिता जागी झाली.

क्षणभर तिला सुधरेना की ती कुठे आहे पण समोर आपल्या वडिलांना पाहुन तिच्या डोळ्यासमोरून सर्व घटना एखाद्या चित्रपटासारख्या तरळुन गेल्या आणि तिला खुप अपराधी वाटले. तिचे डोळे भरले. मला माफ करा बाबा म्हणत ती वामनरावांना बिलगली. वामनरावांची खात्री पटली की अस्मितावरचे वशीकरण तुटले होते. त्यांनी मनोमन त्या तांत्रिकाला धन्यवाद दिले आणि तिला हृदयाशी घट्ट धरले. गदगदलेल्या स्वरात ते म्हणाले, “जे झाले त्यात तुझा काहीच दोष नव्हता बाळा, या सर्वातुन तु सुखरूप बाहेर पडलीस हेच माझ्यासाठी मोलाचे आहे.” नंतर त्यांनी आनंदने त्यांच्या पैशासाठी तिच्यावर वशीकरण करून तिला त्याच्याशी लग्न करायला कसे भाग पडले, महादेवने सी. ए. च्या ऑफिस मध्ये तिला पाहिल्यावर आनंदकडुन सगळे खरे कसे काढून घेतले, नंतर त्याने तांत्रिकाकडे जाऊन तिच्यावरील वशीकरण दूर करण्यासाठी उपाय सुचविण्यास त्याला कसे प्रेरित केले आणि आपल्या अक्कल हुशारीने त्याने तो उपाय कसा यशस्वी केला हे सगळे समजावुन सांगितले. “आज तु आमच्या समोर जीवंत दिसतेस ना ती केवळ त्याच्या प्रयत्नांमुळेच.” ते सर्व ऐकताच अस्मिताने महादेवकडे पाहिले व नजरेने कृतज्ञता व्यक्त करत thanks म्हणाली. त्याने देखील तिला नजरेनेच आश्वस्त केले व welcome back म्हटले. दोघांनी एकमेकांकडे पाहत छान स्मितहास्य केले. आपल्या लेकीला असे हसताना पाहुन वामनरावांचा जीव सुखावला त्याचवेळी आपण आपल्या लेकीच्या वागण्यामागचे कारण समजुन न घेता तिला दोष दिला, तिची मदत करायचे सोडुन तिला त्या नराधमाच्या हवाली करून स्वस्थ बसलो याचा त्यांना प्रचंड पश्चात्ताप झाला. दुःखावेगाने ते लहान मुलासारखे रडू लागले. ते पाहुन महादेव आणि अस्मिता दोघेही गोंधळले. “मला माफ कर अस्मि! तुला जेव्हा माझी सर्वात जास्त गरज होती नेमके तेव्हाच मी तुला वाऱ्यावर सोडले. मला तुझा बाप म्हणवुन घ्यायची लाज वाटते पोरी.” मग ती काही बोलणार इतक्यात महादेवला उद्देशुन ते म्हणाले, “महादेवा! तु नसतास तर मी माझ्या मुलीला कायमचा मुकलो असतो रे! तुझे उपकार मी या जन्मात फेडू शकत नाही.” असे म्हणुन त्यांनी महादेव समोर हात जोडले. तेव्हा “अहो काही तरी काय बोलताय काका! मी माझे कर्तव्य केले. तुम्ही माझ्या वडिलांच्या जागी आहात तुम्ही मला हात जोडायचे नाहीत तर मला आशीर्वाद द्यायचा” असे म्हणुन त्याने वामनरावांच्या पायांना स्पर्श केला. सद्गदित होऊन वामनरावांनी त्याला छातीशी धरले. ते पाहुन अस्मितांच्याही डोळ्यातुन अश्रु वाहु लागले. दाराआडून हा सर्व प्रकार पाहणाऱ्या वामनरावांच्या पत्नीही त्या आनंदोत्सवात सामील झाल्या.

“मोठ्या चलाखीने महादेव अस्मितावरील वशीकरण दूर करण्यात यशस्वी होतो पण काय आनंद स्वस्थ बसेल? तो आपल्या बेअरर चेकला (अस्मिताला) इतक्या सहजा सहजी जाऊ देईल? की नियतीच्या मनात काही वेगळेच आहे? पुढे वाचा.”

अस्मिताला वामनराव घेऊन गेल्याला आता दोन तास होत आले होते, त्यामुळे आनंदच्या आईचा जीव वर खाली होत होता. झक मारली आणि तुझे ऐकले, आता आनंद उठला की तुच त्याला काय ते उत्तर दे, ती आकाशला शिव्या घालु लागली. तिच्या तोंडाचा पट्टा अविरत सुरूच होता. इकडे वामनरावांनी अस्मिताला आनंदच्या घरी सोडण्याची तयारी करा असे आपल्या पत्नीस सांगताच अस्मिताला रडूच कोसळले, “मी नाही जाणार त्या नरकात, मला इथेच राहायचे आहे. मी आता अजुन मार नाही खाऊ शकत, बाबा प्लिज मला नका ना पाठवु” असे म्हणुन अस्मिता जास्तच रडू लागली. तेव्हा महादेव तिला म्हणाला, “आनंद तुला आता हातही लावणार नाही, तु काही काळजी करू नकोस फक्त थोडे दिवस कळ काढ. काका आणि मी उद्याच चांगला वकील गाठतो आणि कायदेशीररित्या तुला आनंदपासुन मुक्त कसे करता येईल ते पाहतो तोपर्यंत तुला तुझ्या सासरीच राहावे लागेल.” पण अस्मिता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती, “आता त्या घरात केवळ माझे प्रेतच जाईल, जीवंतपणी मी तिथे जाणार नाही. तुम्ही माझ्यावर जबरदस्ती कराल तर मी जीव देईन” असे म्हणुन तिने आपल्या बेडरूममध्ये जाऊन आतुन कडी लावुन घेतली.

यावर वामनराव महादेवला म्हणाले, “महादेवा! अस्मिता म्हणते ते बरोबर आहे तिला परत त्या नरकात पाठवायची काहीच गरज नाही. ज्या वशीकरणातुन ती मुक्त होणे गरजेचे होते, ते मोठे काम तर पार पडले. आता त्या आनंदपासुन वेगळे करण्यासाठी तिला त्याच्याकडे ठेवायची गरज नाही आपण त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवु शकतो. “ते बरोबर आहे काका, पण पुन्हा तो तिच्यावर वशीकरण करणार नाही कशावरून. तो काय एकमेव तांत्रिक आहे का? त्यामुळे आनंदचा पुरता बंदोबस्त केल्याशिवाय अस्मिता कधीच मोकळेपणाने श्वास घेऊ शकेल असे मला वाटत नाही.” महादेवने आपली शंका मांडली. “तुझेही म्हणणे बरोबरच आहे म्हणा, आपण आनंदचा पुरता बंदोबस्त करणे जरुरीचे आहेच पण आपण त्या आनंदची अस्मितेशी भेटच होऊ दिली नाही तर पुन्हा वशीकरण कसा करू शकेल? पुन्हा तिला तिकडे पाठवायचा विचारही आता मला सहन होत नाही.” वामनराव म्हणाले. “हो. पण असे किती दिवस तिला तुम्ही कैद करून ठेवणार आहात? तिचा मोकळेपणाने जगायचा अधिकार तुम्ही तिच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तिला त्याच्यापासुन दूर केल्याने भडकुन त्याने अजुन काही अघोरी प्रकार केला तर? आपल्याला त्याला बेसावध ठेऊनच हे काम करावे लागेल आणि त्यासाठी अस्मिताचे त्याच्याकडे जाणे नितांत गरजेचे आहे. मलाही तिची काळजी आहे, म्हणुन तर इतके सगळे केले ना? माझ्यावर विश्वास ठेवा मी योग्य तेच सांगतोय”, असे म्हणुन महादेवने वामनरावांना समजावले. ते पण यासाठी तयार झाले “पण आज माझी पोरगी कुठेही जाणार नाही, उद्या बघु काय करायचे ते” असे म्हणुन वामनरावांनी तो विषय तिथेच बंद केला.

इकडे आनंदची झोप उघडल्यावर, अस्मिताला तिचे वडिल सोबत घेऊन गेल्याचे कळताच तो प्रचंड भडकला. आपल्या घरच्यांना तो शिव्या घालु लागला. “तुम्हाला काही अक्कल आहे का? तिला तुम्ही त्या थेरड्या बरोबर जाऊच का दिलेत? आता त्याने तिला कुठे दूर पाठवुन दिले किंवा घरात डांबून ठेवले तर आपण काय करणार आहोत? सोन्याचे अंडे देणारी कोंबडी अशी सोडुन देताना तुमच्या अकलेचे काय दिवाळे वाजले होते? ते काही नाही. आत्ताच्या आत्ता जातो आणि अस्मिताला परत घेऊन येतो. माझा आवाज ऐकताच ती स्वतःला अडवु शकणार नाही आणि काहीही करून माझ्याकडे येईलच. मी बाहेर पडुन गेल्यावर समजा ती परत आली तर तिला प्रेमाने वागवा आता मारझोड करण्यापेक्षा गोड बोलुन काम लवकर होईल” असे बोलुन आनंद घरातुन बाहेर पडला. निघताना त्याने सोबत अजुन दहा हजार खिशात कोंबले आणि त्याची पाऊले बारकडे वळली.

बारमध्ये जाऊन त्याने भरपुर दारू ढोसली. वामनरावांवरचा राग त्याने तिथल्या वेटरवर काढला. त्याच्या थोबाडात ठेऊन दिली. वर आपल्या खिशातील पैशांची गड्डी काढून तुला या क्षणाला विकत घेईन इतका पैसा आहे माझ्याकडे, तु दिड दमडीचा वेटर मला अक्कल शिकवतोस काय रे? म्हणुन वर एका अस्खलित शिवी पण हासडली. त्या बार मध्ये काही गुंड पण बसले होते त्यांनी आनंदच्या हातातील नोटांचे बंडल पाहुन एक प्लॅन केला आणि आनंद बारच्या बाहेर पडण्याची वाट पाहु लागले. आनंदला दारू खुप जास्त झाली होती त्याला धड उभेही राहता येत नव्हते.

त्याच्या झेपा जात होत्या. शेवटी आनंद धडपडत कसाबसा बारच्या बाहेर पडला. तोंडाने तो सतत बरळत चालला होता, “साला, तो वेटर मला अक्कल शिकवतो! मी कोण आहे माहीत नाही त्याला. त्याच्या अख्या खानदानाला विकत घेईन मी” काही अंतर ठेऊन ते गुंड त्याचा पाठलाग करत होते हे त्याच्या ध्यानीही नव्हते, तो आपल्याच धुंदीत चालला होता. वाटेत एका अंधाऱ्या गल्लीजवळ त्या गुंडानी त्याला गाठले.

रस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती आणि गल्ली सुनसान होती. पोरांनी दगड मारुन ट्युब फोडल्यामुळे दिव्याखाली अंधार होता. आनंदला धक्का बुक्की करत ते त्या गल्लीत घेऊन गेले. ते त्याचे पैसे हिसकावण्याचा प्रयत्न करू लागले तसे आनंदने प्रतिकार करायचा सुरवात केली. दारू प्यायला असला तरी तो त्याच्या मजबुत तब्येतीमुळे आणि मारामारीच्या सवयीमुळे तो त्यांना चांगलाच प्रतिकार करत होता. इतक्या सहजपणे तो पैसे देणार नाही हे लक्षात आल्यावर त्यातल्या एकाने खिशातुन रामपुरी काढला आणि आनंदच्या गळयावर ठेवला. बऱ्या बोलाने आम्हाला पैसे दे नाही तर तुला आता ढगातच पाठवतो असे तो म्हणताच, आनंदने त्याच्या पोटात एक लाथ मारली.

तो गुंड सटपटून खाली पडला.रागाने बेभान झालेल्या त्याने आनंदच्या छातीत तो रामपुरी चाकु खुपसला, बरगड्यांच्या आरपार होत तो चाकु त्याच्या फुफ्फुसात शिरला. आनंदच्या छातीत वेदनेचा डोंब उसळला. फुफ्फुसात छेद झाल्यामुळे त्याला श्वास घेताना अडचण होऊ लागली होती. तरीही त्याने पुन्हा एका लाथ त्या गुंडाच्या पेकाटात घातली त्या सरशी तो गुंड सहा सात फुट लांब जाऊन पडला. ते पाहताच इतर गुंडानी आनंदला गच्च जखडुन ठेवले. आनंद ओरडत होता, “मला सोडा नाहीतर तुमच्या पैकी एकालाही मी जीवंत सोडणार नाही” पण त्या गुंडानी त्याला चांगलाच दाबुन ठेवला होता. रागाने धुमसत असलेल्या त्या गुंडाने यावेळी रामपुरी थेट आनंदच्या गळ्यातच घुसवला. मुख्य रक्तवाहिनी कापली गेल्यामुळे आनंदच्या गळ्यातुन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. तसे त्या गुंडानी त्याच्या कडील पैसे हिसकावून घेतले आणि त्याला जमिनीवर ढकलुन दिले. ते तिथुन जाऊ लागले पण त्याही परिस्थितीत आनंदने एका हाताने आपला गळा धरला आणि दुसऱ्या हाताने एका गुंडाचा पाय धरून ठेवला.

ते पाहिल्यावर त्या गुंडानी आनंदला लाथा मारत आपल्या साथीदाराला सोडवायचा प्रयत्न केला. तरीही आनंदने त्या गुंडाचा पाय सोडला नाही. एव्हाना लोकांचे लक्ष त्या झटापटीच्या आवाजाकडे वेधले जाऊ लागले होते. ते पाहुन त्यातील एका गुंडाने बाजुलाच पडलेला एका मोठा दगड उचलुन आनंदच्या डोक्यात घातला आणि आनंदचा खेळ संपला. आनंदचा प्रतिकार थांबताच ते गुंड त्यांच्याकडचे पैसे घेऊन अंधारात गायब झाले.

“अरेच्चा! हे तर अजबच घडले. ज्या आनंदपासुन अस्मिताची सुटका करण्यासाठी वामनराव आणि महादेव जीवाचा आटापिटा करत होते तो तर गुंडांकडुन कुत्र्याच्या मौतीने मारला गेला. हे तर असेच झाले की साप भी मर गया और लाठी भी नही टूटी. की आनंदच्या खुनामागे या दोघांपैकीच कुणी होते? पुढे वाचा.

काही जिज्ञासु लोकांनी कसला आवाज येतोय म्हणुन गल्लीत शोध घेतला तर मोबाईलच्या प्रकाशात डोक्याचा पार चेंदामेंदा झालेल्या आनंदचा मृतदेह पाहुन खुनऽऽऽ खुनऽऽऽ असे ओरडत ते रस्त्यावर पळाले. गल्लीत खुन झाल्याची बातमी मिळताच पोलिसांची गाडी तिथे येऊन पोहोचली. “Crime Scene Do not cross” ची पट्टी लावुन पोलिसांनी तो भाग seal केला, व पंचनामा सुरु केला. त्यांनी जमलेल्या लोकांचा जबाब घ्यायला सुरवात केली. कोणीच खुन्यांना पाहिले नव्हते, फक्त झटापटीचे आवाज ऐकुन काहीजण तिथे गेले होते, तोपर्यंत आनंदचा खुन करून ते गुंड पसार झाले होते. आनंदचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहुन असली दृश्य नेहेमीच पाहायची सवय असलेल्या पोलिसांचाही जीव गलबला कारण त्याचा चेहरा तर ओळखण्याच्या पलीकडे गेला होता, अंगावरील सर्व चीज वस्तुही लुटून नेल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान होते. फोटोग्राफरनी फोटो काढुन झाल्यावर, उत्तर तपासणीसाठी आनंदचा मृतदेह हलवण्यात आला. त्याच्या डोक्याचे तुकडे पोलिसांना अक्षरशः गोळा करावे लागले होते. एका प्लॅस्टिकच्या पिशवीत गोळा करून ते ही मृतदेहाबरोबर पाठवण्यात आले. पुरावा म्हणुन आनंदच्या डोक्यात घातलेला दगडही ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आजुबाजुच्या दुकानात, हॉटेलमध्ये चौकशी सुरु केली पण काहीच थांगपत्ता लागला नाही. चौकशी करत रात्री उशिरा पोलीस त्या बारमध्ये पोहोचले, ज्यातुन भांडण करून आनंद निघाला होता. मोबाईल मधील आनंदच्या मृतदेहाचा फोटो दाखवुन त्यांनी बारच्या काउंटरवर चौकशी केली तेव्हा त्या मृतदेहाच्या कपड्यांवरून तिथल्या एका वेटरने तो मृतदेह आनंदचा असल्याचे ओळखले. हा तोच वेटर होता ज्याला आनंदच्या रागाचा प्रसाद मिळाला होता. त्याने पोलिसांना आनंदची माहिती दिली. बारमधील सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये तो आनंदच असल्याचे स्पष्ट झाले.

दुसऱ्या दिवशी आनंद शिवलकर नावाच्या इसमाचा दगडाने ठेचुन निर्घृण खुन अशी बातमी स्थानिक पेपर मध्ये पहिल्या पानावर झळकलेली पाहुन महादेवने वामनरावांना फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला आणि त्याचवेळी त्याच्या मोबाईलवर वामनरावांचा फोन आला. “तु पेपरमधली बातमी वाचलीस?” वामनरावांनी फोन उचलताच प्रश्न केला? “हो. ती वाचुन तुम्हाला कॉल करणार इतक्यात तुमचाच कॉल आला. बातमी वाचुन मला पण शॉक बसला.” महादेवने उत्तर दिले. “म्हणजे हे तु करवून नाही आणलेस?” वामनरावांच्या स्वरात आश्चर्य ओसंडत होते. “काहीतरीच काय बोलताय काका? मी असे काही करू शकतो, असे तुम्हाला वाटलेच कसे? मला तर वाटले की रागाच्या भरात तुम्हीच फिल्डिंग लावलीत की काय! म्हणुन तर मी तुम्हाला फोन करत होतो.” महादेव, वामनरावांच्या प्रश्नाने दुखावला गेला होता. “अरे काल तु जेव्हा म्हणालास ना? की आनंदचा पुरता बंदोबस्त केला पाहिजे.

म्हणुन मला तसे वाटले. पण जर हे मी नाही करवले, तुही नाही करवलेस मग हे केले कुणी?” वामनरावांचा भाबडा प्रश्न. यावर “कुणी का करवले असेना! पण आपला प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला, सुंठी वाचुन खोकला गेला म्हणा ना! तसेही त्या बेवड्याचे किती दुश्मन असतील देव जाणे त्यांच्यापैकीच कोणीतरी केले असेल हे काम.

ज्या कोणी हे काम केलय त्याला धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत, वकील, कोर्ट वगैरे सगळ्या कटकटी एका झटक्यात दूर झाल्या आणि आपल्या अस्मिताला विनासायास स्वातंत्र्य मिळाले. या आनंदाच्या प्रसंगी पेढे तर मिळालेच पाहिजेत काका!” महादेव आनंदीत होत म्हणाला. (त्याच्याही मार्गातील काटा आपसुक दूर झाला होता, आता अस्मितांचे मन जिंकण्यासाठी तो नव्या दमाने प्रयत्न करू शकत होता. तसेही तो वामनरावांच्या मर्जीत असल्यामुळे त्यांच्याकडून विरोध व्हायची शक्यताही कमीच होती पण त्याने थोडे सबुरीने घ्यायचे ठरवले). “तेही खरेच, पण अस्मिताला हे सांगताना थोडी काळजी घ्यावी लागेल तिला कदाचित धक्का बसेल. भलेही त्याने वशीकरणाचा वापर केला होता पण तिचे त्याच्यावर प्रेम बसले होते. वामनरावांच्या स्वरात अस्मिताची काळजी डोकावत होती. वामनराव महादेवशी फोन वर बोलत असतानाच अस्मिताची दुःखाने भरलेली किंचाळी त्यांच्या कानावर आदळली. ज्याची भीती होती तेच झाले. अस्मिताने पेपर मधील बातमी वाचली होती. वामनराव आणि त्यांच्या पत्नी अस्मिताच्या रूमकडे धावले.

अस्मिता पेपर मध्ये तोंड लपवुन हमसुन हमसुन रडत होती. तिच्या आईनी तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला तशी ती त्यांना बिलगली आणि तिने हंबरडा फोडला. दुःखाचा आवेग थोडा कमी झाल्यावर ती वामनरावांना म्हणाली, “आज मी विधवा झाले बाबा! मला आनंदपासुन सुटका हवी होती पण अशी नव्हे. भलेही आमचे लग्न देवळात झाले होते त्यावर कायद्याची मोहर उमटली नव्हती पण तो होता तर माझा नवराच ना? (वामनरावांचा फोन सुरूच असल्यामुळे अस्मिताच्या या वाक्याने महादेवचे कान टवकारले.) मी त्याला मनापासुन आपले मानले होते. तुम्ही किंवा महादेवने तर हे केले नाही ना?” त्यावर वामनराव जवळ जवळ ओरडलेच, “अस्मिता तु काय बोलतेस ते तुला तरी कळतंय का? जावई कितीही नालायक असला तरी कोणता बाप आपल्या पोरीला विधवा बनवेल? मी काय किंवा महादेव काय कोणीही हे असले काम करू शकत नाही. माझ्यावर विश्वास ठेव पोरी, तुझ्यासारखे आम्हीही थोड्या वेळापुर्वी हे पेपरात वाचले.

हे कोणी केले ते आम्हाला खरंच माहित नाही. पण जे घडते ते चांगल्यासाठीच. त्याला एक वाईट स्वप्न समजुन विसरण्यातच तुझी भलाई आहे. यावेळी तरी माझे ऐक, तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय. विसर सगळे आणि पुढे चल. अजुन सगळे आयुष्य पडलंय तुझ्यासमोर.” थोडे दिवस जाऊदेत. तुझा रिझल्ट लागला की तु ठरल्याप्रमाणे सी.ए.ला ऍडमिशन घे. अभ्यास सुरु झाला की हळुहळु हे सगळे विसरशील. योग्य वेळ आली की आपण तुझ्या आवडीचा एखादा चांगला मुलगा बघु आणि तुझे थाटामाटात लग्न लावुन देऊ. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी सदैव आहोतच, तु फक्त या सगळ्यातुन लवकरात लवकर बाहेर पड. रडत घालवण्यासाठी आयुष्य खुप मोठे आहे बाळा. हसतमुखाने जग मग बघ आयुष्य किती सुंदर वाटले ते!.“ एवढे बोलून वामनराव सापत्निक अस्मिताच्या रूममधून बाहेर पडले. (वामनरावांकरवी अस्मितांचे मन कसे वळवायचे याचा विचार करत महादेवने फोन कट केला.) आणि अस्मिता आनंदच्या आठवणीत भुतकाळात हरवली.

आनंदच्या मृत्यूनंतर अस्मिताच्या आयुष्यात खरंच सुख येते का? आनंदच्या खुन्यांचा शोध लागतो का? आनंदचा मृत्यू म्हणजे अस्मिताची सुटका ठरते की ती आगीतुन फुफाट्यात सापडते. महादेवला ती आपल्या आयुष्यात स्थान देते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणुन घेण्यासाठी वाचा सप्तपदी कथेचा उत्तरार्ध.


सप्तपदी भाग १ (मराठी भयकथा) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


- केदार कुबडे

अभिप्राय