मी गोरी आहे म्हणजे काय आहे?, सुंदर? देखणी? आणि आकर्षक
मी गोरी आहे म्हणजे काय आहे?सुंदर? देखणी? आणि आकर्षक?
पोटात होते तेव्हा कुणीतरी म्हटलं
मुलगा हवा,
मुलगी झालीच तर मात्र हवी
गोरीपान...सुंदर!!
पाळण्यात होते तेव्हा कुणीतरी म्हटलं,
वाह! काय सुंदर बाळ आहे, अगदी गोरपान!
शाळेत जायला लागले,
मग एक गाणं एकलं,
दादा ला वाहिनी आणायची होती,
ती ही गोरीपान!!
मी गोरी आहे म्हणजे काय आहे?
तरुण झाले आणि समजायला लागली
माझ्या गोरेपणाची किंमत...
उत्सुक नजरा देहावरून फिरणाऱ्या
सलगीसाठी धडपडणाऱ्या..
प्रेमात पडणारी, मागे लागणारी पोरं
घरचे, बाहेरचे, नातलग, शिक्षक
सगळ्यांच्याच नजरेत 'माझ्या' आधी
दिसणारा माझा 'गोरेपणा'
मी गोरी आहे म्हणजे काय आहे?
मैत्रिणी म्हणतात,
तुला नाही कळणार काळेपणाची दुःखं
टीव्हीवर दिसणाऱ्या गोऱ्या बाजाराला
ठेवू नकोस नावं
गोरेपणाच असतं का काही दुःख..निदान त्रास?
तर त्या म्हणतात,
छे! छे!
अग लग्नाच्या बाजारात तुझा भाव
सगळ्यात जास्त
शिवाय नोकारीतही म्हणे तुम्हाला
मिळते विशेष वागणूक..
तुला हवीये की नकोय हा मुद्दाच नाहिये...
पुरुषांना ही हव्या असतात गोर्या बायका
का तर वंश पुढे निघेल गोरा!!
...खरच मी गोरी आहे म्हणजे काय?
माझ्या रक्ता मांसावर चढलेली एक त्वचा।
आई बाबां कडून वाहून आलेले जीन्स
या उपर माझं कर्तृत्व काय
पण तसही ते बघायचे आहे कुणाला?
माझी कातडीच सगळ सांगते..
मग मी गोरी आहे म्हणजे नेमकं काय आहे??
कुणास ठाऊक??
मी नक्की कोण आहे?
गोरी बाई, काळी बाई, सावळी बाई
की नुसती बाई
माणुस नाही आधी बाई...
माझ्या कातडीच्या रंगा वरुन
त्यांना, ह्यांना, ह्याला, त्याला
सगळ्यांनाच्
काहीतरी म्हणायच असत सतत
तू गोरी ना म्हणून...
तू काळी ना म्हणून...
तू सावळी ना म्हणून...
मग होते हळूहळू सवय या 'म्हणून' ची
आणि तिला ही चढतो माज तिच्या रंगाचा
केव्हा मग होते ती दुःखी तिच्याच रंगामुळे..
कोणी विचारतं का तुझा बाप, भाऊ, नवरा, मित्र, प्रियकर
यांच्या कातडीचा रंग कसा आहे...
नाही. असं काही विचारायचं नसतं...
कारण या मातीसाठी
पुरुष कर्तृत्व असतो आणि स्त्री भोग...
किती करकचुन बांधून टाकले आहे
आपण आपल्यालाच...
मग सौंदर्य दिसत नाही, आनंद दिसत नाही, कर्तृत्व दिसत नाही.
दिसतो फक्त रंग...
काळा...सावळा...
नाहीतर गोराही !!