भिकारीण - मराठी कविता

भिकारीण, मराठी कविता - [Bhikarin, Marathi Kavita] भिकारीण उभी दारात, होती भीक मागत, थाळ्यात भाकरी पडली, समाधानानं हसली.

भिकारीण उभी दारात, होती भीक मागत, थाळ्यात भाकरी पडली, समाधानानं हसली

भिकारीण उभी दारात
होती भीक मागत
थाळ्यात भाकरी पडली
समाधानानं हसली
मलाही भीक हवी होती
मायेची!
कुणाच्या दारात जायचं?
झाडाखाली उभी असलेली ती
चिंध्यानी अंग झाकत होती
अंग उघडं पडतच होतं
मनाच्या चिंध्या झालेली मी
आलिशान बंगल्याच्या लॉनवर
विसावले होते
माझं फाटकं मन कुणाला दिसणार?
नवऱ्यानं मारलं म्हणून
ती ओरडत होती
शिव्या देत होती
कपडे वर करून
अंगावरच्या जखमा दाखवत होती
सहानुभूती मिळवत होती
किंमती कपड्यात झाकलेलं
चिंध्या झालेलं मन
ठसठसणारी जखम
कुणाला दाखवायची?


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.