चातुर्य कथा

चातुर्य कथा | Chaturya Katha
चातुर्य कथा - चातुर्याने जगण्याची प्रेरणा देणाऱ्या चातुर्य कथा.
शरीर सुंदर सतेज । वस्त्रे भूषणें केलें सज्ज ॥
अंतरी नसता चातुर्य-बीज । कदापी शोभा न पावे ॥
- समर्थ रामदास (दासबोध, समास सहावा उत्तमपुरुषनिरूपण)

सध्याच्या जगाला लाडीलबाडी व प्रत्येक क्षेत्रातील जीवघेण्या स्पर्धेने ग्रासलं आहे. भारताचे भावी आधारस्तंभ असलेल्या माझ्या बालमित्रांनो, आपल्या अंगचा सज्जनपणा न सोडता, जर या परिस्थितीवर मात करुन तुम्हाला आपली ध्येये साध्य करायची असतील तर, अंगी चातुर्य बाणविण्याची आत्यंनतीक गरज आहे.

परंतु ‘चातुर्य’ म्हणजे काय? हे ठाऊक आहे?

चातुर्य म्हणजे शहाणपणा, धोरणीपणा, मुत्सद्दीपणा, हजरजबाबी वृत्ती, धुर्तपणा, दूरदर्शीपणा, प्रसंगावधानता वगैरे गुणांचं माणसाच्या डोक्यात तयार झालेलं एकजीव असं रसायन.

माणूस केवळ विद्वान असल्याने त्याचा या जगात निभाव लागत नाही. अंगी चातुर्य नसलेला विद्वान एखाद्या प्रसंगात सापडला, तर आपण या प्रसंगात का सापडलो, याची मुद्देसुद मीमांसा ही इतरांपुढे करीत बसतो, परंतु अंगी चातुर्य असलेला माणूस असे विवरण करीत न बसता, आल्या प्रसंगावर मात करतो आणि आपली यशाची वाटचाल आक्रमू लागतो; थोडक्यात सांगायचं तर -
विद्वत्ता ही नुसती बोलघेवडी असते, तर चातुर्य हे कृतिशील म्हणजे प्रत्यक्ष कृती करुन दाखविणारे असते. म्हणून जोश बिलिंग्ज नावाचे पाश्चात्य विचारवंत म्हणतात -

Learning sleeps and snores in libraries, but wisdom is everywhere, wide awake, on tiptoe.
- Josh Billings

भावार्थ: विद्वत्ता ही ग्रंथालयांतून झोपा काढत व घोरत असते, तर चातुर्य हे संभाव्य प्रसंगाला तोंड देण्यासाठी अगदी जागरुकतेनं एका पायावर उभे असते.


अंगी चातुर्य नसलेली माणसं भोवताली कितीही असली, तरी एकटा चतुर माणूस त्या सर्वांवर मात करु शकतो. आगऱ्यास औरंगजेबाच्या कैदेत सापडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फुलादखानाच्या पहाऱ्यातून आपल्या पुत्रासह पलायन केले, ते चातुर्याच्या जोरावरच ना? म्हणून समर्थ म्हणतात -

उदंड बाजारी मिळाले । परी ते धूर्तेंचि आळिले ।
धूर्तांपासीं कांहीं न चले । बाजार्यांचें ॥ २५ ॥
- समर्थ रामदास (दासबोध, दशक पंधरावा, आत्मदशक समास पहिला, चातुर्य लक्षण)

भावार्थ: बाजारबुणगे जरी संख्येनं बरेच असले, तरी धूर्त म्हणजे चतूर माणूस त्यांना ताब्यात ठेवतो. धूर्तापुढे त्या अलबत्या गलबत्त्यांचे काहीएक चालत नाही.

सर्वप्रथम वर्षे २००७ मध्ये मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित झालेल्या चातुर्य कथा देखील येथे पुन्हा नव्याने प्रकाशित केल्या आहेत.


चातुर्य कथा

चातुर्य कथा विभागातील सर्व कथा