Loading ...

दसरा आणि दक्षिण दिग्विजय: विजयाची ऐतिहासिक परंपरा

दसरा, छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण दिग्विजय मोहीम आणि बाजीरावांचा पालखेड संग्राम या ऐतिहासिक विजयांची सविस्तर माहिती.

दसरा आणि दक्षिण दिग्विजय: विजयाची ऐतिहासिक परंपरा

विजयाचा आणि पराक्रमाचा प्रतीक असलेला दसरा सण मराठा इतिहासातील युगांतकारी मोहिमांचा साक्षीदार ठरला आहे…

दसरा आणि दक्षिण दिग्विजय: विजयाची ऐतिहासिक परंपरा

राहुल बोर्डे (पुणे, महाराष्ट्र)

प्रस्तावना

भारतीय संस्कृतीत साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला गेलेला दसरा हा केवळ धार्मिक सण नसून तो पराक्रम, शौर्य आणि रणनीतिक नवसूर्याचा मुहुर्त ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७६ मध्ये दसऱ्याच्याच शुभमुहुर्तावर ऐतिहासिक ‘दक्षिण दिग्विजय मोहिमे’चा प्रारंभ करून स्वराज्यासाठी एक भक्कम भौगोलिक व राजकीय सुरक्षाकवच निर्माण केले. या मोहिमेने पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्याला जिंजीच्या रूपाने एक सुरक्षित आधार दिला. याच विजयाच्या परंपरेला पुढे नेतात १७२८ मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी दसऱ्याच्या दिवशीच ‘पालखेड रणसंग्रामा’ची सुरुवात करत निजामाची शक्ती धुळीस मिळवली. दसरा सण आणि मराठा साम्राज्याचा विजयगाथा यांचा हा ऐतिहासिक संबंध आजच्या काळातही अत्यंत प्रेरणादायी ठरतो.

१६६० साली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळयाच्या वेढ्यात अडकले होते, तेव्हा औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान पुण्यामध्ये ठाण मांडून बसला होता. शाहिस्तेखानाने हिंदवी स्वराज्याची आर्थिक लूट करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. मात्र, महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले आणि पाठोपाठ पुण्यात लाल महालात शिरून शाहिस्तेखानाचा पराक्रम मोडित काढत त्याची बोटे छाटली. महाराजांच्या भीतीने आणि मानहानीमुळे शाहिस्तेखान मुघल प्रांतात परतला. या लुटीमुळे स्वराज्याचे झालेले संपूर्ण आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी १६६२ मध्ये महाराजांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी सुरत लुटली.

या आक्रमक पवित्र्यामुळे संतापलेल्या औरंगजेबाने स्वराज्याला नेस्तनाबूत करण्यासाठी दिलेरखान आणि मिर्झाराजे जयसिंग यांना तब्बल ८० हजारांच्या मुघल फौजेसह रवाना केले. पुरंदरच्या लढाईत मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडले आणि महाराजांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन पावले मागे सरकण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. १६६५ च्या पुरंदरच्या तहात स्वराज्याला २३ किल्ले आणि चार लाख होण उत्पन्नाचा प्रदेश गमवावा लागला. मात्र, १६६६ मध्ये औरंगजेबाच्या आग्रा कैदेमधून अत्यंत खुबीने निसटण्यात महाराजांना यश आले. स्वराज्यात परतताच त्यांनी पुरंदरच्या तहात गमावलेला संपूर्ण प्रदेश पुन्हा जिंकण्यास सुरुवात केली. मुघलांच्या पदरी पुन्हा एकदा अपयशच आले.

यानंतरही कारतलब खान, बहलोल खान आणि उदयभान राठोड यांसारख्या मातब्बर मुघल सरदारांनी स्वराज्यावर आक्रमणे केली; परंतु गनिमी काव्याच्या अफाट तंत्रापुढे या सर्वांनाच हार पत्करावी लागली. १६७४ पर्यंत हिंदवी स्वराज्याचा विस्तार धाराशिवच्या नळदुर्गपासून, पन्हाळ्यापर्यंत आणि सिंधुदुर्ग किल्ल्यासह तळ कोकणापर्यंत पोहोचला होता. याच मजबूत स्वराज्याच्या पार्श्वभूमीवर ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा विधिवत राज्याभिषेक झाला आणि ते रयतेचे अधिकृत ‘छत्रपती’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

राज्याभिषेकानंतर मुघलशाही व आदिलशाहीचा सामना करताना महाराज अधिकृत राज्याच्या रूपात उभे ठाकले होते. औरंगजेब कधी ना कधी स्वतः लाखोच्या फौजेसह दक्षिणेत उतरून स्वराज्याचा घास गिळण्याचा प्रयत्न करणार याची महाराजांना खात्री होती. मुघलांच्या पठाणी फौजा आधीच आदिलशाहीमध्ये धुमाकूळ घालत होत्या. याक्षणी प्रथमच महाराजांच्या मनात स्वराज्य विस्ताराचा विचार प्रकर्षाने आला. आजवरचा विस्तार मराठी रयतेच्या रक्षणासाठी होता, मात्र मुघलांच्या संभाव्य महाआक्रमणाला रोखण्यासाठी आणि पर्यायी सुरक्षित जागा निर्माण करण्यासाठी पुढील विस्तार काळाची गरज बनला होता.

भविष्याचा अचूक वेध घेत १६७६ साली दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘दक्षिण दिग्विजय मोहिमे’ला प्रारंभ केला. एकेकाळी शहाजीराजांची बेंगलोर प्रांतात जहागिरी होतीच, तसेच तंजावरची जहागिरी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांच्याकडे होती. व्यंकोजीराजेंना हिंदवी स्वराज्याशी जोडून घेणे हा या मोहिमेचा एक प्रमुख उद्देश होता.

या मोहिमेत सरसेनापती हंबीरराव मोहिते, येसाजी कंक आणि सूर्याजी मालुसरे यांच्यासारखे शिलेदार सहभागी झाले होते. मोहिमेदरम्यानच महाराजांचे गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. दक्षिणेतील जिंजी आणि वेल्लोरसारखे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे किल्ले जिंकून परिसरातील तब्बल शंभर किल्ले स्वराज्यात सामावून घेण्यात आले. १६७८ पर्यंत चाललेल्या या मोहिमेत वीस लाख होण उत्पन्नाचा प्रदेश स्वराज्याला जोडला गेला. याच प्रवासात श्रीशैलम येथे महाराजांनी ज्योतिर्लिंगाचा जिर्णोद्धार केला. तिथल्या स्थानिक लोकांनी कृतज्ञतेपोटी महाराजांच्या हयातीतच त्यांचे मंदिर बांधले. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर महाराष्ट्रात नसून दक्षिणेत बांधले गेले, हा इतिहास अत्यंत बोलका आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी पुढील सात वर्षे जिंजी किल्ल्यावरूनच हिंदवी स्वराज्याचा कारभार चालवला. जिंजी किल्ला हा अनेक वर्षे स्वराज्याची दक्षिणेतील राजधानी ठरला. शिवाजी महाराजांनी १६७६ ते १६७८ दरम्यान राबवलेल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचा हा दूरगामी फायदा १६९० ते १६९७ या काळात राजाराम महाराजांना मिळाला.

याच विजयाची पुनरावृत्ती १७२८ मध्ये पाहायला मिळाली. जेव्हा थोरले बाजीराव पेशवे स्वराज्यात प्रबळ होत होते, तेव्हा दक्षिणेत निजाम आपली ताकद वाढवत होता. सातारा व कोल्हापूर गादीमधील दुफळीचा फायदा घेण्याचा निजाम प्रयत्न करत होता. त्याचा हा मनसुबा उधळून लावण्यासाठी १७२८ साली दसऱ्याच्या मुहुर्तावर थोरल्या बाजीराव पेशव्यांनी हातात शस्त्रे घेतली आणि ऐतिहासिक ‘पालखेडचा रणसंग्राम’ गाजवला. या युद्धतंत्राचे धडे आजही अमेरिकन सैन्य अभ्यासक्रमात दिले जातात.

दसरा हा सण केवळ साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जात नाही, तर तो पराक्रम, सुसंवाद आणि विजयाच्या अनेक ऐतिहासिक पर्वांचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण दिग्विजय मोहीम असो वा बाजीरावांचा पालखेड रणसंग्राम, या प्रत्येक घटनेने दसऱ्याच्याच शुभमुहुर्तावर इतिहासाला नवी दिशा दिली.

संपादकीय विश्लेषण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटातील आणि एकूणच मराठा साम्राज्याच्या इतिहासातील ‘दक्षिण दिग्विजय’ हा अत्यंत कळीचा, परंतु अनेकांनी दुर्लक्षित ठेवलेला टर्निग पॉईंट आहे. राहुल बोर्डे यांनी आपल्या लेखातून या मोहिमेमागील धोरणात्मक पार्श्वभूमी अत्यंत नेमक्या शब्दांत मांडली आहे. शाहिस्तेखानाचा पराभव, सुरतची लूट आणि त्यानंतर मुघलांचे वाढलेले शुक्लकाष्ठ या साखळीतून महाराजांनी घेतलेले राजकीय निर्णय त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची चुणूक दाखवतात.

इतिहासकार जदुनाथ सरकार किंवा इतर अभ्यासकांनी दक्षिण मोहिमेचे महत्त्व विशद करताना ‘ही मोहीम केवळ भूमी विस्तारासाठी नव्हती, तर ती एका महाकाय सम्राटाच्या संभाव्य आक्रमणाविरुद्ध रचलेला सुरक्षित बचावात्मक व्यूह होता’ असे म्हटले आहे. प्रस्तुत लेखामध्ये हाच धागा अत्यंत प्रभावीपणे पकडण्यात आला आहे. औरंगजेब जेव्हा संपूर्ण ताकदीने दक्षिणेत उतरणार याची जाणीव महाराजांना १६७६ च्या सुमारास झाली होती, त्यामुळेच त्यांनी तंजावर आणि जिंजीपर्यंतचा प्रदेश स्वराज्याशी जोडून एक मजबूत राजकीय व भौगोलिक कवच तयार केले.

या मोहिमेचा खरा ऐतिहासिक लाभ छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानोत्तर काळात राजाराम महाराजांना झाला. जिंजीचा किल्ला हा केवळ एक दुर्ग नव्हता, तर तो संकटकाळात स्वराज्याचा श्वास ठरला. यातून महाराजांच्या दूरदृष्टीची उंची स्पष्ट होते. याशिवाय, १७२८ मधील पालखेडच्या रणसंग्रामाचा संदर्भ जोडून लेखकाने दसरा आणि मराठा पराक्रम यांच्यातील अटूट नात्याला एक व्यापक परिमाण दिले आहे. भाषाशैलीतील प्रवाहीपणा, ऐतिहासिक संदर्भांची अचूक मांडणी आणि विचारप्रवाहाची सुसूत्रता या लेखामुळे वाचकांसमोर एक अभ्यासपूर्ण पट उभा करते.

सारांश

दसऱ्याच्या पवित्र मुहुर्तावर सुरू झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेने आणि थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पालखेड संग्रामाने मराठा साम्राज्याच्या इतिहासाला नवी दिशा व सुरक्षितता मिळवून दिली.

— हर्षद खंदारे (निर्माते-मुख्य संपादक, मराठीमाती डॉट कॉम)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची