ट्रिप टू राजस्थान भाग ४ - भयकथा (इंद्रजित नाझरे) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद लेखक इंद्रजित नाझरे यांची ट्रिप टू राजस्थान भाग ४ ही मराठी भयकथा.
दौलतगडच्या शापित किल्ल्यात अडकलेल्या पाच मैत्रिणींची भयावह रात्र अखेर मोक्ष, धैर्य आणि दिव्य शक्तीच्या साक्षीने संपते...
ट्रिप टू राजस्थान भाग ४
स्नेहल त्या सर्व पुस्तिका वाचून काढते. पण त्या अतृप्त आत्म्यांना शांती कशी मिळेल आणि हा किल्ला कधी त्यांच्या शापातून मुक्त होईल—याचा उल्लेख त्या जीर्ण पुस्तकात कुठेच नसतो. ती याच विचारात असतानाच अचानक तिच्या अंगावर एक विषारी, घातक साप पडतो. क्षणभर तिचे हृदय थरारते; पण धैर्य एकवटून ती सापाला झटकून टाकते आणि धावत बाहेर पडते. सर्वत्र भयाण शांतता आणि गडद काळोख असतो. तिच्या हातातील मशालही कोणत्याही क्षणी विझेल असे वाटत असते. स्नेहल अंधारात खाचखळग्यांत धडपडत पुढे सरकत राहते. तरीही आपल्या मैत्रिणींना घेऊन सुरक्षित बाहेर पडू, या अढळ आत्मविश्वासाने ती प्रत्येक पाऊल टाकत असते. ती पुढे चालत असताना तिला वारंवार भास होऊ लागतो—जणू कोणीतरी तिच्या पावलांवर पाऊल ठेवत मागून येत आहे. ती मागे वळून पाहते, पण तिथे कोणीच नसते. तरीही तिच्या पाठीमागे एक अदृश्य सावली सतत असल्याची जाणीव तिला होत राहते. अखेर ती धीर करून मशाल उंचावते आणि मागे वळते. मशालीच्या मंद प्रकाशात तिला पल्लवी, निशा, कोमल आणि निकिता दिसतात. पण त्यांच्या चेहऱ्यांची अवस्था भयानक असते—जणू ते सर्व भीषणरीत्या भाजलेले आहेत. पुढच्याच क्षणी त्या चौघी कर्णकर्कश, भेसूर आवाजात रडू लागतात. तो आवाज इतका असह्य असतो की स्नेहल कान घट्ट झाकते. “स्टॉप इट...!” ती घाबरून ओरडते आणि पुढे वळते. क्षणात त्या चौघींचे भास नाहीसे होतात. स्नेहल काही क्षण स्तब्ध उभी राहते. आता काय करावे, हेच तिला सुचत नसते. ती हताशपणे पुढे चालत राहते. इतक्या प्रचंड किल्ल्यात ती पूर्णपणे एकटी असते. तिचे हृदय जोरजोराने धडधडत असते. थोड्यावेळापूर्वी पाहिलेल्या दृश्याने तिचा धीर ढासळतो. लहानपणापासून निडर आणि धाडसी असलेली स्नेहलही त्या क्षणी खचून जाते आणि गुडघ्यावर बसते. तेवढ्यात तिची नजर समोर जाते. समोर तिच्या आवडत्या मैत्रिणी—पल्लवी, निशा, निकिता आणि कोमल—एका साखळीने बांधलेल्या अवस्थेत दिसतात. त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असते. अंगावर जखमा, केस विस्कटलेले. त्यापैकी तिघी बेशुद्ध असतात; फक्त कोमल थोडी शुद्धीत असते. स्नेहलला पाहताच कोमलच्या डोळ्यांत आशेची एक झलक चमकते. दोघी एकमेकींकडे पाहून भावुक होतात. कॉलेजच्या दिवसांत त्यांचे फारसे पटत नसे; पण त्या संकटाच्या क्षणी एकमेकींना पाहून त्यांना प्रचंड दिलासा मिळतो. स्नेहल धावत कोमलकडे जाते, तिच्या चेहऱ्यावरून हलकेच हात फिरवते. कोमल थरथरत म्हणते, “स्नेहल, तू कुठे होतीस? आम्ही इथे खूप दिवसांपासून बंदिस्त आहोत.” हे ऐकून स्नेहल चकित होते. कारण त्यांना या दौलतगड किल्ल्यात येऊन फक्त एक दिवस आणि बारा तास झालेले असतात; पण कोमलच्या मते त्यांना इथे येऊन जवळजवळ पंधरा दिवस झालेले असतात. “नाही गं, आपण तर कालच इथे आलो आहोत,” स्नेहल म्हणते. तिच्या या उत्तराने कोमल गोंधळून जाते. इतक्यात बाकीच्या तिघीही हळूहळू शुद्धीवर येतात. स्नेहल त्यांना जवळ घेते आणि धीर देते. “हे सगळं काय चाललंय? आम्ही इथे अशा अवस्थेत कसे?” निशा आणि पल्लवी थरथरत्या आवाजात विचारतात. निकिता स्नेहलच्या हातातील पुस्तकाकडे बोट दाखवत विचारते, “आणि तुझ्या हातात हे कोणते पुस्तक आहे?” तेव्हा स्नेहल आतापर्यंत घडलेली सर्व घटना त्यांना सांगते. ते ऐकून चौघीही भयभीत होतात. “आता आपण काय करायचं? इथून कसं बाहेर पडायचं?” कोमल घाबरून विचारते. “काळजी करू नका,” स्नेहल ठामपणे म्हणते. “आपण सगळ्यांनी मिळून एक धोकादायक पण शेवटचा प्रयत्न करणार आहोत.” तेवढ्यात बाहेरून लग्नाच्या वाजंत्रीसारखा आवाज ऐकू येतो. त्या किल्ल्यात जिवंत माणूस आला की अतृप्त आत्मे त्याला जाळण्यासाठी संपूर्ण किल्ला पेटवतात—ही गोष्ट स्नेहलला पुस्तकातून समजलेली असते. ती कसाबसा साखळ्या सोडवते. इतक्यात कोणीतरी जवळ येत असल्याची चाहूल लागते. पाचही जणी तिथून अलगद निसटतात. दरम्यान किल्ल्यात जणू एखाद्या जुन्या काळातील लग्नसोहळ्याचे दृश्य साकारू लागते. राजकुमारी वसुंधरेच्या लग्नाची तीच भयाण पुनरावृत्ती होत असल्याचे स्नेहलला जाणवते. “आपण या आत्म्यांपासून सुटका कशी करून घेणार? त्यांच्याशी लढणार का?” पल्लवी घाबरून विचारते. स्नेहल उपाय शोधत असतानाच निकिता अचानक म्हणते, “माता महाकालीचं मंदिर!” सगळ्या तिच्याकडे पाहू लागतात. “तूच म्हणाली होतीस ना—या किल्ल्यावर एक प्राचीन महाकाली मंदिर आहे,” निकिता आठवण करून देते. तेवढ्यात त्यांच्या कानावर एक प्रचंड शंखनाद घुमतो. पण अतृप्त आत्मे आता त्यांच्या दिशेने रोखून पाहत असतात. दुसरीकडे लग्नमंडपात राजकुमारी वसुंधरा पाटावर बसण्याच्या तयारीत असते. त्या पाचही जणी मंदिराचा शोध घेऊ लागतात. मात्र आत्मे त्यांना प्रचंड छळू लागतात—पाय अडकवणे, दिशाभूल करणे, भीतीदायक भास निर्माण करणे. त्या अंधारात मंदिर शोधणे अशक्यप्राय वाटत असते. शेवटी थकून त्या खाली बसतात. एकमेकींचे हात घट्ट पकडून त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचे स्मरण करू लागतात. इतक्यात गडद अंधारात दूरवर एक दिव्य प्रकाश चमकताना दिसतो. तेच माता महाकालीचे प्राचीन मंदिर असते. स्नेहल, कोमल, पल्लवी, निशा आणि निकिता उठून त्या दिशेने धावू लागतात. त्या क्षणी लग्नमंडपात राजकुमारी वसुंधरा पाटावर पहिले पाऊल ठेवणार असते आणि किल्ल्यावर अग्निबाणांचा वर्षाव सुरू होणार असतो. पण त्याच क्षणी त्या पाचही जणी पूर्ण ताकदीनिशी त्या बंद मंदिराचा दरवाजा उघडतात. किल्ल्यावर अग्निबाण पडतात. किल्ला पेट घेऊ लागतो. मात्र महाकाली मंदिर उघडताच आतून एक तेजस्वी दिव्य प्रकाश बाहेर पडतो आणि संपूर्ण किल्ल्यात पसरतो. क्षणार्धात आकाशात विजा चमकू लागतात, ढग गडगडू लागतात आणि मुसळधार पाऊस सुरू होतो. पेटलेला किल्ला हळूहळू शांत होतो. आग विझून जाते. दुसऱ्या दिवशी सूर्योदय होतो. पल्लवी, निशा, निकिता, स्नेहल आणि कोमल किल्ल्याच्या बाहेर गवतावर पडलेल्या असतात. किल्ल्यात लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दल, पोलिस आणि गावकरी तिथे जमलेले असतात. महिला पोलिस त्या मुलींना उठवतात. त्या बोलण्याच्या अवस्थेत नसतात. गावातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावले जाते. प्राथमिक उपचार करून औषध दिले जाते. सुदैवाने त्यांना फक्त किरकोळ जखमा झालेल्या असतात. पोलिस त्यांची माहिती नोंदवतात आणि त्यांचे सामान परत करतात. पाचही मैत्रिणी आपल्या जिप्सी गाडीत बसतात. मागे वळून आकाशाकडे पाहतात—आणि त्यांना राजकुमारी वसुंधरा आणि त्या आगीत मृत्यू पावलेले सर्व आत्मे आकाशात दिसतात. ते जणू त्यांच्या दिशेने कृतज्ञतेने हात जोडतात. कारण अनेक वर्षांनंतर त्यांना अखेर मोक्षप्राप्ती झालेली असते. स्नेहल आपल्या खांद्यावरील बॅग मागे टाकते आणि ड्रायव्हिंग सीटवर बसते. “काय मग मुलींनो, पुन्हा जाऊया का आणखी एका ट्रिपला?” ती खट्याळपणे विचारते. निकिता, निशा, कोमल आणि पल्लवी एकदम ओरडतात— “नो...!” आणि स्नेहल जोरात हसत गाडी वेगाने पुढे वळवते. मागे हवेत धुळीचा मोठा लोट उडतो. सहा महिन्यांनंतर. व्हॉट्सॲपवर स्नेहल सर्व मैत्रिणींना व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये जोडते आणि एक आनंदाची बातमी सांगते. काही दिवसांनी त्या पुन्हा एकत्र येतात—पुण्यातील एका लग्नसमारंभात. स्नेहल पाटील आणि विष्णू पोतदार यांचा शुभविवाह मोठ्या दिमाखात संपन्न होतो. कथा समाप्त.















अभिप्राय