ट्रिप टू राजस्थान भाग ३ - भयकथा (इंद्रजित नाझरे) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद लेखक इंद्रजित नाझरे यांची ट्रिप टू राजस्थान भाग ३ ही मराठी भयकथा.
एका प्राचीन किल्ल्यात घडणाऱ्या रहस्यमय आणि भयावह घटनांमध्ये अडकलेल्या स्नेहलसमोर त्या किल्ल्याचा भयंकर इतिहास उलगडत जातो...
ट्रिप टू राजस्थान भाग ३
समोरील दृश्य पाहून स्नेहल भीतीने किंचाळते. तिच्या चारही मैत्रिणी तिथून रहस्यमयरीत्या गायब झालेल्या असतात. लायटरची ज्योत तिच्या बोटाला भाजते आणि तिचा घसा कोरडा पडतो. “माझ्या मैत्रिणी कुठे गेल्या? ती हाडांची सापळे कोणाची होती? हे सगळं काय चाललंय?” तिच्या मनात प्रश्नांचे काहूर माजते. ती क्षणभर तशीच जमिनीवर बसून राहते. अंधारी रात्र अधिक गडद आणि भेदक भासत असते. पण स्नेहल धिटाईने उठते. ती धाडसी मुलगी असते. मनाशी ठाम निर्धार करून ती स्वतःलाच सांगते—काहीही झालं तरी मैत्रिणींना शोधायचं आणि या किल्ल्यातून सुखरूप बाहेर पडायचं. ती सावधपणे पुढे चालत राहते. किल्ल्याच्या आत जाताना ती एका पोर्चसमोर येते. अचानक तिच्या पायाला एक किडा चावतो. “आऊच!” ती दचकते. तिची नजर डावीकडे वळते. तिथे एका महिलेची धूसर आकृती उभी असते. सुरुवातीला तिला भास वाटतो. ती पुन्हा वाकून नीट पाहते. समोरील आकृतीही तशीच वाकून पाहते. स्नेहल सावध होते. ती स्त्री हळूच हसते आणि आपले केस बाजूला सारते. स्नेहल मशालीची ज्योत त्या दिशेने करते. क्षणात ती आकृती अदृश्य होते. किल्ला आतून प्रचंड मोठा आणि भीतीदायक वाटत असतो. स्नेहल पुढे चालत असताना तिला पाठीमागून कुजबुज ऐकू येते. ती भाषा राजस्थानी असते. “छोरी कौण है? अठे क्या करणे आयी है?” स्नेहल मागे वळून पाहते. मागे दोन उंच पहारेकरी उभे असतात. त्यांचे अंग पूर्ण भाजलेले असते आणि ते भयानक आत्म्यांसारखे दिसत असतात. ते दृश्य पाहून स्नेहल घाबरते आणि पुढे धावत सुटते. आता तिला स्पष्ट कळून चुकते की या किल्ल्यात ती एकटी नाही. तिच्या आजूबाजूला भूत, प्रेत आणि अदृश्य शक्तींचे अस्तित्व आहे. धावत धावत ती एका मोठ्या दिवाणखान्यात येते. तिथे तिला एक विचित्र आभासी दृश्य दिसते—एका राजकुमारीच्या लग्नाची तयारी सुरू असते. आरश्यासमोर सुंदर राजकुमारी घुंघट घालून बसलेली असते. तिच्या दासी तिला सजवत असतात. स्नेहलची चाहूल लागताच त्या चौघी तिच्याकडे रोखून पाहतात. घोगऱ्या आवाजात राजकुमारीचा आत्मा म्हणतो, “ये छोरी तो मन्ने दुश्मन लागे है… इसी कारण मेरा बियाह टुटा था!” ताबडतोब त्या तीन दासींचे आत्मे स्नेहलवर झेपावतात. ते तिच्यावर हल्ला करतात. स्नेहल भिंतीवर आदळते. तिला गंभीर दुखापत होते. अंगावरील कपडे फाटतात. कशीबशी स्वतःची सुटका करून ती दिवाणखान्यातून बाहेर पळते. धावत असतानाच ती अचानक एका खोल खड्ड्यात पडते. तिच्या डोक्याला मार लागतो. खड्ड्यातून विषारी विंचू आणि इंगळ्या बाहेर येतात. कसाबसा तोल सावरून ती वर चढते. दोन विंचू तिच्या पाठीवर चढतात. ती घाबरतच त्यांना दूर फेकते. स्नेहल पूर्णतः हादरलेली असते. “आपण इथे ट्रिपसाठी आलो होतो… आणि हे सगळं काय घडत आहे? माझ्या मैत्रिणी कुठे आहेत? हे प्रेत कोणाचे आहेत?” तिचे मन पूर्णपणे गोंधळलेले असते. तेवढ्यात तिला तिच्या आजीचे शब्द आठवतात— आयुष्यात कधी अंधार दाटून आला आणि भीती वाटू लागली, तर सर्वशक्तिमान परमेश्वराचे स्मरण कर; मार्ग आपोआप सापडेल. अचानक तिच्या समोर एक जुनी, जीर्ण वही पडलेली दिसते. स्नेहल ती वही उचलते आणि पाने उलटू लागते. त्या वहीत त्या किल्ल्याचा इतिहास लिहिलेला असतो. इसवी सन १२०० च्या सुमारास त्या किल्ल्यावर महाराज रतनसिंह यांचे राज्य होते. त्यांच्या राज्यातील प्रजा सुखी आणि समाधानी होती. राजा दयाळू आणि बुद्धिमान होता. स्नेहल वही वाचत असताना तिच्या डोळ्यांसमोर त्या काळातील दृश्ये जिवंत होऊ लागतात—जणू ती स्वतःच बाराव्या शतकात पोहोचली आहे. राजा रतनसिंह यांची सुंदर पत्नी दमयंती होती. त्यांना दोन मुले होती—राजकुमारी वसुंधरा आणि राजपुत्र शेखरसिंह. वसुंधरा अबोल होती, पण तिचे डोळे बोलके होते. दोन्ही मुले राजवैभवात वाढली होती. त्यांना शिक्षण देण्यासाठी दक्षिणेकडील विद्वान गुरु रामानुजाचार्य यांची नेमणूक करण्यात आली होती. राजपुत्र शेखरसिंहचे लग्न जोधपूरच्या राजकुमारी वेदांतिका हिच्याशी झाले. राजकुमारी वसुंधरा देखील विवाहयोग्य झाली होती. अनेक राजे-महाराजे तिच्यासाठी प्रस्ताव पाठवत होते, पण योग्य जुळवण होत नव्हती. एकेदिवशी वसुंधरा शिकारीसाठी जंगलात जाते. तिच्या नजरेस एक हरिण पडते. त्याच वेळी एका वाघाने त्या हरिणावर झडप घालण्याची तयारी केलेली असते. वाघाला वसुंधरेची चाहूल लागते. तो तिच्यावर झेपावणार इतक्यात एक धाडसी आणि पराक्रमी राजकुमार पुढे येतो आणि वाघाशी झुंज देतो. भयंकर संघर्ष सुरू होतो. वाघाच्या हल्ल्यात राजकुमार जखमी होतो. तेवढ्यात राजा रतनसिंह यांचे सैनिक तिथे पोहोचतात. अनेक माणसांची चाहूल लागताच वाघ जंगलात पळून जातो. सैनिक जखमी राजकुमार आणि राजकुमारी वसुंधरा यांना राजमहालात घेऊन येतात. वैद्य राजकुमारावर उपचार करतात. काही दिवसांनी राजा रतनसिंह त्या राजकुमाराचा दरबारात सत्कार करतात. भव्य दरबारात राजकुमार आपली ओळख करून देतो— “गणी खम्मा, राजासाब. म्हारो नाम आदित्यराज सिंह है.” राजा विचारतात, “आप जयपूर नरेश विष्णूदास महाराज के सुपुत्र हैं क्या?” “जी हाँ, हुकुम,” आदित्यराज उत्तर देतो. हे ऐकून रतनसिंह आनंदी होतात. विष्णूदास हे त्यांचे बालपणीचे मित्र असतात. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचा स्वर्गवास झाल्याची बातमी ऐकून राजा दुःखी होतात. राजा आदित्यराजला विचारतात—राजकुमारीचे प्राण वाचविल्याबद्दल तुला काय हवे आहे? आदित्यराज शांतपणे उत्तर देतो, “आपकी राजकुमारी का हाथ… हमारे हाथ में दे दीजिए।” दरबारात क्षणभर शांतता पसरते. राजा मात्र आनंदाने हा प्रस्ताव मान्य करतात. राजमहालात आणि राज्यात लग्नाची तयारी सुरू होते. दोघेही लग्नापूर्वी किल्ल्यावरील माता काली मंदिरात जाऊन दर्शन घेतात. राजस्थानी परंपरेनुसार गणेश स्थापना, मेहंदी, संगीतमय संध्या, तोरण, सात फेरे आणि मायरा अशा विधींनी सोहळा सजतो. घुमर नृत्याने वातावरण रंगून जाते. परंतु आदित्यराजच्या मनात कपट दडलेले असते. त्याला वाटत असते की महाराणी दमयंतीवर त्याचे वडील विष्णूदास प्रेम करत होते, पण रतनसिंह यांनी कपटाने त्यांना हरवून राजपाट आणि राणी मिळवली. लग्नाचा दिवस ठरतो—वैशाख महिन्याची पंधरावी तारीख, मृग नक्षत्र. किल्ल्यात विवाहमंडप सजतो. पाहुण्यांची गर्दी जमते. आणि अचानक… किल्ल्याबाहेरून प्रचंड अग्निवर्षाव सुरू होतो. संपूर्ण किल्ला पेट घेतो. हे सर्व आदित्यराजचे कटकारस्थान असते. लग्नापूर्वीच तो सुरक्षितपणे किल्ल्याबाहेर निघून गेलेला असतो. किल्ल्यात सर्वत्र ज्वलनशील पदार्थ ठेवलेले असतात. आग भयानक भडकते. सुमारे पाचशेहून अधिक पाहुणे जळून खाक होतात. त्यांचे कर्णकर्कश आक्रोश, रडणे आणि वेदना किल्ल्याच्या हवेत कायमचे अडकून राहतात. राजकुमारी वसुंधरा तिच्या भरजरी लग्नाच्या पोशाखात जळून जाते. मृत्यूच्या क्षणी तिला वाटते—आदित्यराजने दुसऱ्या स्त्रीसाठी तिच्याशी विश्वासघात केला. त्या वेदनेने तिचा आत्मा त्या किल्ल्यातच अडकून राहतो.















मी भाग 1 पासून ही कथा वाचत आहे लेखकाने प्रवास वर्णन खूप छान केले आहे भयद्रुष्य छान रंगवली आहेत पुढील भाग वाचण्याची उत्सुकता आहे
उत्तर द्याहटवा