Loading ...
/* Dont copy */

हल्लीची जिंदगी डिजिटल आहे (नरेश रावताला)

हल्लीची जिंदगी डिजिटल आहे - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद लेखक नरेश रावताला यांचा ‘हल्लीची जिंदगी डिजिटल आहे’ हा मराठी लेख.

हल्लीची जिंदगी डिजिटल आहे (नरेश रावताला)

डिजिटल युगातील वेग, सोयी आणि त्याचवेळी वाढत चाललेली मानसिक व सामाजिक दुराव्याची प्रक्रिया यांचा सूक्ष्म वेध घेणारा लेख...

हल्लीची जिंदगी डिजिटल आहे

नरेश रावताला (धुळे, महाराष्ट्र)

प्रस्तावना
मानवी इतिहासातील प्रत्येक युगाने जीवनशैली, मूल्ये आणि नातेसंबंध यांना नवी वळणे दिली आहेत. आजचे डिजिटल युगही त्याला अपवाद नाही. या युगाने जीवन सुलभ आणि वेगवान केले असले, तरी त्याचवेळी मानवी संवेदना, संवाद आणि विचारप्रक्रियेवर खोल परिणाम घडवले आहेत. या बदलांचा वेध घेताना तंत्रज्ञानाचा सुजाण वापर किती आवश्यक आहे, हे अधोरेखित करणारा हा लेख आहे.

मानवी संस्कृतीचा इतिहास पाहिला, तर प्रत्येक युगाला त्याची स्वतःची ओळख आहे—दगडी युग, कृषियुग, औद्योगिक युग आणि आता आपण जगत आहोत ते डिजिटल युग. या डिजिटल युगाने मानवी जीवन अधिक सुलभ आणि वेगवान केले; माहितीच्या महासागराशी एका बटणावर जोडले. पण त्याचवेळी माणसाला स्वतःपासून, कुटुंबापासून आणि समाजापासून दूर नेले, ही बाबही तितकीच खरी आहे. आजची ‘डिजिटल जिंदगी’ ही केवळ जीवनशैली राहिलेली नसून, ती एक मानसिक अवस्था बनली आहे. पूर्वी अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा मानल्या जात. त्या आजही कालबाह्य झालेल्या नाहीत; मात्र त्यांच्यासोबत मोबाईल आणि समाजमाध्यमे या नव्या गरजा निर्माण झाल्या आहेत. अनेकांच्या दृष्टीने मोबाईलशिवाय जगणे अशक्य झाले आहे. हातात मोबाईल नसला, तर अस्वस्थता वाढते; नेटवर्क नसले, तर चिडचिड होते; सूचना आली नाही, तर मन बेचैन होते. ही लक्षणे केवळ सवयीची नाहीत, तर ती मानसिक गुलामगिरीचीच आहेत. आज समाजमाध्यमांवर जणू काही कायमचा ‘वाहतूक कोंडी’चा अनुभव येतो. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स, युट्यूब अशा विविध डिजिटल मंचांवर प्रचंड गर्दी उसळलेली असते. प्रत्येकजण कुठेतरी पोहोचण्याच्या घाईत असतो; पण नेमके कुठे जायचे आहे, याचे भान फार थोड्यांना असते. या गर्दीत माणूस स्वतःलाच हरवून बसतो. सभोवताल काय घडते आहे, कुटुंबात कोण काय अनुभवत आहे, समाजात कोणत्या जखमा उघड्या आहेत, याची जाणीव बोथट होत चालली आहे. डिजिटल जगण्यात माणसाची खासगी जिंदगी झपाट्याने नाहीशी होत आहे. एकाच घरात राहूनही कुटुंबातील सदस्य एकमेकांशी न बोलता, एकमेकांकडे न पाहता स्वतंत्र डिजिटल बेटांवर जगत आहेत. आई-वडील मोबाईलमध्ये, मुले स्क्रीनमध्ये, आणि संवाद केवळ ‘ऑनलाइन’पुरता मर्यादित झाला आहे. एकत्र बसून जेवणे, मनमोकळे बोलणे, अनुभवांची देवाणघेवाण करणे—या मानवी नात्यांच्या मूलभूत गोष्टी दुर्मिळ होत चालल्या आहेत. डिजिटल सुविधांनी आयुष्य सोपे केले, हे मान्यच; पण त्याचवेळी विचार करण्याची सवय, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि कष्टाने ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया हळूहळू लोप पावत आहे. सर्व उत्तरे एका क्लिकवर उपलब्ध असल्याने विचारशक्तीला धार लावण्याची गरज उरलेली नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेसारखी साधने मदतीसाठी असावीत; पण ती विचारांची जागा घेऊ लागली, तर माणूस यंत्रवत होण्याचा धोका निर्माण होतो. भावना, वेदना, सहवेदना आणि संवेदना—या माणुसकीच्या खुणा दिवसेंदिवस फिकट होत चालल्या आहेत. डिजिटल जिंदगी अनेकदा लोकांच्या भावना भडकवण्यासाठी पेटवलेली काडी ठरते. पेटलेल्या रानात जसे सुक्याबरोबर ओलेही जळते, तसेच समाजमाध्यमांवरील भडकावू मजकूर संपूर्ण समाजाला जखमी करू शकतो. भाषेची पातळी खालावते, शब्दांची धार वाढते, आणि मुद्द्यांपेक्षा व्यक्तींवर हल्ले होतात. संवादाचा उद्देश सत्य शोधण्याऐवजी जिंकण्याकडे वळतो. आभासी जगातील भांडणे वास्तवात कटुता, द्वेष आणि हिंसक प्रवृत्ती निर्माण करू शकतात. भाषा ही मुळात नदीसारखी प्रवाही असते. काळानुसार ती बदलते, समृद्ध होते; पण जेव्हा तिचा वापर जाणीवपूर्वक विष पसरवण्यासाठी केला जातो, तेव्हा तीच भाषा समाजाला तोडणारे शस्त्र बनते. ‘रेंज’ म्हणजे क्रोधाचा भडका आणि ‘बेट’ म्हणजे गळाला लावलेले आमिष. या दोहोंच्या मधोमध अडकलेला नेटकरा नकळत दुसऱ्याच्या हातातील बाहुला बनतो. जगण्यासाठी भीती हे निसर्गाने दिलेले पहिले संरक्षक कवच आहे. भीतीमुळे सावधगिरी येते आणि सावधगिरीमुळे अस्तित्व टिकते. प्राणी घाबरतात म्हणून आक्रमक होतात; पण माणसाकडे विचार करण्याची क्षमता आहे. दुर्दैवाने, समाजमाध्यमांवर वावरताना ही क्षमता अनेकदा बाजूला ठेवली जाते. कोणताही संदेश खातरजमा न करता पुढे पाठवला जातो. तो खरा आहे की खोटा, समाजहिताचा आहे की समाजघातक—याचा विचार केला जात नाही. अतिमाहिती जितकी घातक आहे, तितकाच माहितीचा अभावही धोकादायक आहे. माहितीच्या पूरात विवेक हरवतो, तर माहितीच्या अभावात अंधश्रद्धा वाढते. या दोन्ही टोकांपासून दूर राहून समतोल साधणे ही आजच्या काळाची गरज आहे. येथे एक मूलभूत फरक लक्षात घेणे आवश्यक आहे—प्रतिक्रिया ही प्राणिज प्रवृत्ती, तर प्रतिसाद ही मानवी वृत्ती. प्रतिक्रियेतून त्वरित कृती घडते; प्रतिसादातून समजूतदार साद उमटते. डिजिटल जिंदगीचा त्याग करणे हा उपाय नाही; तंत्रज्ञानाला शत्रू मानणेही शहाणपणाचे नाही. गरज आहे ती तंत्रज्ञानाचा सुजाण, जबाबदार आणि संवेदनशील वापर करण्याची. मोबाईल हातात असावा; पण मोबाईलने माणसाला हातात घेऊ नये. समाजमाध्यमांचा वापर संवादासाठी व्हावा, दुरावा वाढवण्यासाठी नव्हे. माहितीचा उपयोग ज्ञानवृद्धीसाठी व्हावा, द्वेष पसरवण्यासाठी नव्हे. प्रतिक्रियेच्या सवयीपासून प्रतिसादाच्या संस्कृतीकडे जाणे, हाच खरा मानवी विकास आहे. थांबून विचार करणे, दुसऱ्याच्या दृष्टिकोनाचा आदर करणे, सत्याची खातरजमा करणे आणि शब्द वापरताना संवेदनशील राहणे—हीच डिजिटल युगातील नवी नैतिकता आहे. डिजिटल जिंदगी जर माणुसकी जपणारी ठरली, तरच ती खऱ्या अर्थाने प्रगतीकडे नेणारी ठरेल. आज गरज आहे ती माणसाने पुन्हा एकदा स्वतःकडे वळण्याची. स्क्रीनच्या पलीकडेही एक सुंदर, संवेदनशील आणि जिवंत जग आहे, याची जाणीव करून घेण्याची. डिजिटल युगातही माणूस माणूसच राहिला, तरच तंत्रज्ञानाची ही यात्रा समाजासाठी वरदान ठरेल; अन्यथा ती आपल्यालाच गिळंकृत करणारी ठरू शकते.

संपादकीय विश्लेषण
या लेखात डिजिटल युगाचे द्वैती स्वरूप अत्यंत नेमकेपणाने उलगडले आहे. एकीकडे तंत्रज्ञानामुळे जीवन अधिक सुलभ, वेगवान आणि माहितीसमृद्ध झाले आहे; तर दुसरीकडे त्याच तंत्रज्ञानामुळे मानवी नात्यांमध्ये दुरावा आणि मानसिक अस्वस्थता वाढत असल्याचे लेखक दाखवतो. हा विरोधाभास लेखाच्या मध्यवर्ती चिंतनाचा आधार बनतो. लेखकाने ‘डिजिटल जिंदगी’ ही केवळ बाह्य जीवनशैली नसून मानसिक अवस्था बनली आहे, हा मुद्दा ठळकपणे मांडला आहे. मोबाईल आणि समाजमाध्यमांवरील अवलंबित्वाची लक्षणे मानसिक गुलामगिरीपर्यंत पोहोचतात, ही मांडणी प्रभावी आहे. यामुळे वाचकाला स्वतःच्या वर्तनाचा आत्मपरीक्षणात्मक विचार करण्यास भाग पाडले जाते. समाजमाध्यमांवरील संवादाची पातळी, भाषेचा वापर आणि माहितीच्या प्रसारातील बेफिकिरी यांवर केलेली टीका संतुलित आणि वास्तवदर्शी आहे. लेखकाने भावनिक उत्तेजना, भडकावू मजकूर आणि अफवांच्या प्रसारामुळे समाजात निर्माण होणाऱ्या ताणतणावांचे सूक्ष्म चित्रण केले आहे. विशेषतः ‘प्रतिक्रिया’ आणि ‘प्रतिसाद’ यांतील फरक स्पष्ट करताना मानवी विवेकाची गरज अधोरेखित केली आहे. लेखाचा शेवट उपायसूचक आणि सकारात्मक आहे. तंत्रज्ञानाला नाकारण्याऐवजी त्याचा जबाबदारीने वापर करण्याचा आग्रह, तसेच मानवी मूल्ये जपण्याचे आवाहन, लेखाला समतोल आणि आशयघन बनवते. त्यामुळे हा लेख केवळ टीकात्मक न राहता मार्गदर्शक स्वरूपाचा ठरतो. सारांश: डिजिटल युगातील सोयींसोबतच मानवी संवेदना, विवेक आणि नातेसंबंध जपण्यासाठी सजग वापराची आवश्यकता अधोरेखित करणारा विचारप्रवर्तक लेख.
हर्षद खंदारे (निर्माते-मुख्य संपादक, मराठीमाती डॉट कॉम)
अक्षरमंच - मुक्त विचारपीठमराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

जागतिक महिला दिन (८ मार्च)
जागतिक महिला दिन (८ मार्च)
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची