कुबेराचे गर्वहरण (गणपतीच्या गोष्टी) - आपल्या लाडक्या बाप्पाला ने कुबेराचे गर्वहरण कसे केले? त्याचीच ही रंजक गोष्ट.

आपल्या लाडक्या बाप्पाला ने कुबेराचे गर्वहरण कसे केले? त्याचीच ही रंजक गोष्ट
श्री गजाननाचा जन्म (गणपतीच्या गोष्टी)
मुलांनो, आपल्या सर्वांच्या प्रिय गणपती बाप्पांनी कुबेराचे गर्वहरण करुन गर्वाचे घर नेहमी कसे खालीच असते त्याचीच ही गोष्ट.
मुलांनो, गणपतीबाप्पा लहान होते ना तेव्हाची ही गोष्ट.
कैलासावर शंकर-पार्वती बालगजाननासोबत राहत होते. तेव्हा सर्व देवांचा खजिनदार कुबेर हा स्वर्गात राहत होता. हा कुबेर गर्भश्रीमंत होता. आपल्याकडील संपत्ती सतत उधळत राहण्याचा त्याला खूपच छंद होता. त्याने मोठेमोठे प्रासाद बांधून घेतले होते. आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी तो सतत समारंभाचे आयोजन करुन सर्व देवांना आकर्षित करे. त्याने कितीही उधळपट्टी केली तरी त्याचा खजिना कधीही रिता होत नसे. यामुळे त्याला आपल्या श्रीमंतीचा गर्व झाला होता.
असेच एकदा त्याला आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची लहर आली. म्हणून त्याने एका भोजनसमारंभाचे आयोजन केले आणि सर्व देवांना आमंत्रित करण्याचे ठरविले.
कुबेर हा शंकराचा निस्सीम भक्त होता. त्यामुळे त्याने सर्वप्रथम महादेवांना निमंत्रण करण्याचे ठरविले. तो स्वतः कैलासावर शंकराना निमंत्रण करण्यास निघाला. कैलासावर आल्यावर शंकर-पार्वतीना हात जोडून कुबेराने विनंती केली. ‘हे देवाधिदेवा, जर तुम्ही माझ्याकडील भोजनसमारंभास उपस्थित राहिलात तर माझ्या समारंभाची शोभा वाढेल. सर्व देवांमध्ये माझा मान द्विगुणित होईल.’
परंतु शंकरांनी कैलास सोडून जाणे आपणास शक्य नसल्याचे सांगून त्यास नम्रपणे नकार दिला. पण कुबेर मात्र शंकरांनी निमंत्रण स्वीकारल्याशिवाय ऐकायलाच तयार नव्हता. शेवटी तेथेच असलेल्या पार्वतीने शंकरांना सल्ला दिला. ‘तुमच्याऐवजी आपला पुत्र गजानन यालाच कुबेराकडील समारंभास पाठवावे.’
शंकरांना हा सल्ला पसंत पडला. त्यांनी कुबेराला गणेशास भोजनासाठी पाठविण्याचे आश्वासन दिले. तेव्हा नाईलाजाने कुबेराने ते मान्य केले व इतर देवांना निमंत्रण करण्यास कुबेर निघून गेला.
समारंभाचा दिवस उजाडला. भोजनसमारंभाची जय्यत तयारी कुबेराने केलेली होती. नानाप्रकारच्या पंचपक्वान्नांचा घमघमाट साऱ्या दिवाणखाण्यात भरुन राहीला होता. कुबेराची आपल्या महालात दिवसभर धावपळ चालली होती. जसजसे निमंत्रित येऊ लागले. कुबेर स्वतः प्रवेशद्वारावर उभे राहून त्यांचे स्वागत करू लागला.
काही वेळाने शंकर-पार्वतीपासून बालगजानन तेथे आले. त्यांना पाहताच कुबेराने त्याचे हार्दिक स्वागत केले. सारे देव शंकराच्या या अद्भुतपुत्राचे दर्शन घेऊन नमस्कार करू लागले. कुबेराने गणेशास स्वतः भोजनाच्या पंगतीत आणून बसवले आणि हवे तेवढे भोजन घेण्याची विनंती केली. तुम्हाला कशाचीही कमतरता बसणार नाही, एवढे अन्न मुदपाकखान्यात तयार असल्याची दर्पोक्तीई त्याने केली.
बालगणेश भोजनास बसले. त्यांनी खाण्यास सुरुवात केली. एकामागोमाग एक पदार्थाची मागणी बालगणेश करत होते. एकामागोमाग एकेक पदार्थाचा फन्ना ते उडवीत होते. शेवटी शिजवलेले अन्न संपले. तरीही गणपतीची भूक काही आवरेना. त्यामुळे कुबेराची मान शरमेने खाली गेली. त्याने गणपतीस विनंती केली, ‘अन्न मुदपाकखान्यात अर्धवट शिजत आहे. पूर्ण शिजल्यावर तुम्हाला वाढले जाईल.’ पण बालगणेशास आपली भूक आवरेना. तो उठून मुदपाकखान्यात गेला. तेथे असलेले कच्चे, अर्धवट शिजलेले सारे पदार्थ त्याने संपवून टाकले. तरीहि गणेशाची भूक आवरेना. तेव्हा ते कुबेरास म्हणाले, ‘तुझे सारे पदार्थ संपले. आता मला अजून अन्न दे. नाहीतर मी तुझाच फन्ना उडवीन.’ हे ऐकून कुबेराची भितीने गाळण उडाली. तो पळू लागला. त्याच्या मागोमाग गणेश पळू लागले.
पळत पळत ते दोघेही कैलासावर आले. कुबेराने शंकरांच्या पायांशी लोळण घेऊन घडलेली हकीकत सविस्तर वर्णन केली. ते ऐकून श्रीशंकर गणेशास म्हणाले, ‘गणेशा, तू असे का करत आहेस?’
तेव्हा गणेश श्रीशंकरांना म्हणाले, ‘कुबेराने हवे तेवढे अन्न खाण्यास सांगितले. पण मला पाहिजे तेवढे भोजन तो पुरवू शकला नाही. त्यामुळे माझी भूक शांत झालेली नाही. म्हणूनच मी कुबेराच्या मागे लागलो आहे’ तेव्हा श्रीशंकरांनी गणेशास आज्ञा केली, ‘पार्वतामाते जवळ जा. तिने तुझ्यासाठी थाळीत मोदक ठेवले आहेत, ते खा.’ त्याबरोबर श्रीगणेश तेथून निघून गेले.
मग कुबेर शंकराकडे क्षमयाचना करून म्हणाला, ‘मला माझ्या श्रीमंतीचा खूप गर्व होता. मी त्रैलोक्याला पुरेल एवढे भोजन घालू शकतो असा मला अभिमान होता. परंतु आपल्या या पुत्राने माझे गर्वहरण करून माझी चूक मला दाखवून दिली. म्हणून यापुढे मी कधीही गर्व करणार नाही.
म्हणूनच मुलांनो, लक्षात ठेवा गर्वाचे घर नेहमी खालीच असते.