गजानन सिंदुरवदन झाला (गणपतीच्या गोष्टी) - आपल्या लाडक्या बाप्पाला गणपती हे नाव कसे पडले? त्याचीच ही रंजक गोष्ट.

आपल्या लाडक्या बाप्पाला ‘सिंदुरवदन’ हे नाव कसे पडले असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट
गजानन सिंदुरवदन झाला (गणपतीच्या गोष्टी)
मुलांनो, आपल्या सर्वांच्या प्रिय गणपती बाप्पांना आपण अनेक नावांनी ओळखतो. त्यापैकीच एक नाव आहे ‘सिंदुरवदन’. पण हे नाव गणपतीला कसे पडले त्याचीच ही गोष्ट.
गजाननाच्या अनेक नावांपैकी सिंदुरवदन हेही एक नाव आहे. गजाननाची जी अनेक नावे आहेत. त्या प्रत्येक नांवापोटी कोणतीना कोणती लोककथा रूढ आहे. गजानन सिंदुरवदन कस झाला? हे सांगणारी ही गणेशपुराणातील कथा आहे.
ब्रह्मदेव एकदा सत्यलोकात त्याच्या निवासस्थानी निद्रिस्त असता शंकर त्यांना भेटावयास आले होते. आल्यावर बरेच वेळ वाट पाहूनही ब्रह्मदेव जागे होईनात हे पाहून शंकरांनी त्यांना झोपेतून जागे केले. त्यावेळेस ब्रह्मदेवाला एक जांभई आली आणि त्यांच्या जांभईतून एक सुंदर बालक उत्पन्न झाला. शंकर निघून गेल्यावर ब्रह्मदेवाचे त्या बालकाकडे लक्ष गेले.
तेव्हा त्यांनी त्या बालकास विचारले, “तू कोण?” तेव्हा त्याने “मी आपल्याच जांभईतून उत्पन्न झालेला आपलाच पुत्र आहे. तेव्हा पुढे आता मी कसे जगावे याची मला आज्ञा करावी.” तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला वर दिला. “पुत्रा, तू त्रैलोक्यामध्ये वाटेल तिकडे संचार कर, तुला कोणापासूनही मृत्यू येणार नाही. तू ज्याला अलिंगन देशील त्याचा तात्काळ मृत्यू होईल. तुझ्या शरीराचा रंग तांबडा असल्याने लोक तुला ‘सिंदुर’ या नावाने ओळखतील”
हे ऐकून ब्रह्मदेवाच्या या वराची प्रचिती पाहाण्यासाठी आणि तो ब्रह्मदेवालाच आलिंगन देण्यास ब्रह्मदेवाजवळ येऊ लागला हे पाहून ब्रह्मदेवाला खूप राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला, “मी दिलेल्या वराने उन्मत्त होऊन तू जन्मदात्याचाच काळ बनू पाहतोस. म्हणून तू दैत्य होशील. लवकरच पार्वतीपुत्र गजानन तुझा वध करील.” असे म्हणून भितीने ब्रह्मदेव वैकुंठात पळून गेले. तेव्हा त्यांच्या मागोमाग सिंदुरही वैकुंठास येऊन पोहोचला. तेव्हा वैकुंठ पती विष्णूने, “तू पराक्रमी असल्याने युद्ध करणे तुझ्या लौकिकास साजेसे नाही. तू कैलासपती महापराक्रमी शंकराशी युद्ध कर.” असे चिथावून स्वतःवरील अरिष्ट कैलासवर पाठवून दिले.
सिंदूर कैलासावर आला तेव्हा शंकर ध्यानस्थ होते. तेथेच असलेल्या पार्वतीच्या रुपावर लुब्ध होऊन सिंदूर पार्वतीस पळवून नेऊ लागला. तेव्हा तिने गजाननाचा धावा केला. तेव्हा गजाननाने प्रकट होऊन परशूने त्याच्यावर प्रहार केला. त्या प्रहाराने तो दैत्य विव्हळ होऊन तेथून निघून गेला आणि पृथ्वीवर राहून तेथूनच देवांना त्रास देऊ लागला.
आपल्या पराक्रमाने त्याने सर्व देवांना नामोहरम केले. जिकडे तिकडे अधर्म माजविला. तेव्हा सर्व देवांनी गजाननाची प्रार्थना सुरू केली. ती प्रार्थना ऐकून अत्यंत तेजस्वी रूपात गजानन प्रकट झाला. “मी लवकरच पार्वतीच्या उदरी जन्म घेऊन सिंदुरासुराचा वध करीन.” असे आश्वासन देवांना देऊन गजानन अंतर्धान पावला.
लवकरच शंकर-पार्वतीच्या घरी चार हात, सोंड, हत्तीचे मस्तक असलेल्या स्वरुपात गजाननाचा जन्म झाला. “मला वरेण्या राजाकडे पोचवा.” असे जन्मतःच त्याने सांगताच नंदिसोबत शंकराने त्याला वरेण्याच्या घरी पाठविले. वरेण्याची राणी निद्रिस्त असता तिच्या शेजारी हे बालक ठेवण्यात आले.
चार हात आणि मुखावर सोंड असलेले हे बालक जेव्हा वरेण्यपत्नी पुष्पिका हिने पाहिले. तेव्हा ती घाबरली आणि “अरे बापरे, हे असे विचित्र स्वरुपाचे बालक मला नको.” असे म्हणून किंचाळली. राजाने घाबरून ते बालक अरण्यात दूरवर नेऊन टाकले. गजानन बाळ जंगलात पडलेले होते. ते पाहून एका मोराने आपल्या पिसाऱ्याची सावली त्याच्यावर धरली.
एका भुजंगानेही फणा उभारून गजानन बाळाचे रक्षण केले. तेथे जवळच पराशरऋषींचा आश्रम होता. त्यांनी या बालकास पाहिले. हे अद्भूत दृश्य पाहून आणि संतती नसल्यामुळे ईश्वरानेच आपल्याला हे वरदान दिले असावे असे मानून पराशरऋषींनी त्याचे संगोपन केले. या आश्रमातच गणपतीला उंदीर वाहन प्राप्त झाले. या आश्रमातच पराशर ऋषींनी गजाननाला सर्व वेद-विद्या शिकविली. त्याला शस्त्रविद्येत पारंगत केले.
इकडे सिंदुरासूराच्या नगरीत तो एकांतात असताना त्याला आकाशवाणी ऐकू आली. “हे सिंदुरासुरा, तुझा प्राण घेणारा बालक पार्वतीला झाला आहे.” हे ऐकून सिंदुरासूर घाबरला. हातात खड्ग घेऊन तो धावतच कैलासावर गेला. पार्वतीच्या पलंगावर त्याला बालक दिसला नाही. मग त्याने पार्वतीलाच ठार मारण्यासाठी शस्त्र उगारले. तोच त्याला कोपऱ्यात बाल गजानन दिसला. तो त्या दैत्याला बघून हसत होता.
सिंदूरासूराने त्याला पकडले आणि आकाशमार्गाने उड्डाण केले. त्याच्या हातातील बालक प्रथम हलका होता. पण नंतर तो इतका जड झला की, सिंदुरासूरीला त्याचे वजन पेलवेना.
मग सिंदुरासूराने त्या बालकाला जोराने खाली फेकून दिले. खाली नर्मदा होती. त्या बालकाच्या रक्ताने नर्मदेतील गोठे लाल झाले. सिंदुरासूराला वाटले, छान झाले; शत्रू मेला! पण पाहतो तर काय आश्चर्य! त्या प्रत्येक गोट्यातून त्याला गणेशाची मूर्ती दिसू लागली. हे बघून सिंदुरासूर भांबावला. तो आपल्या राजधानीत परत आला.
मग आपल्या उंदरावर बसून व हाती आयुधे घेऊन आणि शंकर-पार्वतीचे स्मरण करून गजानन सिंदुरासूराच्या राजधानीकडे गेला. त्याच्या भयंकर गर्जना ऐकूनच अनेक दैत्य मूर्च्छित झाले. आपल्या दूतांच्या मुखातून गजाननाच्या आगमनाचे वर्तमान ऐकून सिंदुरासूर गजाननासमोर आला.
गजाननाची एवढीशी चिमुकली विचित्र मूर्ती पाहून सिंदुरासूराला वाटले, अरे, याला तर आपण एका मिठीत यमसदनास पाठवू. तो गजाननास आपल्या बाहुपाशात घेणार तेवढ्यात गजाननाने अनंत मस्तके, अनंत हात आणि पाय असलेले विराट रूप धारण करून आपल्या विराट हाताने सिंदुरास आपल्या बाहुपाशात कवटाळले आणि सिंदुरासूराचा चेंदामेंदा केला. त्यावेळी गजाननाच्या अंगाला सिंदुराच्या अंगाचे रक्त लागल्याने गजाननाचे सारे अंग सिंदूराप्रमाणे तांबडे झाले आणि तेव्हापासून गजाननाला ‘सिंदूरवदन’ म्हटले जाऊ लागले.
अविचाराने कधीही कोणासही शब्द देऊ नये हेच या कथेचे सार आहे.
अभिप्राय