गणपती बल्लाळ विनायक झाला (गणपतीच्या गोष्टी) - आपल्या लाडक्या बाप्पाला बल्लाळ हे नाव कसे पडले? त्याचीच ही रंजक गोष्ट.

आपल्या लाडक्या बाप्पाला ‘बल्लाळ’ हे नाव कसे पडले असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट
गणपती बल्लाळ विनायक झाला (गणपतीच्या गोष्टी)
मुलांनो, आपल्या सर्वांच्या प्रिय गणपती बाप्पांना आपण अनेक नावांनी ओळखतो. त्यापैकीच एक नाव आहे ‘बल्लाळ’. पण हे नाव गणपतीला कसे पडले त्याचीच ही गोष्ट.
एकेकाळी सिंधुदेशात पर्ल्ली नावाच्या गावी कल्याण नावाचा एक दानशूर आणि धार्मिक वैश्य आपली पत्नी इंदुमतीसोबत राहत होता. त्या दांपत्याला योग्यवेळी एकत्र पुत्र झाला. त्याचे नाव त्या दोघांनी बल्लाळ असे ठेवले.
बल्लाळ लहानपणापासूनच धार्मिक वृत्तीचा होता. तो आपल्या वयाच्या लहान मुलांना बरोबर घेऊन गावाबाहेर जाई व इतर कोणतेही लहान मुलांचे खेळ न खेळता दगडाचे देव करुन त्यांची पूजा करीत बसे. असेच एकदा तो आपल्या सवंगड्यांसह गावाबाहेर गेला व नेहमीप्रमाणे एका सुंदर दगडाला गणपतीचे नाव देऊन दुर्वा व कोवळ्या पानांनी त्या देवाची पूजा करू लागला. बल्लाळ व त्याचे सवंगडी गणपतीच्या नामाचा जप करून स्तोत्रे, आरत्या गाऊन देवापुढे नाच करू लागले. रानातील पाने, फुले, फळे यांचाच नैवेद्य व गंधाक्षता मानून या छोट्यांनी त्या दगडाच्या देवाची पूजा केली. गणपतीच्या ऐकलेल्या गोष्टी एकमेकांना सांगण्यात ती बालके इतकी मग्न झाली की त्यांना घरी जाण्याचेसुद्धा लक्षात आले नाही.
इकडे गावात या छोट्यांचे पालक काळजीत पडले. मुले गेली कुठे? बराच वेळ झाला तरी एकहीजण घरी परतला नव्हता. त्यांनी आपली मुले बल्लाळाच्या नादी लागून गावाबाहेर दगडांचे देव करून खेळत असल्याचे समजले. त्यामुळे ते रागावून कल्याण वैश्याच्या घरी गेले आणि त्याला दूषणे देऊ लागले. ‘तुझ्या मुलाच्या सोबतीने आमचीही मुलं बिघडली. तू आपल्या मुलाला आवर. आमच्या सर्वांच्या मुलांना घेऊन तो गावाबाहेर काहीतरी वेड्यासारखे खेळ करीत असतो. त्यासाठी तू तुझ्या मुलाचा बंदोबस्त कर.’
आपल्या गावकऱ्यांचे असे तिखट बोल ऐकून कल्याणलाही बल्लाळचा खूप राग आला. हातात काठी घेऊन तो जिथे बल्लाळ व सवंगड्यांची देवपूजा चालली होती तेथे गेला. तेथे जाताच त्याने मुलांनी उभारलेले काटक्यांचे देऊळ मोडून टाकले आणि काठी उगारून सर्व मुलांवर धावून गेला. त्याला पाहताच इतर सर्व मुले पळून गेली. पण बल्लाळ मात्र गणेशस्तुती करण्यात एवढा गढून गेला होता की त्याला आपले वडील मारावयास आल्याचे समजलेच नाही. मग कल्याणने बल्लाळच्या काठीने इतके झोडपले की त्याच्या अंगातून रक्त येऊ लागले. नंतर कल्याणने त्याला वेलींनी एका झाडाला घट्ट बांधले आणि मुलांनी गणपती मानलेला दगड उचलून दूर फेकून दिला आणि तो बल्लाळास म्हणाला, ‘आता तुला कोणता देव येऊन सोडवतो ते पाहतो.’
कल्याण तेथून निघून गेल्यावर बाळ बल्लाळाने गणपतीची स्तुती करण्यास प्रारंभ केला. तहानभुक, दुःख विसरून तो गजाननाचा आर्त स्वरात धावा करू लागला. बल्लाळ म्हणाला, ‘देवा, तुझे जे पूजन करतात, त्यांची संकटे तू नाहीशी करतोस, म्हणून तुला विघ्न विनाशक असे म्हणतात. मी तुझे पूजन केले असता मला अशी शिक्षा का मिळाली.’ बल्लाळाला आपल्या पित्याचा मोठा राग आला आणि त्याने त्याला असा शाप दिला की, ‘ज्याने माझ्या गजाननाचे मंदिर मोडून टाकले आणि देवाला फेकून दिले तो आंधळा, बहिरा, मुका व कुबडा होवो! हे देवा, माझी जर तुझ्या ठिकाणी दृढ भक्ती असेल, तर माझे भाषण तू सत्य कर! पित्याने मला मारीले व बांधिले त्याचे मला मुळीच वाईट वाटत नाही. पण त्याने तुझ्या पूजेचा उच्छेद केला, याचा मला राग आला आहे. माझ्या जड देहास कोणीही बांधू शकेल, पण त्याला माझे मन व माझी भक्ती यास प्रतिबंध करता यावयाचा नाही. हे देवा, मी अनन्य बुद्धीने तुझे भजन करीत या अशाश्वत देहाचा त्याग करील.’
त्या बालकाची निस्सीम आणि अगाढ भक्ती पाहून गणपती प्रसन्न झाला आणि ब्राह्मणरुपात बल्लाळसमोर प्रकट झाला. ज्याप्रमाणे सूर्योदय होताच पृथ्वीवर अंधाराचे साम्राज्य लोप पावून तेजस्वी किरणांचे साम्राज्य अवतरु लागते तसेच गजानन प्रकट होताच दाही दिशा उजळून निघाल्या आणि बल्लाळाची सारी बंधने पडली. गजाननाच्या कृपादृष्टीने त्याच्या जखमा बऱ्या झाल्या. मोकळा होताच बल्लाळाने गजाननाला साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा गजाननाने त्याला आशिर्वाद देऊन म्हटले, ‘बल्लाळ, ज्याने माझे देवालय भंग केले तो नक्कीच नरकात जाईल. तुझा शापही खरा होईल. तुला जर काही मागायचे असेल तर माग.’
तेव्हा त्या बालभक्ताने गजाननाला विनंती केली, ‘देवा, आपल्याच ठिकाणी माझी निरंतर भक्ती जडू द्या आणि ज्या ठिकाणी आज तुम्ही मला दर्शन दिले तुम्ही यापुढे वास करून लोकांची संकटे दूर करा.’
तेव्हा गजाननाने प्रसन्न होऊन आपल्या या बालभक्ताचा मान राखला. तेथेच आपले वास्तव्य केले. त्याठिकाणी गजानन ‘बल्लाळ विनायक’ म्हणून वास करून राहू लागले. हाच तो पालीचा बल्लाळ विनायक. अष्टविनायकांपैकी एक.
अभिप्राय