मोबाईलवर भरली शाळा - मराठी कविता

मोबाईलवर भरली शाळा, मराठी कविता - [Mobilevar Bharali Shala,Marathi Kavita] मीट उघडा झूम उघडा, मिहीर, मुग्धा, वेदा, स्नेहा, पटापट सगळे जॉइन व्हा.
मोबाईलवर भरली शाळा - मराठी कविता | Mobilevar Bharali Shala - Marathi Kavita

मीट उघडा झूम उघडा, मिहीर, मुग्धा, वेदा, स्नेहा, पटापट सगळे जॉइन व्हा

चला मुलांनो पळा पळा
मोबाईल वर भरली शाळा

मीट उघडा झूम उघडा
मिहीर, मुग्धा, वेदा, स्नेहा
पटापट सगळे जॉइन व्हा
उशीर नका करू तुम्ही वेळ पाळा
मोबाईलवर भरली शाळा

आली लिंक त्वरा करा
मॅडम मला ही जॉईन करा
मेसेजचा सुरु झाला मारा
सगळं ग्रुप च झाला उतावळा
मोबाईलवर भरली शाळा

नाही गणवेश नाही दप्तर
नाही खडू आणि नाही डस्टर
रंग फळ्याचा विसरा काळा
मोबाईलवर भरली शाळा

अनेक पुस्तके आणि एक वही
काटकसरीला पर्याय नाही
पण कुणाचीच याला हरकत नाही
आई बाबांचा खर्च टाळा
मोबाईलवर भरली शाळा

विज्ञानाचा तास झाला सुरु
प्रॅक्टिकल मात्र घरीच करू
फळा नाही म्हणून नका अडू
स्क्रीनवरच आपले पुस्तक उघडू
वेळेचा तुम्ही अपव्यय टाळा
मोबाईलवर भरली शाळा

सुरु झाला इतिहासाचा तास
सरांनी काढले फर्मान खास
माईक करा म्युट
आणि बसा सारे निमूट
उगाच फोनशी नको चाळा
मोबाईलवर भरली शाळा

नाही शिक्षा नाही ओरडा
गृहपाठावरही नाही शेरा
तरीही प्रश्नावली सोडविण्याचा
असे आनंद तो आगळा
मोबाईलवर भरली शाळा

ऑनलाइनचा आता आलाय कंटाळा
कधी एकदा सुरु होईल शाळा
पुन्हा जमवू मित्रमैत्रिणींचा गोतावळा
कारण शाळेचा आम्हांला लागलाय लळा
मोबाईलवर भरली शाळा

मोबाईलवर का कधी शाळा भरते
शाळेमध्येच शाळा भावते
साक्षात पाहता गुरुजनांना
विदयेलाच ते वंदन पोहोचते
बाप्पा नको आता ऑनलाईन शाळा
शाळेमध्येच आम्ही होऊ गोळा

शाळेमध्येच भरेल शाळा
शाळेमध्येच भरेल शाळा

- जयश्री मोहिते

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.