माऊस म्हणाला - मराठी कविता

माऊस म्हणाला, मराठी कविता - [Mouse Mhanala, Marathi Kavita] पिढ्यानपिढ्या आम्हाला पिंजर्‍यात अडकवणार्‍या माणसा थांब, तुला आता शिक्षाच देतो.
माऊस म्हणाला - मराठी कविता | Mouse Mhanala - Marathi Kavita

पिढ्यानपिढ्या आम्हाला पिंजर्‍यात अडकवणार्‍या माणसा... थांब, तुला आता शिक्षाच देतो

पिढ्यानपिढ्या आम्हाला
पिंजर्‍यात अडकवणार्‍या माणसा...
थांब, तुला आता शिक्षाच देतो,
आमच्या विश्वभरातल्या जाळीदार पिंजर्‍यात
तुला कायमचा अडकवूनच टाकतो,
माऊस म्हणाला!

भज्याचे तुकडे दाखवून आधी बोलावायचास
दृष्टपणे तुकड्यांना विष लावून ठेवायचास
आमच्या मरण्यावर आनंदानं उड्या मारायचास
थांब, आता तुला आकर्षित करून अडकवून ठेवतो,
वेड्यासारखा संगणकाला चिकटवून ठेवतो,
जिवंतपणी मरणाचा अनुभव घेत जगवत ठेवतो...
माऊस म्हणाला!

आमच्या आई वडलांना, आजी आजोबांना,
भावा बहिणींना दूर नदीत सोडून मारलंस
कुटुंबातून तोडलंस, उध्वस्त केलंस
थांब, आता आधी तुझ्या मुलांना माझ्या
जाळ्यात ओढतो, आय. टी. चा नाद लावतो

त्यांना स्वतःचा मेंदू आहे हेच विसरायला लावतो
तुझ्या मुलांना आता,
साता समुद्रापार दूर नेऊन सोडतो
बस रडत म्हातारपणी...
माऊस म्हणाला!

आमच्या विश्वभरातल्या जाळीदार पिंजर्‍यात
तुला कायमचा अडकवूनच टाकतो...
माऊस म्हणाला!

- प्रफुल्ल चिकेरूर

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.