यंत्र मानव लाडात आला, माणूस मात्र नेहमी सारखाच, कंटाळलेला, सुस्तावलेला
चल माणसा गप्पा मारू
यंत्र मानव लाडात आला
माणूस मात्र नेहमी सारखाच
कंटाळलेला, सुस्तावलेला
तुझं यंत्रा बरंय लेका
कधीच नसतोच थकलेला
टिचक्या वाजवून जांभई देत
माणूस लागला बोलायला
हवा किती ओली सर्द
बघ तुला गंज चढला
रॉकेल आणा, गंज काढा
किती व्याप? माणूस म्हटला
माणसा, यंत्र बोलू लागला
माझा गंज क्षणिक म्हणाला
तुझ्या बुद्धीवर शतकांपासून
बघ गंजाचा थर चढलेला
आळसटलेला माणूस म्हणाला,
प्रतिक्रियेचे कष्ट कशाला?
आम्ही सांगू तसा राबतोस
वरून तुझा रे तोरा कसला?
यंत्र म्हणाला, पायावरती
धोंडा तुझ्या पडून घेतला,
यंत्राला देऊन जन्म तू
जोम तुझ्यातला गमवून बसला
अरे यंत्रा तापू नकोस
एकेक स्क्रू होईल ढिला
उचलून तुला फेकून देऊ
घेऊन जाईल भंगारवाला
यंत्र म्हणाला, पुनर्जन्म मी
घेऊन सारा घेईन बदला,
बघशील पुढच्या तुझ्या पिढीची
शक्ती बुद्धिहीन माणूस लीला
पुढच्या पिढीच्या भवितव्याचा
विचार करता तो गहिवरला
चेहर्यावरची उदासीनता
प्रयत्नपूर्वक लपवू लागला
चल माणसा गप्पा मारू
यंत्र मानव लाडात आला
पस्तावलेला माणूस पाहून
यंत्र मानव हसू लागला
- प्रफुल्ल चिकेरूर