संकटकाळात पिकांच्या नियोजनाची गरज

संकटकाळात पिकांच्या नियोजनाची गरज - [Sankatkalat Pikanchya Niyojanachi Garaj] कोरोना या दुर्देवी संकटाचा शेवट केव्हा आणि कसा होईल याचे भाकीत.
संकटकाळात पिकांच्या नियोजनाची गरज

कोरोना या दुर्देवी संकटाचा शेवट केव्हा आणि कसा होईल याचे भाकीत


शोध सुखाचा घेतांना सर्वांगाला इजा ही होते,
वेदनेचे त्या शल्य कशाला काष्ट्यांनाही आयुष्य असते.अलीकडे आपल्या देशाने विशेषकरून महाराष्ट्राने अनेक नैसर्गिक संकटांचा समर्थपणे सामना केलेला आहे. जसे भूकंप, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ इत्यादी. परंतु सद्द्यस्थितीत आपण “कोरोना विषाणु” या जागतिक वैद्यकिय आपत्तीचा सामना करीत आहोत. ‘कोरोना’ या दुर्देवी संकटाचा शेवट केव्हा आणि कसा होईल याचे भाकीत करणे घाईचे होईल.

नव्हे! ही आपत्ती मावळत असतांनाच अनेक संकटाचा ‘उदय’ सुद्धा झालेला असेल, जसे आर्थिक, शैक्षणिक, बेरोजगारी, कच्चा माल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृषी आधारित आवश्यक उत्पादनांचा तुटवडा. शासनातर्फे पुढील पाच - सहा महिनेच अन्नधान्य साठा असल्याचे संगितल्या जात आहे. इतकेच नव्हे तर पुढील काही महिने आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय निर्यात - आयात बंद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना आपत्तीमधुन आपण काही चांगले धडे ही घेवू, भौतिक सुखसोयींच्या बाबींवर अंकुष सुद्धा ठेवू परंतू ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ ला कोणताही पर्याय शिल्लक असणार नाही. योग्य शेती उत्पादनांशिवाय जगणे कठीण होणार हे निश्चित.

खरोखरच सद्द्याचा अन्नधान्य साठा कसा आहे? किती आहे? केव्हापर्यंत पुरेल? नजिकच्या भविष्यात कशाची गरज भासेल? यासर्व गोष्टीचा सारासार विचार करुन येत्या खरीप - रब्बी हंगामात पिकांचे तातडीने नियोजन करणे, कृषी समुदायाला मार्गदर्शन करणे क्रमप्राप्त वाटते. राज्यात नऊ ते दहा ‘कृषीहवामान विभाग’ आहेत त्यानुसार आता परंपरागत लागवड क्षेत्र आणि शासकीय योजना यामध्ये सुद्धा आवश्यक ते कोणते बदल करावेत यासाठी कृषी अधिकारी, सहसंचालक, कृषीतज्ञ, प्रगत शेतकरी, कृषी विद्यापीठे, शेतकरी नेतृत्व यासर्वांनी मिळून प्रभावी कार्यक्रमाची योजना तयार करणे अत्यंत गरजेचे वाटते.

आतापर्यंत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण वाटत असलो तरी या संकटकाळात उपलब्ध संसाधनांचा विवेकपूर्ण वापर आणि नियोजन गरजेचे आहे. सोबतच बियाणे, खते, किटकनाशके, पशुखाद्य, सिंचन याचाही समन्वय आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यात जवळपास दोनशे दहा लाख पिक लागवड क्षेत्र आहे. सरकारी आकडेवारी नुसार त्यापैकी अंदाजी १९० लाख हेक्टर क्षेत्रामध्ये तृणधान्य (२८.५४ टक्के), गळीत धान्य (२३.३८ टक्के), उस (६.२६ टक्के) आणि कापुस (२२.९२ टक्के) इत्यादी पिकांची लागवड केली जाते. तसेच फळे, भाजीपाला, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती इत्यादींची जवळपास १५ ते २० लाख हेक्टर मध्ये उत्पादन घेतले जाते. तृणधान्यात प्रामुख्याने (तांदूळ, गहू, ज्वारी), कडधान्यात मुख्यत्वे (तुर, मुग, हरभरा), गळीत धान्यात (भुईमुग, सोयाबीन, करडई), नगदी पिकांत उस आणि कापुस इत्यादींची लागवड प्रमाण क्षेत्र परंपरागत तशीच ठेवावी काय? हा विचार करणे गरजेचे आहे.

माझ्यामते नमूद अडचणींचा विचार करता आणि उद्भवलेल्या वाईट परिस्थितीचा भविष्यात सामना करण्याकरिता काही पिकांच्या लागवड क्षेत्रात कमी - अधिक प्रमाण सुचवणे आवश्यक वाटते. सत्तर आणि ऐंशीच्या दशकापर्यंत साधारणतः शेतकरी, थोड्या प्रमाणात का होईना सर्व प्रकारची पिके घेण्याचा प्रयत्न करायचे. गहू, ज्वारी, तुर, हरभरा, भुईमुग, भाजीपाला, मसाला पिके घेणे शक्य असेल त्यांनी अशा आपत्तीत हा प्रयत्न करावा. आपल्या हातात अजुनही दिड ते दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. येत्या खरीप आणि रब्बी हंगामाचे विवेकपूर्ण नियोजन, अंमलबजावणी उद्याच्या अडचणी दूर करणारे ठरेल यात शंका नाही.

जीवनाचे शाश्वत सत्य, संकट ही उभी ठाकते
वादळाची त्या धास्ती कशाला, लाटांनाही किनारा असते.

- डॉ. विलास डोईफोडे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.