Loading ...
/* Dont copy */

झंगाट - मराठी कथा

झंगाट, मराठी कथा - [Jhangat,Marathi Katha] बबन्याचं आणि तिचं झंगाट आहे.

बबन्याचं आणि तिचं झंगाट आहे?


‘जय हनुमान’ तालमीतील पोरं रोज पहाटे पाच वाजता उठून व्यायाम करायचे. व्यायाम झाल्यानंतर परत पोहायला जायचे आणि पोहल्यानंतर सकस खुराक घ्यायचे. तालमीतल्या पोरांचे शरीर बजरंग बली सारखे दणकट आणि पिळदार झाले होते. कामचुकार, काडी पहिलवान पिंटयाला त्याच्या बा नं नविनच तालमीत लावलं होतं. रोज उठून व्यायाम करायचा आणि कुस्तीचा सराव करायचा त्याच्या जीवावर येत होतं.



रोजच्याप्रमाणे पोरं आज पण व्यायाम करुन बंडु पाटलाच्या विहीरीवर पोहायला गेले होते. सगळयांनी विहीरीमध्ये उडया मारल्या होत्या. पाणी गार असल्यामुळं उडी मारावी का नाही? या विचारातच पिंटया होता. तितक्यात त्याला एक सुंदर मुलगी खांद्यावर सॅक लटकवून विहीरीजवळच्या पायवाटेने येताना दिसली. कोवळया उन्हात तिचा सुंदर गोरा चेहरा सुवर्णासारखा चमकत होता. गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये तिचा गोरा चेहरा आणखीनच उठून दिसत होता. पिंटया तिचं अप्रतिम सौंदर्य न्याहाळत होता.

तितक्यात नाम्यानं पिंटयाला एक शिवी हासडली आणि म्हणाला, “ये कवा येतो रं? आमचं पव्हायचं झाल्यावर येतो का?” पिंटयाला नाम्याचा खुप राग आला. जर त्या मुलीनं शिवी ऐकली असेल तर असल्या गहीराती मित्रांसोबत राहतो म्हणून तिनं मला गहीराती समजलं तर? असं त्याच्या मनाला उगाचच वाटून गेलं. ती मुलगी आता दूर गेली होती. पिंटयानं गार पाण्यामुळं अंग चोरुनच विहीरीत उडी मारली. सगळे पोरं पाण्यात शिवणा पाण्याचा खेळ खेळत होते. तेवढयात बाहेर गावी शिकायला असलेला बंडु पाटलाचा बबन्या आला. तो खुपच गुंड प्रवृत्तीचा होता. धिप्पाड देहयष्टीचा बबन्या तिघा चौघांना एकसकट सहजच लोळवील असा होता. त्यानं विहीरीत डोकावून पाहिलं आणि चिडून म्हणाला, “तुमच्या बापाची हीर हाय कारं? निघा लौकर भाईर, न्हाईतर एक एकाला चांगला सटकून काढीन.”

पोरं चिडले होते. पण काय करणार, विहीर तर बबन्याचीच होती ना. चालता-चालता नाम्या म्हणाला, “आरं हे बबन्या तालुक्याला शिकायला व्हतं, ते नव्हतं तर कसं निवांत वाटत होतं. उगच ही ब्याद गावात आली राव.” तेवढयात बाळ्या म्हणाला, “आरं ते पाच-सहा वर्ष झालं कॉलेजात एकाच वर्गात हाई, ते काय पास व्हयना म्हणून कॉलेज सोडून आलंय वापस.”

पोरांच्या बबन्या विषयी गप्पा चालु होत्या. पण पिंटया मात्र सकाळी पाहिलेल्या त्या पोरीच्याच विचारात होता.

पिंटया घरी जेवण करत होता. पण त्याचं लक्ष जेवणात नव्हतचं. ती सुंदर मुलगी त्यानं यापुर्वी गावात पाहिली नव्हती. ती गावातील तर नक्कीच नव्हती. कारण गावातल्या सगळया मुली त्याला माहित होत्या. ती कोणाच्या इथे पाहुणी आलेली असेल? याचा विचार करत पिंटया जेवत होता. तेवढयात त्याची आई म्हणाली,“आरं, भाकर वाढु का?” पिंटयाचं लक्षच नव्हतं. त्यानं नकळतपणे मान हलवली. पिंटयाच्या आईनं त्याला भाकर वाढली. थोडया वेळानं पिंटया भानावर आला. आणखी एक भाकर ताटात बघून तो आईवरच चिडला म्हणाला, “ये आये, भाकर कशाला वाढली गं?” त्यावर पिंटयाची आई म्हणाली, “मुडद्या, तुच वाढ म्हणलास की आता.” तेव्हा पिंटयाच्या लक्षात आलं, आपलं मन थाऱ्यावर नाही. त्या मुलीनं आपल्यावर नक्कीच मोहीनी घातली आहे.

कॉलेज सुटायची वेळ झाली होती. वयात आलेले पोरं आणि काही वय सरलं तरी लग्न न झालेली पोरं चावडीवर लाईन मारण्यासाठी थांबले होते. पिंटयाच्या आईनं चिरगुटात भाकर बांधून दिली आणि ती पिंटयाला म्हणाली, “एवढी भाकरी तुझ्या बापाला रानात देवून ये.” पिंटयाला रानात जाण्याचा कंटाळा आला होता. एवढया लांब आणखी तंगडतोड करत जायचं होतं. त्याने नाईलाजानेच चिरगुटात बांधलेली भाकरी घेतली आणि तो चावडीजवळ आला. कॉलेज सुटलेलंच होतं, तितक्यात त्याला ती दिसली. तिच्या बरोबर कडवकराच्या वस्तीवरील आणखी दोघीजणी होत्या. पिंटयानं मनाशीच अंदाज बांधला, ही पण कडवकराच्या वस्तीवरच कोणाकडं तरी पाहुणी आली असणार. त्या तिघीही रानाच्या वाटेनेच निघाल्या. पिंटयाला पण तिकडेच जायचं होतं. थोडया वेळापुर्वीच रानात जायचं त्याच्या जीवावर आलं होतं. पण आता तो आनंदीत झाला होता. आता तो कितीही चालायला तयार होता. पिंटया थोडया अंतराने त्यांच्या मागे-मागे चालु लागला. मसणवाटयापासून दोन पायवाटा फुटत होत्या. त्या दोघीजणी उजवीकडे कडवकराच्या वस्तीकडे वळल्या. ती एकटीच पायवाटानं डावीकडं वळली. आता ती आणि तिच्या मागे पिंटया आणि पायवाटेच्या दोन्ही बाजूने डोक्याच्या वर गेलेल्या ज्वारीची शेतं होती.

दहा-बारा पावलांचं अंतर ठेवून पिंटया तिचं पाठमोरं सौंदर्य न्याहाळत चालत होता. तिचा रेखीव बांधा पाहून पिंटया वेडा होत होता. देवानं अप्रतिम सौंदर्य तिला बहाल केलं होतं. तिचे लांबसडक, काळेशार, मुलायम, रेशमी केस मंद वाऱ्याच्या झुळकेने अलगद उडत होते. तिची डौलदार चाल पाहून पिंटयाचं दिल खल्लास होत होतं. तिचं सौंदर्य पाहायला भेटत आहे. यातच पिंटया स्वत:ला भाग्यवान समजत होता. चालत-चालत आता ते बंडु पाटलाच्या विहीरीजवळ आले होते. बबन्या आणि त्याचा एक गडी विहीरीजवळ पाईपलाईनची जोडाजोडी करत होते. पिंटया तिच्या मागे चार-पाच पावलांच्या अंतरानं चालत होता. बबन्यानं एकदा त्या मुलीकडं पाहिलं नंतर तो रागाने पिंटयाकडे पाहु लागला. पिंटयानं त्याच्याकडं पाहून न पाहिल्यासारखं केलं. ती पिंटयाच्या गोठयाजवळून उजव्या हाताला वळून चालू लागली. पिंटयापण आपल्या गोठयाकडं न जाता कोणी पाहत नाही याची खात्री करुन तिच्या मागे-मागे चालू लागला. पिंटयानं ती कोठे जाते ते पाहिलं. ती नारायण बाबराच्या शेताकडे गेली. ती बाबराचीच पाहुणी आहे म्हणून पिंटयाच्या लक्षात आलं. तो आपल्या शेताकडे वळला. दुपारचे अडीच वाजले होते. पिंटयाचा बा सकाळी सातलाच न्याहरी न करता रानात आलेला होता. काम करून त्याला कचकटून भुक लागलेली होती. तो पिंटयाची वाट पाहतच लिंबाच्या झाडाच्या सावलीला बसला होता. पिंटया उशीरा आल्यानं आणि भुक लागल्यानं पिंटयाचा बा संतापला होता.

पिंटया दिसताच पिंटयाला दोन-चार शिव्या हासडून तो म्हणाला, “काम नगं वाटतं. निसतं फिरायला पाहिजे, भाकर सुद्धा टायमावर आणित नाही.”

पिंटयाचं बापाकडं लक्षच नव्हतं. त्याचा बाप त्याला शिव्या झाडत होता आणि पिंटया मनात तिचाच जप करत होता. बापाकडं दुर्लक्ष करुन पिंटया गावाकडं निघाला. चावडीवर नाम्या आणि रम्या बसले होते. ते बळंबळंच पिंटयाला मोहोळ झाडायला घेवून गेले. त्यांनी भरपूर मोहळं झाडली, पोटभरुन मध खावून दोन किटल्या भरून मध गोळा केला. शेवटचं मोहळ झाडायच्या वेळेला घात झाला, पिंटयाच्या नाकाला एक माशी चावली. पिंटयाचं नाक सुजून चांगलंच टप्पू झालं. आता त्याला नाकावरील सुज कमी होईपर्यंत म्हणजेच किमान दोन दिवस तरी तिला पाहता येणार नव्हतं. असं सुजलेलं तोंड घेवून तिच्यापुढं जाता येणार नव्हतं. दोन दिवस तिला न पाहिल्यामुळं त्याच्या जीवाची खुप तगमग झाली होती.

तिसऱ्या दिवशी त्यानं सकाळी उठल्या-उठल्या आरशात पाहिलं. नाकावरील सुज बऱ्यापैकी कमी झाली होती. आता नाकावरील सुज ओळखु येत नव्हती. त्यानं पटकन आवरलं आणि तो तडक तिच्या येण्याच्या वाटेला बंडु पाटलाच्या विहिरीकडं आला. तिथं त्याला बबन्या ज्वारीला पाणी देत असलेला दिसला. त्याला पाहून पिंटया एका झाडाच्या मागे लपला. बबन्या ज्वारीला पाणी देत विहीजवळून बराच लांब गेला. पिंटया विहीरीच्या थारोळयावर उभा राहून बबन्याची नजर चुकवून तिच्या वाटेकडे पाहू लागला. तेवढयात त्याला ती येताना दिसली. पिंटयाच्या मनात आनंदाच्या उकळया फुटत होत्या. दोन दिवसानंतर आज त्याला ते दैवी सौंदर्य जवळून पाहायला मिळणार होतं. तो तसाच पाणी पिण्याच्या बहाण्याने विहीरीमध्ये उतरला. ती दिसेल अशा बेतानं तो विहीरीच्या तिसऱ्या पायरीवर उभा राहिला. पण बराच वेळ झाला तरी ती काही येईना. अंदाजानुसार आतापर्यंत ती यायला हवी होती. पिंटया विहीरीच्या बाहेर आला. तो त्या वाटेकडे पाहू लागला. पण ती काही दिसली नाही. अचानक ती कशी गायब झाली असेल? याचा विचार करत पिंटया तिचा मागोवा घेत होता. तेवढयात त्याला एकेठिकाणी ज्वारीचे ताटं हललेले दिसले. तिच्या सोबत काही बरं-वाईट तर झालं नसेल ना? असा विचार मनात येवून पिंटया तिकडे पळाला. तो ज्वारीचे ताटं बाजूला सारीत-सारीत तिकडे जाऊ लागला. तितक्यात त्याला हसण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाजाच्या दिशेनं हळुहळु गेला. पाहतो तर काय? जिच्यासाठी तो पागल झाला होता, ती बबन्याच्या मिठीत विसावली होती.

पिंटया सरळ गावाकडे निघाला. चावडीवर नाम्या आणि रम्या बसलेच होते. त्यांना त्याने घडलेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा ते म्हणाले, “आरं काल तु चावडीवर नव्हता, कालच चावडीवर त्या दोघांचा विषय निघाला होता. बबन्याचं आणि तिचं आधीच झंगाट चालु हाई म्हणून. तालुक्याच्या ठिकाणीच ते दोघे भेटले होते आणि तिनं बबन्यासाठीच आपल्या गावातल्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे.” बबन्याचं आणि तिचं आधीच झंगाट आहे, हे ऐकून पिंटयाला धक्काच बसला. तो सावरला. तो तेथून उठला. इथून पुढं कधीच असल्या लफडयात पडायचं नाही असं ठरवून तो तडक ‘जय हनुमान’ तालमीकडं चालु लागला.

- संदिप खुरुद

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची