मनोरुग्ण ते मनोयात्री

मनोरुग्ण ते मनोयात्री - मनोरुग्ण या शब्दाचा मनोयात्री पर्यंतचा प्रवास कसा झाला? त्याचं अनुभव कथन.
मनोरुग्ण ते मनोयात्री

मनोरुग्ण या शब्दाचा मनोयात्री पर्यंतचा प्रवास कसा झाला? त्याचं अनुभव कथन


मनोरुग्ण! प्रत्येकवेळी हा शब्द जेव्हा जेव्हा कानावर पडायचा त्या प्रत्येकवेळी मला मनोरुग्ण म्हणजे वेडेच असतात असे काहीसे वाटत राहायचे. खरंतर रस्त्यावर एकट्याने, उपाशी, मळलेल्या, जखमा झालेल्या, जखमांमध्ये किडे झालेल्या अश्या लोकांना जेव्हा पाहायचो तेव्हा प्रत्येकवेळी डोक्यात एकच प्रश्न सतावत राहायचा की, ‘माणूस म्हणून मी यांच्यासाठी काय करू शकतो?’...पण प्रत्येकवेळी सगळा सारासार विचार करत आपली असलेली बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेता खूप इच्छा असूनही आपण काही करू शकत नाही याचे वाईट वाटायला लागले. पण डोक्यात घोंगावणारे प्रश्न काही थांबत नव्हते. नोकरीच्या ठिकाणीही लक्ष लागत नव्हते. सतत डोक्यात ती माणसे - त्यांचे जगणे हेच विचार सुरू राहायचे. पुढे हळूहळू मी रस्त्याच्या कडेला उभा राहून त्यांना पाहू लागलो. त्यांच्या हालचाली,त्यांचे हावभाव, त्यांचे स्वतःशी बोलणे, हसणे, रडणे सारं काही न्याहाळत होतो. हे सगळं सुरू असताना माझ्या डोक्यात एक गोष्ट येत राहिली की, ही माणसे स्वतःशीच यासाठी बोलत असावी कारण की त्यांना गरज असताना त्यांच्यासोबत कोणी मनमोकळे पणाने बोलले नसावे. आणि मग पुढे रस्त्याच्या कडेला उभा राहून न्याहाळत हळूहळू मी त्यांच्या समोर जाऊन बसू लागलो.

कधी कोणी रागाने माझ्यावर थुंकायचे, कोणी शिवीगाळ करायचे तर कोणी हातात जे काही लागेल ते फेकून मारायचे. इतके होऊनही मी पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांच्या समोर जाऊन बसायचो. असे करत करत एक दिवस ती सगळी आपल्यासारखी माणसे हळूहळू माझ्याकडे पाहत हसत रोज माझी वाट पाहत असायची. आणि कदाचित हाच माझ्या सामाजिक आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट ठरला.

मी सोलापुर मधील अनेक मनोरुग्णासोबत रस्त्यावर मांडी घालून बोलू लागलो, गप्पा मारू लागलो. त्यांची समाजाबद्दल असलेली भिती, समज - गैरसमज हे त्यांच्या भाषेतून समजून घेऊ लागलो. हे सगळं करत असताना त्यांना ‘आपल्याला भूक लागली आहे हे सांगता ही न येणे’ ही गोष्ट माझ्या मनाला चटका लावून गेली. त्यांच्या अंगावर झालेल्या जुन्या जखमा पाहून, त्यात झालेली किड पाहून मला अस्वस्थ होऊ लागले आणि एका क्षणाला मी कशाचाही विचार न करता तुटपुंज्या पगारातून थोडे थोडे पैसे वाचवत मी त्यांच्या जखमांवर उपचार करू लागलो. त्यांना दोन वेळेचे जेवण देणे माझ्याकडून शक्य नव्हते म्हणून, मी घरात बनवल्या जाणाऱ्या जेवणातूनच थोडे त्यांच्यासाठी घेऊन जाऊ लागलो.

घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे हे मला ठाऊक असतानाही मी या सगळ्या दुःख वेदनांच्या हळूहळू प्रेमात पडू लागलो. रात्र रात्र माझ्या डोक्यात त्यांचे चेहरे, आवाज, डोळे दिसू लागले आणि या सगळ्यात माझी नोकरी सुटली. मला त्यावेळी माझी नोकरी सुटली याहूनही जास्त वाईट ‘या सगळ्यांना मला आता जेवण - उपचार देता येणार नाही’ याचे जास्त वाईट वाटू लागले. हळूहळू माझे त्यांना भेटणे कमी होऊ लागले आणि एक दिवस अचानक मला एका मित्राकडून कळले की, “अमुक अमुक रस्त्यावर असणारा एक मनोरुग्ण गेले काही दिवस माझी वाट पाहत आहे.” आणि तेव्हा माझ्या काळजात चर्रर्रर्र झाले होते. आणि क्षणातच माझ्या मनात असलेला ‘मनोरुग्ण’ हा शब्द ‘मनोयात्री’ झाला.

डोक्यात अनेक विचार होते. पण आर्थिक परिस्थितीने मला बांधून ठेवले होते. माझी अस्वस्थता काही केल्या कमी होईना. त्यामुळे मी जवळच्या काही मित्रांना याबाबत बोलू लागलो. ते प्रत्येकवेळी शक्य तितका हातभार लावू लागले. असे सगळं करत असताना एक दिवस असा उजाडला की सोलापूरच्या रस्त्यांवर फिरणारा प्रत्येक मनोयात्री हा आतिश कविता लक्ष्मण चा मित्र आहे अशी चर्चा लोकांमध्ये होऊ लागली.

पुढे मी या माझ्या मनोयात्री मित्रांसाठी वैयक्तिक हात उसने पैसे काढले. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या संस्थांसोबत संपर्क केला आणि एक एक करत अगदी विश्वासाने त्यांना उपचारासाठी संस्था मध्ये पाठवायला सुरुवात केली. उपचारासाठी जाणारे हे माझे मनोयात्री मित्र गाडीत बसताना माझ्याकडे पाहून रडायचे तेव्हा मला वाटत राहायचे की, “यांना काही कळत नाही” हे इथल्या समाजाने कशाच्या आधारे ठरवले असेल? पण असो.

गेली सहा वर्ष हे सगळं काम करत आहे. कर्ज काढत, जवळ असलेले तुटक मुटक सोन गहाण ठेवत, याच्या - त्याच्याकडून पैसे उसने घेत हा सगळा सहा वर्षाचा प्रवास प्रामाणिकपणे करत राहिलो. या माझ्या प्रामाणिकपणा मुळेच कदाचित पुढे सोलापूर मध्ये पूर्वी सारखे रस्त्यावर फिरणारे मनोयात्री कमी झाले. मी त्यांना योग्य ठिकाणी उपचारासाठी किंवा काहींना त्यांचे घर शोधून त्यांच्या घरी पोहचवले.

खूप वाईट काळ पाहिला या सगळ्या प्रवासात. काही वेळा स्वतः दोन दोन दिवस उपाशी राहिलो पण माझ्या मनोयात्री मित्रांना निदान एक वेळचे जेवण देत राहिलो. रेटत रेटत का असेना आज सोलापुरातील एकही मनोयात्री उपाशी पोटी झोपत नाही आणि त्यांना गरजेच्या असलेल्या उपचारापासून वंचित राहत नाही याचेच समाधान आहे.

वर्षानुवर्षे स्वतःशीच बडबडत असणारे मनोयात्री माझ्यासोबत बोलू लागले. त्यांच्या गोष्टी सांगू लागले. सुख दुःख सांगू लागले त्यावेळी असे जाणवले की, तुम्ही प्रयत्न करा फक्त आणि पहा मग ‘या जगात काहीच असे असंभव’ नाही. पुढे याच विचाराने, प्रेरणेने मी करत असलेल्या कामाला एक नाव स्वरूप दिले जे आहे ‘संभव फाऊंडेशन’ आणि हे कायम माझ्या जगण्यात, असण्यात राहावे म्हणून माझ्या मुलाचे नावही संभव ठेवले.

हा सगळा खडतर प्रवास मला आता एका साच्यात आणायचा आहे. उपचारासाठी बाहेर पाठवत असणाऱ्या मनोयात्रींना मला इथेच आपल्या सोलापूर मध्ये एका छताखाली आणून त्यांच्यावर उपचार करायचे आहे. त्यांना पुन्हा नव्याने जगायला शिकवायचे आहे. हाच माझ्या आयुष्यातला आता शेवटचा आलेख आहे.

माझ्या तोकड्या हाताला जर तुमचे आभाळ लाभले, तर पायात जगण्याची बेडी बांधली गेलेल्या शेकडो मनोयात्रींच्या पंखात मी नव्या उभारीचे बळ देईन असा विश्वास आणि खात्री तुमच्याप्रती सादर करतो.

- आतिश कविता लक्ष्मण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.