आमचाही एक जमाना होता - मराठी कविता

आमचाही एक जमाना होता - मराठी कविता - [Aamchahi Ek Jamana Hota, Marathi Kavita] आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्नं पहातोय.
आमचाही एक जमाना होता - मराठी कविता | Aamchahi Ek Jamana Hota - Marathi Kavita

आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्नं पहातोय

पहिल्या यत्तेपासून शाळेत आम्हाला पायी पाठवायची पद्धत होती, बस ची चैन परवडत नव्हती
आम्ही कधी हरवू कींवा गाडीखाली येऊ अशी भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही

पास / नापास हेच आम्हाला कळत होतं
% चा आणि आमचा संबंध कधीच नव्हता

शिकवणी लावली, हे सांगायला लाज वाटायची
कारण ‘ढ’ असं हीणवलं जायचं

पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपिस ठेवून
आम्ही हुशार होऊ शकतो, असा आमचा दृढ विश्वास होता

कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत
पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं

दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी
पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे
हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा

वर्ष संपल्यानंतर दुकानात जाऊन पुस्तके विकणे आणि त्यातली थोडी रक्कम
खाऊसाठी ढापण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे

आई वडिलांना आमच्या शिक्षणाची तशी फारशी फिकीर नव्हती कारण
आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजा नव्हते

वर्षानुवर्षं आमच्या आईवडिलांची पावलं कधी आमच्या शाळेकडे वळत नव्हती
कारण आमच्यामध्ये ते टॅलेंटच तेवढं होतं

एका मित्राला सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून
आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो हे आता आठवतही नाही

सरांचा शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन उभं राहताना
कान लाल होऊन पिरगळला जाताना आमचा ईगो कधीही आडवा येत नव्हता
खरं तर आम्हाला ईगो काय असतो हेच माहीत नव्हतं

मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती
मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुष असायचे
मार खाणारा यासाठी की,चला, कालच्यापेक्षा तरी आज कमी धोपटला गेलो
म्हणून आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळाले म्हणून

बिनचपला, बुटांचे कोणत्याही बॅटीने आणि चेंडूवर वेळ मिळेल तेव्हा खेळण्यातले काय सुख होते?
ते आम्हालाच माहीत होते

आम्ही पॉकेट मनी कधीच मागितला नाही, आणि वडिलांनी कधी दिला नाही
आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या
छोट्याशा असल्याच तर घरातले कोणीतरी पुर्ण करून टाकायचे
सहा महिन्यातून मिठाई खायला मिळालीच तरी आम्ही बेहद खुश होतो
दिवाळीत लवंगी फटाक्यांची लड सुटी करून एकेक फटका उडवत बसणे
यात काही अपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही
आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की
आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो
कारण आम्हाला आय लव यू' म्हणणं माहीतच नव्हतं

आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात
संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालोय
ज्यांना जे हवं होतं, ते त्यांनी मिळवलंय

शाळेतील ते डबल सीट वर फिरवलेले आणि म्युनिसिपल हायस्कूल बाहेरच्या त्या सायकलवाल्या गोळी वाल्याकडून
काय काय ज्या मित्रांच्या कृपेने मिळायचे ते मित्र, आजही स्मरणात आहेत..

आम्ही जगात कुठेही असू पण हे सत्य आहे की
आम्ही वास्तव दुनियेत जगलो आणि वास्तवात वाढलो

कपड्यांना सुरकुत्या पडू न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं आम्हाला कधी जमलंच नाही
पोळी भाजी शिवाय मधल्या सुटीतला काही डबा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं

आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्नं पहातोय
कदाचित ती स्वप्नच आमच्या ऊतारपणी जगायला मदत करतायत
जे जीवन आम्ही जगलो तेच आम्हाला पायाभूत ठरतेय
असा तो आमचाही एक जमाना होता

- अमरश्री वाघ

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.