शारदे पूर्ण कर कामना

शारदे पूर्ण कर कामना - [Sharade Purna Kar Kamana] माझी सरस्वती, ब्राम्ही अशी अनेक नावे आहेत. तसेच मला विद्या या नावानेही ओळखतात.
शारदे पूर्ण कर कामना - Sharade Purna Kar Kamana

माझी सरस्वती, ब्राम्ही अशी अनेक नावे आहेत

माझा इयत्ता ९ वी सहामाहीचा निकाल नुकताच लागला होता. मला ६३ टक्के मिळले होते. तेवढे माझ्यासाठी पुरेसे नव्हते, असे तुम्हालाही वाटते ना! खरे तर मी अर्थशास्त्र आणि विज्ञान - १ या विषयात सपास तर भुमितीमध्ये नापास होते. काही उपयोग नव्हता. कारण वेळ हातातून गेलेली होती. खरं तर योग्य त्या वेळी मी थोडासा जरी जास्त अभ्यास केला असता, तरी मला सत्तर ते बहात्तर टक्के नक्कीच मिळाले असते. पण त्या वेळी मी दिवाळीची सुट्टी लागणार मग मज्जा करायला मिळणार या आनंदाच्या विश्वात हरवले होते. पण नंतर मला या गोष्टीचा पश्चाताप होत होता. म्हणून मी माझ्या खोलीत गेले व दार लावून रडत बसले.

मनोमनच मी देवाला खूप शिव्या देत होते. त्याचवेळी अचानक प्रकाश झाला आणि माझ्यापुढे एक सुंदर, सालस, उच्चविचारसरणी असणाऱ्या घरातली, सदैव प्रसन्न वाटणारी, परी राज्यातील रूपवान परीप्रमाणे दिसणारी पण पंख नसणारी अशी स्त्री उभी राहिली. तिने शुभ्र वस्त्र धारलेले होते. हाती वीणा व पुस्तक घेऊन राजहंसला आपले वाहन बनवून ती तिथे प्रकट झाली होती. तिचे मुख शरद ऋतूतील कमळाप्रमाणे होते. तिच्या कमळासारख्या हातामध्ये स्फटिकांसारखे रूद्राक्ष असलेली माळ शोभून दिसत होती. तिच्या नखातून निघालेले लालसर किरण हे पोपटाला आकर्षवणारे डाळींबच जणू आहेत असे भासत होते. तिचे ते मंद हास्यच आपल्या ज्ञानासाठी कारणीभूत आहेत. असे वाटत होते. तिला पाहून ती नक्कीच देवीच असावी असे मला वाटले आणि मी तिला प्रणाम केला.

मी तिला विचारले, “माते तू कोण आहेस?”

ती हसली आणि उत्तरली, “मी तुम्हाला सर्व देऊन तुमचे बुद्धीचे भांडार गच्च भरवते आणि तुमच्या मुखकमलामध्ये नेहमी चांगला ठेवा तुमच्याजवळ ठेवते. अशी मी शारदा देवी आहे. पुस्तक हे माझे मानस अपत्य आहे. तुम्ही त्याचा अपमान करता, अशी त्याने माझ्याकडे तक्रार केली आहे. म्हणून मी प्रत्येक विद्यार्थीनीची भेट घेणार आहे. त्याच इच्छेने मी तुझ्याकडे आली आहे.”

“माझी सरस्वती, ब्राम्ही अशी अनेक नावे आहेत. तसेच मला विद्या या नावानेही ओळखतात. त्यावरूनच विद्यार्थी हा शब्द आला. विद्यार्थी शब्दाची फोड केली तर त्याचा अर्थ विद्येचे अर्थार्जन म्हणजेच ज्ञान संपादन करणारा.”

“विद्येविना मती गेली
मती विना निती गेली
निती विना गती गेली
गती विना वित्त गेले
वित्ताविना क्षुद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले.”

असे म्हणत महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांना पहिला ‘स्त्री शिक्षिका’ केले. त्या सावित्रीबाई फुलेंनी अनेक विद्यार्थीनी घडविल्या. त्यांच्यामुळेच हा हक्क आज तुला मिळाला आहे. तरी तू त्याचा अपमान करतेस? ज्या पुस्तकाचा उपयोग तुला अशा पवित्र कामासाठी होत आहे. अशा पुस्तकाला तू ढुंकून सुद्धा पाहत नाहीस. मग तुला एवढ्या मोठ्या शिक्षणाचा हक्क देण्याचा उपयोग तरी काय?”

“आज काही गरीब गलिच्छ वस्त्यांमध्ये मुलांना शिक्षण मिळू शकत नाही. सरकारने बरीच सोय केली आहे. पण गरीबीमुळे आई-वडील त्यांना शिकू देत नाहीत. सरकारी सोयीही तिथपर्यंत पोहचत नाहीत. अशा परिस्थितीत ते काहीच करू शकत नाहीत. पण तुला तर सर्व सोयी उपलब्ध आहेत. मग तू त्याचा का लाभ घेत नाहीस?”

“आंबेडकर, सावरकर यांसारख्या लोकांनी गरिबीत दिवस काढून आपले शिक्षण पूर्ण केले आणि ते थोर तत्ववेत्ते व विचारवंत म्हणून उदयास आले. त्यांचा तरी आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तू शिक्षण पूर्ण केले पाहिजेस. तुला यांच्यासारखं जर स्वतःचं व्यक्तिमत्व घडवायचं असेल, जगात जर ताठ मानेने जगायचं असेल तर तुला मला वचन द्यावं लागेल की तू यापुढे चांगला अभ्यास करशील व पुस्तकाचा अपमान न करता त्याची योग्य जपवणुक करशील आणि चांगले गुण संपादन करशील. याप्रमाणे जर तू वागलीस तर नक्कीच तू यशस्वी होशील व तुझ्या आयुष्यात विद्या ही तुझ्या यशाची मानकरी ठरेल.”

“आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. ज्ञान हा एक अनमोल ठेवा आहे. म्हणून विद्वान व्यक्ती ही नेहमीच श्रीमंत मानली जाते. ज्ञान कधीही कोणालाही चोरून घेता येत नाही तर हे मेहनतीनेच कमवावे लागते. तु हुशार आहेस असे सर्व म्हणतात. पण अशा हुशारीचा काय उपयोग? तु असा गर्व कधी करू नकोस. कारण या जगाच्या ज्ञानापुढे तु एका विशाल वृक्षाच्या पानावरचं एक छोटासा दवबिंदू आहेस. त्या वृक्षाचं अख्खं पान व्यापायला तुला खूप मेहनत करावी लागेल. सगळ्यांनाच तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करायला तू पात्र ठरशील अशी माझी आशा आहे. तुला तुझ्या पुढच्या जीवनाच्या शुभेच्छा.” असे म्हणून ती शारदा देवी गडप झाली. पण जाताजाता मला स्फुरण देऊन गेली. आता मी जोमाने अभ्यास करत आहे आणि मी चांगले मार्क मिळविन अशी मला खात्री आहे.


रागिनी पवार | Ragini Pawar
अंबरनाथ(पूर्व), महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
वाचना सोबतच लिखानाची आवड असणाऱ्या रागिनी पवार या लघुकथा, लेख, दीर्घकथा आणि स्त्रीयांच्या जीवनावर आधारीत कथांचे लिखान करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.