जुळ्यांचं रूटीन आणि पेशन्स

जुळ्यांचं रूटीन आणि पेशन्स - घरात लहान बाळ असलं की, पहिले काही महिने नुसता गोंधळ एके गोंधळ असतो, एक रुटीन लागलंय म्हणे पर्यंत बदलून जातं.
जुळ्यांचं रूटीन आणि पेशन्स

घरात लहान बाळ असलं की, पहिले काही महिने नुसता गोंधळ एके गोंधळ असतो

जुळ्यांचं रूटीन आणि पेशन्स


आमच्या वरच्या मजल्यावरसुद्धा एकांना जुळ्या मुली झाल्या आहेत, आणि त्याही एकयुग्मज (identical) आहेत. या बाळांच्या आईचे आईवडील सद्ध्या त्यांच्या घरी असतात, तिचे सासू-सासरे आमच्याच बिल्डींगमध्ये खालच्या एका मजल्यावर राहातात. त्यामुळे वरचेवर ये-जा, काही ना काही ने-आण चालूच असतं त्यांचं. आणि अचानक कोणत्याही वेळी दोन्ही बाळांचा एकत्रित टाहोसुद्धा ऐकू येत असतो. मला आठवतं, डिलिव्हरीच्यावेळी ती आणि बाळं हॉस्पिटलमध्ये असताना मी आणि माझा नवरा, त्या दोघांना खास भेटायला गेलो होतो. कोविड काळात बाळं जन्माला आलेली असल्याने बाळांच्या बाबाला आणि आईलासुद्धा त्यांनी अगदी आठवड्यानंतर, म्हणजे डायरेक्ट घरी घेऊन जायच्या दिवशी बाळांच्या जवळ जाऊ दिलं होतं! त्यामुळे या नव्या आई-बाबांशी बोलून थोडा ताण हलका करावा म्हणून आम्ही गेलो होतो. ती बाळांना घेऊन लगेच तिच्या माहेरी जायची होती.बाळांचा चवथा महिना


बाळांचा चवथा महिना सुरू झाला, तशी ती दोघींना घेऊन तिच्या आई-वडिलांबरोबर इथे आली. त्याआधी या नव्या बाबाने पण पूर्ण planning करून घरचं सगळं फर्निचर बदलून घेतलं होतं. येता-जाता मला कधी भेटला, की आम्ही कोणत्या महिन्यात काय आणि कसं केलं, यासाठी तो almost माझा interview घेत असे. ते कानडी बोलतात त्यामुळे त्याच्या बायकोला माझी जुळ्यांच्या पालकत्वावरची इंग्रजीतली ब्लॉगिंग साईटची लिंक त्याने तिला पाठवून दिली. आपल्यापैकी कुणाला आवड असेल तर नक्की ही वेबसाईट एकदा पाहून घ्यावी. त्या काळातल्या बरेच ताजे अनुभव मी Our Upgraded Journey या ब्लॉग साईटवर टिपून ठेवले होते.

रुटीन लागलंय म्हणे


सगळ्यांनाच माहितीये, घरात लहान बाळ असलं की, पहिले काही महिने नुसता गोंधळ एके गोंधळ असतो. एक रुटीन लागलंय म्हणे पर्यंत बदलून जातं. त्यामुळे त्यावेळच्या रुटीनमध्ये उसंत नावाच्या गोष्टीला मोठी सुट्टी देण्यावाचून पर्याय नसतो. आम्ही, जुळ्यांच्या पालकांनी असा काही ‘अविचार’ करणं म्हणजे महापाप असतं! 😃 आपल्या घरच्या सर्व वेळा आणि आपल्या लेखी मुलांच्या पालनामध्ये ज्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं आहे, त्या सगळ्याचा अंदाज घेऊन, त्याप्रमाणे आपल्या capabilities आणि resources यांचं planning करून स्वतःला त्या (बदलत्या) घडीत जर आपण जाताजाता बसवत गेलो, तर हे सगळं तेवढंसं कठीण जात नाही.

उदाहरणार्थ सांगते, माझ्या दोघी 6 महिन्यांच्या होईपर्यंत त्यांचे दोन्ही आजी-आजोबा alternately आमच्या सोबत येऊन जाऊन राहात. घरचा सारा व्याप ह्या तान्हुल्यांसकट सांभाळायला मदत खूप व्हायची त्यांची. घरी स्वयंपाकाला एक नि घरकामाला (केरवारं, भांडी, कपडे) एक अशा बाया ही होत्या मदतीला. बाळांचा बाबा (IT) नोकरीवाला असल्याने सकाळी घराबाहेर गेला, की रात्रीपर्यंत परतू शकत नसे. पण तरीही घरी आल्यानंतर त्याची बाळांसोबत रात्रपाळी असायचीच.

बाळांचे वजन


म्हणजे ह्या दोघी झाल्या तेंव्हा underweight म्हणजे 1.9 and 2.2 kgs च्या होत्या, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पाहिले तीन महिने पर्यंत निक्षून दर दोन तासांनी दूध पाजायला सांगितलं होतं. त्यामुळे हा उद्योग रात्रभरात सुद्धा दोन दोनदा करावा लागायचा. सर्वात कठीण काम म्हणजे आधी त्या झोपलेल्या बाळाला उठवा, मग दूध पाजा, मग ते जिरवा, नि मग (रात्री आम्हाला झोपायचंय म्हणून) पुन्हा जबरदस्तीने झोपवा. ह्यासाठी रात्री एक बाळ माझ्या नि एक बाबाच्या ताब्यात असायचं. काही आठवड्यांनंतर आम्ही दोघींचं पाठोपाठ आवरायला शिकलो. म्हणजे एकाने लवकर झोपायला जायचं. दुसऱ्याने पहिल्या शिफ्टमध्ये दोन्ही बाळांचं सगळं आवरून घेऊन बाळांबरोबर झोपून जायचं. नंतर दुसऱ्याने लवकर उठून दुसरी शिफ्टमध्ये सगळं आवरून घ्यायचं. मग पहाटेचा त्यांचा सगळा program उरकून त्यांना आज्जी-आजोबांच्या हवाली केलं, की आम्हाला झोपायला अजून थोडा वेळ मिळायचा.

बाळांचे रूटीन


ह्यात एक नियम आम्ही कसोशीने पाळला म्हणजे, दोघींचं पोट भरणे, झोपवणे, त्यांना फिरायला घेऊन जाणे, हे सगळं एकाच वेळी करायचं. त्यामुळे पुढेसुद्धा या दोघी झोपलेल्या असल्या की एक तर मी निवांत माझी कामं किंवा झोप पूर्ण करू शकत असे. आणि दुसरा फायदा म्हणजे दोघींच्या सर्व activities चा track ठेवणंही आम्हाला सोपं जायचं. आम्ही एक tracker ठेवलेला. त्यात मी दोघी किती वाजता, किती मी.लि. दूध प्यायल्या, औषधं (Iron, Calcium, multi Vitamins) कुणाला नि किती वाजता दिली, कुणाची शी झाली / झाली नाही, हे सगळं लिहून ठेवत असू.

ह्यांच्या डॉक्टरांच्या मर्जी विरुद्ध, साधारणपणे पंधरा दिवसांतच आम्ही Feeding साठी NanPro द्यायला सुरुवात केली. कारण दोघींच्या वेळा सांभाळण्याच्या दृष्टीने एक तर ते सोपं होऊ लागलं, आणि पुढे जसजशी ह्यांची in-take quantity वाढू लागली, तसतशी मला त्याचा चांगला फायदा होऊ लागला. दिवसा तसंच जास्ती करून रात्रीच्या वेळी मी एका बाळाला दूध पाजायला घेतलं असेल, तर दुसरा कुणीही दुसऱ्या बाळाला feederने पाजू शकत होता. हं, न चुकता आमच्या tracker मध्ये कुणाला आईचं दूध आणि कुणाला formulaचं दिलंय, हे ही लिहून ठेवत असू. नाही तर त्याने एकीच्याच पोषणात फरक पडलेला चालला नसता!

बाळाची भूक


तर असे हे साधारण तीन महीने गेले, आणि आमच्या लक्षात आलं की रात्री जर का बाळ पोट भरून झोपलेलं असेल, तर त्याला पहाटे पर्यन्त पुन्हा उठवून पाजायची गरज नाही. त्या आधी भूक लागलीच, तर आता बाळ स्वतःहून रडून भूक सांगू शकेल, एवढं मोठं झालेलं आहे. मग त्यांच्या growth tracker प्रमाणे सगळं नीट चालू आहे, ही खात्री झाल्यावर आम्ही मध्यरात्री उठवून बाळांना पाजण्याचं दिव्य थांबवलं, आणि रात्री सुखाने ५-६ तासांची झोप घेऊ लागलो! आमच्या नशिबाने या दोघी आजारपण सोडता रात्रभर कधीच जाग्या राहिल्या नाहीत. असं होऊ लागलंय, हे लक्षात येताच मी त्यांच्याशी बोलत, खेळत त्यांची संध्याकाळी झोपायची वेळ वाढवत असे. कष्टाने रडवत ठेवायचं नाही, पण त्यांच्या त्या त्या वयातलं कुतूहल लक्षात घेऊन त्यांना गुंतवत राहिलं की गुंतून बघत, खेळत राहातात मुलं! असं हळूहळू अर्धा-एक तासापासून सुरूवात करत त्यांची वेळ आपल्याला हवी तिथवर ढकलत नेता येऊ शकते. त्यांचा वाढवता वाढवता आपोआप आपलाही patience वाढत जातोच मग...


प्रज्ञा वझे-घारपुरे | Pradnya Vaze-Gharpure
बंगळूर, कर्नाटक (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
बिझीनेस मॅनेजमेंट विषयात पदविधर असलेल्या प्रज्ञा यांना लहान मुंलांविषयीच्या लेखनात रस आहे त्यावर त्यांची काही पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.