सांगावे कसे कळत नाही, गणित काही जुळत नाही
सांगावे कसे कळत नाही
गणित काही जुळत नाही
वीतभर पोट
टीचभर मन
काही केल्या भरत नाही
क्षणाचे जीवन
थोडेसे यौवन
हव्यास काही सुटत नाही
आयुष्यभर चाकरी
कष्टाची भाकरी
सहज कुठे मिळत नाही
लबाडांची चाल
गुणवंतांचे हाल
जमते कसे समजत नाही
बेरजेचे राजकारण
उध्दाराचे समाजकारण
एकत्र कसे उमगत नाही
आयुष्याचे गमक
कवीतेचे यमक
कधी उलगडत नाही
- प्रा. महेश बिऱ्हाडे