डाळींबी भाग १ - मराठी कथा

डाळींबी भाग १, मराठी कथा - [Dalimbi Part 1, Marathi Katha] डाळींबी म्हणजे एका गोड चिमुकल्या मुलीची हृदयद्रावक कथा.
डाळींबी भाग १ - मराठी कथा | Dalimbi Part 1 - Marathi Katha

डाळींबी म्हणजे एका गोड चिमुकल्या मुलीची हृदयद्रावक कथा

लातूर जिल्ह्यातील उदगीर गावात ‘सदानंद माळी’ हे गृहस्थ राहतात. नावाने सदानंद असणाऱ्या सदानंद यांच्या घरी सदा + आनंद क्वचितच पाहायला मिळतो. तसा लातूर जिल्हा हा दुष्काळी भाग त्यात उदगीर गाव ही दुष्काळी पट्ट्यात येते. गावातील बरीच माणसे एम. आय. डि. सी. मध्ये कामाला आहेत. रात्रंदिवस बारा बारा तास ड्युटी करायची आणि संसाराचा रहाटगाडा रेटायचा. अशी गावकऱ्यांची दिनचर्या.

मराठवाड्यातील लातूर जिल्हा मुळात दुष्काळी भाग म्हणून तेथील मुलांच्या लग्नाची नेहमीच अडचण; तरी सदानंद माळींच्या नशीबाने त्यांना वेळेवर साथ दिली म्हणून जवळच्याच एका गावातील मुलीसोबत त्यांचे लग्न झाले. तिचे नाव ‘शारदा’. मुळात! लग्न तर थाटामाटात झाले. सदानंदांच्या लग्नात सर्वांनी आपली हौस भागवून घेतली थोरामोठ्यांनी शुभाशिर्वाद दिले पण लग्नाला सहा वर्षे लोटली तरी घरचा पाळणा काही हलेना; औषध पाणी झालं डॉक्टरांचे सल्ले झाले पण ‘शारदा माळी’ यांची कुस काही ऊजवेना.

ऐकेदिवशी शारदाची मावशी घरी आली. “येऊ का घरी” बाहेरून ओळखीचा आवाज आला शारदा स्वयंपाकघरात स्वयंपाक करीत होती. आवाज ऐकून ती लगेचच बाहेर आली. मावशीला पाहून शारदाला खूप आनंद झाला. ये मावशी शारदाने मावशीला घरात घेतले; माठातील थंड पाणी पिण्यास दिले. हवापाण्याच्या गप्पा झाल्यावर मावशीने शारदाला अपत्याबाबत विचारलं. तो प्रश्न विचारल्यावर शारदाचा चेहेराच पडला. का गं? काय झालं? तेव्हा शारदाने लग्ना नंतरच्या सर्व गोष्टींचा उलगडा केला. की... किती वैद्यकीय प्रयत्न झाले, उपवास झाले. हे सर्व ऐकून मावशीने तिला माळावरच्या महादेवाची उपासना करण्याचा सल्ला दिला. ते असे एकमेव महादेवाचे मंदिर होते की ज्यात महादेवाचे शिवलिंग व मूर्ती एकत्रित होत्या.

दुपारी सदानंद घरी आले; त्यांनाही मावशीला पाहून आनंद झाला. जेवताना त्यांच्यात गप्पा रंगल्या. मावशी आपला चांगला पाहूनचार घेऊन गेल्या. रात्री सदानंद व शारदा झोपायची तयारी करीत होते. तेव्हा शारदाने सदानंदांना मावशीने सांगितलेला उपाय कानावर घातला. यावर सदानंद तिला म्हणाले. बरं हा ही उपाय आपण करूया; बघू परमेश्वर तरी किती आपल्या भोळेपणाची परिक्षा घेतो.

एकेदिवशी सोमवारी ते दोघेही माळावरच्या महादेव मंदिरात जातात आणि भगवान शिवाची मनोभावे उपासना करतात. शारदा महादेवाकडे आपले दोन्ही हात पसरून पुत्रप्राप्तीची प्रार्थना करते यावेळेस तिच्या डोळ्यांतून अश्रू तराळतात. सदानंद तिला धीर देतात. दोघेही महादेवाचे दर्शन घेऊन पुन्हा घरी परततात. असेच थोडे दिवस निघून जातात. एकेदिवशी शारदाला अचानक कोरड्या उलट्यांचा त्रास सुरू होतो. या त्रासाने ती अगदीच कासावीस होऊन जाते. तेव्हा ती घरी एकटीच असते. शेजारच्या काकी लगेच सदानंदांना फॅक्ट्रीवर फोन करून घरी बोलावून घेतात. सदानंद शारदाला लगेच डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टर तिची तपासणी करून सदानंदांना सांगतात की... “तुमच्या बायकोला दिवस गेले आहेत”. हे ऐकून सदानंदांच्या आनंदाला पारावर उरत नाही. डॉक्टर त्यांना तिची सर्व काळजी घ्यायच्या सूचना करतात.

तेव्हा तिला तिसरा महिना सुरू असतो. सदानंद तिची अगदी डोळ्यांत तेल घालून काळजी घेत असतात. दोघेही मनोमन महादेवाचे आभार मानतात. एकेदिवशी शारदाला पोटदुखीचा खूप त्रास सुरू होतो. सदानंद तिला ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जातात. डॉक्तर तिची तपासणी करतात तपासणी दरम्यान डॉक्टरांना असे आढळून येते की शारदाने तिला राहिलेल्या दिवसांमध्ये पपईचे सेवन केले आहे...

डॉक्टर थोडे काळजीत पडतात. डॉक्टर लातूर जिल्ह्यातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये फोन करून तेथील एका एक्स्पर्ट सर्जनला संपूर्ण परिस्थिती सांगतात. ते सर्जन घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित उदगीरमध्ये येतात. सदानंद, डॉक्टर आणि ते सर्जन यांची भेट होते. सर्जन सदानंदांना घटनेचे गांभीर्य सांगतात की राहिलेल्या दिवसांत पेशंटने पपई या फळाचे सेवन केले आहे. तेव्हा सदानंद त्यांना सांगतात की “डॉक्टर कधी कधी पाण्याची खूप ओरड होते म्हणून पाण्याची तहान भागविण्यासाठी शारदाने पपई खाल्ली होती. ते पण तिच्या मावशीने तिला सांगोल्याहुन आणली होती”. तेव्हा सर्जन त्याला सांगतात की पेशंटने एकदा नाही तर तब्बल तीन वेळा पपई खाल्ली आहे आणि हे धोकादायक आहे. बाळासाठी आणि तिच्या आईसाठी. डॉक्टर काही काळजी करण्यासरखं तर नाही ना? तेव्हा डॉक्टर सदानंदला विश्वासात घेऊन त्याला सांगतात की गर्भावस्थेत पपईचे सेवन केल्याने प्रसुतीच्या वेळेस खूप अडचणी येतात आणि इथे तर परिस्थिती फार नाजूक आहे.

आम्ही आई किंवा बाळ या दोघांपैकी कुणा एकट्याचेच प्राण वाचवू शकू. यावर सदानंदला धक्काच बसतो. तो डॉक्टरांचे पाय धरतो. त्यांना विनवण्या करू लागतो कि माझ्या आयुष्यात माझ्या पत्नी व्यतीरिक्त बाकीचे कुणी नाही आणि मला माझे बाळ ही हवे आहे. मला माझा संसार सुखाने चालवायचा आहे. डॉक्टर त्याची कशीबशी समजूत काढतात व त्याला शांत करतात.

डॉक्टर आणि सर्जन शारदाची प्रसुती करण्यासाठी प्रसुतीगृहात जातात. इकडे सदानंद महादेवाची उपासना करू लागतात. नामस्मरण करू लागतात. एक दोन तासांनी डॉक्टर बाहेर येतात. त्यांच्या चेहऱ्यावर भीषण खिन्नता असते. सदानंद ताबडतोब डॉक्टरांजवळ जातात व शारदा आणि बाळाबद्दल विचारतात पण शेवटी इथे घात झालेला असतो. शारदाची प्रसुती अगदी नॉर्मल झालेली असते. परंतु ती आपल्या बाळाला जन्म देऊन कायमची कालावश झालेली असते.

गर्भधारणेच्या दिवसांत पपईचे सेवन केल्याने तिच्या गर्भाशयात खूप गुंतागुंत निर्माण झालेली असते आणि शेवटी बाळाला जन्म देताच तिचा मृत्यू होतो. हे ऐकून सदानंदच्या पायाखालची जमीन सरकते. तो उदासीनतेचा शिकार होतो व फार मोठ्या दुःखी मनाने हॉस्पिटलच्या पायरीवर जाऊन बसतो.

क्रमशः


इंद्रजित नाझरे | Ajit Patankar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
कादंबरी, कथा वाचनाची आवड असणारे इचलकरंजी, कोल्हापूर येथील इंद्रजित नाझरे हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कथा या विभागात लेखन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.