भारतीय मंदिरे - भाग १

भारतीय मंदिरे भाग १ - [Bharatiya Mandire Part 1] मंदिरांचे भारतीयांच्या अस्तित्वाशी असणारे अतूट नाते उलगडण्याचा प्रयत्न करणारा लेख.
गोंदेश्वर मंदिर सिन्नर / मॉडेल - रागिणी कर्डीले - महाराष्ट्र भारत | Gondeshwar Temple Sinner / Model - Ragini Kardile - Maharashtra India

मंदिरांचे भारतीयांच्या अस्तित्वाशी असणारे अतूट नाते उलगडण्याचा प्रयत्न


भारतवर्षातील वीस वर्षाच्या भटकंतीत साधारणतः शंभरच्या आसपास मंदिरे पहिली. कला, निसर्ग आणि समाज यांचा संगम प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रूपात अनुभव देऊन जातो.
शेवटचा बदल ४ जून २०२१

सह्याद्रीतील शिव मंदिरातील गूढ शांतता शरीरातील रोमारोमात पाझरून मनाच्या खोल गाभाऱ्यात उतरते तर मदुराई, तंजावर आणि कांचीपुरमला माना वर करून किती शिल्पे पहावे हा प्रश्न पडातो. बेलूर आणि हळेबिडू मध्ये चन्नकेशवा, होयसळेश्वर मंदिरातील लोखंडासारखे चमकणारे आणि तासलेले स्तंभ, हंपी येथील सप्तसुरात निनादणार विठ्ठल मंदिराचे स्तंभ, खजुराहोतील कामशिल्पे पाहून स्तिमित झालो, तर मार्तंड आणि अवंतिकेश्वराचे काश्मीरमधील तोडलेली मंदिरे पाहून मन विषण्ण झाले. लिहिण्यासारखे खूप असले तरी विस्तारभयास्तव येथे थोडक्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करू या.

ही लेखमाला साधारणतः चार भागात विभागली आहे. त्याद्वारे मंदिरांचे भारतीयांच्या अस्तित्वाशी असणारे अतूट नाते उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. याचा उद्देश तुम्हाला मंदिराविषयी माहिती देणे नाही तर यातून तुम्हाला प्रश्न पडायला हवे हा आहे.

 • मंदिरे भारतातच का तयार झाली?
 • मंदिरांच्या निर्मितीचे सामाजिक, आर्थिक, कलाविषयक, सांस्कृतिक परिणाम काय झाले?
 • परदेशी कला आणि एत्तद्देशीय कला यात फरक काय आहे?
 • आजच्या काळातही मंदिराचा काही उपयोग आहे का?
...हे आणि असे अनेक प्रश्न ज्यांनी भटकंतीत छळले! काही गोष्टींचे अर्थ नंतर कळले ते तुमच्यापुढे सादर करीत आहोत. आजचा समाज भावनेपेक्षा विचारांनी जास्त चालतो म्हणून येणारे चार लेख तुम्हाला विचारप्रवण करायला सादर करीत आहे.

अनुभूती, प्रेरणा आणि निर्मिती
जी गोष्ट आपल्या आकलनापलीकडे आहे तिला दैवी समजून नतमस्तक होणे ही प्रवृत्ती आदिमानव काळापासूनची. विशेषतः भारतासारख्या देशात जेथे मानव समृद्ध आणि प्रगत झाला तेथे मग अशा शक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करताना मानवी प्रतिभा फुलली ती देवराया, गुंफा(लेण्या), छोट्या मंदिरापासून ते विशालकाय मंदिरांच्या रूपात.

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मन: ॥९.२६॥

गीतेच्या नवव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने म्हंटल्याप्रमाणे यथाशक्ती लोक भगवंताप्रती आपले प्रेम आणि श्रद्धा व्यक्त करायचे. कोणी पिंडीवर बेलाचे पान वाहायचे तर कोणी दूध तुपाचा अभिषेक तर कोणी हजारो लोकांना अन्नदान करायचे याशिवाय ठराविक ऋतूत यात्रा आणि वाऱ्या करायचे. थोडक्यात काय तर समाज आणि निसर्गाशी जोडण्याचा मंदिरे हा एक दुवाच होती. परचक्र आले आणि मंदिरांचा विनाश केला तरी परत नवीन मंदिरे उभी राहिली आणि लोकजीवन त्याभोवती फुलत राहिले. राजे आले आणि गेले. त्यांचे महाल, वाडा, किल्ले देखील पडले. परंतु मंदिरे क्वचितच ओस पडली. माणसांचा ओघ आणि आस्था कायम राहिला. जगातील अनेक संस्कृती जशा संपल्या ते आपल्याबाबतीत घडले नाही याचे कारण राजांनी जरी ही मंदिरे बांधली तरी ती पुजली समाजाने. त्यांचे नाव जरी लोकस्मृतीतून पुसले गेले पण कार्य मात्र चिरंतन झाले.

उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गाचा स्थायी भाव आहे. जे निर्माण झाले ते कधीतरी पूर्णत्वाला जाऊन निसर्गात विलीन होणारच. तसेच काळाच्या उदरात अनेक संस्कृती निर्माण होऊन नष्ट झाल्या. आज काहींचे अवशेष मात्र उरले. भारतवर्षात मात्र वेगळे घडले. सामाजिक जीवन, आध्यात्मिक प्रवास, कामशास्त्र, युद्ध, प्राणिजीवन, निसर्गचक्र, विज्ञान, दैवी शक्ती यांचा संगम वास्तू, शिल्प आणि चित्रकला यांच्या सुंदर गुंफणीतून मंदिरांच्या रूपात विकसित झाला. जगाच्या पाठीवर एकमेव अशी संस्कृती आहे जी अखंडित मंदिरे निसर्ग आणि शेती यांच्याभोवती फुलत राहिली. या तीन गोष्टी माणसाला शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक पातळीवर उन्नत करायला कारण ठरल्या. मंदिरे म्हणजे नेमके काय? तर आयुष्याच्या सर्वांगाला स्पर्श करून सर्वाठायी परमात्मा दर्शवून मनोरंजनातून प्रबोधन करणारी मंदिरे. मंदिर हे कला, समाज, उत्सव, वैराग्य, काम, मोक्ष, ऐश्वर्य, करुणा, दानशूरता, निष्ठा, सातत्य, निसर्ग अनुरूप स्थापत्य या सर्वांचा संगम आहे. हि दगडांच्या रूपातील जणू पुस्तकेच. सर्व मानवजातीला समजणारी चित्र रूपातील भाषा हे समाजास मनोरंजनातून प्रबोधन करण्याचे माध्यम बनली. जसे प्रत्येकजण सारखा नसतो. तसेच अध्यात्मिक मार्गावर देखील सर्वजण एकाच स्थानी असत नाहीत. त्यामुळे कोणाला ध्यान, यात्रा, कर्म, संगीत किंवा कला माध्यमातून आयुष्य व्यतीत करता करता धर्माचरण करता येते. ना त्यामुळे कोणी श्रेष्ठ होते ना कनिष्ठ. कारण प्रत्येकाची एक जागा आणि उपयोग समाज आणि निसर्गात असतेच.

निराकार वैश्विक शक्तीचा अनुभव जो ऋषीमुनींना ध्यानाद्वारे झाला त्याला साकार स्वरूपात कलाकारांच्या मदतीने दगडांच्या रूपात उतरविला गेला. जर कोणी म्हणत असेल देव सर्वत्र आहे तर मग तो सुंदर अशा दगडी मूर्तीत तर नक्कीच आहे. जर कोणी म्हणत असेल हे विश्व् म्हणजे फक्त आणि फक्त ऊर्जा आणि तिच्या लहरी आहेत तर मग त्या लहरी तुम्हा आम्हा सर्वांत आणि मूर्तीत देखील निश्चितच आहेत. मंत्रोच्चारात मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करताना ध्वनी लहरींचा देखील यात सहभाग नक्कीच असेल. भगवंत सर्वाठायी आहे तसाच तो निसर्गात आणि दगडात देखील असणार. फक्त सामान्य जण आपली भावना मूर्तीवर प्रक्षेपित करतात तर संत सज्जन विश्वाप्रती. देवत्वाची कल्पना आपले जाणिवेचे क्षितीज जितके विस्तारू तितके विशाल आहे. सुदैवाने श्रध्येपायी कोणालाही हीं कमी लेखण्याची परंपरा आपल्याकडे नव्हती. त्यामुळेच आपण हनुमान, गणपती, नागदेवता, नंदी यांच्यात देखील देवाचे अस्तित्व अतिशय नैसर्गिकपणे पाहतो. तसेच शिव, विष्णू , भैरव, शक्ती, वीरभद्र, म्हसोबा, ब्रह्म यांना देखील पुजतो. प्राणी, झाडे, दगड, मानव आणि नैसर्गिक शक्ती या सर्वांना आपण पूजनीय स्थान दिले आहे. मार्ग अनेक असले तरीही सत्य नेहमी पूर्ण आणि एकच असते. हेच तर पूर्वजांना सांगायचे नसेल ना? त्यामुळे ज्याला ती शक्तीची अनुभूती झाली तशी त्याने निर्मिती केली. आणि यातूनच भारतात उभी राहिली मंदिरे.

मंदिरांचे वैविध्य
साधारणतः भारतीय मंदिरे तीन शैलीत निर्माण केली गेली. उत्तरेकडील नागर, दक्षिणेकडील द्रविड आणि त्या दोन्हींचा संगम असलेली वेसरा. उत्तरेकडे शिखरांच्या निर्मितीने आपले लक्ष वेधले जाते तर दक्षिणेकडील उत्तुंग गोपुरं आणि मंदिरांचा असलेला पसारा. दोन्हीकडे शिल्पांवर बारकाईने काम केलेले आहे. नीट लक्ष देऊन पहिले तर मंदिरांची आकृती, शिल्पे आणि नक्षी काम हे निसर्गाचेच अनुकरण केल्याचे दिसते. त्यांच्यातील लय हि तुम्ही शिल्पांच्या भावमुद्रा, नृत्य आणि कृतीत पाहू शकता. अतिशय बारकाईने भौमितिक आकृत्या काढून एकामध्ये एक दगड गुंफून हि मंदिरे उभी राहिली आणि आजतागायत टिकून आहेत. भारतभर जसा निसर्ग वैविध्याने नटलेला आहे त्याचेच प्रतिबिंब मंदिरात वापरल्या गेलेल्या दगडात आणि लाकडात दिसते. शुभ्र संगमरवर, लालसर सँडस्टोन, काळाशार बेसाल्ट, ग्रॅनाईट इत्यादी या सर्वांवर तितक्याच ताकदीने आणि नजाकतीने शिल्पे जिवंत केली गेली. निश्चितच हे कार्य करणाऱ्या शिल्पयोगी आणि त्यांच्या शिल्प शाळा हजारोंच्या संख्येने असतील यात काही संशय नाही. असेच एक विद्यापीठ कर्नाटकात पट्टडक्कल येथे होते. जेथे उत्तर आणि दक्षिणेचे दोन्ही प्रकार शिकायला मिळायचे. हंपीला तर म्हणतात हजारोंच्या संख्येने कारागीर होते. हंपी (विजयनगरला) भेट दिल्यावर तुमच्या ते लक्षात येईलच. पल्लव, सातवाहन, चंदेल, राष्ट्रकूट, चोला, मौर्य, गुप्त, कर्कोटक, हर्षवर्धन, मराठे आणि इतर अनेक राजवंशांनी पाठबळ दिल्याने हि स्वर्गीय मंदिरे झाली.

आपल्याला त्यांच्या निर्मात्याविषयी माहित नाही. फक्त एक विचार करा लिओनार्दो द विंची, मायकल अँजेलो हि मंडळी अलीकडच्या काळातली. त्यांच्या कडे लिखित इतिहास असल्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचली. प्रत्येक गावात एक तरी पुरातन मंदिर असणारच. म्हणजे या भारतभूमीत आजवर करोडो कलाकार होऊन गेले असतील. कल्पना करा जर आपल्याकडे इतिहास लिहिला असतात तर हजारो महान कलाकारांच्या सुरस गोष्टी, त्यांचा प्रवास, निष्ठा, अडचणी, काम करण्याच्या पद्धती आपणाला मिळाल्या असत्या. पुरातन काळातील सर्व पूजास्थळे जेथे जेथे उभारली ती गुलामांच्या शोषणावर. भारतात मात्र विकेंद्रीकरणामुळे गावागावात मंदिरे उभी राहिली. कलाकारांना मानाचे स्थान तेव्हाही होते आणि आजही आपल्याला दिसेल. कागदावर लिहिण्यास आपण कदाचित नालंदा आणि तक्षशिला जाळल्यानंतर कमी पडलो. तरीही दगडांनी आपले काम चोख पार पडले. जेव्हा लोक रोमला कलोसियम पाहायला जातात तेव्हा तेथे मारलेल्या गुलामांच्या स्मृती कधी जाग्या होतात का? पॅरिसमधील लोखंडाच्या टॉवरला रोमँटिक म्हणून पाहणाऱ्या जोडप्याला स्वतःच्या राणीच्या स्वप्नासाठी कळसापासून मंदिराची सुरवात करणाऱ्या एकमेवद्वितीय वेरूळचे कैलास मंदिर तयार करणारा राजा आठवतो का? एका जोडप्याचे प्रेम ही जगासाठी वास्तुशात्रातील अनमोल ठेवा बनली आहे. लुव्र, व्हीकटोरीया आणि अल्बर्ट म्युझियम, सिस्टाईन चॅपल जे पाहायला जातात त्यांनी कधी विस्तीर्ण हंपी (विजयनगर), खजुराहो, कांचीपुरं, मदुराई, आणि तंजावर येथील मंदिरे पहिली आहेत का? आजही परदेशातील संग्रहालयातील एखादी भारतीय मूर्तीची किंमत करोडो रुपये असू शकते मग देशभर पसरलेला हा ठेवा किती अनमोल असेल?

कला ही तुलनात्मक पद्धतीने शक्यतो पाहू नये. प्रत्येकाचा बाज आणि परिस्थिती निराळ्या असतात. पण आपण दुर्दैवाने मार्केटिंगला भुललो. ना आपल्या शिक्षकांनी व पालकांनी कला विषयक कधी दृष्टिकोन दिला ना भटकण्यास प्रवृत्त केले. अपवाद सर्वत्र असतात. परंतु वारंवार होणाऱ्या जाहिरातींच्या भडिमारामुळे परदेशी पर्यटन आणि भारतात फिरलो तर ताज महाल पलीकडे आपली मजल कधी गेलीच नाही. जगात काही गोष्टी फक्त त्या विशिष्ट भागातच विकसित होतात आणि त्यामुळेच त्यांचे महत्व असते. याची जाणीव पश्चिमात्य संशोधकांना मात्र पूर्वीपासून होती.

आपण कला म्हणून मंदिरांकडे केव्हा पाहू शकतो? स्वतःच्या नजरेतून विश्वाकडे उत्सुकतेने पाहिल्यास आपल्याला त्या मंदिरांच्या दगडी शिल्पांवर काम केलेली माणसे दिसतील. त्यांची, शारीरिक क्षमता, एकाग्रता, कलाविषयक प्रगल्भता दिसेल. वेगवेगळ्या भागातील कलाविषयक जाणीव आणि त्यांचे मिश्रण दिसेल. गाव तिथे मंदिर असलेल्या या देशात गेल्या ३ हजार वर्षात निश्चितच लाखो कलाकार होऊन गेले असतील हे नक्कीच. कुणी वास्तुशास्त्रातील तज्ञ, कोणी शिल्पकार, कोणी चित्रकार, एखादा भूगर्भ शात्राचे ज्ञान असणारा, कोणी दगड फोडणारे, तर कोणी गिलावा करणारे, कोणी नक्षीकाम करणारे, कोणी दगड वाहून आणणारे कितीतरी लोक आणि या सर्वांना जगविणारे शेतकरी, व्यापारी, राजे या सर्वांचा हातभार या देशाच्या संस्कृतीला लागलाय. मग वाटते आपले योगदान कला आणि इतिहासाच्या क्षेत्रात काय असणार?

आज कुठले मंदिर अभिमान बाळगण्यासारखे बांधले गेले किंवा निदान सांभाळे गेले? पुढची पिढी प्लास्टिकचे डोंगर, रासायनिक रंगातील चित्रे, कचऱ्यातील कलाकृती पाहणार? त्याची किंमत १००० वर्षाने जशी पुरातन शिल्पे आणि मंदिरांची असेल तितकी असेल का?

मंदिरे आणि प्रवासी
मंदिरांसोबत देव धर्म आणि अध्यात्म हे जोडलेले जातातच. परंतु त्यापलीकडेही आपण मंदिरांकडे पाहू शकतो का ?जगभरातील प्रवासी भारतात जेव्हा येतात तेव्हा त्यांचा उद्देश नेमका काय असेल? एखादा ग्रीक, रोमन, चिनी, रशियन, इराणी (पर्शियन) जेव्हा भारतात आले असतील ते का? पुरातन काळापासून या भूमीत प्रवाशी, व्यापारी, सैनिक आणि विद्यार्थी यांचा प्रवास या भूमीत होऊन त्यांनी येथील मंदिरे, विहार, मठ पाहून काय शिकले असतील?

समजा तुम्ही एखादे मंदिर पाहायला गेलात तर तेथे नेमके काय काय पाहतात? मंदिराबाहेरच्या तलावात फुललेली कमळे, उत्तुंग प्रवेशद्वार आणि त्यावरची शिल्पे, आत प्रवेश करताना दिसणारी फुले, प्रसाद, मिठाई, पुस्तके विकणारी दुकाने. मग पुढे मंदिर परिसरातील मोठे मैदान त्यात लावलेली चाफ्याची झाडे, वड किंवा पिंपळाची झाडे, भाविकांची प्रदक्षिणेसाठी लगबग, सभामंडपातील बारकाईने केलेली कलाकुसर, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, युद्ध, सांस्कृतिक जीवन, प्राणी आणि पक्षी, देव, यक्ष, राक्षस, आणि विविध प्राणी यांची शिल्पे सर्वत्र दिसतात. हे पाहत आपला बराच वेळ जातो. मग दिसते ती गर्भागारातीतलं शांतात आणि अंधारात तेवणारी पणत्यांची रंग. घंटेचा नाद मधुर आवाज. आत सर्व काही निवलेले आणि कलाकुसर संपून गर्भागारात असते ते शिवलिंग. बाहेरून आत येत येत आपण कांन, नाक, डोळे, जीभ, त्वचा आणि शेवटी मनामध्ये वेगवेगळे अनुभव घेतो. यालाच आजच्या भाषेत क्युरेशन म्हणतात. कुठल्याही उत्सवासाठी, कला दालनासाठी सर्व ज्ञानेद्रीयांना लागणारे अनुभव प्रेक्षकांना देणे. शेवटी आपल्याला प्रदान करतो शांतात, उत्साह व निसर्गाविषयी आणि समाजाविषयी आदर.

शिल्प, चित्र, सेक्रेड जिओमेट्री (भूमिती), गणित, भूगर्भशास्त्र, ध्वनीचा अभ्यास यांचा मंदिरांशी संबंध आहे का? की आपण त्या नजरेने त्यांच्याकडे तसे पाहत नाही. अतिशय बारकाईने केलेले काम, सुबक आणि अचूक तासलेले खांब लेथ मशिन्स शिवाय कसे बनविले असतील? कि त्यांच्याकडे दुसरे कुठले प्रगत तंत्रज्ञान असेल? ठराविक दिवशी सूर्यकिरण किंवा चंद्रप्रकाश नेमका विशिष्ट्य ठिकाणी कसा काय येतो? खगोल शास्त्रात नक्कीच ही लोक खुप पुढे असणार. केदारनाथापासून ते रामेश्वरमपर्यंत पाच शिव मंदिरे एका रेखांशात कशी काय बनविली? कार्टोग्राफी (नकाशा तयार करण्याचे तंत्र) त्यांना निश्चित येत असणार. एखाद दुसरे मंदिर एकाच रेखांशात येणे कदाचित असू शकते पण पाचही मंदिरे कशी काय शक्य आहे? शिव मंदिर मग ते वाळवंट का असेना त्याचा गाभारा सर्व ऋतूत थंड असतो आणि पाण्याचा पुरवठा त्याला वर्षभर कसा काय असतो?

एकाच वेळी हत्ती, गायी, कुत्रे, माकडे, टोपलीत नाग घेऊन फिरणारे गारुडी, अस्वलवाले मदारी, बैलगाडी, नृत्य आणि संगीत कार्यक्रम ही सर्व मंदिर परिसरात पाहणे म्हणजे एक सुखद सांस्कृतिक धक्का असेल. कदाचित आपल्याला याची सवय झाल्यामुळे हे प्रश्न पडत नसतील पण त्यांना मात्र नक्कीच पडले असणार. अशा गोष्टीत एकाच जागी क्वचितच एकत्र दिसतात विशेषतः जेथे लोकांना सर्व काही सुटसुटीत आणि व्यवस्थित राहण्याची सवय असते. वरवर आपण विरोधाभास जगतो पण अंतरंगात संस्कृतीमुळे एकजुटता नक्कीच आहे.

मंदिरे आणि आपण
मंदिर हे फक्त देवाची आंधळेपणाने केलेली पूजा नसून निसर्ग तत्वे, सौंदर्य, संगीत यांचा संमिश्रित उत्सव आहे.

सकाळी लवकर उठून, सुविचार म्हणून, नदी किंवा तलावात स्नान करून देवाला फुल वाहताना ते त्याला देण्यापेक्षा आपल्यालाच खुप काही देऊन जाते. ना तो काही मागतो ना त्या निसर्गाला त्याची गरज असते. त्यातून आपल्याला मिळते ते प्रसन्न मानसिकता, मंत्र उच्चारामुळे, फुलांच्या सुगंधामुळे शारीरिक उत्साह, गर्भागारातील शांतता आणि संगीतामुळे मनाची एक लयबद्धता जी दिवसाला सामोरे जाण्यास आपल्याला सज्ज करते. यातील कोणतीही एक गोष्ट काढून वेगळी करून तिला आपण मंदिर म्हणू शकत नाही. गर्भागारातील निरव शांतता आणि सभामंडपातील सोहोळे या दोन्हींच्या अस्तित्वात पावित्र्य पाहणे. साकार आणि निराकार यांचा एकत्रित अनुभव म्हणजेच मंदिर.

हा लेख वाचणार्यापैकी जे गावाकडे राहणारे असतील त्यांच्या लहानपणीच्या गावाबाहेरील किंवा मध्यवर्ती वस्तीतील एखाद्या निवांत मंदिराचा नक्कीच असेल. आई वडिलांचा मार चुकविण्यासाठी कुठे जायचे तर मंदिरात, मित्रांसोबत शाळा बुडवून वडाच्या झाडाखाली किंवा नदीकडच्या मंदिराकडे. तेथेच सूर पारंब्या, लपाछपी, अभ्यास, झाडाखाली मस्त झोप, पुजाऱ्याने दिलेला शिरा किंवा लापशीचा प्रसाद, कितीतरी आठवणी असतील. गाव सोडला तसे त्या मंदिराकडे परत जाणे जरी होत नसले तरी आजही नवीन पिढीला तेच आसरा देत असणार.

ज्या काळात, वेडिंग हॉल्स, मॉल्स, थिएटर्स नव्हती त्या काळात विवाह समारंभ आणि उत्सव या सर्वांसाठीची एकमेव जागा खेड्यापाड्यांपासून ते शहरांपर्यंत निभावत होती. त्यांच्या आजूबाजूला बाजारपेठ आणि वस्त्या देखील फुलायचा आणि अशा मंदिरांचे जाळे खंडप्राय देशभर काबुल ते बाली (इंडोनेशिया), नारानाग (काश्मीर), नेपाळ, तिबेट आणि खाली श्रीलंकेपर्यंत होते. राजे आणि राज्ये अनेक होती परंतु संस्कृती मात्र एकच. मग कोणी चारधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, शक्तीच्या मंदिरांच्या यात्रा, ज्योतिर्लिंग दर्शन ते काशी यात्रा, पंढरपूरची वारी, कुंभ मेळा, शबरीमाला यात्रा हे सर्व करायचे. यातून शिकण्याजोगी गोष्ट एक कि हे सर्व करताना समाज आपोआप जोडला गेला आणि सोबत देशदेखील. त्याला कोणी ट्रेक, माऊंटेनिअरिंग, अल्ट्रा मॅरेथॉन अशी नावे त्याकाळात देण्या ऐवजी यात्रा, जत्रा, वारी, परिक्रमा असे दिले. शारीरिक कष्ट तेच पण भाव मात्र भक्तीचा आणि एकमेकांना सहकार्याचा. आजही तो अनुभव तसाच येतो. आयुष्यातील अडचणी स्वतः सोडवायचा प्रयत्न करता करता सत्संग करून विरक्तीने संसारकडे पाहायचे हे ज्ञान मंदिरांत होणाऱ्या कीर्तनकारांनी दिले. वार्षिक हरिनाम सप्ताह म्हणजे उत्सव आणि एक प्रकारचे मानसिक समुपदेशनच. जोडीला होते संगीत आणि सर्वत्र भरून उरलेला कलेचा माहोल. ज्याला इंग्रजीत होलिस्टिक एक्सपीरिअन्स म्हणतात. वार्षिक उत्सवात लहान मुलांची चंगळ असते तर मोठी लोक, पाहुणे एकमेकांना भेटतात, नवीन गोष्टी, खाद्य पदार्थ खरेदी, संगीत किंवा नृत्याचे कार्यक्रम यातून समाजाच्या अर्थ व्यवस्थेस मन्दिर केंद्रस्थानी असल्याने चालना मिळते. या सर्व गोष्टी हळूहळू समाजात रूढ झाल्या जसे मानव गुहेतून बाहेर आला तसेच मंदिरे देखील तेथूनच सुरु होऊन प्रचंड मोठया प्रमाणात पसरले. मानवी प्रतिभेचे, धार्मिकतेचे, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि देशाची ओळख बनले.

मंदिर सर्वांसाठी
मंदिरे खरंच सर्वसमावेशक आहेत का? हे जर पाहायचे असेल तर मंदिर बाहेर फुले विकणारी आज्जी, नारळ विकणारा, सफाई कामगार, मिठाईवाले, पूजा अर्चा करणारे, येणारे भाविक, त्या मंडपात संगीत आणि नृत्य कार्यक्रम करणारे हे सर्व पाहिल्यावर वाटते कि देशाच्या अर्थव्यवस्थेत मंदिराचा एक चांगल्या प्रकारे हातभार लागतो. कुठल्याही प्रकारचे महागडे तिकीट न विकत सर्व प्रकारच्या सामाजिक स्थरातील शिक्षित, अशिक्षित, गरीब आणि श्रीमंत मंदिरांना भेटी देतात. आपल्यासोबत छानसा ठेवा घेऊन जातात.

मंदिरे फक्त उत्सवासाठी नाही तर शिक्षणासाठीही प्रसिद्ध होती आणि आहेत. आयुर्वेद, गोसेवा, शिक्षण आणि संस्कृती संवर्धनाची कामे मंदिरांनी आजतागायत अव्याहत चालू ठेवली आहेत. याही पलीकडे दूर जंगलातील किल्ल्यांवर, दऱ्या खोऱ्यात शिव आणि भैरवाची मंदिरे येणाऱ्या ट्रेकर्स, यात्रेकरू यांना आश्रय देतात. तर अन्नपूर्णेश्वरी, धर्मस्थळ, बालाजी, शिर्डी, गजानन महाराज यांची अनेक मोठी मंदिरे अविरत अन्नदान, हॉस्पिटल्स, धर्मशाळा ह्या सुविधा राबवितात. हे पाहिल्यावर समाजातील एकजूट सरकार सोडून देखील वेगळ्या स्थरावर दिसते. व्यावसायिक दृष्टी हि आजची त्यामुळे आजची मंदिरे बहुतांशी व्यावसायिक झालीयेत. परंतु देशाचा वारसा हा सर्व जाती धर्माच्या लोकांचा आहे. आज ज्या कुठल्या जाती धर्मात तुम्ही असाल परंतु तुमचे पूर्वर्ज हे हिंदू, जैन आणि बुद्धच असतील आणि मंदिरे हे सर्व जाती धर्मातील लोकांनी देणगी देऊन, कर देऊन, स्वतः च्या हाताने कलाकार किंवा श्रमिक बनून तयार केली आहेत. त्यामुळे जेव्हा आपण मंदिरांकडे पाठ फिरवितो तेव्हा आपण आपल्या पूर्वजांच्या कष्टाकडे पाठ फिरवितो. हा तुमचाही ठेवा नक्कीच आहे. आपण नशीबवान आहोत कि भारतात आपला जन्म झाला. मंदिरे ही राजांनी जरी बांधली तरी आजही मंदिरे देवामुळे ओळखली जातात ना कि राजामुळे किंवा शिल्पकारामुळे. यातून त्यांचे महत्व कमी होत नाही. पण त्यांचा समाजाप्रती उदार दृष्टिकोन दिसतो.

आमच्या भटकंतीत आम्ही वर्तमानपत्रे, शालेय पुस्तके यांच्याही पलीकडे असणारे भव्य आणि सुंदर मंदिरे, शिल्पे, चित्रे, भित्तिचित्रे पहिली. भारत हा किती सुंदर आहे हे पाहण्यासाठी भटकणे मात्र जरुरी आहेच. आपण देवाला मानव स्वरूपात व्यक्त करीत नाही तर मानवातील देवत्व साकार करतो. आपण कठोर पाषाणातून देवाचे अस्तित्व पाहतो. त्याला वाहणाऱ्या फुलातही पाहतो, त्याच्यावर अभिषेक करणाऱ्या पाण्यात, तेलात , तुपात आणि दुध आणि दह्यातही आणि तेवढेच बाहेर भिक्षा मागणाऱ्या याचकातही पाहतो. आपण फक्त पिंडीवर अभिषेक करीत नाही तर वर्षानुवर्षे देवस्थानांची अन्नदानाची परंपरा आहे. गरीब श्रीमंत, यात्रेकरू, भिकारी इतकेच काय तर कुत्री, मांजरे, गाय, बैल, माकडे सर्व अन्न ग्रहण करून तृप्त होतात. अन्नपूर्णेच्या मंदिरात जेव्हा ब्राम्हण वाढपी तुमच्यासमोर येतो तेव्हा तो तुमची जात विचारीत नाही. ना की विठोबाच्या वारीत, पंच केदार यात्रेत नाही किंवा भैरवाच्या मंदिरात देखील नाही. गरज आहे ती खुलेपणाने फिरण्याची, अनुभवाला भिडण्याची, वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियाच्या भडकावू पोस्टच्या बाहेर पाहण्याची. भारत हा आजही तितकाच एकरूप आहे जितका तो पूर्वी होता. त्यामुळे भारत समजून घ्यावयाचा असेल तर त्याची नाडी सापडावी लागेल आणि ती सापडेल गावोगावच्या मंदिरांमध्ये.


योगेश कर्डिले | Yogesh Kardile
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
व्यवसायाने छायाचित्रकार असलेले योगेश कर्डिले निसर्गावर असलेल्या प्रेमापोटी सातत्याने भारत भ्रमंती करत असतात.

५ टिप्पण्या

 1. मंदिरांबद्दल पुन्हा नव्याने विचार करायला भाग पाडणारा लेख...
  पुढील लेख लवकर प्रकाशित करावा.

  जर्मनीहून खुप सारे प्रेम.
 2. योगेश मित्रा,
  लिखानाचा गाभा आवडला रे.

  मराठीमाती डॉट कॉम ने लेखाची केलेली मांडणी स्तुत्य आहे.

  लवकरच भारतात येऊन जमेल तेवढ्या मंदिरांना भेट द्यायची ईच्छा जागी झाली आहे.

  पुढच्या लेखाची आतुरतेन वाट पाहत आहोत.
 3. आज सोशल मिडियाच्या जमान्यात किड्यामुंग्यांसारख्या उभ्या राहणाऱ्या मराठी भाषेतील वेबसाईट्स निव्वळ पांचट साहित्य प्रकाशनाच्या चढाओढीत दर्जा हरवून बसल्या आहेत...
  मराठीमाती तुम्ही याला अपवाद आहात, तुम्ही दर्जा राखलाय...
  सलाम!
  तुमचं फेसबुक वरचं पान फॉलो करतेय.
 4. Nice article
 5. Vishay changla nivadla aahe tumhi.
  Tumche pudhache lekh vachayala aavdatil.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.