प्राचीन बांधकामे - महाराष्ट्र

प्राचीन बांधकामे, महाराष्ट्र - [Prachin Bandhkame, Maharashtra] यादव सम्राटांच्या काळात हेमाडपंती बांधणीच मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला.

यादव सम्राटांच्या काळात हेमाडपंती बांधणीच मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला

चुन्याचा दर्जा भरल्याशिवाय बांधलेल्या देवळांना सर्वसाधारणपणे हेमाडपंती म्हटले जाते. अशी देवळे महाराष्ट्रात यादव काळाच्या (इ. स. ११८४-१३१०) अगोदर क्वचितच आढळतात, असे मत हेन्‍री कझिनस यांनी दक्खनच्या बांधीव स्थापत्याच्या त्यांच्या अभ्यासाच्या संदर्भात जवळजवळ शाक-अर्धशतक अगोदर नमूद केले आहे. अशा हेमाडपंती देवळाबद्दल ते पुढे असे म्हणतात,"ही प्राचीन देवालये आता, अगदी निरपवादपणे खिळखिळी झाली असून जवळजवळ ढासळलेल्या अवस्थेत आहेत. ह्याला मुख्यत्वे बांधकामासाठी वापरलेला, अ‍ॅमिग्डलॉयडल/अमिग्डालाइडल (amygdaloidal) प्रकाराचा, दगडच कारणीभूत आहे. बऱ्याच वेळा हा दगड दुसऱ्या कुठल्या जागेहून आणण्याऐवजी बांधकामाच्या जागीच खाणीतून काढला जाई. हा दगड कठिण आणि मजबूत असला तरी तो काही वेळा सदोष व भेगाळलेला असल्याने तुळई म्हणून अयोग्य ठरतो. प्राचीन हेमाडपंती देवालये पटईच्या छताची असल्याने त्यात तुळ्यांचा मोठा प्रमाणावर वापर होता. या तुळ्यावर प्रचंड बोजा असल्याने त्यांना साहजिकच तडा जात असे."

[next] यादव सम्राटांच्या काळात हेमाडपंती बांधणीच मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. त्या अगोदर दक्खनमध्ये बदामीचे चालुक्य आणि उत्तरेत प्रतिहार यांनी अशा बांधणीची देवळे उभारली; आणि आपली स्वतःची अशी प्रादेशिक शैली निर्माण केली. वेरूळाच्या राष्ट्रकूटांनी (इ.स. ७५३-७६६ च्या सुमारास) मात्र अशी देवळे न बांधता गुंफा कोरण्यावरच भर दिला. ह्या आवडीचीच परिणती संपूर्ण देऊळच कळसापासून पायापर्यन्त डोंगरातून कोरण्यात आली. राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम (इ.स. ७५७-७७२) याने घडविलेले कैलास लेणे हे एक अद्‌भुतच आहे. हे देऊळ महणजे स्थापत्यशास्त्राचा एक नमुनाच नव्हे, तर एक प्रचंड शिल्पच आहे!

देऊळ बांधण्याऐवजी गुंफा कोरण्याची ही पद्धत हजार वर्षाइतक्या प्राचीन परंपरेचे उल्लंघन न करण्याच्या भीतीमुळे टिकून राहिली असे नव्हे, तर वर उल्लेखिल्याप्रमाणे त्या पाठीमागे काही व्यावहारिक कारणेही होती. चौकटीच्या दाराच्या आणि पटईच्या छताच्या स्थापत्यात वर उल्लेखिल्याप्रमाणे दक्खनचा दगड तुळई म्हणून टिकाव धरणे कठिण होते. चुन्याचा अथवा मातीचा दर्जा दगडी भिंतीत न भरता देवळे उभारण्याची पद्धत उत्तर भारतात गुप्तकाळात रुढ झाली. पण यादव काळापर्यन्त या तंत्राने महाराष्ट्रात मूळ धरले नाही. यादवांच्याच काळात घडीव दगडांची देवळे उभारण्याचे तंत्र कसे किंवा का आले हे आज तरी सांगता येणे कठिण आहे; पण यादव सम्राटांनी, विशेषतः त्यांचा प्रधान अमात्य हेमाडि, उर्फ हेमाडपंत, याने या स्थापत्यप्रकाराला प्रोत्साहन दिले; आणि लोकानुश्रुतीप्रमाणे त्यामुळेच या स्थापत्यतंत्राला हेमाडपंती असे नाव पडले. हा वाक्‌प्रचार आता इतका रूढ झाला आहे की हेमाडपंताच्या नंतरच्याच नव्हे तर पूर्वीच्या देवळांचे वर्णन करतानासुद्धा हेमाडपंती या शब्दात केले जाते. मराठाकालात महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारचे स्थापत्य तंत्र प्रचलित झाले. मंदिराचा छतापर्यन्तचा भाग दगडाचा व शिखर विटांचे, दर्जासाठी व गिलाव्यसाठी तसेच नक्षीसाठी चुन्याचा भरपूर वापर करण्यात येऊ लागला. यापेक्षा प्राचीन देवळे वेगळी असल्याने त्यांना सरसकट हेमाडपंती असे नाव देण्यात आले असावे.

[next]

रामटेक येथील यादवपूर्व मंदिरे


यादव सम्राटांनी घडीव देवळाच्या स्थापत्याला चालना दिली आणि त्याचा प्रसारही केला. पण त्यामुळे गुंफा कोरण्याची प्रथा लोप पावली नाही, ती यादवोत्तर काळातही प्रचलित असल्याचे दिसते. एक दशकाअगोदरपर्यन्त सर्वात प्राचीन हेमाडपंती देऊळ अंबरनाथचे शिवालय समजले जाई. ठाण्याचा शिलाहार राजा मुम्मुणिराज याने देवळाची डागडुजी केल्याचा इ.स. १०६० च्या शिलालेखात उल्लेख आला होता. म्हणजे त्या अगोदर वीस-पंचवीस वर्षे तरी शिवालय बांधले गेले असावे. याचा अर्थ घडीव देवळाची महाराष्ट्रातील प्राचीनता ११व्या शतकाच्या अगोदर जात नाही. पण गेल्या दशकात प्रस्तुत लेखकाने केलेल्या संशोधनामुळे घडीव स्थापत्याची महाराष्ट्रातील प्राचीनता बरीच मागे गेली आहे. (प्राचीन महाराष्ट्र या संज्ञेमध्ये अर्थातच कुंतल, विदर्भ आणि अश्मक म्हणजेच दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांचा अंतर्भाव आहे). त्यांच्या प्राचीनतेमुळेच नव्हे तर शैलीच्या दृष्टीनेही हे देवालये महत्त्वाची आहेत. भारतीय कलेतिहासात अभिजात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुप्तकलेची केंद्रे उत्तर भारतात गुप्त सम्राटांच्या आणि त्यांच्या मांडलिकांच्या आश्रयाने उदयाला आली. दक्खनमधील अजिंठा येथील स्थापत्य-शिल्पकला याच अभिजात परंपरेचा काहीसा वैशिष्टयपूर्ण असा फरक समजला जातो. यामधील दुवा म्हणून रामटेक येथील देवळांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यातही विशेष उल्लेखनीय बाब आहे ती अशी की अजिंठा येथील सातवाहन काळातील १-२ गुंफा सोडता वाकाटककातील गुंफ मुख्यत्वे हरिषेण या त्या वंशातील शेवटच्या ज्ञात राजाच्या कार्यकाळात, म्हणजे इसवी सन ४६५-४८५ या काळात, कोरल्या गेल्या, रामटेक येथील घडीव मंदिरे त्याहून अगोदरच्या काळातील (इ.स. सुमारे ४१५-४५०) आहेत. वेगळ्या शब्दात सांगायचे तर मंदिर स्थापत्याच्या इतिहासाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील तथाकथित हेमाडपंती देवळांची प्राचीनता जवळजवळ सहा शतकांनी मागे रेटता येते. रामटेक येथील वाकाटककातील मंदिरे व अंबरनाथ येथील शिलाहारकालीन देवालयाच्या काळामधला कालखंड या शैलीच्या दृष्टीने जवळजवळ रिकामाच राहतो ही मात्र एक आश्चर्याचीच बाब आहे.

[next] रामटेक येथे सुमारे पन्नास वर्षाच्या कालखंडात बांधलेल्या वाकाटककालीन ह्या देवळांना आणखी एक महत्त्व असे आहे की समकालीन गुप्त स्थापत्यापेक्षा काहीसा वेगळेपणा येथे जाणवतो. वाकाटकांच्या ज्येष्ठशाखेची राजधानी नगरधन (प्राचीन नंदिवर्धन) येथून अगदी जवळच आहे. मंदिराचे आगळेपण राजाश्रयामुळे आले असावे हे उघडच आहे. येथील वाकाटककालीन स्थपतींचे वैशिष्टय असेकी एकाच विन्यासावर सर्व देवळे न उभारता प्रत्येक वेळी काही वेगळा प्रयत्न येथील सातही प्राचीन मंदिरात आढळतो.

वराहमंडप हा येथील मंदिराचा सर्वात साधा प्रकार. त्रिविक्रम मंदिर हे त्यापेक्षा एका पायरीने पुढे आहे. गर्भगृहाला पुढे अर्ध्या भिंतीचा मंडप जोडला आहे. वराह मंडपाच्या साध्या भिंतीच्या तुलनेने ह्या अलंकृत, अर्ध्या भिंती त्यावरील वेदिका व गणांच्या आकृतीमुळे अधिक शोभिवंत वाटतात. केवल आणि रूद्र-नरसिंहाच्या मंदिरात यापेक्षा विकसित विन्यास आढळतो. नंतरच्या स्थापत्यशास्त्रातील परिभाषेत बोलावयाचे म्हणजे वराह व त्रिविक्रम हे मंडप निरंधार आहेत तर ही साधार देवालये आहेत. त्यामुळे मंडप व गर्भगृहाच्या भोवती पूर्ण भिंती असून गाभाऱ्याच्या भोवती प्रदक्षिणा घालता येते. मंडपाच्या व गर्भगृहाच्या भिंतीवर दर्शनी बाजूला वेदिकेचे अलंकरण आहे; पण त्यात यक्षाकृती नाहीत. त्याना दर्शनी दरवाज्याच्या खांबावर जागा मिळाली आहे. रुद्र-नरसिंहाचे देऊळसुद्धा दोन मंडपाभोवतीच बांधले असले तरी त्यात थोडा वेगळेपण आहेच. या रुद्र-नरसिंहाच्या देवळापेक्षा भोगरामाचे देऊळ आणखी वेगळे आहे. त्यात लहानसा बोळ मध्ये ठेवून दोन गर्भगृहे शेजारी बांधली आहेत. त्यांना समोर एक सामयिक अंतराल असून, समोर उघडा मंडप आहे.

[next] अलंकरणासाठी वापरलेली प्रयोजने (motifs)तसेच स्थापत्यातील फरकावरूनही ह्या गुप्त-वाकाटक-शैलीच्या व त्या काळातील वास्तू आहेत यात शंका नाही. वाकाटक सम्राट्‌ रुद्रसेन द्वितीय (इ.स. ३९५-४००) याची पत्नी सुप्रसिद्ध प्राकृतकवी सम्राट्‌ प्रवरसेन द्वितीय (इ.स. ४२५-४५०) याची माता प्रभावतीगुप्ता हिचा एकशिलालेख केवल-नरसिंह मंदिराच्या भिंतीवर आतल्या बाजूस सापडला असून ही देवळे वाकाटक-काळात इ.स. ४०० ते ४५० च्या उभारली गेली याविषयी शंका राहत नाही. विन्यासदृष्ट्या या मंदिरसमूहाच्या विकासाचा आलेख गुप्त साम्राज्यात इतरत्र आढळत नाही आणि त्यामुळे या देवळाना गुप्त-वाकाटक-शैलीच्या स्थापत्यात आगळे महत्त्व आहे. या मंदिरसमूहातील एक देऊळ हे अर्धे घडीव व आतील भाग गुंफेसारखा कोरलेला अशा प्रकारचे आहे ही लक्षणीय गोष्ट आहे. याचा अर्थ असा की या वाकाटक स्थापत्यात दक्खनच्या गुंफा-स्थापत्याचे काही अंश समाविष्ट झाले होते.

इसवी सनाच्या चौथ्या शतकात दगडांनी बांधलेल्या वास्तूंची एक शैली नव्याने आकारास येत होती. गुप्त सम्राटांच्या आश्रयामुळे तिला चालना मिळाली व समुद्रगुप्ताच्या विजिगीषू सेनेबरोबरच तिचा सर्वत्र प्रसार झाला. विंध्य व विंध्यपादाशी असलेल्या जंगलमय प्रदेशात तिला प्रतिसाद मिळाला आणि फलस्वरूप आपल्याला एरण, नचना-कुठारा व भुमरा येथील वास्तू दिसतात. गुप्त साम्राज्यातील वास्तूशी काहीशा मिळत्या जुळत्या पूर्ण स्थाप्त्यालंकरणात स्वतःची वेगळी लकब असलेल्या वास्तू वाकाटकांच्या आश्रयाने विदर्भातील स्थपतींनी उभारल्या. रामटेक शिवाय पवनार येथे त्या कलेचे अवशेष आता बघावयास मिळतात पवनार येथील भव्य देवालय आज उभे नसले तरी तेथील मुर्ती व शिल्पपट त्याच्या संपन्नतेची साक्ष देण्यास समर्थ आहेत उत्तरेकडील गुप्तस्थापत्याचे घटक व दक्खनमधील बौद्ध स्थापत्य यांचे बेमालूम मिश्रण घडवून आणण्यात रामटेक येथील स्थपती यशस्वी झालेले दिसतात. स्थानिक दक्खनी काळा फत्तर व वालुकापाषाण यांचा वापर यांनी रामटेक येथे मोठ्या चातुर्याने केलेला दिसतो. आधीच्या स्थापत्य नमुन्यांच्या व त्यातील घटकांच्या मिश्रणातून एक नवीन नमुना रामटेक येथे आकारास आलेला दिसतो. त्यात अभिप्रेत असलेल्या मिश्रणामुळे दक्खन व उत्तरेच्या स्थापत्याला जोडणारा दुवा असूनही दक्खनच्या स्थपतींच्या प्रतिभेचा एक आगळा आविष्कार आहे असे दिसते.

[next]

प्राचीन विटांची देवळे


पाषाणाने बांधलेल्या देवळांच्या स्थापत्य परंपरेला समांतर अशी विटांच्या देवळांचीही परंपरा होती. किंबहुना ती जास्त प्राचीन होती. लाकूड हे माध्यम सगळ्यात जास्त नाशवंत. परंतु सगळ्यात खरीखुरी प्राचीन परंपरा काष्ठस्थापत्याचीच असली पाहिजे. दक्खनमधील सुंदर सुंदर गुंफा कोरणाऱ्या पाथरवटाला सातवाहन काळात सेलवड्‍ढ (शैलवर्द्धकी, म्हणजे पाषाणमाध्यमात काम करणारा सुतार ) म्हणत. यावरुनही प्राचीन स्थापत्यात सुतार कामाला अग्रक्रम होता हे स्पष्ट होते. प्राचीन काळी विटांच्या स्थापत्यात काही महत्त्वाचे घटक लाकडाचे असत यावरून त्या माध्यमाचे व परंपरेचे महत्त्व लक्षात येते.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर (प्राचीन नगर) येथील त्रिविक्रमाचे मंदिर विटांच्या स्थापत्याचा महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन पुरावा असे म्हणता येईल. ही काही एकादी भव्य वास्तू नाही. या मंदिराचा २६*१२ फूट लांबरूंद आकार गजपृष्ठाकृती (apsideal) असून दोन्ही बाजूला उतरते छप्पर व समोर बौद्ध गुंफातल्याप्रमाणे चैत्य-गवाक्ष आहे. धाटणीवरूनच या मंदिराचा काळ इसवीचे पाचवे शतक इतका सामान्यतः समजला जातो. साधारणपणे याच आकाराच्या (९*५ मीटर) गजपृष्ठाकृती चैत्यालयाचे-कारण त्यात मूर्तीऐवजी स्तुपाची स्थापना केली आहे-अवशेष तेर येथील उत्खननात सापडले आहेत. त्यांचा काळ इसवीचे दुसरे शतक इतका प्राचीन ठरविण्यात आला आहे. त्रिविक्रम मंदिरात आज उत्तर-चालुक्य-शैलीतील त्रिविक्रमाची मूर्ती आहे. बाहेरील मंडपही त्याच काळातला असावा. या अगोदर हे मंदिर उत्खननात सापडलेल्या चैत्यालयाप्रमाणेच असावे असा काही विद्‌वानांचा कयास होता. उत्खन्नातील पुराव्यामुळे या कयासाला पुष्टी मिळाली एवढेच नव्हे, तर त्रिविक्रम मंदिराच्या रचनेचा काळ मानला जातो त्यापेक्षा पूर्वीचा असावा असेही म्हणण्यास जागा झाली आहे.

[next] त्रिविक्रम मंदिरापेक्षा थोड्या नंतरच्या काळातली (इ.स. सहावे शतक) विटांची मंदिरे तेरमध्येच आहेत. ती म्हणजे उत्तरेश्वर आणि कालेश्वर ही होत. त्यापैकी उत्तरेश्वराचा गाभारा चौकोनी असून त्याचे शिखर दक्षिणे पद्धतीतल्याप्रमाणे चारही बाजूने पिरॅमिडप्रमाणे निमुळते होत जाणारे आहे. कुडू (गवाक्ष) हा स्थापत्य घटक आणि शिखरावर ठिकठिकाणी आढळणारे मकराच्या आकृतीचे अलंकरण यावरूनही शिखराची दक्षिणे धाटणी लक्षात येते. पण या मंदिराचा अभ्यासाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा वाटतो तो भाग म्हणजे येथील दरवाजाची लाकडी चौकट. ही आता देवळात नाही. ती स्थानिक संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. तिच्या गणेशपट्टीवर ब्रह्मा, विष्णू आणि शिव या त्रिमूर्तीव्यतिरिक्त इतरही पौराणिक देवत सुबक रीतीने कोरण्यात आल्या आहेत. या सुंदर शिल्पाइतकीच चौकटही महत्त्वाची आहे. त्यातून प्राचीन इष्टका आणि काष्ठ या स्थापत्याच्या दोन परंपरांचे संबंध सुस्पष्ट रीतीने ध्यानात येतात. वाकाटक परंपरेतील नागरा (जिल्हा भंडारा) या गावाचे विटांचे देऊळ या कालखंडातील महत्त्वाच्या देवळांपैकी एक म्हणता येईल. देवळाचा आता चौथराच शिल्लक आहे; पण त्यावरून मंदिराच्या विन्यासाची कल्पना देऊ शकते. आज मंदिराचा वरचा भाग शिल्लक नसला तरी चौथऱ्याचे अलंकरण साधे पण आकर्षक आहे. चौथऱ्याची बाह्य रेषा आकर्षक वाटावी म्हणून त्यात तरंगां (Projection and recesses) ची योजना करण्यात आली आहे. त्या काळात मध्य प्रदेशात व आजूबाजूच्या परिसरात रूढ असलेले वेदिकेचे अलंकरण आहे. मंदिर बहुधा शिवाचे असावे. गाभाऱ्यातल्या शिवलिंगावरील अभिषेकाचे तीर्थ एका पाषाणाच्या पन्हाळीद्वारे एका भुतमुखातून बाहेर पडत असे. एरवीच्या मकरप्रणालीपेक्षा हे भूतमुख वेगळे असून त्यावरून मंदिराच्या प्राचीनतेला पुष्टी मिळते.

[next]

राष्ट्रकूटोत्तरकालीन स्थापत्य


बदामीचे चालुक्य स्वतःला त्रिमहाराष्ट्रकाचे- म्हणजे विदर्भ, अश्मक व कुंतलाचे अधिपती म्हणवून घेत असत. महाराष्ट्राचा राज्य म्हणून शिलालेखातला हा सर्वात प्राचीन उल्लेख. वाकाटक हे घडीव स्थापत्याचे महाराष्ट्रातील आद्य प्रणेते असले तरी त्याचा दक्खनमध्ये प्रसार करण्याचे श्रेय बदामीच्या चालुक्यांकडेच जाते. उत्तर कर्नाटकातील ऐहोळी, बदामी आणि पट्टदकल या ठिकाणी त्यांच्या आश्रयाने अनेक मंदिरे बांधाण्यत आली. यातील बहुसंख्य मंदिरे उत्तरेतल्या म्हणजे नागर, शैलीतली असून काही द्रविडशैलीत बांधलेली व पल्लवांच्या मंदिराशी साम्य दाखविणारी आहेत. घडीव स्थापत्याप्रमाणेच कोरीव स्थापत्याला म्हणजे गुंफांना सुद्धा चालुक्यांनी तितकेच महत्त्व दिले. ऐहोळी व वेरुळ येथे काही गुंफा त्यांच्या प्रेरणेनेच कोरल्या गेल्या . हा एक योगयोगच आहे की त्यांची बहुतांशी घडीव मंदिरे आजच्या महाराष्ट्रबाहेर, तर गुंफा महाराष्ट्रात, रणराग चालुक्याच्या काळात बांधलेले (इ.स.४८८) एक जैन मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील अळते या गावी होते. असा उल्लेख शिलालेखांतून येतो, पण आज तरी ती वास्तू दृष्टोत्पत्तीस येत नाही.

राष्ट्रकुटांच्या काळात याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली राष्ट्रकूट कृष्ण प्रथम व इतर सम्राटांच्या आश्रयाचे बऱ्याच गुंफा कोरण्यात आल्या. कृष्ण प्रथमाच्या काळात बौद्ध गुंफा कोरण्याचे काम थंडवलेले दिसते पण त्यांची जागा शैव गुंफांनी घेतलेली दिसते. कैलास लेणे अशा प्रकारच्या गुंफांचा मुकुटमणी ठरवा; पण घडीव देवळे महाराष्ट्रात अभावानेच आढळतात. महद्‌ग्राम मेहूण(आजचे जळगाव जिल्ह्यातील) या ठिकाणी उग्रदित्याचे देऊळ असल्याचा उल्लेख राष्ट्रकूट अमोघ वर्षाच्या काळातील (इ. स. ८४४) असला तरी आजपर्यन्त तरी त्या मंदिराचे अवशेष सापडलेले नाहीत.

[next] राष्ट्रकूटांनंतर महाराष्ट्रात राज्य करणारी निरनिराळी राजघराणी कल्याणीच्या चालुक्या मांडलिक म्हणून राज्य करीत होती. १२ व्या शतकाच्या उत्तरार्धात, यादवांचा सम्राटवंश म्हणून महाराष्ट्रात उदय झाला. आणखी एक महत्त्वाचे राजघराने म्हणजे शिलाहाराचे. हेही मूळचे राष्ट्रकूटांचे मांडलिकच. परंतु नंतरच्या काळात काहीशा स्वतंत्र वृत्तीने त्यांनी कोकणात व दक्षिण महाराष्ट्रात राज्य केले. त्यांच्यातील शाखा ठाणे, बलिपत्तन (सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण) व पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर) येथून स्वतंत्रपणे राज्य करीत होता.

ठाण्याच्या शिलाहारांच्या आश्रयाने बांधलेले अंबरनाथ येथील शिवालय हे राष्ट्रकूटोत्तर काळातील सर्वात प्राचीन घडीव देवालय, मुम्मुणिराज शिलाहाराने (इ. स. १०४५-१०७०) त्याची स्थापन इ.स. १०६० मध्ये केल्याचा देवळातील शिलालेख उल्लेख आहे. कदाचित, हे देऊळ त्यानेच बांधले असावे. शिवालयाच्या शिखराची बरीच पडझड झालेली असली तरी ते कुठल्या धाटणीचे आहे हे ठरविण्यासाठी लागणारी बरीच सामुग्री उपलब्ध आहे. गाभारा आणि सभामंडप यांच्या बाह्यांगावर तरंगांची योजना केलेली असल्याने मंदिरावर ऊन-सावल्यांचा सुरेख खेळ बघावयास मिळतो. मंदिराच्या भिंतीतल्या तरंगांवर शैव आणी वैष्णव देवदेवतांच्या आख्यनांचे प्रसंग कोरलेले आहेत. नरसिंहादी दशवतारांबरोबरच विष्णूच्या चोवीस रूपांपैकी काही रूपांच्या मूर्ती आढळतात. गणेश, काली, महिषामर्दिनी या शैव परिवारातील देवतांबरोबरच शिवाच्या काही क्वचित आढळणाऱ्या लिंगोद्‌भव, यमान्तक या मूर्तीही दृष्टोत्पत्तीस येतात. सभामंडपातील खांब शिल्प व इतर अलंकरणांनी भरगच्च सुशोभित केले आहेत.

[next] अंबरनाथच्या शिवालयाच्या अगदी समकालीन असे माळव्यातल्या उदयपुरात उदयेश्वर नावाचे मंदिर आहे. माळव्यातच मूळ असलेल्या व बहरलेल्या भूमिज-शैलीचे प्रातिनिधिक व सर्वात प्राचीन असे उदयेश्वराचे देवालय समजले जाते. अंबरनाथचे देवालय त्याच्याशी मिळतेजुळते असून भूमिज-शैलीचेच गणले जाते, नागर आणि भूमिज या दोन्ही उत्तर भारतात विकास पावलेल्या मंदिर स्थापत्याच्या शैलीपैकी भूमिज शैलीपेक्षा नागर प्राचीन मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थानमध्ये नागर शैलीच्या मंदिरांची बरीच उदाहरणे आढळतात. या शैलीच्या मंदिराचे, म्हणजे प्रासादाचे, शिखर निमुळते होत जाणारे असून त्याच्या निरनिराळ्या पातळ्यांवर शिखराच्या लहानमोठ्या प्रतिकृती (शेखरी प्रकारचे शिखर) अथवा संपूर्ण शिखरावर चैत्य गवाक्षांचे पट्टेच्या पट्टे (लतिन प्रकारचे शिखर ) असतात. याच्या विरुद्ध भूमिज प्रासादाच्या शिखरावर चार मुख्य दिशांना चैत्यगवाक्षांचे पट्टे असून उरलेल्या शिखरांच्या भागावर प्रत्येकी तीन किंवा पाच शिखर प्रतिकृतींच्या उतरंडी रचलेल्या आढळतात. प्रत्येक उतरंडीत पाच, सहा शिखरांच्या प्रतिकृती (कूट) असतात उतरंडीत असलेल्या शिखरांच्या संख्येवरून तितक्या मजल्यांचे (भूमि) ते शिखर असे म्हटले जाते. भूमिज प्रासादाच्या गर्भगृहाचा आकार चौरस (चतुरस्त्र) अष्टकोनी (अष्टभद्र), किंव गोला (वृत्त) असू शकतो. भूमिज प्रासादाचे हे सर्व प्रकार मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व महाराष्ट्र या प्रदेशात आढळून येतात.

[next] माळवा ही भूमिज शैलीची जन्मभूमी असली तरी ही शैली वर उल्लेखिलेल्या इतर प्रदेशाप्रमाणेच महाराष्ट्रातही लोकप्रिय झाली. एवढेच नाही तर कोकणच्या शिलाहारांच्या व यादवांच्या राज्यात जी देवळे बांधली गेली ती बहुतांश चतुरस्त्र भूमिज प्रकारचीच होती. मध्य युगात प्रत्येक प्रदेशाची अशी शैली होती. भूमिज शैलीत आपले काही वैशिष्टयपूर्ण स्थापत्य घटक मिसळून महाराष्ट्राची भूमिज शैली बनली. या भूमिज शैलीत शेकडो मंदिरे महाराष्ट्रात बांधली गेली. बलसाणे (जि. धुळे) येथील मंदिर क्र.१ (इ. सनाचे ११वे शतक), झोडगे (जि. नाशिक) येथे महादेव मंदिर (इ. सनाचे १२वे शतक), सिन्नर (जि. नाशिक) येथील गोंदेश्वर मंदिर ( इ.सनाचे १३शतक); रतनवाडी आणि ताहाकारी (जि.अहमदनगर) येथील देवालये; गुर्साला(जि.सातारा) येथील, शिंगणापूर येथील शंभूमहादेव व अमृतेश्वर देवालय (जि.बुलढाणा) आणि कोकमठाण (जि. अहमदनगर ) ही काही उल्लेखनीय उदाहरणे म्हणून सांगता येतील. कोकमठाणच्या शिवमंदिराचे वैशिष्टय असे की त्याचे शिखर विटांनी बांधले असून, घाटणीवरुन ते मूळचे असावे असे वाटते.

गोदेंश्वर हे सर्वात वेगळेआहे; कारण मुख्य देवळाभोवती चार उपदिशांना आणखी चार देवळे आहेत. थोडक्यात ते पंचायतन आहे. मुख्य देऊळ भूमिज प्रकारचे असून उरलेली नागर-लतिन प्रकारची आहेत. यावरून असे सिद्ध होते की नागर प्रासादाचे यादवकालीन महाराष्ट्रात वावडे नव्हते असे दिसते. नागर प्रासादाचे इतर तुरळक उदाहरणे सांगावयाची झाल्यास अंजनेरी (जि. नाशिक ) येथील १२-१३ व्या शतकातील जैन मंदिरे, धोडांबे (जि. नाशिक) येथील वैष्णव मंदिर, आणि संगमेश्वर (जि. रत्नागिरी ) येथील मंदिरे म्हणून सांगता येतील.

[next]

खिद्रापूर येथील शिलाहार मंदिरे


खिद्रापूर येथील शिलाहारांनी उभारलेली मंदिरे ही वैशिष्टयपूर्ण आहेत. त्याचे कारण असे की महाराष्ट्रात नेहमी आढळणाऱ्या भूमिज शैलीतल्या मंदिरांपेक्षा ती वेगळि असून त्यांच्यावर कर्नाटकातील उत्तर चालुक्य कालीन स्थापत्याचा खोल ठसा उमटलेला दिसतो. उत्तरचालुक्य काळात (इ. सनाचे १०वे ते १२वे शतक) दक्खनमध्ये द्रविड व नागरशैलीचे मिश्रन असलेली शैली प्रादुर्भूत झाली. शिलाहारकालीन स्थापत्यात उत्तरचालुक्य शैलीतल्या सारखे स्तंभकार, सभामंडपाच्या भिंतीतल्या जाळीच्या खिडक्या या स्थापत्य घटकांच, तसेच अगदी वैशिष्टयपूर्ण अशा शिल्पशैलीच अंतर्भाव झालेला आहे. उत्तरचालुक्य-शैलीतले गोल खांब तर इतके वेगळे आहेत की ते लेथवर तयार केल्याइतके सुबक आहेत. हा चालुक्य शैलीतील स्तंभकार इतका आकर्षक होता की त्याचे चौरस व गोल हे दोन्ही आकार महाराष्ट्रात सर्वत्र प्रचलित होते.

दुर्दैवाने खिद्रापूरच्या दोन्ही मंदिरांची- म्हणजे जैन आणि कोप्पेश्वर महादेव यांची शिखरे मूळचि नाहीत. ती मराठकाळात परत बांधण्यात आली. नाही तर त्यावरून या शैलीबद्दल आणखि काही निश्चित सांगता आले असते. त्यातल्या त्यात कोप्पेश्वराचे मंदिर त्याच्या सांगोपांग स्थापत्य-रचनेमुळे, भरगच्च शिल्पसौंदर्यांमुळे आणि भव्यतेमुळे चटकन लक्ष वेधुन घेते. येथल्या सगळ्यात पुढच्या खुल्या मंडपाचे (त्याला स्थानिक लोक स्वर्गमंडप म्हणतात) तर गुजरातेतील मोढरा येथल्या सूर्यमंदिरातल्या मंडपाशी विलक्षण साम्य आहे.

[next] सिन्नर (जि.नासिक) येथील सरस्वती नदीच्या काठी आलेले आयेश्वर हे महाराष्ट्रातील खरेखुरे उत्तर चालुक्य शैलीतले मंदिर म्हणता येईल स्तंभ, अंतराळाच्या छतावरच्या दिवपाल पट, द्राविड पद्धतीचे शिखर या सर्वावरून त्याचे उत्तर चालुक्य कुलगोल सहज लक्षात येते.

वैनगंगेच्या काठावरील मंदिर समूहामुळेच चंद्रपूर जिल्ह्यातील या गावास मार्कंडी हे नाव मिळाले. मंदिरांवरील शिल्पसमृद्धी, स्थापत्यदृष्ट्या मध्यप्रदेशातील कलचुरी धाटणीच्या मंदिराशी असलेले साम्य, व खुजराहो येथील धर्मपंथाशी असलेली जवळीक यामुळे या मंदिराचा वेगळेपणा सहज लक्षात येतो.

येथील मंदिरात सगळ्यात सुंदर आहे मार्कंड-ऋषीचे देऊळ खुजराहोच्या मंदिरातल्या प्रमाणे या मंदिराच्या भिंतीवर शिल्पांचे एकावर एक असे तीन आडवे पट्टे आहेत. त्यावर अनेक चित्रविचित्र व्याल आणि निरनिराळ्या वेशभूषातल्या व हावभाव दाखवणाऱ्या अप्सरा आहेत. अधूनमधून रामायण-महाभारतातील कथाप्रसंग कोरले आहेत. मंदिराच्या एरवी साध्या वाटणाऱ्या अधिष्ठानावर थोड्या थोड्या अंतरावर बसविलेल्या आम्रभंजिकांच्या मुळे आकर्षकपणा आला आहे.

अष्ट वसू, हरि-हर-पितामहार्क, सुब्रह्मण्य, विलक्षण सदाशिव यांच्या मूर्ती, तसेच दिक्‌पालांचे स्वतंत्रपणे व शक्तीसमवेत मंडपावर व गाभाऱ्यावर चित्रण ह्या मूर्तिशास्त्रविषयक तसेच सांप्रदायिक वैशिष्टयामुळेही खुजराहोच्या स्थापत्य-परंपरेला जवळ वाटतात.

[next]

बारवा आणि वीरगळ


महाराष्ट्राच्या मंदिर स्थापत्याच्या बाबतीत आढळून येणारी वैशिष्टये, इतर स्थापत्य व शिल्पप्रकारात सुद्धा आढळून येतात. हे प्रकार म्हणजे बारवा (पायऱ्यांच्या विहिरी) आणि वीरगळ होत. यांची प्राचीनता महाराष्ट्रात आठव्या शतकापर्यंत जाते.

मंदिर व त्याच्या आसपासच्या परिसराला आलेले माहात्म्य व या परिसराला भेट दिल्याने पापक्षालन होते अशी भावना यामुळे या स्थळांना तीर्थक्षेत्राचे माहात्म्य आले. त्यामुळेच अशा ठिकाणी यात्रा भरविण्याची प्रथा सुरू झाली. आणि त्यातूनच अशा स्थळी स्नानकुंडे व बारवा बांधण्याचा प्रघात सुरू झाला असावा. अशा प्रकारच्या पायाविहिरी किंवा बारवा बांधण्याची कला प्राचीन महाराष्ट्रातील स्थपतींना आज्ञात नव्हती. चालूक्य आणि राष्ट्रकूट काळातील अशा बारवा ऐहोळी (जि. धारवाड) आणि कंधार (जि. नांदेड) येथे आजही वापरात आहेत. परंतु बारवा बांधण्याचा प्रघात जास्त करून यादव काळात जास्त प्रचलित झाला असावा. अशा प्रकारची यादवकालीन कुंडे किंवा बारवा अहमदनगर जिल्ह्यात खांबपिपरी येथे, धुळे जिल्ह्यात मेथी येथे, नांदेड जिल्ह्यात होट्टल येते, सोलापूर जिल्ह्यात वेळापूर येथे आणि सातारा जिल्ह्यात गुर्साला येथे दृग्गोचर होतात. बुलढाणा जिल्ह्यातील जिजामातेच्या जन्मगावी, सिंदखेडराजा येथे, अशा प्रकारच्या दोन बारवा आहेत. एक नीळकंठेश्वर मंदिराजवळ तर दुसरी हल्लीच्या गावाच्या किंचित्‌ बाहेर एका शेतात. त्यापैकी दुसरीला तर पुतळा बारव असेच नाव आहे. बारवेच्या भिंतीवर असलेल्या सुंदर शिल्पाकृतीमुळेच तिला हे नाव देण्यात आले आहे. देऊळ उभारताना जवळपास चांगला दगड काढता येईल अशी जागाच निवडत असत. दगड काढल्यानतर झालेल्या खानीच्या खड्ड्यात पाण्याचा जिवंत झरा लागल्यास त्याचे बारवेत रूपांतर करीत. अशा प्रकारच्या एका कुंडाचे अवशेष आजही सिन्नर येथील गोंदेश्वराच्या मंदिराजवळ दिसतात. बऱ्याच वेळा या बारवांच्या सोपानावरील विश्रामस्थाना- (landing) वर लहान लहान देवळ्या उभारलेल्या दिसतात. यातील भिंतीवर कोनाड्यातून आप्सरांची आणि देवतांची शिल्पे कोरलेली आढळतात. काही वेळा देवता शिल्पावरून ज्या भक्ताने ही बारव बांधलेली असेल त्याच्या सांप्रदाहिक ओढ्याची कल्पना येते. पुतळा बारवेत एका ठिकाणी ठळकपणे मच्छिंद्रनाथांची प्रतिमा बसविली आहे. बारव बांधणारा नाथपंथाचा असावा हे उघड आहे. आणि उत्तर काळात नाथपंथाच्या वाढत्या प्रसाराचेही ते निदर्शक आहे.

[next] पितरांना आणि मृत योद्ध्यांना उद्देशून, स्मारक शिला उभारण्याची प्रथा पश्चिम भारतात, विशेषतः राजपुताना, गुजरात व माळवा या भागात, उगम पावली असे दिसते. गाईचे रक्षण करताना मरण पावलेल्या व योद्ध्यांना उद्देशून उभारलेल्या स्मारक शिलांचा पश्चिम भारतात गोवर्धन या नावाने तर पितरांच्या व सतींच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या स्मारकशिलांचा पालिय या नावाने उल्लेख केला जातो.

महाराष्ट्रआणि कर्नाटकात मृत योद्ध्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या शिल्पांकित शिळांना वीरगळ म्हणतात. कोरड्या हवामानाच्या कुरणाच्या भागात साहजिकच पशुरक्षणाला अथवा गोरक्षणाला महत्त्व होते. त्यांचे रक्षण करताना सद्‌गती मिळालेल्या योद्ध्यांच्या स्मरणार्थ स्मारक-शिला उभारण्याची प्रथा प्रचलित झाली. महाराष्ट्रात प्रचलित असलेले आणखी स्मारक-शिलांचे दोन प्रकार म्हणजे धारातीर्थी पडालेल्या योद्ध्यांच्या स्मरणर्थ उभारलेली वीरगळे व अशा योद्ध्यांच्या बरोबर सहगमन करणाऱ्या सतीच्या स्मरणार्थ उभारलेल्या सतीशिला, कोल्हापूरच्या टाउन हॉल म्युझियममधील वीरगळ आणि बीड (जि. कोल्हापूर) येथे अशा वीरगळ आणि सतीशिलांचा प्रतिनिधिक संग्रह आहे. सागरी युद्धात मरणा पावलेल्या नाविक योद्ध्यांच्या स्मरणार्थ बोरिवलीजवळ एक्सर येथे वीरगळ आहेत. काही वेळा तर आध्यात्मिक कारणासाठी मृत्यूला समोऱ्या जाणाऱ्यांच्या स्मरणार्थही शिला उभारलेल्या दिसतात. सोपाऱ्या जवळील निर्मळ येथे बौद्ध व शैव साधूंच्या स्मरणार्थ शिळा उभारल्या आहेत.

स्मारक शिलांच आकार आणि त्यांची ठेवण या बाबतीतही गुजरात-राजस्थान भागातील परंपराचे महाराष्ट्रात अनुकरण झालेले दिसते. राजस्थानमधल्या गोवर्धन-शिळांप्रमाणेच चालुक्य व यादव-काळातील वीरगळे चुकोनी स्तंभाच्या आकाराची होती असे दिसते; तर नंतरच्या काळात गुजरातमधल्या पालियाप्रमाणे सपाट शिळा वीरगळासाठी आणि सतीसाठी वापरण्याची प्रथा पडलेली दिसते. या चौकोनी स्तंभाच्या आकाराच्या होती असे दिसते तर नंतरच्या काळात गुजरातमधल्या पालियाप्रमाणे सपाट शिळा वीरगळासाठी आणि सतीसाठी वापरण्याची प्रथा पडलेली दिसते. या चौकोनी स्तंभाच्या आकाराच्या वीरगळावर मृतांशी संबंधित अधिकाधिक देव-देवतांची शिल्पे कोरण्यासाठी जागा होती; तर सपाट शिळांवर एकादी इष्ट-देवतांची कोरण्याची प्रथा पडली. सपाट शिळेवर कोरलेले प्रसंगही ठराविक क्रमाने येतात असे दिसते. त्यात तीन अथवा चार चौकटी असून त्यात खालून अनुक्रमे (१) युद्ध प्रसंग, (२) मृताचा चितेवर जळत असलेला, प्रसंगी सपत्नीक, देह (३) वीराचे अप्सरासह स्वर्गगमन आणि (४) परलोकात वीराकरवी इष्ट देवतेचे पूजन. अशा प्रसंगाचे चित्रण आढळते. अशा इष्ट-देवतांमध्ये बहुतकरून शिवलिड्‌गाचे, पण प्रसंगोपात महालक्ष्मी अथवा जिनाचेही चित्रण आढळते.

[next] महाराष्ट्राचे मंदिर स्थापत्याचा विचार करता असे आढळते की त्याच्या इतिहासातील पूर्व काळात गुंफास्थापत्याचे अधिक प्राबल्य दिसते. गुप्त काळामध्ये या परिस्थितीला वेगळे वळण मिळाले. गुप्त आणि वाकाटकांच्या जवळच्या संबंधामुळे घडीव पाषाणस्थापत्याची खऱ्या अर्थाने सुरवात झाली व नंतर विकासही झाला. महाराष्ट्रात या अगोदरच्या काळापासून विटांच्या व लाकडी स्थापत्याचे नमुने होते. त्याचे काही वाकाटक काळाच्या आसपासचे नमुनेही मिळतात. चालुक्य व राष्ट्रकूट काळात काही अपवाद सोडता रचनात्मक स्थापत्याची फारशी वाढ झालेली दिसत नाही. ती वाढ उत्तर चालुक्य, शिलाहार व विशेषकरून यादवांच्या आश्रयानेच झाली. महाराष्ट्रातील रचनात्मक स्थापत्यात दक्षीणेतील काही महत्वाच्या घटकांचे सात्मीकरण झालेले दिसते; पण ते मूलतः भूमिज शैलीचेच आहे. पुढे महाराष्ट्रात याच शैलीची वाढ झाली. आणिअसे असले तरी नागरी शैली अथवा उत्तर चालुक्यांचे किंवा कलचुरींचे स्थापत्य याचे महाराष्ट्राला वावडे नव्हते सभोतालच्या सांस्कृती प्रेरणाचे महाराष्ट्राने नेहमीच स्वागत केले आणि त्यांच्या सात्मीकरणातून आपला सांस्कृतिक आदर्श निर्माण केला. अशा प्रकारच्या प्रक्रियेतूनच तो भारताच्या इतिहासात उत्तर आणि दक्षिण यांच्या मधला एक महत्त्वाचा दुवा ठरला आहे.

- अरविंद जामखेडकर


संपादक मंडळ | Editors
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.