मराठीमाती डॉट कॉमचे सभासद लेखक उपेंद्र शेळके यांचा हे पांडुरंगा... तुझ्या भक्तांना सद्बुद्धी दे! हा मराठी लेख.

हे विठ्ठला, हे थांबायलाच हवं! कारण अजूनही तुझी जात कुणालाच माहिती नाही...
हे पांडुरंगा... तुझ्या भक्तांना सद्बुद्धी दे
उपेंद्र शेळके (बीड, महाराष्ट्र)
“जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा” - संत तुकाराम महाराज
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्म दिलं, संत तुकारामांनी तत्त्वज्ञान, नामदेवांनी भक्ती, एकनाथांनी सहिष्णुता आणि माणुसकी शिकवली, चोखामेळ्यांनी समतेसाठी झुंज दिली, गोरा कुंभारांनी कर्मयोगाचं महान तत्त्व शिकवलं आणि सावता माळ्याने श्रमशील भक्तीचं जिवंत उदाहरण घालून दिलं.
ही तीच भूमी आहे जिथे वारीत कोट्यवधी पावलं तुझ्याकडे चालत येतात — प्रेमपोटी, भक्तीपोटी तुझ्या अस्तित्वाला साकडं घालायला! ही भूमी वारकरी परंपरेची आहे, इथे संत परंपरेतून विषमता नाहीशी झाली होती. तिथं ‘माणूस’ म्हणून पाहिलं जात होतं – ‘जात, धर्म, वर्ण’ म्हणून नव्हे. पण हे विठ्ठला! आज परिस्थिती खूपच बिकट आहे. आज इथे प्रत्येकजण देव, संत, मंदिर... सगळं आपल्या जातीच्या चष्म्यातून पाहतो आहे. कोणत्या जातीचा संत, कोणत्या जातीचा देव, कोणत्या जातीचा नेता... हा भेदभाव इतका खोल रुतला आहे की –गुन्हेगार, अत्याचारी, भ्रष्टाचारी... केवळ आपल्या जातीचा आहे म्हणून त्याचं समर्थन केलं जातंय.
हे विठ्ठला, हे थांबायलाच हवं! कारण अजूनही तुझी जात कुणालाच माहिती नाही. तू अजूनही सर्वांचा आहेस, तुला सर्व आपलं मानतात – म्हणूनच तू सर्वांमध्ये बदल घडवू शकतोस आणि विषमतेची परिस्थिती बदलू शकतोस आणि हे थांबवण्याची ताकद तुझ्यातच आहे.
हे विठ्ठला, पांडुरंगा, भान हरवलेल्या, भरकटलेल्या, दिशाहीन आणि विवेक हरवलेल्या पोरांना समज दे, की त्यांचा जन्म हा आईबापाच्या अपार कष्टांमुळे झालेला आहे. त्यामुळे त्यांना सांग — नेत्याला ‘बाप’ मानणं सोडून द्यावं. आईबाप नसते तर ते या मातीत दिसलेही नसते —ह्याची सद्बुद्धी त्यांना मिळू दे. त्यांना समज दे —की खऱ्याला खरं मानावं, सत्याचं समर्थन करावं आणि असत्य आणि वाईट, नीच प्रवृत्तींचा निडरपणे निषेध करावा आणि वेळ आलीच तर अशा प्रवृत्तीला ठेचून काढावे.
हे विठ्ठला, पांडुरंगा, हेही त्यांना सांग की —
भ्रष्ट अधिकारी, राजकीय नेते, स्वजातीय गुंड, अत्याचारी आणि शोषित लोकांच्या विरोधात उभं राहायला हवं. हे सर्व लोक कुणाचेच नसतात — हे सर्व लोक स्वार्थाने, पैशाच्या लालसेने,मोहाने हपापलेले असतात ते आपले कधी होतील किंवा ते आपले आहेत हा गैरसमज त्यांचा दूर कर.
हे विठ्ठला, पांडुरंगा, क्रूर, कमी आणि भ्रष्ट नेत्यांना, आणि माजलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना अर्धांगवायूचे झटके येऊदे, म्हणजे त्यांचे चेलेचपाटे तरी नैतिकतेच्या किमान दोन गोष्टी शिकतील.
हे विठ्ठला, पांडुरंगा...
संत तुकडोजी महाराजांच्या ओळीप्रमाणेच
पालकांना समज दे की जर वडिलांनी आपल्या मुलाला शिकवलं नाही तर तो पापाचा भागीदार ठरतो —जसं जन्म देणं एक कर्तव्य आहे तसंच चांगलं शिक्षण देणं हेही त्याचं पवित्र कर्तव्य आहे. पालकांनी मुलांना उत्तम शिक्षण, सद्गुण, नीतिमत्ता, नैतिकता, चांगलं आचरण, लोकांविषयी आदर, ममत्वभाव आणि सुसंस्कार द्यायला हवेत. पालकांनी कोणत्याही चुकीच्या वागणुकीला थारा देऊ नये, चुकीचं वागणं योग्य ठरवू नये कारण जे आज समर्थन केलं जातं तेच उद्या मुलांच्या स्वभावाचं आणि भविष्याचं आरसपानी ठरतं.
नाहीतर पुढची पिढी आपल्या वडिलांच्या चुकीच्या कृत्यांमुळे घृणा, लाज आणि अपराधीपणाच्या सावटाखाली जगेल. ते घडू नये — म्हणूनच, हे पांडुरंगा पालकांना चांगली समज दे!
हे विठ्ठला, पांडुरंगा,
तुझ्या भक्तांना सद्बुद्धी दे. त्यांना सांग की गर्वाचं घर नेहमीच खाली होतं. गर्व, मस्ती, माज माणसाला विनाशाकडे घेऊन जातात. रावणाचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं ते फक्त गर्वामुळे.
सिकंदरने जग जिंकलं पण शेवटी दोन्ही हात रिकामे ठेवून गेला.
हिटलर स्वतःला देव मानणारा हुकूमशहा; ज्याच्या अहंकाराने जगात युद्धाचा नरक माजवला पण शेवटी एका अंधाऱ्या बंकरमध्ये त्याचं अस्तित्व संपलं.
अशा लोकांना जगाचा नकाशा दाखव; जेणेकरून त्यांना त्यांची खरी जागा आणि अस्तित्व समजेल.
हे विठ्ठला, पांडुरंगा...
वकिलांना सद्बुद्धी दे...
त्यांच्या ज्ञानाचा वापर फक्त पैसा मिळवण्यासाठी नव्हे, तर विस्थापित, गरजू, पीडित आणि अबोल माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी व्हावा. हे विठ्ठला, पांडुरंगा तुला ठाऊक आहे —कधी कधी न्यायालयात खरी वेदना बोलत नाही, ती शब्दात हरवते, कागदांमध्ये दडते, आणि पैसा बोलतो... म्हणूनच वकिलांनी शब्दांची तलवार सत्यासाठी उपसावी, अन्यायाच्या भिंतीवर वार करावा.
गरिबांचे अश्रू हेच खरे साक्षीदार असतात; ते ऐकणं हीच खरी वकिली आहे. हे देवा, ते त्यांच्या बुद्धीला नीतिमत्तेचं बंधन लावू देत, सत्यासाठी लढणं हेच त्यांचं धर्म मानू देत. न्यायाला माणुसकीचा चेहरा मिळवून देणं हाच त्यांचा खरा विजय ठरू दे.
हे विठ्ठला, पांडुरंगा...
डॉक्टरांना सद्बुद्धी दे...
की देवाच्या रूपात दिलेलं त्यांचं स्थान पैशाच्या हव्यासाने कलंकित होऊ नये. रुग्ण हे ‘क्लायंट’ नाहीत — ते जीव आहेत. ते दुःखात असतात, विवश असतात, त्यांच्या डोळ्यांत भीती असते, पण मनात तुझ्यावर श्रद्धा असते. त्यांच्या हातात प्राण आहे —तेव्हा प्रत्येक उपचारात करुणा असू दे आणि अनुभवात नम्रता असू दे. डॉक्टरांचे हात फक्त सुई टोचणारे नसावेत, तर रुग्णाच्या काळजात दिलासा देणारे असावेत. रुग्णाला फक्त औषध नको असतं! त्याला हवं असतं डॉक्टरच्या डोळ्यांतलं आश्वासक हसू, हृदयातून उमटणारी काळजी आणि शब्दांतली ममता.
हे विठ्ठला, पांडुरंगा...
शिक्षकांना समज दे...
की त्यांचा आवाज फक्त वर्गात नको तर मुलांच्या मनातही घुमायला हवा. ते जे शिकवतात ते फक्त पाठ नाही तर ते एक आयुष्य घडवतात! हे ते विसरू नयेत. त्यांच्या शिकवणीत शब्दांबरोबर माणुसकी असावी आणि त्यांच्या वागणुकीत नम्रतेची सावली असावी. शब्द हे पुस्तकातून मिळतात पण संस्कार हे शिक्षकाच्या वागणुकीतूनच झिरपत जातात. शिक्षण म्हणजे केवळ गुणांपर्यंत मर्यादित नको तर मूल्यांपर्यंत पोहोचणारं असावं.
हे विठ्ठला, पांडुरंगा...
तू त्या शिक्षकांना आरसा दाखव —जे स्वतःची मुलं इंग्रजी शाळेत घालतात आणि मराठी शाळा वाचवा म्हणतात. मराठी शाळा गरिबांसाठी नाही, त्या आपल्या मातीच्या ओंजळीतल्या जपलेल्या मूळांसाठी आहेत.
स्वतः मात्र इंग्रजी शाळेत मुलं घालून, मराठी शाळांबद्दल उपदेश करणं —हा दुटप्पीपणा संपव.
हे विठ्ठला, पांडुरंगा...
कारखानदार, भांडवलदार आणि उद्योगपतींना सांग
– सामाजिक दायित्व जपायला, गरजू व उपेक्षित घटकांना मदतीचा हात द्यायला हवं तुमचा पक्का माल निसर्गाच्या कुठल्यातरी घटकावर आधारलेला असतो — हवा, पाणी, जमीन, आकाश या साऱ्याच सर्वसामान्यांचा हक्काचा वाटा आहेत.
म्हणूनच जेवढं निसर्गाचं तुम्हाला देणं आहे, तेवढं समाजाचंही तुम्हावर काही देणं आहे. म्हणून हे विठ्ठला त्यांना सद्बुद्धी दे –की त्यांनी आपला वाटा फक्त नफ्यात पाहू नये, तर समाजासाठीही काहीतरी परत द्यावं! हेच खऱ्या अर्थानं त्यांचं दायित्व आहे.
विठ्ठला, पांडुरंगा... या साऱ्या प्रार्थना तुझ्या चरणी अर्पण करतो... तू समाजाला सद्बुद्धी दे! माणुसकीचा मार्ग दाखव आणि माणूसपण जपायला शिकव!
॥ श्रीहरी विठ्ठल ॥
अभिप्राय