साथिया भाग ६ (प्रश्न) - मराठी कथा

साथिया भाग ६,मराठी कथा - [Sathitya Part 6,Marathi Katha] सहवासाने, मनाने आणि भविष्याच्या स्वप्नांनी एकरूप झालेल्या शिष्य आणि त्याच्या गुरुची रंजक कथा.
साथिया भाग ६ - मराठी कथा | Sathiya Part 6 - Marathi Katha

सहवासाने, मनाने आणि भविष्याच्या स्वप्नांनी एकरूप झालेल्या शिष्य आणि त्याच्या गुरुची रंजक कथा


प्रश्न
जुलै - २०२० (मुंबई)

विश्वजीतचा जो अंदाज होता तेच घडलं होतं. कोरोना बाधितांचा आकडा कंट्रोलबाहेर वाढला होता. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा महानगरात हॉस्पिटल्स आणि रुग्णसेवांवर प्रचंड ताण आला होता. अशा वेळेस लोकप्रक्षोभ टाळायला सरकारला काहीतरी ठोस पावलं उचलणं भाग होतं. अशा वेळेस, कार्यक्षम आणि तरुण धडाडीच्या मंत्र्याच्या हातात आरोग्यमंत्रालय देणं ह्याने दोन गोष्टी साध्य होणार होत्या. कंट्रोल मिळवता आला तर सरकारचं कौतुक, नाही आला तर ठपका ठेवायला बळीचा बकरा म्हणून विश्वजीतचा बळी द्यायला हरकत नव्हतीच. नाहीतरी, भावी काळातील मुख्यमंत्री म्हणून त्याचा केलेला उल्लेख बऱ्याच जणांना मनातून खुपत होताच. पक्षश्रेष्ठींनी होकार दिल्यावर रातोरात सूत्र विश्वजीतकडे आली होती. आधीच थकलेल्या यंत्रणेला पुनर्जीवित करायला लागणार होतं. स्टाफला मोटीव्हेट करणं गरजेचं होतं, लोकांना शांत करणं गरजेचं होतं, त्यांच्या मनात सरकारी कार्यक्षमतेवर विश्वास निर्माण करणं आवश्यक होतं.

सरकारी यंत्रणा + खाजगी हॉस्पिटल्स + सेवाभावी संस्था + केंद्र सरकारची मदत + लोकसहभाग + औषधकंपन्या + डॉक्टर व ओरोग्यकर्मी यांच्या एकत्रित समन्वयाशिवाय हे नियंत्रीत होणं अशक्य होतं. आता झटपट पावलं उचलायला हवी होती.

“वैदेही! I miss you so much!” अशा युध्दजन्य परिस्थितीत त्याला वैदेहीची प्रकर्षाने आठवण येत होती. कृष्ण जसा अर्जुनाचा पाठीराखा तसा वैदेही त्याची कणा होती. प्रत्येक गोष्टीकडे विविध दृष्टिकोनातून बघणं, त्याचं विश्लेषण करणं, आणि प्रत्येक प्रॉबल्मची तुकड्यांमधे फोड करुन शिस्तबद्ध नियमन करणं ही तीची खासियत होती. तिने आपल्या हाताखालच्या टिमला तसचं तयार केलं होतं पण तिचा वास्तववादी अ‍ॅप्रोच, सारासार विवेकबुद्धी, आणि दूरदृष्टी ते कुठून उसनी आणणार?! ती असती तर ऐव्हाना संपूर्ण आराखडा तयार झालेला असता.

त्यांनी सचिवांना फोन केला आणि खासगी आणि प्रायव्हेट हॉस्पिटलच्या प्रमुखांची तातडीने मिटींग बोलवायचा हुकूम दिला. मुंबईतल्या प्रमुखांशी प्रत्यक्ष तर महाराष्ट्रातील प्रत्येक हॉस्पिटलच्या प्रमुखांशी तो आज ऑनलाईन संवाद साधणार होता.

हॉस्पिटलांना किमान आणि कमाल दरपत्रक देणं गरजेचं होतं.

कुठल्याही हॉस्पिटलमधे लोड वाढता कामा नये याकरता, आजारांच्या तिव्रतेप्रमाणे ICU पेशंट्स, ईतर आजारांनी ग्रस्त आणि कोविड पॉझीटीव पेशंट्स, नुसते बाधित, अशा लेव्हलनी नियमन व उपचार करणे गरजेचे होते. हॉस्पिटल स्टाफला राहण्यासाठी जवळची हॉटेल्स, शाळा, हॉस्टेल ताब्यात घेणे गरजेचे होते...!

प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तिथल्या आरोग्य यंत्रणांना आणि प्रमुखांना भेट देऊन प्रश्न समजून घ्यायची आवश्यकता होती. विश्वजीतने धडाधड सूचना द्यायला सुरुवात केली. मंत्रालयातल्या ५०% कर्मचाऱ्यांना हजर रहायचे हुकूम सुटले. दिवसा एक शिफ्ट आणि रात्री दुसरी शिफ्ट अशा शिफ्ट मधे पूर्ण स्टाफची वाटणी करावी लागणार होती.

पुढचे काही महिने म्हणजे अक्षरशः कुरुक्षेत्रावरची लढाई होती. या लढाईला तोंड लागायच्या अगोदर कोल्हापूरला जाणं आणि घरातल्यांना एकदा भेटून येणं आवश्यक होतं. देवयानीची त्याला कधीच फार काळजी नव्हती. पण आता त्याची मुलगी वाड्यात होती. वाड्यात आणि शेतीवर, कारखान्यात भरपूर स्टाफ होता. दादासाहेबांपासूनची जूनी आणि म्हातारी नोकर माणसं होती. त्यांना धीर देणं आवश्यक होतं. एकदा सगळी व्यवस्था चोख लावणं गरजेचं होतं. नंतर सहा महिने तरी आपण येऊ शकणार नाही हे त्याला समजून चुकलं होतं.

मुलीचा विचार मनात आला तसं विश्वजीतच्या चेहर्‍यावर एक प्रसन्न हास्य आलं. वैदेही, त्याची सात वर्षांची मुलगी म्हणजे नुसता उत्साहाचा झरा होती. उद्योगी आणि बडबडी. बारशाच्या दिवशी, देवयानीने तिचं नावं वैदेही ठेवल्यावर विश्वजीत चमकला होता. त्याचं आणि वैदेहीचं भांडण होऊन वैदेही निघून गेलेली आहे हे देवयानीला माहिती होतं. त्या मागचं कारण विश्वजीतने कधीच देवयानीला सांगितलं नाही तरी, देवयानी वैदेहीला भेटायला तिच्या घरी गेली होती, हे यशवंत ने (वैदेहीच्या ड्रायव्हरने) त्याला सांगितलं होतच. वैदेहीचं कायमच्या निघून जाण्यामागे देवयानीचा निश्चितच काही अंशी हात होता ह्याची कल्पना विश्वजीतला होतीच. मुद्दामहून मुलीचं नाव वैदेही ठेवणं आणि नंतर इतक्या लहान वयात तिला पाचगणीच्या बोर्डींगला त्याच्या पासून दूर ठेवणं ह्या दोन्ही गोष्टी विश्वजीतला क्लेशदायक होत्या. त्यामुळे मुलगी झाल्यावर, देवयानीशी नातं सुधारण्या ऐवजी अजूनच दुभंगलं होतं.

मुल झाल्यापासूनच विश्वजीतचा व्याप प्रचंड वाढला होता, तो इतका कामात गढला होता की त्याला तिच्या बरोबर फार कमी वेळ मिळे. देवयानी आई असली तरी तिचा स्वभाव हा कौटुंबिक आणि संसारी स्त्री सारखा कधीच नव्हता. तिच्या महिला मंडळाच्या मिटींग, वेगवेगळ्या कमिटीच्या बैठका, इव्हेंटचे उद्घाटन, कारखान्यात व्हीजीट्स आणि उर्वरित वेळात मैत्रिणी, योगा, जिम, नेटफ्लिस्क नाहीतर इतर चॅनलवरच्या सिरियलस अशा उद्योगात ती रमलेली असे. या करताचं तिने मुलीला पहिली पासूनच अतिशय महागड्या आणि उच्चभृंच्या मुलांकरता असलेल्या पाचगणीच्या बोर्डींगस्कूल मधे घातले होते. इतक्या वर्षात देवयानी स्वतःचा फॉर्म अगदी सुरेख ठेवला होता. पण त्या बाह्यरुपाकडे बघून विश्वजीतला कचकड्याच्या बाहुल्यांची आठवण येई. त्याला स्वतःची, सात्विक, सोज्वळ आणि प्रेमळ आईची मूर्ती आठवे. घर, मुलं, करिअर तेवढ्याच यशस्वी पणाने सांभाळणारी, मुलीचे प्रोजेक्ट्स, अभ्यास, वाचन लक्ष घालून करुन घेणारी वैदेही आठवे. मुलांना केवळ महागड्या शाळेत घातलं म्हणजे आपलं कर्तव्य पार पडलं हे विचार त्याला अजिबात पटत नसत. मुलांना आई वडीलांचा सहवास आणि त्यांची इमोशनल इन्व्हेस्टमेंट लागते हे ठावूक होते त्याला पण त्याचा नाईलाज होता. स्वतःच्या नोकरीतल्या व्यस्ततेमुळे त्याला कधीच मुलीबरोबर वेळ घालवता येत नसे, कधी तिच्या शाळेत जाता येत नसे कधी तिचा अभ्यास घेता येत नसे.

आज तिला भेटणं आवश्यक होतं. सकाळची मिटींग संपवून लगेच निघाला तर संध्याकाळच्या आत कोल्हापूर गाठता आलं असतं.

मिटींगची वेळ झाल्याच्या रीमांईडरनी विश्वजीत भानावर आला. मुंबईतल्या बऱ्याच मोठ्या हॉस्पिटलचे व्यवस्थापन प्रमुख जातिने मिटींगला हजर होते बाकीचे ऑनलाईन झुमवर उपस्थित होते. मिटींगमधे चर्चा करताना विश्वजीतचे लक्ष पुन्हा पुन्हा एका डॉक्टरकडे जात होते. आपण कुठेतरी पाहिलंय या माणसाला हे फीलींग येत होतं. अचानक, त्या डॉक्टरचा अमेरिकेन अॅक्सेंट ऐकून विश्वजीतच्या लक्षात आलं की हाच वैदेहीचा डॉक्टर मीत्र, जो अनिरुद्ध गेल्यावर तिला भेटायला आला होता, ज्याच्याशी वैदेहीने लग्न केलंय. नकळत त्याच्या कपाळावर आठी आली. डॉक्टरकडे बघता बघता... वैदेहीने काय पाहिलं या माणसात? असा कडवट विचार आल्याशिवाय राहीला नाही.

“म्हणजे वैदेही भारतात आहे!? मुंबईत? कीती वर्षे? मला येऊन भेटावंस वाटल नाही का तिला? ...विश्वजीतच्या मनात एका क्षणात अनेक विचार येऊन गेले.

मिटींग प्राथमिक दृष्टीने अतिशय यशस्वी झाली होती. विश्वजीतने सुचवलेल्या बदलांना डॉक्टरची मंजूरी होती. संपूर्ण महाराष्ट्रातील १५ तज्ञ डॉक्टर्सची कमिटीचं नेमली होती. त्यात वैद्यकीय उपचार, औषधे, रोगप्रसार नियंत्रण आणि इम्युनिटी बुस्टींग याबद्दलचे महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार होते आणि माहीती प्रसारित होणार होती. प्रत्येक हॉस्पिटल व डॉक्टरांना ह्या नियमानुसार, उपचारामधे एकसूत्रता आणता येणार होती. लोकांपर्यंत अतिशय वास्तव आणि मेडीकली आँथेंटीकच माहीती पोहोचणार होती. लोकांनी चूकींचे उपचार व माहीती पसरवून गैरसमज वाढवू नयेत ह्या करता नागरिकांना आवाहन करण्यात येणार होते.

“So?! Doctor?! Since when did you came back from USA?” मिटींग नंतर विश्वजीतशी बोलण्यासाठी आलेल्या डॉक्टरांमधे, अचानक या डॉक्टरला विचारलेल्या प्रश्नाने, तो गडबडून गेला. Excuse me?! Sir! How do you know, I was in USA? मी जवळ जवळ १० वर्षापूर्वीच भारतात आलो.

“म्हणजे, अनिरुद्ध गेले, त्यावेळेस तुम्ही भारतात आला होतात, ते इथेच राहिलात? विश्वजीतची उत्सुकता आता ताणली होती. So, how is Vaidehi now? वैदेही कशी आहे?
आता मात्र आश्चर्यचा धक्का बसायची पाळी त्या डॉक्टरची होती.
Sir! Extremely sorry, but have we met before?
विश्वजीतने त्याला अनिरुद्ध आणि वैदेहीच्या घरी आपणं भेटलो होतो हे सांगितल्यावर डॉक्टरांना एकदम ओळख पटली!!
ओह! विश्वजीत, काय योगायोग आहे. ग्रेट and extremely nice to meet you again!
“And I am sorry”, डॉक्टर पुढे म्हणाले, “पण माझा आणि वैदेहीचा सुध्दा संपर्क नाही गेले काही वर्षे. As far as I know, she was in US with Prakash पण नंतर ती काही दिवसांनी भारतात परत आली! OK sir, I will take your leave, म्हणून डॉक्टर निघाले.

विश्वजीतचा पल्सरेट एकाएकी वाढला, एकीकडे मनात हजारो प्रश्न एकदम आदळायला लागले. वैदेहीने लग्न केलचं नाही? मग मला असं का सांगितलं प्रकाश दादांनी?! आणि वैदेही अमेरिकेत नाही, भारतात आहे तर कुठे आहे नक्की? माझ्या पासून का लपवून ठेवल तिने?! हि उत्तरं खरंतर अबोलीला फोन करुन मिळाली असती पण विश्वजीतने सात वर्षांत एकदाही फोन केलेला नव्हता. त्यानेही सगळा संपर्क तोडला होता. त्याला वैदेहीचा भयंकर राग आला आणि तीने लग्न केलं नाही ऐकून मनावरचं ओझं निघून गेल्यासारखं हलकं वाटलं. “माझ्याशी का खोटं बोललीस वैदेही? भारतात येउन सुध्दा तुला माझ्यशी बोलावसं वाटलं नाही ?? असा मी काय गुन्हा केला होता?”

पण ह्या सगळ्या विचारांना आत्ता अर्थ नव्हता. तातडीने कामं आटोपून कोल्हापूरला जाणं आवश्यक होतं. त्याला जेमतेम आजची संध्याकाळ आणि उद्याचा दिवस मिळणार होता. परवापासूनचं शेड्युल लागलेलं होतं. वाड्यात गेल्यावर त्याच्या मुलीने, उत्साहाने केलेल्या स्वागताने त्याला बऱ्याच दिवसांनी खरोखर घरी आल्यासारखं वाटलं. देवयानी तिच्या जिम आणि अॅरोबिक्सच्या ट्रेनरकडे गेलेली होती. एक उसासा टाकून विश्वजीतने आंघोळ करुन कपडे बदलले. तिन्ही सांजा होऊन गेल्या होत्या. देवयानीचा पत्ता नव्हता. विश्वजीतने मुलीला बरोबर घेऊन देवघरात जाऊन दिवा लावला. देवघराशेजारी लावलेल्या त्याच्या आई-दादासाहेबांच्या फोटोला दोघांनी नमस्कार केला. नेहमीच्या सवयीने विश्वजीतने शुभंकरोती आणि रामरक्षा सुरू केली. वैदेहीला स्तोत्र पूर्ण म्हणता येत नव्हते तरी ती लक्षपूर्वक तिच्या बाबाकडे बघत होती. त्याच्या सारखीच मांडी घालून हात जोडून बसली होती. रामरक्षा पूर्ण करुन विश्वजीतने पुन्हा एकदा नमस्कार केला.

“बाबा!! तु पण voice modulation आणि public speaking येण्यासाठी रामरक्षा म्हणतोस का??”
“नाही ग बेटा! हे तुला कोणी सांगितलं? विश्वजीत हसत म्हणाला! त्या छोट्याश्या पोरीच्या तोंडात असे अवघड शब्द मजेशीर वाटत होते.
“अरे! आमच्या मॅम म्हणतात, की रामरक्षाने तुमचा speech एकदम clear होतो म्हणून. माझी नाही का काँपिटीशन होती काही महिन्यांपूर्वी?! त्या वेळी आम्हाला सगळ्यांबरोबर मॅम नी खुप छान ट्रेनिंग दिलं होतं. इंग्लिश मधले toung twisters आणि मराठी मधले पण. तू मगाशी रामरक्षा म्हणालास ना...”
त्यातलच एक सेंटेन्स आहे बघं...

आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषंगसंगिनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम्‌ ॥

ते त्या कायम म्हणून घ्यायच्या आमच्या कडून!!

अचानक वीज पडावी आणि आसमंत प्रकाशमान व्हावा असं झालं विश्वजीतला! घशात आवंढा आला. त्याने प्रेमाने वैदेहीला जवळ घेतलं.
“अच्छा!!? बेटा that's so true. मला माहीत नव्हतं. कोण या तुझ्या मॅम?”
पण तीचं उत्तर ऐकायच्या आधीच विश्वजीतला त्याचं उत्तर मिळालेलं होतं! त्याची वैदेही परत आलेली होती.

क्रमशः
स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.